शनिवार, १६ मे, २०२०

"ह्रदयसंवाद-२२": "लाँकडाऊनचे कवीत्व":


 "ह्रदयसंवाद-२२":
"लाँकडाऊनचे कवीत्व":

कोरोना संकटात, लाँकडाऊन चुकीचा होता हे मी बिलकूल मानत नाही. फक्त तो ज्या घिसाड घाईने सुरु केला गेला आणि राज्यांना न विचारता, पूर्वनियोजन नीट न करता, अंमलात आणला गेला ते पटणे कठीण आहे. कारण त्यामुळे अनेक गहन प्रश्न, विशेषतः परप्रांतीय मजुरांचे निर्माण होत गेले आणि त्यातून मार्ग काढणे अत्यंत बिकट बनत गेले हे नाकारता येणार नाही. जी काही विदारक परवड रस्त्यांमध्ये या गरीब बिचाऱ्या मजुरांची त्यांच्या कुटुंबीयांची झाली, त्याला जबाबदार कोण? योग्य वेळी, योग्य ते पूर्वनियोजन न करता, कोणतीही कृती बेधडकपणे करण्याचा परिणाम हा आहे. फाळणीनंतर नोटबंदीच्या वेळेस जे घडले, त्याची पुनरावृत्ती झालेली उघड्या डोळ्यांनी पहाण्याची वेळ सर्वांवर दुर्दैवाने आली आहे. लाँकडाऊन अत्यंत कठोरपणे अंमलात आणायला हवा होता व खरोखरच कोरोना संकट नियंत्रणात येइपर्यंत तो हवाच हवा.

दुर्दैवाने आपली जनता बहुतांश बेशिस्त व संकटाचे गांभीर्य न जाणणारी आहे. म्हणूनच
पहिल्या दिवसापासून, अक्षरशः लष्करी शिस्तीत तो पाळला गेलेला पहाणे, हे प्रशासनाचे मूलभूत कर्तव्य होते. त्या आघाडीवर अजून तरी यश नाही, हे सत्य होय. उलट एक हजाराहून अधिक पोलीसकर्मी कोरोनाग्रस्त होणे ही अत्यंत खेदाची व शरमेची बाब आहे.

सध्याच्या महासंकटाने विविध क्षेत्रात काय काय भीषण आर्थिक समस्यांचे आव्हान उभे केले आहे, ती वास्तवता आता आ वासून उभी आहे. लाँकडाऊन शिथिल करावा, तर किती मोठ्या संख्येने कोरोनाग्रस्त होतील, याचा नेम नाही. कारण इतके दिवस लाँकडाऊन असून देखील जर कोरोनाग्रस्त असे झपाट्याने भयानक वाढत गेलेले असतील, तर विविध घटकांच्या आर्थिक
मजबुरपायी, शिथिलता आणून जर लोकांना बाहेर वावरायला दिले, तर काय होईल याची कल्पना करता येत नाही. त्यामुळे खरोखरच चक्रव्यूहात सापडल्यासारखी स्थिती झालेली आहे. Point of No return अशा विचित्र वळणावर गाडी आली आहे. धरलं तर चावतंय आणि सोडलं तर आणखीनच धरतंय, अशी एकंदर परिस्थिती आहे.

अर्थात् शेवटी हे आव्हान स्विकारायचेच हा विचार आवश्यक आहे, हे बरोबर आहे. पण ही शिस्त, सामाजिक जाणीव समाजात एकदम येत नाही. त्यासाठी आदर्श असावे लागतात, एक कार्यक्रम असावा लागतो. अव्याहत दारु पिणारा बाप आपल्या मुलाला आज अचानक तू दारु पिऊ नकोस असे कुठल्या तोंडाने सांगणार? आडात नाही ते पोहोर्‍यात कुठून येणार? आज आपण लष्कराची मागणी करतो आहोत, कां? आपले एके काळी जगात नावाजलेले , मुंबई पोलिस आज इतके हतबल कसे झाले? त्यांनी अजून किती त्रास सहन करायचा? हे विचार करण्यासारखे नाही कां? जेव्हा प्रशासनावर पकड नसणारे नेत्रुत्व असेल तर अशी कार्यक्षम यंत्रणा पण हतबल होते, तिला विनाकारण नामुष्कीला, यातनांना सामोरे जावे लागते.

आज महाराष्ट्र हे एक असे राज्य आहे, जिथल्या पोलीसांनी राज्यात लपलेल्या मरकजच्या किती तब्लिंगींना शोधले आहे? या मंडळींमुळे कोरोनाचा सर्वात जास्त प्रसार झाला हे आता सर्वश्रुत आहे. नुसती भावनेला हात घालणारी घरेलू भाषेतील उपदेश व मार्ग व्यक्त करुन पुरेसे होत नाही, हाच आता पन्नास दिवसांनंतर अनुभव येत आहे. सुरवातीला फक्त "लष्कर बोलवावं लागेल असे वागू नका", इतपत शामळू शब्दातील बोल बोलण्याचे धैर्य दाखवले गेले. त्यातून काही साध्य झाले नाही.

पहिल्या लाँकडाऊनच्या काळातच परप्रांतीय मजूरांची सुखरूप घरवापसीची योजना एकीकडे अंमलात आणून, दुसरीकडे निदान मुंबई व पुण्यात लष्कर बोलावून लाँकडाऊन तंतोतंत पाळला जाईल हे करून दाखवायला हवे होते. महाराष्ट्रातील वाढत्या कोरोनाग्रस्तांमुळे, केंद्र सरकारने महाराष्ट्रातले सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करण्याइतकी परिस्थिती हाताबाहेर जाईल, अशी परिस्थिती तरी येऊ नये.

ह्या पार्श्वभूमीवर ही चारोळी डोळ्यात अंजन घालणारी आहे.

तुझं माझं, ब्रेक अप् जाहले,
पंत गेले, अन् राव चढले!
फतव्यांमागून फतवे निघती,
भरकटणार्या कारभाराची हीच रिती!

आता वास्तवतेचे एक उदाहरण पाहू:

एका सहकारी सोसायटीच्या ह्या घरात सत्तरीपुढच्या वयाचे ज्येष्ठ नागरिक असलेले फक्त दोघे पती पत्नी रहातात. त्या़ंनी आतापर्यंत lockdown च्या काळात मोलकरीण येत नसल्यामुळे तिची कामे ते करत आले आहेत. पण ह्यापुढे ते कठीण होत असल्याने त्यांच्या मोलकरीणीने येऊन घरातील तिची कामे करावीत अशी आवश्यकता भासत आहे. ती येण्यास तयारही आहे. तिला येण्याची परवानगी क्रुपया मिळावी, अशी ह्या ज्येष्ठ दांपत्याची अपेक्षा असणे रास्त आहे.

मात्र लाँकडाऊनमुळे सहकारी सोसायटीने कंपाऊंडच्या आंत इतर कोणालाही येण्यास मज्जाव केलेला आहे. सहाजिकच ही परवानगी सोसायटी देत नाही, कारण त्यांना इतर सदनिकाधारकांना धोका पोहोचावा, असे वाटत नाही. त्यामुळे बिचाऱ्या या ज्येष्ठ जोडप्याला भांडी घासणे केर लाद्या पुसणे वैगेरे सगळं कठीण असलं तरी घरातच करायला लागत आहे. ही मजबुरी आणि ही अगतिकता सध्याच्या विचित्र परिस्थितीमुळे आलेली आहे.

घरगुती सेवा देणार्यांचा विषय आलाच आहे, तर त्यासंबंधी सर्व साधारणपणे त्यांना त्यांचा महिन्याचा पूर्ण मोबदला देण्याकडे कल असावा, हे सहाजिक आहे. परंतु असा मोबदला आता लाँकडाऊन अनिश्चितपणे वाढत असल्यामुळे किती दिवस देत राहायचं, असा प्रश्नही मध्यमवर्गीय निवृत्त ज्येष्ठ नागरिकांना येणं साहजिक आहे. कारण मेहनत त्यांची, फळ मात्र पूर्णपणे घरगुती सेवा देणार्याला द्यायचं हे तात्विक दृष्ट्या पटत नाही. जसं कुठल्याही कारखान्यात लाँकडाऊन केला किंवा टाळेबंदी केली, तर कामगारांना अर्धा पगार दिला जातो, त्याप्रमाणे घरगुती सेवकांना पहिल्या महिन्यानंतर तरी पुढच्या महिन्यांमध्ये अर्धा पगारच देणे, रास्त नव्हे कां? कारण त्यांचे श्रम वाचत असून, ते श्रम मालक करत आहेत, हा विचार त्यांनी देखील समजून घ्यायला नको कां?

एखाद्याला कोरोनाची लागण झाली आहे, हे कळले की काय होते, याची कल्पना देणारा एक संदेश आता सोशल मीडियावर फिरत आहे. तो वाचून कोणताही थरकाप होऊ शकतो. कारण नंतर तुमची उचलबांगडी कुठे होईल कुठल्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला कोणत्या परिस्थितीत धावपळ करायला लागेल, याची कल्पना करवत नाही. शिवाय सध्या त्यावर औषध नसल्यामुळे या पुढे काय होणार या विचाराने देखील कोणाचीही घाबरगुंडी उडू शकते. शिवाय ज्या वेगाने ही लागण होत आहे, ते पाहिले तर खरोखर भीतीच वाटते.

हा भयानक विषाणू तुमच्या श्वासनलिके मधून फुफ्फुसांत पर्यंत धोका निर्माण करतो आणि एकदा शरीरात शिरला की, प्रचंड वेगाने वाढत जाऊन शेवटी श्वास घ्यायला जड जाते. व्हेंटिलेटरवर ठेवायला लागते, हे सगळं ऐकलं वाचलं की कोणाच्याही हृदयाचा ठोका थांबू शकतो. त्यामुळे ही लागण होऊ नये याकरता घरातच थांबणे नितांत आवश्यक आहे. सध्याचा काळ किती विचित्र आला बघा, लागण झाली आणि मृत्यू आला तर तुम्हाला ताबडतोब स्मशानात नेले जाऊन विल्हेवाट लावली जाते. हा संसर्ग समजा तुम्हाला झाला नाही, पण काही कारणाने तुम्ही आजारी पडला, तर तुम्हाला तुमचे नातेवाईक सुद्धा मदतीला, भेटायला येणे देखील तसे कठीणच. त्यातून जर मृत्यू आला तर काय आणि कोण कसे मदतीला येणार पुढे काय काय होणार, असे अनेक यक्षप्रश्न सर्वसामान्य माणसांच्या मनासमोर येणार हे सहाजिक आहे.

थोडक्यात, कधी नव्हे तो भयानक विचित्र असा काळ आला आहे आणि त्यातून कोणाचीच सुटका सहजासहजी नाही हे सत्य आहे. जोपर्यंत या रोगावर विषाणूवर जालीम औषध सापडत नाही व त्याची बाधा होऊ नये म्हणून लगेच सापडत नाही तोपर्यंत जो अनिश्चित काळ जाणार आहे तो पर्यंत रात्र काळोखाचीच आहे.

सुधाकर नातू

ता.क.
माझा ब्लॉग असून त्यावर असेच शंभराहून अधिक विविध विषयांवरील लेख आपण जरुर वाचा.

For that
Please Open this link
and share it too in your whatsapp grp:

http//moonsungrandson.blogspot.co

शिवाय माझ्या यू ट्यूब चॅनलची लिंक आहे:

https://www.youtube.com/user/SDNatu

सदर लिंक उघडून चाळीसहूनही अधिक उपयुक्त विडीओज् जरुर पहावेत. अभिप्राय कळवावा.

धन्यवाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा