रविवार, १६ जानेवारी, २०२२

"शारदोत्सव": "जावे, कवितांच्या गांवा !:

 "शारदोत्सव":                                                         "जावे, कवितांच्या गांवा !":


आज, रविवार दि. १६ जानेवारी'२२ 'म टा संवाद पुरवणी'मध्ये 'कवितेचे सगे' हा कवि हेमंत गोविंद जोगळेकर यांचा लेख अथपासून इतिपर्यंत एका दमात वाचला. एके काळच्या होतकरू कवीने, प्रथितयश कवी मंगेश पाडगावकर ह्यांच्या बरोबरच्या सहवासाच्या आठवणी-त्याच्या पुरस्कारप्राप्त 'होड्या' ह्या पहिल्याच कवितेपासून सुरू झाल्यानंतर आतापर्यंतच्या, मनमोकळेपणाने फुलवत केलेले हे एक आत्मचिंतन आहे. असे जरी असले तरी, हा लेखक-कवी वाचकांनाही त्याच्या मंगेश पाडगावकरांबरोबरच्या सहवासाचा क्षण अन् क्षण जागवत बरोबर नेतो, हे या लेखाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

ह्या वाचनीय लेखातील शेवटच्या ओळी, प्रस्तुत लेखककवीबद्दल व कविवर्य पाडगावकरांबद्दल देखील खूप खूप काही सांगून जातात, यातच ह्या लेखाचे सार व सामर्थ्य आले ! त्या ओळी अशा:

"पाडगावकरांकडून मला काय मिळाले, असा विचार जेव्हां मी करतो, तेव्हा मायकेल एंजेलोची प्रसिद्ध उक्ति आठवते:

"शिल्प हे दगडात असतेच, मी फक्त ते दाखवण्याचे काम करतो !"
मी कवी होतोच; पण ते इतरांना आणि मलाही दाखवण्याचे काम पाडगावकरांनी केले. हे ऋण न विसरण्याजोगे आहे."

कवितेतून नुसते 'बघे'च नव्हे, तर जीवाभावाचे 'सगे' निर्माण करणाऱ्या, मंगेश पाडगावकरांना जसा माझा सलाम, तसाच हेमंतजींना सुद्धा !

ह्या मनोज्ञ लेखाच्या गारुडांत मी गुंतलो असतानाच मोबाईलवरील, नीलम खानापूरकरांनी* forward केलेली "अभंगवाणी" ह्या 'व्हाँटस् अँप'समुहावरील पुढील कविता* नजरेत आली आणि मी पहाता पहाता ती वाचूनही काढली.

हेमंतजींच्या लेखानंतर ह्या कवितेचा प्रसाद, रविवारच्या प्रसन्न सकाळी सकाळी मला मिळणे,
हा एक दुग्धशर्करा सुयोगच नव्हे कां?
ती अर्थपूर्ण कविता म्हणूंनच येथे देण्याचा मोह आवरत नाही:

👍👌💐💐

"टिंब"
एकदा एक टिंब
इकडे तिकडे हिंडले
शब्दांच्या बागेमध्ये
फुलपाखरू झाले !

'नदी'चा केला 'नंदी'
'माडी'ची केली 'मांडी'
'बाबू'चा केला 'बांबू'
'कुडी'ची केली 'कुंडी'

'शेडी'ची केली 'शेंडी'
'अग' जाले 'अंग'
'भाडे' बनले 'भांडे'
'रग' बदला 'रंग'

हिंडून हिंडून असे
टिंब अगदी दमले
वाक्याच्या शेवटी येऊन
पूर्णविराम बनले !

👍👌💐💐

(* one response on above poem as rec'd:
"That ‘timb’ Kavita seems to be a forwarded poem."
पण कोणाची कविता आहे ती? ही उत्सुकता माझ्या मनात रेंगाळली. सोशल मिडीयावर सर्फींग करताना ही कविता डॉ निलीमा गुंडी ह्यांची असल्याचे वाचनात आले.)
👍👍
कवितांच्या या आनंद मधुर सोहळ्यात अशा तऱ्हेने मी गुंतत गेलो आणि अचानक मला, माझ्या नोंदवहीतील, मीरा सहस्रबुद्धे# ह्यांच्या 'अंतर्नाद दिवाळी अंक'११ मधील अशाच अर्थपूर्ण दोन कवितांची# आठवण झाली. त्या ह्या लेखाचे शेवटी दिल्या आहेत. काव्यावर प्रेम करणार्या रसिकांनी त्या आवर्जून वाचाव्यात.
👍👍
काव्याच्या ह्या मन धुंद करण्याच्या माहोलात,
नवल की हो घडले !
मलाही ह्या काव्यपंक्ती सुचून गेल्या:

"आगळे वेगळे, 'ते' सगळे !
कुणी हसे वा रुसे,
कुणी फसे वा रडे.
असेच नित्य जग हे चाले
क्षण आले गेले, सारे 'ते' संपले !"

तर अशी आहे ही कवितांच्या गांवातली कहाणी ! 👌💐

धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क.
👍👍💐💐
# मीरा सहस्रबुद्धे ह्यांच्या 
"अंतर्नाद दिवाळी अंक'११:
मधील दोन अर्थपूर्ण कविता:


"अखेरचा ज्ञानी":
पुन्हा अभ्यासली
सारी वर्णमाला
वेगळाची बोध झाला मनी

'अ'काराचे स्थान
आरंभा असे
परी 'ज्ञ' तो वसे सर्वां अंती

आधी अहंकार
ज्ञान ये नंतर
ठेविले अंतर सुज्ञपणे

ज्ञानास नकोरे
अहंतेचा संग
पुरता बेरंग अज्ञ करी

नव्हे अहंकार
धुमसे अंगार
ज्ञान वारंवार शांतवी तया

जीवासवे जन्मे
जरी आधी कुणी
अखेरचा ज्ञानी, लावी दीप.
👍👍👍👍💐💐💐💐


"शैशव":

सानुल्या विश्वात माझ्या बासुरीचा सुर आहे...
जीवनाचा जो विसावा ब्रह्म मी त्यातून पाहे
उमलणारे मुक्त हसणे
सुखवणारे गोड रुसणे

आज त्यांच्या बोलण्याला चंदनाचा गंध आहे
नजर भोळी भुलवणारी
अंतरंगा फुलवणारी
भाबड्या प्रश्नातूनी त्या अमृताचा पूर वाहे...

भास्कराचे तेज ह्यांचे
वैनातेयाची भरारी
चांदण्यांचे स्वप्न सुंदर सोबतीला आज आहे...

पाहिला मी देव येथे
पूजिले निष्पापतेला
घनतमी ह्या जीवनाच्या जागती ही ज्योत आहे....
👍👍👍👍💐💐💐💐

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा