बुधवार, १९ जानेवारी, २०२२

"मनभावन क्षण-२!": "मातीचा कस आणि पिकाचे वाण !":

 "मनभावन क्षण-२!":                                            "मातीचा कस आणि पिकाचे वाण !":

"पसंद अपनी अपनी, खयाल अपना अपना" यावरच पुढचं सारं नव्याने सांगतो आहे:
टीव्ही बघताना रात्रीच्या 'प्राइम टाईम'मध्ये पाणी घातलेल्या लांबवत नेलेल्या मालिका कधीकधी बघाव्याशाच वाटत नाहीत. तसा एक तरी मोकळाचाकळा तास रात्रीच्या वेळेला मिळतो असा माझा अनुभव आहे. त्याला मी "गोल्डन अवर" मानतो.

असाच "गोल्डन अवर" आज दुपारी वामकुक्षी घेत असताना मला अवचित गंवसला. दुपारी पोटभर भोजन झाल्यावर कधीमधी बिछान्यावर झोपेची आराधना करता करता, एखादे पुस्तक वा मासिक वाचण्याची माझी नेहमीची संवय आहे.

# "विलक्षण प्रेरणादायी अपूर्व अनुभव !":
तसा आज दुपारी मी "मॅजेस्टिक नेट"च्या दिवाळी अंक संच'२१ भेट" सोबत आलेले डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे 'आकाश भाषिते' हे पुस्तक वाचत होतो. त्यातील प्रत्येक लेख सोन्याच्या विचारांचा व हिरेमाणकांसारख्या अनुभवांचा खजिनाच आहे. हे सारे ललित लेख म्हणजे डॉक्टर साहेबांचे आत्मशोधाचे आत्मनिवेदन असल्यासारखे आहेत.
अजून कोणकोणते लेख वाचायचे राहिले आहेत, ते
अनुक्रमणिकेवर ऊन चाळत असताना अचानक "मातीचा कस आणि पिकाचे वाण" हा आगळेवेगळे शीर्षक असलेला लेख नजरेत आला आणि हा लेख मी तहान भूक व झोप विसरुन अधाशासारखा वाचला. वीज चमकावी, तसा एक विलक्षण प्रेरणादायी अपूर्व अनुभव गंवसल्याचा आनंद मला झाला.

त्या लेखात 'मातीचा कस व पिकाचे वाण' म्हणजे खरोखर काय हे उलगडून टाकता टाकता, 'सु'संस्कार 'कु'संस्कार म्हणजे काय ते सोप्या भाषेत सांगितलेले जाणवले. 'मनभावन क्षण' शोधत, शोधत तसा अनुभव घेण्याची आपली अंगभूत शक्ती, चांगले असे काय मिळेल ते शोधण्याची आपली रसिक वृत्ती, यांचा केलेला समर्पक उहापोह मनाला पटून गेला.

डॉक्टर साहेबांनी हा मुद्दा पटवण्यासाठी त्यांनी बालपणापासून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ह्यांची शिवचरित्रावरची व्याख्याने आणि पुस्तके कसकशी वाचली आणि मनावर झालेला संस्कार, तो अनुभव समरसून कसा घेतला व तिथेच न थांबता त्या अनुभवाचे पृथक्करण करत अधिक माहिती मिळवत, छत्रपती शिवाजी महाराजांची व्यक्तीवैशिष्ट्ये, त्या बिकट काळात, स्वराज्य स्थापन करण्याच्या ध्येयाची पूर्तता त्यांनी कशी केली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, राज्यकारभार कुशल प्रशासकासारखा कसा सांभाळला ते मांडले आहे.

ह्या जोडीला महाराजांच्या व्यक्तिमत्वाचा मानसशास्त्रीय द्रुष्ट्या अभ्यास करुन "छत्रपती शिवाजी महाराज The CEO" ही द्रुक् श्राव्य मालिका कशी सिद्ध केली -ती 'AVAHAN IPH'
ह्या यु ट्यूब वरील चँनेलवर निःशुल्क उपलब्ध असल्याचा लेखाअखेरी उल्लेख केला आहे.

सहाजिकच दुपारची झोप न घेता मी हे 'मनभावन क्षण' अधिक सम्रुद्ध करण्यासाठी लगेचच चहा पीता पीता डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी परिश्रमपूर्वक सादर केलेला वरील विडीओ you tube वर पाहिला; मी भारावून गेलो, अपूर्व आत्मसमाधान अनुभवले आणि म्हणूनच "ह्या ह्रदयीचे त्या ह्रदयी" करण्यासाठी, त्याची लिंक येथे पुढे देत आहे:

https://youtu.be/pPu9XY2K_IQ

आपणही लिंक उघडून हा प्रासादिक भाषेतला विलक्षण अंतर्मुख करणारा प्रेरणादायी व्हिडिओ जरूर पहा. तुम्हाला खूप खूप 'मनभावन क्षण' त्यामुळे मिळतील, अशी मला खात्री आहे.

सारांश काय, छान पाऊस पडला, उत्तम बियाणे लावली, नैसर्गिक खते घातली, तरी येणाऱ्या पिकाचा वाण हा अव्वल असण्यासाठी, मातीचा कस सगळ्यात महत्वाचा ! तसंच माणसाच्या मनाचं असतं, बाह्य कितीही उपचार सोपस्कार केले तरी शेवटी मातीरुपातील माणसाच्या संस्कारशील मनाचा कस सगळ्यात अत्यावश्यक हेच खरे !

धन्यवाद
सुधाकर नातू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा