शनिवार, २ मे, २०२०

"आजोबांचा बटवा-५": "श्री ज्ञानेश्वरींतले अमूल्य विचारधन":


"आजोबांचा बटवा-५":
"श्री ज्ञानेश्वरींतले अमूल्य विचारधन":

"प्रास्ताविक":

गेले महिनाभराहून अधिक दिवस
lockdown असल्यामुळे घरातच बसायची वेळ आली आहे. त्याचा एक फायदा मात्र जरूर झाला: सध्या लायब्ररी चालू नाही, त्यामुळे नवीन वाचायला काहीही नाही, घरात पेपरही येत नाही, त्यामुळे रोजचा पेपर वाचण्याची सवयही जवळजवळ गेलेली, कारण कितीही नाही म्हटलं तरी ऑनलाईन पेपर मोबाईलवर वाचणे, हा नक्कीच त्रासदायक, विशेषतः आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना कष्टप्रद नकोसा असाच पर्याय असतो, त्यामुळे जुने ते सोने, असे अनुभव यावेत अशा तऱ्हेच्या घटना घडल्या.

माझे कपाट लावताना, मला माझ्या विविध जुन्या डायऱ्या मिळाल्या आणि त्या डायर्‍यांमधील दहा-पंधरा वर्षांपूर्वीच्या त्या असूनही, त्यातील अनेक विचार मला विविध लेखांचा स्वरूपात या दिवसात मांडता आले, हे माझे भाग्यच होय. त्यातीलच आज माझ्यासमोर जे पान उघडले गेले, ते कधीतरी त्या काळात, कुठल्याशा मंदिरात डॉक्टर यशवंत पाठक यांची अतिशय मुलगामी, प्रासादिक व्याख्याने ऐकली आणि त्यांच्या माझ्या मनावरील उमटलेल्या प्रतिमा, मी या अशा शब्दरूपात नोंदवुन ठेवल्या होत्या, त्या सापडल्या. आज त्यातीलच ही नोंद मांडत आहे. ती नक्की तुम्हाला मार्गदर्शन करेल व चांगलीच उपयुक्त वाटेल.

"अमूल्य विचारधन":

"डॉक्टर यशवंत पाठक यांची व्याख्याने ऐकणे, म्हणजे खरोखर चा एक अमृतानुभव असतो. मनाला, तर्काला पटतील, असे विचार ते आपल्या उगवत्या भाषेच्या शैलीत सांगत जातात आणि तास-दीड तास कसा निघून जातो, ते कळतच नाही. आपल्या पूर्वसुरींनी निसर्गाचे यथातथ्य भान राखून, मानवी जीवनाचा योग्य तो अर्थ जाणत, ते यशस्वी समाधानी करण्याची जीवनशैली निर्माण करण्याकरता, वेगवेगळे सणवार, व्रतवैकल्ये व उपास-तापास, पूजाअर्चा अशा परंपरा निर्माण केल्या. तसेच डॉ. पाठकांच्या निरूपणांतून मनावर ठसते की, आजच्या चंगळवादी भोगवादी युगात, विश्वातील निसर्गाचे सर्वव्यापी अस्तित्व
नाकारून, माणूस आपले श्रेष्ठत्व, वर्चस्व गाजवण्याचा केविलवाणा प्रयत्न करतो आहे, हे योग्य नव्हे. पूर्वीच्या आपल्या सांस्कृतिक ठेव्याची शिदोरी, बदलत्या काळात जाणीवपूर्वक व्यवस्थित जपावी, असेही डॉक्टर पाठकांच्या विचारधनांतून वाटले. त्यांच्या श्रीकृष्णदर्शन व ज्ञानेश्वरी अध्यात्म या दोन प्रवचनातील मला उमजलेले मोजके ज्ञानकण मी जसे ऐकले आहेत ते मांडतो:

# अभ्यास करून, मगच प्रकटावे. मेहनतीला एखाद्या विषयावरील निष्ठापूर्वक व्यासंगाला तोड नाही. तेवढी मेहनत जर जमत नसेल, तर उगाच बडबड करून, आपले नसलेले पांडित्य पाजळू नये.
# श्री ज्ञानेश्वरी व गीता, हे जीवन कसे जगावे, जीवनातील आपले प्रश्न कोणते, त्यांची उकल कशी करावी आणि विश्वाच्या पसार्‍यात आपले स्थान व बाह्य परिस्थितीशी व्यक्तींशी काय ऋणानुबंध आहे, या साऱ्याचे सोदाहरण विवेचन करणारे हे ग्रंथ होत.
# अवघ्या अठराव्या वर्षी अक्षरशः या माऊलीने श्री ज्ञानेश्वरी कशी रचली 9000 अशा ओव्यांचा हा अमृततुल्य विचारांचा खजिना कसा निर्मिला, हे खरोखर एक अद्भुत कोडे आहे.
# ज्ञानेश्वरांची थोरवी वादातीत आहे, कारण आज 830 वर्षांनी त्यांच्या विचारांचे जे काही अमोल धन आपल्याजवळ आहे, ते अजूनही पटण्याजोगे आहे.
# त्यांच्या विचारसंपदेवर प्रेम करणारे लाखो वारकरी आहेत म्हणूनच अजूनही माऊलींचे पुण्यस्मरण तत्मयतेने हजारोजण करत असतात. # जीवनात निसर्गाचे भान ठेवावे, ज्ञानोपासना करावी.
# एखादी गोष्ट आपल्याला जेव्हा सहजसुंदर वाटते, तेव्हाच भक्ती निर्माण होते. जीवनात
भक्तीबरोबर, शक्तीची उपासनाही करावी. कारण अत्यावश्यक असे कर्मकर्तव्य पार पाडण्यासाठी, तिची नितांत आवश्यकता असते.
# सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपण केवळ आपल्यापुरतेच न पाहता, साऱ्या विश्वाचे कल्याण साधण्यासाठी, आपल्या परीने झटत राहावे. 'दुरितांचे तिमिर जावो' अन जो जे वांछिल तो ते लाहो' असा आपल्या प्रयत्नांचा गाभा असावा.
( सध्याच्या कसोटीच्या काळात तर हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे)
# शब्द हेच खरे ब्रह्म होय. कारण माणसाला दिलेल्या सर्वात मोठ्या अन् श्रेष्ठ शक्तीचे जाणीवेचे प्रकटीकरण, जाणीवेची एकंदर ज्वलंत अशी प्रतिमा, आपल्याला व इतरेजनांना करून देण्याचे सामर्थ्य, ह्या शब्दांतच असते.
# अनुभवांच्या निकषांवर जेव्हा विचारांची जाणीव, तावून-सुलाखून पारख केली जाते, तेव्हाच शब्दब्रह्म निर्माण होते. शब्दब्रह्माच्या उपासनेसाठी भरपूर वाचन मनन व चिंतन व प्रसंगी ते जसे जमेल तसे लेखनही हवेच हवे.
# श्री ज्ञानेश्वरी वरील डॉक्टर पाठकांचा विचारांचा ओघ आहे, तो खरोखर ऐकतच जावे, त्यामध्ये डुंबत राहावे, असाच असतो."

आज डॉ यशवंत पाठक, आपल्यात जरी नसले तरी यानिमित्ताने माझ्या डायरीमधील ही निवडक शब्दपुष्पे, मी वेचली होती-सुमारे दहा-पंधरा वर्षांपूर्वी, ती आज या निमित्ताने तुमच्यासमोर उलगडून दाखवता आली. सध्याच्या काळात अशा तर्‍हेचे विचार मनात येणे आणि त्या विचारांप्रमाणे आपण वागण्याचा प्रयत्न करणे, हेच शेवटी आपले ध्येय असावे. त्याचा प्रामाणिकपणे आपण सर्वांनी पुरावा करायला हवा, एवढेच मी जाता जाता म्हणू शकतो.

घरातच रहा, नियम कसोशीने पाळा. स्वच्छ व स्वस्थ रहा.

धन्यवाद
सुधाकर नातू
ता.क.
असेच वैविध्यपूर्ण व अनेक विषयांचा उहापोह करणारे शंभराहून अधिक लेख वाचण्यासाठी ही लिंक उघडा....आपल्या संग्रही ठेवा....

http//moonsungrandson.blogspot.com

आणि
आपल्या whatsapp grps
वर शेअरही करा...।।....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा