"नाट्यरंग !":
"मुंबईचे षड्दर्शन":"घडविते हात-माधव मनोहर":
"मुंबईचे षड्दर्शन" हे 'महाराष्ट्र टाइम्स'मधील सदर मुंबईची एकंदर जडणघडण कशी होत गेली, याचा ओझरता आढावा घेत असताना, मुंबईच्या सांस्कृतिक जीवनात आपल्या असामान्य योगदानाने ज्यांनी भर घातली अशा विविध क्षेत्रातील व्यक्तिमत्वांचा आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा देखील येथे यथातथ्य प्रवास रेखाटला जातो. त्यादृष्टीने हे सदर म्हणजे 'आर्काइव्ह वँल्यू' असलेले ठरू शकेल.
आज दि. १८ जानेवारी'२२ रोजी ह्या सदरात, प्रतिभा मतकरी यांनी त्यांचे पिताजी प्राध्यापक माधव मनोहर यांच्या कार्यकर्तृत्वाचा आणि कौटुंबिक जीवनपटाचा जो लेखाजोखा "नाट्यसमीक्षेचा मानदंड" या लेखात मांडला आहे, तो सर्वच रसिकांनी वाचण्याजोगा आहे.
नाशिकमधील माधवरावांची जडण-घडण आणि तेथील त्यांचे गंगेमध्ये पट्टीचे पोहणे, बी ए झाल्यावर मुंबईला कन्याशाळेत शिक्षक, नंतर एस एन डी टी मध्ये प्राध्यापक, त्यांना एम ए व्हायचा झालेला आग्रह; नाही तर त्यांची गेलेली नोकरी व पुढे पिंगेज् क्लासेसमध्ये त्यांचे शिकवणे, असा व्यावहारिक जीवनपट जसा समोर येतो, तसाच त्यांचे कन्याशाळेत असताना विद्यार्थिनी असलेल्या काशीबाईंबरोबर जुळलेले प्रेम व नंतरचा त्यांचा संसारिक, कौटुंबिक जीवाभावाचा अनुभव या लेखामध्ये प्रतिभाताईंनी सहजसुंदर भाषेत मांडला आहे.
एक उत्तम नाट्यसमीक्षकम्हणून त्यांची कारकीर्द किती असामान्य होती आणि विविध क्षेत्रातील मित्रमंडळी जमवण्याचे त्यांचे कौशल्य व छंद, तसेच रविवारी मुद्दामून फोर्टमधील चित्रपटगृहांना भेट देणे, चांगल्या हॉटेलमध्ये भोजन करणे आणि पुस्तके विकत घेणे हा त्यांचा कार्यक्रम देखील आपल्याला हा माणूस कसा विचारसंपन्न, सांस्कृतिक दृष्ट्या उच्च दर्जाची मूल्ये जपणारा होता, हे जाणवते. लेखा शेवटी मांडलेली दोन तीन वाक्येच त्यांचे सद्ग्रहस्थ म्हणून श्रेष्ठत्व जसे सांगतात, तसेच आता अशी माणसे अनुभवायला मिळत नाहीत, दिसत नाहीत, अशी रुखरुखही आपल्या मनात रुतून बसते.
साहाजिकच माझ्याही माधवरावांसंबधीच्या आठवणी, हा लेख वाचत असताना जागा झाल्या. पट्टीचे पोहणारे प्रा मनोहर आणि माझी पहिली गांठ हिंगण्याच्या महिलाश्रम वसतीगृहातील आमच्या सुट्टीतील वास्तव्यात सुमारे साठ वर्षांपूर्वी झाली त्याचे स्मरण झाले.
त्या निसर्गरम्य परिसरात पोहोण्यासाठी एक
तरणतलाव होता आणि दररोज सकाळी बच्चेकंपनी आणि इतर जण तिथे पोहण्याचा सराव करत असत. मला पोहता येत नसल्यामुळे, तिथे मी शँलो विभागात फक्त पाण्यात डुंबायला जात असे. ते पाहून स्वतः माधवरावांनी मला पोहायला शिकवायचा खूप प्रयत्न केला. परंतु मला ते काही जमले नाही आणि मी त्यांना नको नको असे म्हणत राहिलो. तेव्हा त्यांनी सांगून टाकले "तुला कधीच पोहोता येणार नाही." ही आठवण जागी झाली. अर्थात ते नवल नव्हते. कारण मी अगदी बालपणी माझ्या आजोळी, कोकणात आमच्या विहिरीमध्ये मला माझ्या वयोवृद्ध आजोबांनी पोहायला शिकवण्यासाठी एकदा आत दोरीच्या आधाराने सोडले होते. परंतु दोन अडीच वर्षाचा मी, घाबरून पाण्यामध्ये गटांगळ्या खायला लागलो आणि बुडतो की मरतो की काय अशी वेळ आली होती. अखेर मी वाचलो खरा, परंतु त्या क्षणापासून मला पोहण्याची जी भीती वाटू लागली, ती आजतागायत ! सहाजिकच प्रा मनोहरांसारखे पट्टीचे पोहोणारे, असूनही माझे पोहोणे तसेच आजतागायत अधांतरी राहिले.
दुसरी आठवण, मी देखील माझ्या रंगभूमी वरील प्रेमामुळे, दादरला नाट्यवर्तुळात वावरत असे. नियतकालिकात नाट्यविषयक सदर लिहित असताना, कधीमधी "शिवाजी मंदिर नाट्यग्रुहात माधवरावांची भेटगांठ होत असे. नाटकाच्या मध्यंतरांत, त्यांना सन्मानाने बोलवून रंगपटामागे त्यांच्या कलाकार निर्माते व दिग्दर्शक ह्यांच्यखबरोबरच्या गप्पाटप्पा यांचा मी साक्षीदार होतो. तेव्हा बटाटेवडा व चहाचा, चवीने आस्वाद घेतानादेखील त्यांना मी बघितले आहे. त्यांना मिळणारा नाट्यवर्तुळातील सन्मान व आदर ह्यांचा मी साक्षी आहे.
आमच्या घरात अधून-मधून माझी सौ नेहमी प्रा माधव मनोहरांची आठवण काढते. कारण प्रा मनोहर पिंगेज् क्लासमध्ये, ती बी ए करत असताना तिला शिकवायला होते. कदाचित माझे लेखन उद्योग, मराठीचे प्रेम आणि मराठी वांग्मय व इतर बाबतीतल्या माझ्या तिच्याबरोबरच्या गप्पाटप्पांमुळे
सौ नेहमी मला म्हणते "तुम्ही रिटायर झाल्यावर पिंगेज् क्लासमध्ये, प्रा म़ाधव मनोहरांप्रमाणे मराठीचे प्राध्यापक कां नाही झालात ? माझ्या निव्रुत्तीनंतर हा प्रश्न मला नेहमी तिच्याकडून अधून-मधून विचारला जातो !
प्रा माधव मनोहरांसारखे 'घडविते हात', मुंबईचे सांस्कृतिक, शैक्षणिक जीवन सम्रुद्ध करत गेले. त्या स्मरणजागराला माझा सलाम !
धन्यवाद
सुधाकर नातू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा