"आजोबांचा बटवा-६":
"हे प्रणयगंध किती अनंत-१"
विश्वाच्या संक्रमणातून मानव उत्पन्न झाल्यानंतर, शरीराबरोबर त्याला देण्यात आलेले तरल मन हा त्या विश्वंभराच्या सामर्थ्याचा परमोच्च बिंदू होय. स्त्री-पुरुषांच्या मनाच्या अनंत संवेदनांपासून चित्रविचित्र प्रणयगंध फुलत राहिले. संस्कृतीच्या विकासातून निर्माण झालेल्या विवाह रूढीने या प्रणयगंधांना जखडून ठेवण्याचा प्रयत्न अपुरा ठरला, इतके हे पाश अतिविशाल आणि गूढ रम्य आहेत. त्यांना स्थळ-काळ, वय, जात-पात नातीगोती कशाकशाचे म्हणून बंधन मान्य नाही.
दोन व्यक्ती एकमेकांना कां आणि कधी आवडाव्यात कराव्यात, हा एक अनाकलनीय प्रश्न आहे.
मनाच्या गाभार्यात त्यामुळे अनेक कल्लोळ जन्मतात. जितक्या व्यक्ती, तितक्या मनोहारी त्यांच्या अभिव्यक्ती. दोन व्यक्ती एकमेकांना कां कधी आवडाव्यात याला उत्तर नाही. कुणाला एखादीचे हास्य मोहित करते, तर कुणाचे बालिश डोळे, एखादीचा ठाव घेतात, कुणाचा भोळाभाबडा स्वभाव एखादीला आवडतो, तर एखादीच्या अनुकंप अवस्थेतून सहानुभूती मधून प्रणय भावना फुलत जाते. किती किती म्हणून हे प्रणयगंध आठवायचे ! शोभादर्शकासारख्या बदलत्या रंगसंगतीचे ही काही चित्तथरारक शब्दचित्रे:
"जगावेगळे, हे सगळे!":
नशिबाच्या फरफटीचे खरोखर मला आश्चर्यच वाटते. पुरुषाचे सुख नशिबात पुढे कधी नसावे की काय अशाच माझ्या संसाराच्या पाऊलखुणा आहेत. खूप विचित्र अशी ही जीवन कहाणी आहे.
माझे पहिले लग्न झाले, नीट बघून चिकित्सकपणे निवड करून. दुर्दैवाने लवकरच लक्षात आले की, आपला नवरा आहे षंढ ! स्त्री शरीराविषयी कुठली म्हणून आसक्तीच त्याला नाही. म्हणून उमलू पाहणारी एक कळी फुलायच्या, आतच कोमेजू लागली. सरळ घटस्पोट घेण्याशिवाय मला पर्याय नव्हता आणि त्याप्रमाणे मी तो घेतला. नंतर एक नोकरी धरणे आणि काही वर्षे गेली नको नको वाटत असताना, मी दुसऱ्या लग्नाच्या फंदात पडले. अनिलचा पण माझा परिचय बस स्टॉपवर झाला. तोही घटस्फोटित होता. त्याला घाई नव्हती अन पेन्शनर वडिलांबरोबर तो रहात होता.
अनिलने मला मागणी घातली अन् मी सौभाग्याची लेणी चढवून या घरात आले. पण हाय ! लग्नाच्या पहिल्या रात्रीची गोष्ट. आम्ही आमच्या खोलीत आलो, अनिलने दूध घेतले अन् कोपऱ्यातील स्टुलावर ग्लास ठेवायला तो गेला आणि अचानक एकदम किंचाळलाच. मी चमकले, वर भिंतीवर एक पाल होती, खूप मोठी पाल होती. तिला हा पुरुषासारखा पुरुष घाबरला होता. थरथर कापत स्वयंपाकघरात जो गेला, तो पुन्हा यायचे नाव नाही. ती पाल माझ्याकडे बघून जणू चुकचुकत होती.
ते किंचाळणे ऐकून आमच्या खोलीत माझे सासरे आले तात्यासाहेब. मी पालीकडे बोट दाखवले त्यांनी कोपर्यातली काठी उचलली, धाडकन जो फटका मारला पालीवर, ती खल्लास. त्यानंतर तिची शेपटी हाताने उचलून गॅलरीतून तिला बाहेर फेकणारे, साठी उलटूनही तगडे असलेले तात्या कुठे आणि हा माझा भित्रट नवरा अनिल कुठे? या पहिल्याच रात्री काही वेगळे अनुबंध माझ्या मनात तात्यासाहेबांविषयी निर्माण करून गेले.
आमचा संसार सुरू झाला. एक मुलगीही झाली. पण पदोपदी माझ्या लक्षात यायचे, अनिल एक खुळचट भित्रा कसलीही धमक नसलेला माणूस आहे. मनाने आणि शरीराने खुलावे असे त्याच्या संसारात सहवासात मला कधी वाटलेच नाही. साध्या साध्या गोष्टीत तात्यांची धडाडी प्रकर्षाने दिसायची. एकदा चोरांचा सुळसुळाट झाला असताना आमच्या वाडीत रात्री प्रत्येकावर गस्त ठेवायची पाळी असायची. राखण करायची रात्री ११ ते पहाटे ४ अशी प्रत्येकाची गस्त घालायची ड्युटी होती. कॉलनीतले साधारण आठ-दहा पुरुष गस्त घालायचे या दोन-तीन महिन्यांच्या भीतीदायक काळात. तेव्हाची अनिलची तारांबळ मला बघवत नसे.
आमच्या घराची पाळी आली की, तो मुद्दाम आजारी पडायचा. तात्या मात्र स्वतः इतर तरुणाबरोबर गस्त घालायला जायचे. त्यांच्या धडाडीने अखेर चोरांच्या टोळीला पकडण्यात यश आले होते. असे किती प्रसंग आठवायचे आणि हाय, दुर्दैवाने आमच्या लग्नाला तीन वर्षे पूर्ण होत नाहीत, तोच अनिल एका मोटर अपघातात अचानक मरण पावला.
मी पूर्ण उन्मळून गेले. माझ्या हृदयाचे पाणी पाणी झाले, काय करावे काही सुचेना. ती बातमी आल्यावर कानावर अशा वेळेला तात्यासाहेब पुढे सरसावले. सारे सोपस्कार धीरोदात्तपणे करून सारे पुढचे निस्तरले ते त्यांनीच. आता एक मोठी विचित्र अशी पोकळी घरामध्ये निर्माण झाली होती. मला सावरायला तात्यांनी मदत केली. हा माणूस बायकोशिवाय स्वतःचे तारुण्य जाळून ज्याच्या करता बसला होता, तो एकुलता एक मुलगा, अनिल मरण पावला होता. परंतु हा माणूस तरीही डगमगला नव्हता.
काही दिवस गेले आणि आता त्यांचा जीवनक्रम नियमितपणे पहाटे उठणे फिरायला जाणे, नंतर 11 ते चार एका पेढीवर हिशोब लिहायला जाणे असे चालू होते. पुन्हा नोकरीवर जायला मला त्यांनीच परावृत्त केले. छोट्या मुलीला-त्यांच्या नातीला, पाळणाघरात ठेवायला लागू नये, म्हणून ते घरीच राहून त्या पिढीचे हिशोबाचे काम पाहू लागले. मला घरकामात मदत करता येईल तेवढे करायचे. काहीसा रापलेला असला तरी चेहरा करारी, भरदार छाती बलदंड बाहू तितकेच खंबीर मनाचे तात्या माझ्या मनावर कुठलीतरी मोहिनी घालत होते, हेच खरे.
सारा कारभार आता विचित्र होत जाणार होता. हळू मी पुन्हा सावरले. नोकरीवर जाऊ लागले. अजूनही तिशीतच तर होते. त्यामुळे माझे मन व शरीर अजूनही उमलत होते. माझ्यासारख्या, एकाकी तरूण स्त्रीच्या मागे विखारी नजरेने काही जण येऊ लागले. काय करावे मला काहीच सुचेना.
एकदा मी बस स्टॉपवर मी उभी असताना काही मवाली नेहमीप्रमाणे माझी चेष्टा करू लागले, छेड काढू लागले. मात्र तोच तात्या कुठूनसे एखाद्या चित्त्यासारखे धावत आले आणि त्यांनी त्यातील एकाला धरून अक्षरशः चोपला. हा अनपेक्षित हल्ला पाहून बाकीचे पळाले. पुन्हा कधीही हिच्या वाटेला जाल, तर माझ्याशी गाठ आहे याद राखा, अशी तंबी त्यांनी दिली. मला एक वेगळाच रुपगंध जाणवला त्यांच्या त्या रुपात.
आम्ही घरी आलो. तात्यांच्या कुशीत जाऊन जेव्हा मी मनसोक्तपणे रडले तेव्हाच शांत झाले.
त्यांनी हळुवारपणे माझ्या केसांवरून हात फिरवला तो स्पर्श माझ्या शरीरात उरी एक नवे चैतन्य निर्माण करून गेला. माझ्याहून तीस वर्षांनी मोठा असलेला माझ्या स्त्रीत्वाची खरीखुरी कदर करणारा हा माणूस, एक विचित्र भावबंध माझ्या मनात निर्माण करून गेला.
नाते, वय यांची कुंपणे तोडणारा एक नवाच झंझावात सुरू झाला होता. इतका जवळ असूनही, इतके दिवस दूर असणारा एक पुरुष माझ्या हृदयात घर करून बसला. पण समाजाच्या दृष्टीने आम्हाला दोन जीवांचे मिलन अशक्य होते. माझ्या नशिबाची फरफट किती विचित्र म्हणते, ते ह्यामुळेच. त्या क्षणापासून आम्ही दोघेही तळमळत आहोत, तडफडत आहोत. एका अनाहूत भीती पोटी, हा अनोखा कुठल्या रंगाचा प्रणयगंध?
ह्याची अखेर काय होणार कोण जाणे !
सुधाकर नातू
# रोहिणी मासिक, जून १९८३
मधील माझी कथा.
ता.क.
"शोधा म्हणजे सापडेल, विचार करा, सुचेल":
जगप्रसिध्द मँनेजमेंट गुरुंच्या अनुभवी मार्गदर्शनाचे सार मांडणारे अभ्यासपूर्ण लेख असणारे 'Management Musings' व सोप्या भाषेत घरच्या घरी ज्योतिष शिकण्यासाठी 'नियतीचा संकेत' हे दोन खास डिजिटल अंक मी माझ्या ७६ व्या वाढदिवशी १६जून रोजी प्रकाशित केले आहेत.
ते ज्या इच्छूक वाचकांना हवे असतील त्यांना विनामूल्य पाठवले जातील. 9820632655 ह्या नं. वर आपले नांव, गांव देऊन, होकार whatsapp ने कळवावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा