सोमवार, २७ जानेवारी, २०२०

"रंगांची दुनिया-४": "शारदोत्सव-३": "किस्त्रीम" दिवाळी अंक'१९चा रसास्वाद":


 "रंगांची दुनिया-४":
"शारदोत्सव-३":
"किस्त्रीम" दिवाळी अंक'१९चा रसास्वाद":

दिसामाजी काही ना काही नव नवे वाचत जावे, काही बघत वा ऐकत जावे आणि त्यातील मनाला भिडलेल्या निवडक मुद्दांवर नीरक्षीर विवेकबुद्धीने जसे जमेल तसे भाष्य करावे अशी माझी प्रवृत्ती असल्याने हा रसास्वाद....

नुकताच मी "किस्रीम दिवाळी अंक'१९ वाचला.
"श्री दीपलक्ष्मी" पाठोपाठ यंदा मला जर दुसरा कुठला दिवाळी अंक मला वैशिष्ट्यपूर्ण आणि विविधता साधणारा वाटत असेल, तर तो म्हणजे "किस्रीम" दिवाळी अंक होय.

या संग्राह्य अंकाच्या वाचनाने, माझ्या मनावर जी भावचित्र उमटली ती पुढे विस्ताराने देत आहे:

# या अंकात विशेषतः इतिहासाच्या काही पानांची उजळणी खुबीने केली आहे त्यामध्ये मला मेघश्याम सावकार ह्यांनी चपखलपणे चितारलेले, बाबाराव सावरकर यांचे, तसे दुर्लक्षित राहिलेले परंतु स्वातंत्र्यवीरांइतक्याच तोलाचे व मोलाचे त्यागमय कष्टमय जीवनचरित्र वाचून खरोखर मन भरून आले. अगाध आणि अमोल देशप्रेमापोटी, ह्या दोन सावरकर बंधूनी भयानक अशा काळरात्रीप्रमाणे असणारी काळ्यापाण्याची शिक्षा भोगली. कदाचित जगाच्या इतिहासात हे असे एकमेव उदाहरण असेल की, जेव्हा दोन सख्खे बंधू इतक्या कष्टमय अशा दुःखभोगांना सामोरे गेले. आपले दुर्दैव हे आहे की, इतक्या अफाट अचाट कर्तृत्वाच्या माणसांचा ना त्यांच्या आयुष्यात यथोचित कदर केली गेली, ना झाला त्यांच्या मृत्यूनंतर उचित गौरव.

# अंकामधील डॉ शामाप्रसाद मुखर्जींविषयीच्या इतिहासाची तपशीलवार कहाणी डॉ गिरीश दाबके ह्यांनी मांडली आहे. ती निश्चितच चटका लावणारी आहे व मला ह्या घडामोडी अपरिचित असल्याने त्याची दाहकता अधिकच होती. कालौघात बदलणारे देशाचे नेत्रुत्व देशाच्या भवितव्याला कलाटणी देणारे असते ही जाणीव मला झाली.

# ह्या अंकातील प्रियदर्शनी तगारे ह्यांची "ती" ही कथा खरोखर उत्कंठापूर्ण व पुढे ह्या माणसाचे व त्या बाईचे काय नाते असेल ह्याची उत्सुकता वाटत असताना 'ती' त्याचीच बिचारी अभागी आई असते, हे समजून चर्र झाले.

# ह्या अंकात अनिरुद्ध बिडये ह्यांच्या लेखात हाँटसन व सोलापूर मार्शल लाँ ह्या तशा अपरिचीत व कदाचित विस्मृतीत गेलेल्या प्रकरणाची आठवण ओघवत्या भाषेत पुनश्च जागी केली आहे.

# तसेच अंकातील प्रा. मिलींद जोशी ह्यांची "लग्नकल्लोळ" ही नांवाप्रमाणेच मनात हल्लकल्लोळ करणारी, एका अभागी तरुणाची व्यथित करणारी कहाणी, खरोखरच उत्कंठापूर्ण होती. विवाह दोन वेळेस अपयशी ठरण्याची अशी वेळ कुणावर येऊ नये, ह्या सदिच्छेने बहुदा कथेचा गोड व समंजस शेवट केला आहे.

# एक मात्र नमूद करावेसे वाटते की अंकातील कवितांच्या भाऊगर्दीत न समजणाऱ्या अशाच रचना अधिक आहेत आणि लक्षात राहतात त्या फक्त मोजक्या दोनच, मकरंद करंदीकरांनी संग्रहित केलेल्या ज्ञानेश्वर व कुसुमाग्रज ह्यांच्या.
जीवनानुभवांचे वास्तववादी परंतु अचूक भाष्य करणार्या ह्या दोन रचना, खरोखर ह्या दोन दिग्गजांचे श्रेष्ठत्व सिद्ध करतात.

# आता अखेरीस स्वतः संपादक श्री. विजय लेले हँयांनी सिद्ध केलेल्या "इतनी नफरत क्यू है भाई?" असा भक्तगणांच्या अनिच्छेने का होईना पण वास्तवात निर्माण होत असलेल्या प्रश्नाचे शीर्षक घेतलेल्या लेखासंबंधी, बहुदा काहींना मान्य न होणारे दोन शब्द:

शेवटी माणूस कितीही गुणवंत आणि कर्तृत्ववान असला, तरी शेवटी त्याच्यातील कमतरता केव्हा ना केव्हा तरी आपले रूप दाखवतात हेच खरे मानायला हवे. तरच वरील प्रश्नाचे अधिक पारदर्शक पद्धतीने उत्तर मिळू शकेल. "आपला तो बाब्या अन् दुसर्याचा मात्र पाग्या" अशा भूमिकेतून केवळ एका विशिष्ट चष्म्यातून जर बघितले तर हा प्रश्न अप्रस्तुत वाटणे सहाजिकच आहे.

परंतु त्याचे उत्तर सत्ता मिळविण्यासाठी, जी जी काही आश्वासने किंवा जुमले बिनदिक्कत दिले त्यांचे शेवटी काय झाले, काय होत आहे हे बघितले पाहिजे. त्यामुळे विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण कां होत आहे, ते समजेल. तुघलकी पद्धतीने लादलेल्या नोटाबंदीमुळे व दिशाहीन धोरणांमुळे ज्या बिकट अवस्थेत सध्याची देशाची आर्थिक व व्यावहारिक स्थिती आणली गेली आहे, ते पहाता, आता "अच्छे दिन" ही संकल्पना खरोखर हास्यास्पद ठरली आहे, हे कोणीही मान्य करील.

सारांश, काय काय करायला नको होते आणि काय खरोखर कालमानाप्रमाणे आवश्यक होते ह्या प्रश्नांची जर प्रामाणिकपणे उत्तरे शोधली तर मूळ प्रश्नाचे खरे उत्तर मिळू शकेल.

चुक भूल द्यावी घ्यावी.

धन्यवाद.
सुधाकर नातू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा