शनिवार, ९ मे, २०२०

"ह्रदयसंवाद-२१": "करोना"-डरो ना? ना, ना, रोना ही रोना!":

"ह्रदयसंवाद-२१":
"करोना"-डरो ना? ना, ना, रोना ही रोना!":

पहिल्या व दुसर्या लाँकडाऊनमध्ये पूर्ण दुर्लक्षित ठेवलेल्या परप्रांतीय मजूरांच्या घरवापसीमुळे बिचार्यांवर पायी शेकडो मैल प्रवास करायची वेळ आली. अशाच एका अभागी मजुराची श्री हेरंब कुलकर्णी ह्यांनी घेतलेली ही मुलाखत वाचावी. ती डोळ्यात अंजन घालणारी व नियोजनाचा खेळखंडोबा ऐरणीवर आणणारी आहे:

प्रथम ही मुलाखत वाचा:

"*हैदराबाद ते बिहारपर्यत पायी निघालेल्या मजुराची मुलाखत* ****************************** स्थलांतरित मजूर रस्त्याने चालत गावाकडे निघाले आहेत हैदराबाद वरून थेट बिहार मध्ये. नागपूर मध्ये दिनानाथ वाघमारे व त्यांच्या 'संघर्ष वाहिनी' च्या सहकाऱ्यांनी त्यांना थांबविले व त्यांची राहण्याची व जेवणाची सोय केली.या पायी निघालेल्या मजुरांची हेरंब कुलकर्णी यांनी फोनवर घेतलेली मुलाखत ---------------------------- *तुझं नाव काय ?*
.राजीव . *सोबत किती कामगार आहेत ?* आम्ही ८ जण आहोत *कुठे कामाला होतात ?
* हैदराबादमध्ये बांधकाम साईटवर कामाला होतो * मग तिथून का निघालात* ?
*मालकाने काम बंद केले व खायलाही दैना हिशोबही करीना त्यामुळे तसेच गावाकडे निघालो.
*कधीपासून चालायला सुरुवात केली ?
*१३ दिवस चालतो आहे. .
*रोज किती किलोमीटर चालता ?
*४० ते ५० किलोमीटर पायी चालतो आहे. .
*पुढे कुठे जाणार ?तुमचे गाव किती लांब आहे हे माहित आहे
कां? .
* हो.आम्ही बिहारच्या सहरसा जिल्ह्यातील बडोना गावचे। आहोत.इथून चौदाशे किलोमीटर दूर आहे. .
*मग इतके दूर पायी जाणार ?
*हो. मग दुसरे काय करू ? कोण खायला _देणार_ ? .
*पण रेल्वे सुरू होतील ? .
तोपर्यंत आम्हाला कोण खायला देणार? तेव्हा जमेल तसे पुढे जातो आहे. *वीटभट्टीवर तुम्हाला कोणी आणले होते ?*
आमच्या गावा जवळच्या एका मुकादमाने आम्हाला तिथे नेले व आता आम्हाला सोडून दिले .
*किती रुपये रोज मिळत होता ?
*चारशे रुपये ठरले होते. पण मालकाने आता हिशोब पूर्ण केला नाही व हाकलून दिले. त्या मुकादमाचा फोन लावतो आहे .त्याचा फोन लागत नाही. .
*गावाकडे गेल्यावर त्यालाशोधणार का ?
*शोधू. पण त्याचे गावात आम्हाला माहीत नाही। . । *मग पैसे सोडून देणार ?
*मग दुसरे काय करू भाऊ ? . *हैदराबादजवळ कुठे राहत होते ?
*तिथे खोली घेऊन राहत होतो। . *गावाकडे किती शेती आहे ?
*आम्हा आठ जणांपैकी दोघांना तीन एकर शेती आहे. मला शेती नाही. .
*मग तिथेच बिहार मध्ये काम का करत नाही ?
*तिथे सारखे काम मिळत नाही म्हणून मग आंध्रप्रदेशात गेलो होतो. *घरी फोन केला का ?
*हो .आई वडील काळजीत आहेत. ते म्हणतात तुम्ही इकडे गावाकडे निघून या. थोडेसे धान्य घरात आहे. तेच खाऊन राहू व पुन्हा तुम्ही जायचे नाही. तुम्ही कामाला जायचे नाही. इथेच उपाशी रहा. पण परत असे हाल करून घेऊ नका। . *मग तुम्ही पुन्हा येणार नाही का ?
*बघू, पण फसवल्यामुळे पुन्हा जावेसे वाटत नाही। .
*तुमच्या गावातील किती लोक बाहेर आहेत ?
*आमच्या गावात शेतीला पाणी नसल्याने बरेच जण असेच ठीक ठिकाणी आहेत.
*इथे तुम्हाला कोण भेटले ?
*आम्ही जबलपूर रस्त्याने निघालो होतो पण रस्ता चुकल्यामुळे हे लोक भेटले व तीन तारखेपर्यंत येथे थांबा म्हणालेत. जेवणाची राहण्याची सोय करतो म्हणालेत.
*समजा हे लोक भेटले नसते तर ?
* तर गेलो असतो पुढे पुढे... कधीतरी आम्ही आमच्या घरी पोहोचलो असतोच ना ? ---------------------------
*हेरंब कुलकर्णी*
मुलाखत समाप्त.
---------------------------

"घरवापसीच्या जीवघेण्या यातना":

परप्रांतीय मजूरांवर आपल्या घरी शेकडो कि.मी. चालत जाण्याची वेळ येणे हे दुर्दैव होय. अशाच एका मजूराची श्री. हेरंब कुलकर्णी ह्यांनी घेतलेली मुलाखत वाचनात आली. ह्रदय पिळवटून टाकणारी व डोळ्यात अंजन घालणारी मुलाखत आहे.

करोना महासंकटाचा मुकाबला करण्यासाठी लाँकडाऊन करण्याचा निर्णय हा परप्रांतीयांना कसा महागात पडला, त्याचे हे दुःखद चित्र आहे.
परप्रांतीय मजुरांच्या घरवापसीची व्यवस्था, यथोचितपणे कुठलेही अडथळे न येता पार पाडण्याचे कर्तव्य, पार पाडण्यासाठी नको इतका विलंब केला गेला, ही वस्तुस्थिती टाळता येईल कां? दूरद्रुष्टीचा अभाव आणि संवेदनशीलता नसणे असे म्हणायचे कां?

फाळणीनंतरचे सर्वात भयानक व विघातक असे परप्रांतीयांचे घरवापसीचे स्थलांतर-ताजी बातमी-'मालगाडीने उडवल्याने १६ मजूरांचा दुर्दैवी म्रुत्यु'

😢😢 समस्येकडे इतके काळ पूर्ण दुर्लक्ष केल्याबद्दल माफी मागणे अधिक संयुक्तिक नाही कां?

"भरकटत जाणारा कारभार":

हे काही कमी नाही, म्हणून की काय, केंद्राने व राज्याने दोन्हीकडे दारु विक्रीला, मोकळीक अत्यंत नको त्या वेळी देणे व सगळीकडे बेवडे इतक्या संख्येने जमा होणे असा दुर्देवी क्षण कधीच आला नव्हता. नैतिकता इतक्या रसातळाला गेल्याचे दुःख पहाण्याची वेळ येणे, हा अधःपात पुढे काय काय भयंकर दिवस दाखवणार कोण जाणे.

कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्याच्या साधक बाधक परिणाम ध्यानात न घेता, बेधडक निर्णय घेण्याच्या पद्धतीचे एकामागोमाग एक भयानक परिणाम व्यथित करणारेच नाही कां? त्या परिणतींची जबाबदारी कोणावर?

आज सुरुवातीपासूनच इतकी वर्षे, धोरणकर्त्यांचे अपयश, नियोजनाचा संपूर्ण बोजवारा आणि आपल्या स्वार्थी कारभारापायी, स्थानिक रोजगार समस्येकडे काणाडोळा करणारे एका बाजूला, व मतांच्या पेटीकडे लक्ष ठेवत शहरे फुगवून देणाऱ्या स्वार्थी राजकारण्यांच्या नादान कारस्थानाचे सारेजण बळी ठरलेले पहात आहोत.

सर्व प्रकारच्या साधनसामुग्री नि समृद्ध असलेला देश असून अयोग्य अशा कारभारामुळे, आज श्रीमंत, प्रचंड श्रीमंत आणि गरीब अधिकाधिक गरीब होत आहेत आणि आर्थिक दरी भयानक अशी झालेली बघायला मिळत आहे . निवडक राज्ये व शहरे विकसित होत जाताना अनेक राज्ये मागासलेली राहिल्याने, हा परप्रांतीयांचा लोंढा अनेक महानगरांना बकाल बनवून गेला.

दुसर्या बाजूला आरंभापासून आजपर्यंत आरक्षणाच्या अतिरेकी अट्टाहासामुळे ब्रेन ड्रेनपायी जी सर्वोत्तम गुणवत्ता होती, ती परदेशात जाऊन त्यांना त्या त्या परदेशांचे भले केले आणि इथे गुणवत्ते अभावी मामुली सामान्य अशा वकुबाच्या कारभार्यांमुळे आज ही वेळ आलेली बघायला मिळत आहे. गुणवंताना अपेक्षित संधी उपलब्ध करून देण्यात सपशेल अपयश आल्याने ही विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. कालचक्र इतके विदारक दिवस दाखवेल असे कोणालाही त्यावेळेला वाटले नसेल.

कोरोना संकटाचा कुठलाही नायनाट झालेला नसताना उलट त्याचे अधिक भेसूर स्वरूप समोर येत असताना, अचानक दारू दुकाने उघडी करून काय साध्य होत आहे, तर समाजाचे जे विद्रूप स्वरूप आज समोर आले आहे. ते तर खरोखर मान खाली घालावे असेच आहे. समंजस सुसंस्कृत नीतिमान माणसाला मान खरोखर दुःखातिरेकाने खाली घालायला लागावी अशा तर्‍हेची सभोवतालची परिस्थिती अधिकाधिक उत्पन्न होताना पाहायला मिळत आहे.

परप्रांतीय मजुरांना घरवापसी करून देण्याची योजना लाँकडाऊन सुरू करतानाच अंमलात आणायला हवी होती. दोन लाँकडाऊन वाया जाऊ दिले गेले, त्यामुळे आजची भयानक व लाजिरवाणी स्थिती निर्माण झाली आहे.
नुसते (सतत बदलणारे) फतव्यांमागून फतवे काढून ईप्सित साध्य होत नसते. तहान लागली की, विहीर खणायची असे धोरण असल्याने अशीच वेळ सातत्याने येत रहाणार आणि मधल्यामधे सामान्य भरडले जाणार, दुसरे काय !

फेब्रुवारीत ह्या संकटाची कल्पना असताना एक दिवसाच्या, नंतर निरर्थक ठरलेल्या स्वागत सोहळ्यात शंभर कोटींचा चुराडा करण्यात मश्गुल राहून दुर्लक्ष केले गेले. शेवटी २४ मार्चला
पहिला लाँकडाऊन करताना रात्री आठ वाजता घोषणा केली गेली आणि बारा वाजता त्याची अंमलबजावणी ठेवणे, नोटाबंदी सारखाच हा धक्कादायक प्रकार झाला. तेव्हाही अशाच रांगाच रांगा ! कुठल्याही तऱ्हेची योग्य ती खबरदारी घेतली गेली नाही, ना विविध राज्याच्या प्रमुखांबरोबर चर्चा करून योग्य ते नियोजन करून आणली गेली. एवढे करून तिची कठोर अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला गेला नाही. सर्व रामभरोसे असेच होत राहिल्याने अजूनही कोरना संकटापासून, अपेक्षित यश तर नाही व दुसरीकडे अर्थसंकट आ वासून उभे, त्यामुळे आता कशीही शिथीलता देत रहाण्याची अगतिकता आलेली दिसत आहे.
वस्तुनिष्ठ कारणमीमांसा":

अशी परिस्थिती निर्माण व्हायला, आपली जनता, हीदेखील कारणीभूत आहे, हे सत्य नाकारता येणार नाही. साधी भाजी घेण्यासाठी किती माणसं कशी गर्दी करतात, हे आपण बघितले आहे आणि अशा गर्दीचे शेवटी रूपांतर हे कोरोनाची लागण लागण्यात होतं, एवढी साधी गोष्ट माणसं लक्षात घेत नाहीत. ज्याला त्याला घाई, मग ते दारूच्या दुकाना पुढची लाईन असो किंवा किराणा घेण्यासाठी लाईन असो, वा इतरत्र, कुठेही शिस्त म्हणून आपल्याला काही माहीत नाही. त्यामुळे पोलीसदलावरील ताण खूप वाढत गेलेला दिसत आहे. एकंदर परिस्थिती अधिकाधिक हाताबाहेर जात चालली आहे.

त्यात भर म्हणजे आपली प्रचंड लोकसंख्या. त्या लोकसंख्येच्या रेट्यामुळे आणि त्यातून बरेचसे जे काही लोक आहेत ते गरीब आहेत, पोट हातावर असलेले व दररोजची भ्रांत असलेले आहेत. त्यांची निरक्षरता वा शिक्षण, विचारशक्ती आणि अपेक्षा या वेगळ्या आहेत. त्यांच्याजवळ एवढी, जेवढी पांढरपेशा व मध्यमवर्गाला असते, तशी समज नाही आणि त्यामुळे लॉकडाऊन करून देखील म्हणावा, तितकासा फायदा झालेला नाही.

इतक्या दशकांनंतरही जर मोठ्या संख्येने अशा तर्‍हेचे शिस्त नसलेले आणि मूलभूत गरजा पुऱ्या होऊ न शकणारे असे नागरिकच प्रचंड संख्येने, देशात असले, तर दुसरं काय होणार? आपल्या इतक्या वर्षांच्या नियोजनाच्या व अंमलबजावणीच्या अपयशाचे, दूरद्रुष्टीच्या धोरणांच्या अभावाचे, गलथान कारभार व भ्रष्टाचाराचे तो स्वाभाविक परिणाम आहे, हे ह्या महासंकटाने दाखवून दिलेले आहे.

त्यामुळे शासनासमोरचाही प्रश्न अतिशय गहन आहे, कठीण आहे आणि त्याची सोडवणूक करणे, महाकर्म कठीण आहे, यात वाद नाही. पण जेवढा लाँकडाऊन वाढत जाईल, तेवढं अर्थचक्र मंदावल्यामुळे किंवा थांबल्यामुळे, समस्या अधिकाधिक उग्र आणि जिकिरीच्या होऊन बसतील दुसरं काय?

पुढे काय? ह्या यक्षप्रश्नावर उत्तर कोणालाही सापडत नाही, अशी विदारक स्थिती पहाण्याची वेळ सर्वसामान्य जनांवर आली आहे.
कोरोनामुळे पूर्वीपासून आतापर्यंत, ज्या ज्या चुका घडल्या, त्याचे दाहक परिणाम आता सर्वसामान्यांना भोगावे लागत आहेत. ह्यावरून तरी धडा घेऊन पुढील वाटचालीत योग्य ती आवश्यक सुधारणा होईल अशी आशा बाळगू या.

तोपर्यंत..
"करोना"-डरो ना? ना, ना, रोनाही रोना!":

धन्यवाद
सुधाकर नातू
ता.क.
राहून राहून आता असे वाटते की, स्वातंत्र्यापूर्वी राजकीय स्वातंत्र्याला पहिले प्राधान्य, असे आग्रहाने मांडणारे एका बाजूला व समाज सुधारणा व्हावी योग्य त्या तर्हेचे नागरिक निर्माण करणारे असे धोरण व प्रयत्न आधी असावेत, असे मानणारे सुधारक, यांच्यातील द्वंद्वात दुर्दैवाने राजकीय स्वातंत्र्य मंडळींना प्राधान्य व यश मिळाल्यामुळे, आपण आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य, सुसंस्कृत समंजस नागरिक न निर्माण झाल्यामुळे, आज या अवस्थेला आणून ठेवले आहे, असे नमूद करावेसे वाटते.......

असेच अंतर्मुख करणारे, शंभराहून अधिक..... लेख वाचण्यासाठी ही लिंक उघडा......
आपल्या whatsapp grp वर शेअरही करा.....

http//moonsungrandson.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा