शनिवार, ४ जानेवारी, २०२०

"रंगांची दुनिया-१": "शारदोत्सव-१": "श्री दीपलक्ष्मी दिवाळी अंक'१९ सखोल रसास्वाद"


 "रंगांची दुनिया-१:
"शारदोत्सव-१"
"श्री दीपलक्ष्मी दिवाळी अंक'१९
सखोल रसास्वाद"

प्रास्ताविक:
नुकताच मी सर्वांगसुंदर व परिपूर्ण असा
"श्री दीपलक्ष्मी दिवाळी अंक'१९" वाचला. त्याचा माझ्यावर इतका काही परिणाम झाला की, हा सविस्तर ह्रदयसंवाद लिहायला उद्युक्त झालो आहे.

अंकांच्या वाचनाने माझ्यावर काय गारुड केले ते प्रथम देतो:
-------------------------
"टीमो" पासून मुक्ती" !:

आज खरोखर नवलच घडले, कधी नव्हे असा एक खरोखर आश्चर्यकारक विक्रम मी करू शकलो !

दररोज सकाळी उठल्यापासून क्षणोक्षणी मोबाईल हाताळणाऱ्या मला, आज सकाळपासून चक्क
आत्तापर्यंत सायंकाळी ६ पर्यंत म्हणजे, जवळजवळ बारा तास मोबाईलला हातही लावावासा वाटला नाही, ना टीव्ही पहावासा वाटला, ना सोशल मीडियावर असे काही खरडावेसे वाटले !

अशा अनोख्या विक्रमाला, कारण ठरली एक वेगळीच गोष्ट ! रुपये ३५० अशी भरघोस किंमत असलेला, ३०० पानांहून अधिक असल्यामुळे वजनदार असलेला, परंतु सर्वांगीण सखोल अशा साहित्य खजिन्याने नटलेला, अर्थात् लौकिकार्थानेही वजनदार, "श्रीदीलक्ष्मी" चा दिवाळी अंक'१९ वाचायला मिळाला. प्रत्येक वाचनप्रेमी रसिकाने वाचावा, असाच हा एक उत्तम ऐवज आहे.

ह्या एकसंघ, एकाग्र वाचनामुळे टीव्ही आणि मोबाईल ह्या आजच्या युगातील अत्यावश्यक साधनांची मला जराही आठवण झाली नाही, हा सर्वात मोठा फायदा मिळाला. ही दोन्ही उपकरणे जेव्हा आपल्यासाठी अस्तित्वातही नव्हती, त्या जपून ठेवणार्या काळाची आपोआप उजळणी झाली.

ह्यापुढेही "टीमो" पासून अशीच मुक्ती मिळत जावी हीच इच्छा !"......
--------------------- ------
अशा ह्या संग्राह्य दिवाळी अंकात साहित्यकृतीचे योगदान असणे, ही देखील एक भूषणावह गोष्ट होय. त्यांच्यातील मला विशेष भावलेल्या काहींचा रसास्वाद तुम्हाला हा अप्रतिम अंक वाचायलाच लावेल, अशी मला आशा आहे. लेखकाचे नांव , साहित्यक्रुतीचे शीर्षक व नंतर रसास्वाद हा असा:

श्री. रविप्रकाश कुलकर्णी:
"अग्रगण्य घटनातज्ञ नानी पालखीवालांबद्दल":

ह्या थोर विधीज्ञासंबंधीत विविध प्रकारची वेधक वेचक माहिती व मोजके नाट्यमय प्रसंग प्रस्तुत लेखातून मांडले आहेत. खरोखर रंजक आणि विचार करण्याजोगा हा आठवणींचा ठेवा आहे.

या थोर माणसाने, असामान्य न्यायालयीन कामगिरी तर केलीच, पण आपल्या अर्थमंत्र्यांनी मांडलेल्या वार्षिक बजेटबद्दल दिलेली मार्गदर्शक व परखड व्याख्याने, एका भल्यामोठ्या स्टेडियममध्ये वर्षानुवर्ष अलोट गर्दीत ऐकली जात ही खरोखरच अभिमिनास्पद गोष्ट होय. लेखकाचाही जवळून संपर्काचा योग ह्या उच्चविद्याविभूषित वकीलांशी कसा कोठे आला होता, हे वाचून थक्क व्हाल.
--------------------------

श्री. मनोज आचार्य:

"भारतातील पहिली फोटो जर्नालिस्ट":
होमाई व्यारावावला...

काही काही गोष्टी आपल्या मनात किंवा माहितीत नसतात मात्र त्यांचे नेहमीच कुतूहल वाटत असते. पत्रकारिता हा आज लोकमान्य व आवश्यक असा व्यवसाय बनला आहे. परंतु ज्यावेळी स्त्रिया नुकत्याच घराबाहेर पडून काही धडपड करायला लागल्या होत्या, अशा वेळेला होमाई व्यारावाला यासारखी एक स्त्री फोटो जर्नालिस्ट बनते, तिची कहाणी या लेखात अतिशय उत्कंठापूर्ण रितीने संग्राह्य निवडक फोटो देऊन मांडली आहे. त्यामुळे इतिहासाची तर उजळणी झालीच परंतु या स्त्रीच्या धडाडीचे आणि कौशल्याचे कौतुक वाटले.

मला आठवण झाली,अशाच तर्‍हेचे "पहिल्यात पहिले" कोण याचा मी विविध क्षेत्रातील शोध घेतला होता आणि त्याबद्दलचे माझे दोन लेख माझ्या ह्याच ब्लॉगवर लिहिले होते. आपण तो लेख जरुर वाचावा.
--------------------------

प्रा. अविनाश कोल्हे

"शह-काटशह":

एका भुरट्या चोरावर, दैवगतीने फसलेल्या चोरीच्या एका प्रयत्नानंतर पळून जाताना काय काय प्रसंग ओढवतात, त्याचा मदतगार मित्रही कसा त्याला दगा देतो आणि त्यामध्ये काहीही संबंध नसलेले असे, ट्रकड्रायव्हर आणि क्लिनर त्या भानगडीत कसे गुंतले जातात, हे अतिशय ओघवत्या भाषेत प्रसंगांचे यथातथ्य वर्णन या प्रकरणात मांडले आहे.

सभोवताली जे घडतंय याचे सूक्ष्म निरीक्षण आणि त्यातून गुन्हेगारी विश्वाचे मनोविश्व रेखाटणे, हे काही येरागबाळ्याचे काम नव्हे. त्याकरता जातीवंत प्रतिभाच हवी आणि ती येथे प्रकर्षाने दिसते. त्यामुळे लेखकाची हे प्रकरण असलेली मूळ कादंबरी खरोखर वाचनीय असणार हयाची खात्री पटली.
-----------------------

डॉ श्रीकांत मुंदरगी

"बिनधास्त बिनधास्त बेफिकिर आणि बेदरकार राष्ट्राध्यक्ष" श्री. डोनाल्ड ट्रम्प यांचे चित्तथरारक असे जीवन चरित्र ह्या लेखात रंजकतेने मांडले आहे. काळाच्या गरजेनुसार समानधर्मी नेतृत्व कसे उदयाला येते ते आपण विविध देशांमध्ये सध्याचे जे अग्रणी नेते आहेत त्यावरून समजू शकतो.

आजच्या खळबळजनक समयी, अमेरिकेसारख्या जगात महाबलाढ्य अशा श्रीमंत देशाचे समर्थ सारथ्य, करण्यासाठी असाच डोनाल्ड ट्रंम्प ह्यांच्यासारखा, परिणामांची पर्वा न करणारा, सत्तरी ओलांडूनही अशा धडाडीचा आणि धडपड्या माणूस हवा हेच खरे! तसेच त्याचे बरे वाईट परिणाम भावी काळात काय होतील ह्याची मात्र खात्री देणे कठीण ठरेल.

----------------------
श्री.अरुण पुराणिक

"चोप्रांचे महाभारत":
काळी महाभारत ही दूरदर्शन वरील विशाल मालिका बघण्यासाठी जवळ जवळ सारा भारत एक वाटला जायचा आणि रस्ते अक्षर च्या पोस्ट पडायचे अशा या लोकप्रिय मालिकेच्या जडणघडणीत कुतुहूल प्रत्येकाच्याच मनात असू शकते त्यासंबंधीची पडद्यामागची कहानी या लेखात आपल्याला वेगळीच दिशा आणि चित्र दाखवते.

महाभारत कथेचा भव्य नाट्यमय आणि रोमहर्षक असा पट छोट्या पडद्यावर मोठ्या खटपटीने प्रयत्नपूर्वक कसा मांडला त्याची कहाणी "चोप्रांचे महाभारत" या चटपटीत लेखात सांगितली आहे. ती खरोखर मनोरंजक आहे. पडद्यामागच्या विविध मजेशीर घटना त्यात नमूद केल्या आहेत त्याही आश्चर्यजनक म्हणून नोंद घ्यायला हवी.

--------------------

श्री. बाबू मोशाय,

"एक बंजारा गाता जाये":
हा गीतकार आनंद बक्षी ह्यांच्या हिंदी चित्रपट स्रुष्टीतील अविस्मरणीय योगदानाची चपखल दखल घेणारा, हा लेख खरोखर वाचनीय आहे.

एखाद्या कलावंताचे जीवन इतक्या जवळून उभे करणे खरोखर कठीण असते. त्यातून त्याच्या भावविश्वाचा, वैशिष्ट्यपूर्ण कारकीर्दीचा संपूर्ण लेखाजोखा मांडणे, हे खरोखर एखाद्या चिकित्सक अभ्यासकाचे काम असते.
आनंद बक्षी यांच्या 'एकसे बढकर एक' अशा सुमधुर अर्थपूर्ण गीतांचा जो पट व त्यांच्या निर्मिती मागची कहाणी येथे मांडली आहे, तो खरोखर एक ऐतिहासिक ठेवा मानला जावा.

अशा तर्‍हेचे इतके सखोल व्यक्तीचित्रण फारच दुर्मिळ झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर लेखकाच्या रसिक दृष्टीचा आणि गोष्टींच्या तळाशी जायच्या वृत्तीचा परिचय या लेखातून घडतो. पन्नास साठच्या हिंदी चित्रपटांच्या सुवर्णकाळाची जणु उजळणी असावी अशीच आनंद बक्षींची योग्यता होती असे म्हणणे, हीच त्यांना सुयोग्य आदरांजली असेल.
----------------------------
श्री. संजीव पाध्ये,

"सम्राट आणि नवरत्ने":
ह्या अंकातील "सम्राट आणि नवरत्ने" हा लेख खरोखर अत्यंत अभ्यासपूर्ण आणि इतिहासाची साद्यंत व निरपेक्ष माहिती देणारा असा आहे.

आत्तापर्यंत आम्हाला फक्त तानसेन बिरबल आणि कदाचित तोरडमल एवढीच तीन नवरत्ने माहिती होती, परंतु लेखकाच्या प्रयत्नांमुळे आम्हाला इतरही रत्नांची देखील जाणीव झाली. त्या गुणग्राहक सम्राटाचे आणि त्या नवरत्नांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
----------------------------
श्रीमती शुभदा साने

"लेखन, आनंदी गोपालचे":
बरोबर एक वर्षापूर्वी "आनंदी गोपाळ" हा अविस्मरणीय चित्रपट मी पाहिला होता. तो पाहून मी इतका भारावून गेलो होतो की, ते शब्दात वर्णन करणे कठीण आहे.

एखादा विशिष्ट ध्येयाने झपाटलेला, गोपाळराव जोशींसारखा अवलिया, आपल्या पत्नीने भरपूर शिकावे, म्हणून त्या अत्यंत प्रतिकूल काळात काय काय धडपड करतो आणि त्याला त्याची पत्नी कशी यशस्वी, पण अखेरीस दुर्दैवी ठरलेली साथ देते, ते त्या चित्रपटात फारच प्रभावीपणे मांडलेले होते. लगेच मी माझ्या ब्लॉगवर रसास्वाद घेणारा एक लेखही लिहिला होता.

आज ती सारी आठवण "लेखन आनंदी गोपाळचे" हा रसभरीत लेख वाचून झाली
आणि गंमत गंमत अशी की, "आनंदी गोपाळ" चित्रपट ज्या कादंबरीवर आधारित आहे, त्या कादंबरीचे लेखक श्री. ज. जोशी यांच्या मुलीचाच तो लेख असावा ही.

एखादा सिद्धहस्त लेखक विशिष्ट असा विषय घेऊन किती धडपड करीत, ते ध्येय पूर्तीला नेतो ते लेखात सहजपणे दाखविले आहे. अशी ऐतिहासिक महत्व असलेली कलाकृती जेव्हा आकार घेते, तेव्हा त्यामागे काय काय मनाचे व्यापार घडत जातात, ते या लेखामुळे उमजले. एक वेगळाच अद्भुत आनंद या लेखाच्या वाचनाने मिळाला.
---*-*-*--*----------*-

डॉ नंदू मुलमुले

"मेनकेची तपश्चर्या":
हा एक अनोखे, परंतु विषयासंबंधी चपखल शीर्षक असलेला लेख, हेलन ह्या ख्यातनाम अभिनेत्री-नर्तिकेबद्दल अदभूतरम्य व चित्तथरारक माहिती देतो. ती साद्यंत वाचणं, हाच एक रोमहर्षक अनुभव होता.

एखाद्या व्यक्तिला किती किती प्रसंगांना तोंड द्यावे लागते, कसकशी संकटे भोगावी लागतात, याची कल्पना या लेखावरून येते. तीन-साडेतीन वर्षांची एक अजाण अभागी मुलगी बर्मा सोडून दिसेल ती वाट आईबरोबर, पायदळी तुडवत भारतात येते आणि त्यानंतर तिचे नाट्यमय जीवन कसे आकारास येते, याची खरोखर अभ्यासपूर्ण अशी माहिती ह्या लेखाद्वारे दिली आहे.

आपण रुपेरी पडद्यावर हेलनला जेव्हा जेव्हा बघतो, तेव्हा तिच्या नयनरम्य अदाकारीने हक्क होतो. परंतु त्यामागे किती कथा आणि व्यथा होत्या, याची जाणीव या अत्यंत वाचनीय लेखाने दिली.
------------------------

श्री. दा कृ सोमण

"कालगणना व भारतीय पंचांग":
कालगणना आणि त्याची शास्त्रीय नोंद ही आपल्या पूर्वसुरींनी कसकशी घेतली आणि त्यातून पंचांग कसे निर्माण झाले, हे या लेखात मांडले आहे. खरोखर अभिमान वाटावा अशीच आपल्या पूर्वजांची ही कामगिरी आहे.

पंचांगाची ओळख सर्वसामान्य वाचकाला सुलभतेने समजेल अशा भाषेमध्ये हा लेख आहे. तो खरोखर अत्यंत उपयुक्त असाच आहे. पंचांगाचा इतिहास आणि त्यामध्ये होत गेलेली प्रगती अगदी योग्य तऱ्हेने मांडली आहे. माझ्यासारख्या अभ्यासकाला सुद्धा हा लेख खरोखर मार्गदर्शक वाटला.

ह्या लेखाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे, केवळ पंचांगातील विविध अशा अंगांची आपण नुसती ओळख करून दिली नाही, तर आगामी
कालखंडात महत्त्वाच्या दिवसांचे सखोल संशोधन करून अचूक नोंद केली आहे आणि ती खरोखर अत्यंत सर्वांनाच उपयोगी पडणारी आहे.
------------------------
श्री. विजयराज बोधनकर

"पद्मश्री गोरक्षकर आणि मानव धर्म:
मुंबईतील राणीचा बाग आणि म्युझियम ही शालेय जीवनातील सहलीचे प्रमुख ठिकाणे. त्यातील म्युझियमची अवाढव्य इमारत आणि तिथे असलेल्या अनेकानेक प्रकारच्या, भूतकाळातील विविध वस्तूसंचायांचा तो ठेवारुपी खजिना बघायला जाणे, ही एक कायम आवडीची गोष्ट. जिज्ञासू व्रुत्ती व कुतूहल जागते ठेवणारा तो अनुभव असतो.

मात्र वय वाढल्यावर तिकडे पावलं वळतातच असे नाही. परंतु माननीय गोरक्षकरांविषयींच्या आपुलकीपोटी, लेखकाने मनापासून लिहीलेल्या ह्या लेखामुळे पुन्हा एकदा त्या आठवणी चाळवल्या गेल्या. म्युझियम आपल्यापुढे दिसते ते उभे करण्यासाठी, किती माणसे कसकशी धडपडीतात आणि काय काय गोष्टी कारणीभूत होतात त्याची कल्पना अनाहूतपणे विचारात येते.

अशा ह्या अती विशाल संचयपटांची व्यवस्था पाहणे, हे येरागबाळ्याचे काम नव्हे. परंतु ते कठीण काम, विलक्षण जिद्दीने, निष्ठेने आणि प्रामाणिकपणे अव्याहत करणाऱ्या संचालक सदाशिव गोरक्षकरांचा जीवनपट थोडक्यात येथे मांडला आहे. हा मनस्वी माणूस ध्येयाने प्रेरित होऊन आपले चिरंतन खजिना निगुतीने जपण्याचे, त्याची वाढ करण्याचे काम कसे समर्थपणे यशस्वी करतो त्याचे हे मनोज्ञ चित्रण आहे. त्यातून योगायोगाने लेखकाला जणू गोरक्षकरांच्या कुटुंबाचाच भाग होण्याचे भाग्य लाभले, यामुळे हे सारे कथन जिव्हाळ्याची एक अमृतधाराच बनले आहे.

तर अशी आहे श्री. दीपलक्ष्मी दिवाळी अंकाची विलोभनीय दीपमाळ.

संपादक श्री. हेमंत रायकर ह्यांचे व अंकातील इतर सर्व साहित्यिकांचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा.

जाता जाता एक आठवण जागी झाली मी जेव्हा बहुधा शाळेत होतो आणि माझे काही तरी छापून यावे असे मला वाटायचे. अशा वेळेला मी श्री. दीपलक्ष्मी मधील कुठल्याशा स्पर्धेत भाग घेतला होता आणि त्या वेळेला माझे नांव त्या अंकात छापून आले होते. म्हणजे माझा पहिला साहित्य प्रवेश या श्री दीपलक्ष्मी अंकातून झाला होता, ह्याचा मला अभिमान वाटतो. या शुभारंभ यामुळेच कदाचित, मग माझ्या हातून हजारो शब्दांचे साहित्य पुढे प्रकाशित होत गेले असावे!

धन्यवाद. व नववर्षाच्या शुभेच्छा.
सुधाकर नातू
५/१/'१९


1 टिप्पणी: