"दिवाळी अंकांची मांदियाळी-पसंतीची बावनकशी मोहोर !-भाग २":
सुदैवाने ह्या वर्षी माझी दिवाळी अंकांचे बाबतीत खूप चंगळ झाली आहे. मला माझ्या मुलाने ग्रंथाली भेट योजनेतील पाच दिवाळी अंक भेट म्हणून दिले. तर मी न मागता, मला मँजेस्टिक भेट योजनेकडून वेगळे पाच अंक पाठविण्यात आले. शिवाय मी ज्या दिवाळी अंकात लिहीतो ते लोकमत व मणीपुष्पक दिवाळी अंक मला मिळाले. असे बारा दिवाळी अंक घरपोच आल्याने वाचनालयामध्ये जाण्याचे कष्ट आपोआपच वाचले.
एक एका अंकाचे वाचन करण्यात सध्या चांगला सत्कारणी वेळ लागत आहे. त्यातले काय विशेष आवडले, भावले त्याची झलक दाखविणारा हा दुसरा लेख.
------------------------------------
"दाद द्यावा असा, "अक्षर" दिवाळी अंक'२०:
"अक्षर" हा शब्दच मुळात विचारगर्भ व अर्थपूर्ण आहे. मानवाचे इतर सजीवांपेक्षा असणारे वेगळेपण त्याच्या वाणीत आहे. ह्या अमोघ शक्तीचा सुयोग्य वापर करण्याची किमया त्याला ज्या क्षणी गवसली, तो क्षण मानवजातीच्या भाग्याचा. अक्षर व अक्षरांतून शब्दरुपी वाणीचा महासागर असा खुला झाल्यानंतर परस्पर संपर्क, विचार, माहिती व ज्ञान ह्यांचे आदान प्रदान व त्यातून उत्तरोत्तर मानवजातीच्या विकास व प्रगती भरभराटीचे अनेक मार्ग व विविध दिशा खुल्या झाल्या. म्हणूनच दिवाळी अंक "अक्षर" ह्या नांवाचा अनेक वर्षे प्रकाशित करत त्याचे भूषणावह आगळेवेगळेपण राखणार्या मंडळींचे कौतुक वाटते.
आतापर्यंत आपण संप, टाळेबंदी, मुंबई, महाराष्ट्र वा भारत बंद अशी अनेकानेक सर्वसामान्य जीवन आक्रसून टाकणारी आंदोलने पाहिली व अनुभवली होती. पण २०२० हे वर्ष न भूतो न भविष्यती असे कोरोनारुपी भस्मासूरी महामारीचे संकट काय घेऊन आले आणि त्यावर उपाय म्हणून केवळ चार तासांची आगाऊ सुचना देवून लाँकडाऊनच्या रुपाने एक नवी जीवनशैली जी आजपर्यंत कदाचित जगाच्या इतिहासात अनुभवली नसेल अशी, घरातच कोंडून घ्यायला लावणारी परीक्षा सर्वांना द्यावी लागली.
"अक्षर" दिवाळी अंकातील °कोरोनाच्या छायेत जगताना" ह्यावर विविध क्षेत्रांवर झालेले दुष्परिणाम ह्यावर काही अंतर्मुख करणारे लेख वाचायला मिळाले. खरोखर हृदय पिळवटून टाकणार्या त्या कहाण्या होत्या. आपले घरदार सोडून महाराष्ट्रात आलेल्या परप्रांतीय मजुरांच्या वर अचानक व लॉग डाऊन जाहीर झाल्यामुळे किती गंभीर प्रसंग आणि बिकट वेळ आलेली त्याचे आखो देखा हाल असणारा एक लेख खरोखर आपण किती निष्क्रिय व वेदना शून्य दया शून्य झालो आहोत याचे दर्शन घडवतो. लांबत जाणाऱ्या लाँकडाऊनमुळे इथे रहाणे अशक्य झाल्याने, मुंबई पासून बाराशे किलोमीटर आपल्या घरी केवळ एका साईड कार जोडलेल्या स्कूटरवर कुटुंबासह जाणाऱ्या एका गरीब बिचाऱ्या आणि त्यातून डावा पाय निकामी झालेल्या मजुराची थरारक कहाणी त्या लेखात अक्षरशः जीवंत केली होती. त्याहूनही विदारक प्रसंग शरीरविक्रय करणाऱ्या अभागी वेश्यांवर आल्याचे वर्णन दुसर्या एका लेखात होते.
वाचता वाचता, अंक चुकून जमीनीवर पडला आणि त्याचे मुखप्रुष्ठ जणु कुणी डोळे वटारुन पहात असल्यासारखे भासले. भल्या मोठ्या चावीने उघडण्याची खिटी बाजूला, अशा एका लोखंडी बंद कुलुपाचे ते चित्र मी अचानक प्रथमच पाहत होतो. इतक्या वाचनापूर्वी त्याच्याकडे दुर्दैवाने माझे लक्षच गेलेले नव्हते. कोरोना महामारीसारख्या भस्मासूरी महासंकटाने सार्या जगाला कसे बंदिस्त केले आहे, त्याची मूर्तीमंत प्रतिमा होती. "अक्षर" कर्त्यांना असे वास्तववादी मुखपृष्ठ निवडल्याबद्दल मनापासून दाद व सलाम!
-----------------------------------
श्री. अमोल उदगीरकर
सादर वंदन.
नुकताच तुमचा "अक्षर" दिवाळी अंक'२० मधला 'केन & एबल' हा अफलातून लेख एका दमात वाचला व लगेच ही मनापासून लेख आवडल्याची दाद लिहून टाकली. ईरफान खान व ऋषी कपूर ह्या दोन दिग्गज अभिनेत्यांच्या समांतर कारकीर्दीचा ओघवत्या भाषेत, योग्य तितका हा तपशीलवार मागोवा, माझ्यासारख्या वाचकांना, चित्रपटसृष्टीकडे पहाण्याच्या नव्या जाणीवा देत हा classic लेख आगळावेगळा अनुभव देऊन गेला. अभिनंदन व शुभेच्छा."
सुधाकर नातू
--------------------------------------
श्री सुधीर गाडगीळ
सादर वंदन.
मराठी साहित्यशारदेच्या विश्वात, दिवाळी अंक हा जणु एक तेजःपुंज हिराच, जसा मराठी रंगभूमीवर संगीत नाटकांचा. मला लेखनाप्रमाणे वैचारिक वाचनाची मनापासून आवड आहे. सहाजिकच दर वर्षींची दिवाळी अंकांची मांदियाळी ही तर माझ्यासाठी अपूर्व पर्वणीच.
मी जे जे वाचतो, त्यातील मला भावलेले रूचलेले काही खास अंतर्मुख करणारे गवसले तर त्या त्या लेखकांना वा संपादकांना माझ्या पसंतीची बावनकशी मोहोर पाठविल्याशिवाय मला चैनच पडत नाही. ह्यास्तव, हा अनाहूत संदेश.
" लोकमत " दिवाळी अंक'२० मधील आपण आजवर घेतलेल्या विविध क्षेत्रातील नामवंतांच्या ४,४०० मुलाखतींपैकी निवडक केवळ ५
"संवादातील पाचपावली" ह्या छोटेखानी लेखात असणे, हा रसिक वाचकांवर तुम्ही नव्हे, तर अंकाच्या संपादकांनी केलेला एक प्रकारे अन्यायच म्हणावा लागेल. जणु खवैयांच्या पंगतीत पंचपक्वान्ने व इतर अनेकानेक सुग्रास पदार्थांनी भरलेल्या ताटातला केवळ अन् केवळ एकच पदार्थ खायची मुभा ठेवणं होय !
अर्थात जीवघेण्या स्पर्धात्मक व्यवसायविश्वात व मार्केटिंगच्या ह्या जमान्यात वाचनीय मजकूरापेक्षा रोकडा मोजणार्या जाहिरातींनी अंकाची पाने भरावयाची अपरिहार्यता काय असते, तो अनुभव ह्याच अंकातील माझ्या संपूर्ण वार्षिक राशिभविष्याच्या लेखापायी मी अनुभवली आहे. म्हणून तर दोष, तुमचा नाही हे म्हटले. असो.
फक्त पाचच आठवणी निवडण्याचे शिवधनुष्य मात्र तुम्ही सुपरस्टार राजेश खन्ना, गानसम्राज्ञीआशा भोसले, अभिनेत्री ललिता पवार, भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉ. कलामसाहेब आणि किर्लोस्कर उद्योगाला लकाकि प्रदान करणारे माननीय शंतनुराव अशी बावनकशी पाचामुखी परमेश्वरांची निवड करून लिलया पेललेत. तो तो काळ आणि ती ती गुणवंत माणसे आणि त्यांच्या सहवास-संवादातील वैशिष्ट्यपूर्ण आठवणी आपण पुनःप्रत्यय देत लेखात उलगडल्या आहेत. आपल्या दिलखुलास व्यक्तिमत्वाप्रमाणेच लेखातील भाषा साधी सोपी व खुसखुशीत आहे. म्हणून ही मनापासून पसंतीची मोहोर ! तसेच अभिनंदन व शुभेच्छा.
सगळ्यात शेवटी अत्यंत महत्वाचे निरीक्षण. आमच्या मार्केटिंग परिभाषेत नेहमी हे बिंबवले जाते की, "Don't put all your eggs in one basket" ह्या नियमाला तुम्ही केवळ आणि केवळ
अपवाद ठरला आहात हे मला मांडायचे आहे. तुमच्या समंजस जोडीदाराच्या सक्रीय पाठिंब्यावर, चांगली नोकरी सोडून, गेली तब्बल चाळीस वर्षे "निवेदक मुलाखतकार" ह्या एकाच एक क्षेत्रात आपली उपलब्ध शक्तीस्थळे वापरुन कर्तृत्व व लोकप्रियतेची जी उत्तुंग गरुडभरारी मारली आहे, ती निश्चितच एक प्रेरणादायी अनुकरणीय दिशा आहे.
धन्यवाद
सुधाकर नातू
माहीम, मुंबई १६
-------------------------------------
श्री. अवधूत परळकर,
सादर वंदन.
"अंतर्नाद दिवाळी अंक'२० हा त्यामधील गेल्या पंचवीस वर्षांच्या साहित्याचा अक्षरशः सर्वोत्तम अर्क आहे. अनेकविध विषय व अनुभवांना स्पर्श करणारा हा ऐवज वाचल्यावर मी अक्षरशः भारावून गेलो.
अशा ह्या वर्षीच्या सर्वोत्तम दिवाळी अंकांत तुमचे 'अखेरचे अवधान' व ' मी चोवीस तास' हे दोन लेख प्रसिद्ध होणे हा लेखक म्हणून तुमचा बहुमानच आहे. ते लेख वाचले, आवडले आणि जणु तुम्ही माझ्यासारख्या ( किंचीत ) लेखक व (मुबलक) वाचक असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकासमोर आरसा धरल्याप्रमाणे वाटले. ह्यास्तव ही 'पसंतीची मोहोर' !
Frankly मी अधूनमधून फक्त गेली काही वर्षेच अंतर्नाद मासिक वाचत आलो असल्याने त्यातील 'अवधान' हे सदर वाचल्याचे मला आठवत नाही. अर्थात ह्या 'अखेरचे अवधान' मधील मजकूरावरुन त्यातील तुमचे लेखन तुमच्या विवेकबुद्धीला पटेल व कुणीही तर्कनिष्ठ द्रुष्टीने वाचले तर यथोचित असावे हा विचार माझ्या मनात आला. ह्या लेखातील तुम्ही व्यक्त केलेला तुमच्या मनाचा उद्वेग निश्चितच रास्त आहे. 'पुरस्कार प्राप्त लेखकाला टीवी कलाकाराइतकाही आपल्या समाजात मान नाही' हे तुमचे निरीक्षण, मला समोर आरसा धरल्याप्रमाणे वाटून गेले.
'मी चोवीस तास' ने तर त्याचीच पुनरुक्ती केली. त्यामध्ये जो तो मी मी करत आपलीच फुशारकी मारत असतो ही तर एक डोळ्यात अंजन घालणारी होती. Honestly मी त्यामुळे अंतर्मुख होऊन माझ्याकडे, माझ्या आजतागायतच्या संपर्करितीकडे पाहीले अन् आपणही अगदी अशीच 'मीही 'चोवीसतासगिरी' करत आलो ही जाणीव झाली. सहाजिकच आता ह्या लेखामुळे त्यात इतक्या उशीराने कां होईना मी सुधारणा करण्याचा संकल्प करत आहे.
धन्यवाद
सुधाकर नातू,
माहीम, मुंबई १६
Mb 9820632655
ता.क.
"दिवाळी अंकांची मांदियाळी-पसंतीची बावनकशी मोहोर !":
मला लेखनाप्रमाणे वैचारिक वाचनाची मनापासून आवड आहे. त्यांत दर वर्षींचा दिवाळी अंकांची मांदियाळी हा तर अपूर्व खजिनाच असतो. मी जे जे वाचतो, त्यातील मला भावलेले रूचलेले काही खास अंतर्मुख करणारे गवसले तर त्या त्या लेखकांना वा संपादकांना-त्यात "अंंतर्नाद दिवाळी अंक" ही आला, माझ्या पसंतीची बावनकशी मोहोर पाठविल्याशिवाय मला चैनच पडत नाही. हा विशेष लेख हा त्या स्वानंदमयी 'वारी'चा प्रारंभ.........
Eternal Exctacy अनुभवण्यासाठी.......
हा लेख अखेरपर्यंत वाचा..........
ही लिंक उघडा............
http// moonsungrandson.blogspot.com
---------------------------------
माझा हा दाद व पसंतीची मोहोर दिवाळी अंकांना देण्याचा अनोखा सिलसिला असाच चालू रहाणार आहे.
धन्यवाद
सुधाकर नातू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा