"शारदोत्सव !": "वाचा, फुला आणि फुलवा !":
# "ऐ जिंदगी गले लगा ले !":दुपारच्या वामकुक्षीच्या वेळी आज आत्ताच "तीन सम्राट' हा पार्थ एम एन् यांचा 'अक्षर' दिवाळी अंक'२१ मधील चित्तथरारक लेख वाचून संपवला. सर्वश्री नडाल, जोकोविच आणि रॉजर फेडरर या, प्रत्येकी वीस वीस ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या महान टेनिसपटूंमधील विविध चित्तथरारक टेनिस स्पर्धांमधील रोमहर्षक प्रवास वाचला. या तीनही खेळाडूंची व्यक्तिगत वैशिष्ट्ये आहेत तशी, या लेखात अनुभवायला मिळाली, त्याचप्रमाणे त्या
तिघांमधला एकमेकांबद्दलचा आदर आणि एकंदरच मैदानाबाहेर वागण्यामधला सज्जनपणा, शालीनता पाहून ह्या तीन सम्राटांसमोर नतमस्तक व्हायला झाले.
सांगण्यासारखी बाब म्हणजे रॉजर फेडरर हा
स्विट्झर्लंडमधल्या बेझलचा आहे आणि जोकोविचने तर सर्बियामध्ये ७८ दिवस बेलग्रेड शहरातील बॉम्बस्फोटांच्या वर्षावात आपले बालपण काढलेले आहे. तिघांच्याही खेळामधला रसरशीतपणा आणि नजाकत, त्याबरोबरच खेळावरील दुर्दम्य प्रेम, निष्ठा या लेखातून पाहायला मिळाली. खूप खूप काही मिळवल्याचा आनंद या वाचनातून जसा झाला तसा इथे शेअर करण्याचा प्रयत्न करतो आहे. पण माझ्या माईंडसेटची जातीवंत स्थिती शब्दात वर्णन खरोखरचकरणे कठीण आहे.
"माणूसच माणसाचा शत्रू वाटावा" अशा भयानक कोरोना महामारीच्या कालखंडात, तसेच सात ग्रहांच्या भेसूर कालसर्पयोगाच्या अंधःकारात,
गेल्या काही दिवसांमध्ये अनेक लहान थोर परिचित वा प्रसिद्ध माणसांच्या मरणायात्रांच्या एकापाठोपाठ दिवसांगणिक येणाऱ्या काळजाचा ठोका चुकविणार्या बातम्यांच्या कल्लोळात मन विषण्ण आणि सैरभैर झालेले असताना, अंधाराची वाट आता सापडणारच नाही की काय अशी मनाची परिस्थिती असताना, अचानक हे तीन सम्राट असे शब्दब्रम्हात अवतरले आणि जाणवले...
"हा जगाचा शेवट नाही; ऐ जिंदगी गले लगा ले" अशी आशिकी किरणे मनामध्ये चमकून गेली....
# "काव्यविहार !":
मनाने मी अशी उभारी घेतली असतानाच, योगायोगाने डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या "आकाश भाषिते" या पुस्तकातील डॉक्टर अनिल अवचट यांनी त्यांच्या 75व्या वाढदिवशी लिहिलेली कविता अचानक वाचनात आली ती अशी:
"कशास आता वाट चालणे......
भरकट फिरूया इकडे तिकडे......
वास घेऊया रानफुलांचा......
निरखूया पक्ष्याचे घरटे.......
काढू आठवण प्रीय जनांची.....
उत्कट रमल्या ह्रद्य क्षणांची.....
आपण झालो झाड जुनेसे......."
तरि अंगावरी नवी पालवी......
# "दिसतं, तसं नसतं !":
नुकताच मी "अक्षर" दिवाळी अंक'२१ यामधील श्री. लोकेश शेवडे यांचा "रोम, बर्लिन आणि हस्तिनापूर" हा लेख वाचला. त्यामध्ये फॅसीझम, मुसोलिनी आणि हिटलर व नाझी प्रव्रुत्तीच्या सगळ्या इतिहासाचा सखोल उहापोह केला आहे. त्यानंतर एकाधिकारशाही वा हुकूमशाही ह्यांबरोबर फॅसिझम् व नाझी प्रवृत्ती यांमधील तुलनात्मक फरक देखील तर्काला पटेल अशा शब्दात वर्णन केला आहे. सरतेशेवटी, सध्या त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होते की काय, अशा तर्हेचे भाष्य आहे.
हा अंतर्मुख करणारा लेख वाचत असताना, कायम सध्याच्या परिस्थितीशी आपोआपच मनात विचार केला जातो आणि त्यामध्ये साम्य आहे की काय, अशी भावना निर्माण होते. जमले तर हा विचारप्रवर्तक लेख जरूर वाच. म्हणजे कदाचित सध्याच्या वास्तवाचे एक वेगळेच चित्र तुझ्याही नजरे समोर येईल.
# "मुंबईचे षड्दर्शन !":
मुंबईचे षड्दर्शन" ही म.टा. मधील लेखमाला, मी नियमितपणे वाचतो. खास तज्ञांनी लिहीलेल्या प्रत्येक लेखामध्ये, मुंबई, तिच्या नजिकच्या इतिहासावर प्रकाश टाकत, इथे घडून गेलेल्या महत्त्वपूर्ण घटनांवर मांडलेली माहिती उत्कंठा पूर्ण आणि उपयुक्त अशीच असते.
काय,काय घडून गेले आणि त्याचे काय परिणाम झाले व पुढे काय होतील अशा पद्धतीचे निरीक्षणही या अभ्यासपूर्ण लेखांमध्ये असते. त्यामुळे लेखकांचे अभिनंदन आणि ही अभिनव संकल्पना वाचकांच्या हितासाठी राबविल्याबद्दल म.टा.चे कौतुक व शुभेच्छा.
म.टा. २३ डिसेंबरच्या अंकामध्ये विचक्षण आणि साक्षेपी अशी कीर्ती असणाऱ्या, संपादक तत्वाचे अनेक पैलू अंगी असणाऱ्या, 'श्रीपु' अर्थात श्री. पु. भागवतांचे 'सत्यकथा' मासिक व मौज प्रकाशनाच्या रुपाने मराठीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांचे योगदान आहे. 'सत्यकथा' मासिकाच्या संपादनाची मुहूर्तमेढ करून 'श्रीपुं'नी साहित्य विश्वात जे पाऊल टाकले, ते खरोखर वामनावताराप्रमाणे मराठी साहित्यविश्वाला व्यापून गेले. 'सत्यकथे'ने, पुढे नामांकित झालेले अनेकानेक दिग्गज लेखक घडवले ही एक त्या विश्वातील अभिमानास्पद व आनंददायी गोष्ट आहे. तिचा लेखाजोखा साक्षेपी व्रुत्तीने सादर करणारा हा लेख, प्रत्येक मराठी प्रेमीने वाचावा असाच आहे.
त्या लेखातील वेचक व वेधक गोषवारा असा आहे:
"संपादन एक दृष्टी असते, कथा कवितेतील नव्या प्रतिभावंतांच्या प्रयोगशील निर्मितीला आग्रहाने स्थान देणारी आणि त्याचा पुरस्कार करणारी समीक्षाही प्रकाशित करणे, हे संपादकाचे आद्य कर्तव्य असते. मराठी साहित्यवर निरतिशय प्रेम करणारे, लेखकांच्या जडण-घडणीत स्वतःला झोकून देणारे, नवसाहित्य घडवून आणणारे आणि साहित्यिक बांधिलकीचे व्रत घेऊन जाणारे असे संपादक म्हणजे 'श्रीपु' होय.
संपादक हा लेखक घडवतो हे मान्य न करता, प्रतिभावान लेखकच संपादकाला नकळत घडवत असतो, असे म्हणणारा विचक्षण व साक्षेपी संपादक म्हणजेच श्री पु भागवत !"
सारांश,
ही 'मुंबईचे षड्दर्शन' लेखमाला म्हणजे जणू काही, मुंबईकरांसाठी उघडलेला तिसरा डोळाच म्हणावा लागेल.
धन्यवाद
सुधाकर नातू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा