गुरुवार, २७ जानेवारी, २०२२

"कालाय तस्मै नम: !":

 "कालाय तस्मै नमः !":

सध्या जानेवारी महिन्यामध्ये खरोखर मृत्यूचे अक्षरश: थैमान चाललंय असं वाटतंय. एकामागोमाग एक असे कौटुंबिक परिचयातल्या किंवा एकंदर विविध क्षेत्रांमध्ये नामांकित असलेल्या व्यक्ती, एकामागोमाग एक जसे क्रिकेटमध्ये खेळाडू पाठोपाठ आउट होत जातात, तसे एक एकजण या जगाचा निरोप घेत आहेत. त्याचं मला खरोखर कोडं वाटतं.

कारण बघा ना, आता कुठल्या कुठल्या क्षेत्रातली काय काय माणसं नुकतीच गेली ते: सिंधुताई सपकाळ नंतर रामदास कामत, सुधीर दामले, सुनील मेहता, डॉ अनिल अवचट अशी एकामागोमाग एक माणसं गेल्याच्या बातम्या येऊन अक्षरश: थरकांप मनाचा झाला.

माझ्यातरी आठवणीमध्ये अशा तर्‍हेच्या मृत्यूच्या बातम्या एकसारख्या मी कधी ऐकलेल्या नाहीत. कधीमधी दहा-पंधरा दिवसांनी, महिन्याने अशा काही अंतराने नामांकित लोकांच्या वा परिचितांच्या मृत्यूच्या बातम्या यायच्या. तसेच कोरोना काळामुळे नक्कीच पहिल्या लाटेत आणि दुसऱ्या लाटेत माणसं एकामागोमाग गेली हेही खरं आहे. परंतु नांव मिळवलेली वलयांकित माणसे वेगवेगळ्या वयात व निरनिराळ्या व्याधींमुळे अशी एकामागोमाग जाणे, हे गुढ काय, याचा अर्थ काय, याचा मी शोध घेतोय.

साहजिकच मनात खळबळ माजत राहिली आणि कुणाशी तरी बोलावसं वाटत राहिलं. त्याप्रमाणे एका समवयस्क मित्राशी मी बोललो. आमची सकारात्मक चर्चा झाली, एक नवी दृष्टी त्यामुळे मिळाली.
तिचा सारांश असा:
"ह्या प्रत्येकाचा इतिहास वेगळा असतो, तो कां गेला, कसा गेला त्याच्या मागची कारणं काय? त्यांचं वय वेगळं, त्यांचा जीवनानुभव वेगळा, त्यांनी जीवनात खाल्लेले टक्के-टोणपे वेगळे आणि ते सध्या आजारी होते काय? खरोखरच काय झालं, हे आपल्याला माहिती नसते.

त्यामुळे प्रत्येकाचा काहीतरी पूर्वेतिहास असणार आणि म्हणून कदाचित ही काळ-वेळ आली असू शकते. आता एकामागोमाग इतकी नामवंत मंडळी कां मरण पावली, याचे उत्तर काढणे कठीण आहे. या गोष्टीकडे या दृष्टीने बघायचं की त्या त्या माणसाचं काही ना काहीतरी अनारोग्याचे कारण असणार म्हणून ही वेळ आली, that's it !

आपण ह्यातून धडा काय घ्यायचा तर आपण आपल्या परीने आपलं आरोग्य सांभाळायलाच हवे हा !"

आपल्याला ह्या विचित्र काळातील, अंतर्मुख व्हायला लागणार्या अनुभवाबद्दल काय वाटतं?

धन्यवाद
सुधाकर नातू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा