"रंगांची दुनिया-२":
"शारदोत्सव-२":
"मेनका" मासिक जाने२०: रसास्वाद:
सादर वंदन
सर्वसाधारण आठवड्यातून एकदा मी अशा तर्हेचे लेखन करत जाणार आहे, त्याप्रमाणे पहिला श्री दीपलक्ष्मी दिवाळी अंक'१९ चा रसास्वाद पाठवला होता.
आता वरील रसास्वाद पाठवत आहे. तो तुम्हाला आवडेल अशी आशा आहे आपण तो तुमच्या व्हाट्सअप ग्रुप वर जरुर शेअर करावा.
तसेच वाचून झाल्यावर मला अभिप्राय कळवावा ही विनंती.
धन्यवाद
सुधाकर नातू
Mb 9820632655
--------------------------
"रंगांची दुनिया":
"शारदोत्सव-२":
"मेनका" मासिक जाने२०: रसास्वाद:
दररोज दुपारच्या वेळी वामकुक्षी करता-करता काहीना काही वाचायची माझी सवय आहे. अशाच एका दुपारी, मेनकाचा जानेवारी'२० चा अंक हातात होता. पाहता पाहता "कोलाज- थोडं जगून बघा" "शब्द जिवलग- श्री सरस्वती विद्यापीठाचे मंत्रमुग्ध करणारे कुलगुरु प्रा. राम शेवाळकर", "पट खटल्याचा- सायको कीलर अविनाश" आणि "शब्द कोडं", "दुनियादारी" अशी वाचनाची सजग सफर कधी पूर्ण झाली, ते कळलेच नाही!
या शब्दामालांच्या स्वप्नातून बाहेर आल्यावर, मला लक्षात आलं की अरे आपण आज झोपलोच नाही! त्यामुळे एक वेगळाच नवा जागर मनात उगवला. वाटलं जग किती वेगानं बदललाय, बदलत चाललंय आणि जे बदलत आहे ते खरोखर किती चांगलं आहे. हे अशाकरता की, मी देखील कोणे एकेकाळी-तीन साडेतीन दशकांपूर्वी, ह्याच मेनका व जत्रांमध्ये "रंगांची दुनिया" "टेलीरंजन" आणि व्यवस्थापन शास्त्रावर "प्रगतीची क्षितीजे" अशी काही ना काही नियमित सदरे लिहीत असे!
सहाजिकच ते मनोहारी दिवस आठवले. दिवाळी अंकांच्या जाहिरातींच्या निमित्ताने श्रीमती सुमनताई बेहेरे आमच्या मुंबईच्या ऑफिसमध्ये यायच्या, ते दिवस आठवले किंवा विजयानगर कॉलनी मध्ये माझ्या पुणे मुक्कामी कधीमधी घडलेल्या, संपादकीय कक्षात प्रत्यक्ष बेहेरेसाहेबांच्या भेटी व त्यांचा पाहुणचार म्हणून घेतलेल्या चहाची चव जीभेवर आली, हिरव्या सुवाच्य अक्षरात त्यांनी मला लिहिलेली पोस्टकार्डस् नजरेसमोर आली.....
ह्या अंकात "कोलाज सदरात (ज्यामुळे मला अचानक हे असे मनचे, मनसे लिहावेसे वाटले!) लेखिकेने म्हटल्याप्रमाणे लक्षात आले की, बदल कसे घडतात आणि झालेले बदल स्वीकारायला हवेतच हवेत! जाणवले की किती आकर्षक व बदलत्या काळानुरूप अशा तर्हेचे आकर्षक मेनका माहेर अंक वाचकांच्या अभिरुचीनुरुप प्रसिद्ध होत आहेत. उत्तम कागदावर तशीच छान छपाई, अनोख्या, विविध विषयांवरची आकर्षक अशी नियमित येणारी सदरे, तसेच इतर कथा व साहित्य, त्याजोडीला मेनका प्रकाशनाच्या विविध अशा जाहिराती पेरलेल्या, यातील 'कथावली' ही अभिनव संकल्पना तर खरोखर कौतुकास्पदच. या साऱ्यांचा खरोखर मला खूप आनंद झाला.
काळाच्या ओघात मराठी मासिकं आताशा फारशी उरलेली नाहीत आणि त्यामध्ये मेनका माहेर सारखी मासिकं अजूनही तितक्याच, कदाचित पूर्वीपेक्षा जास्त उत्साहाने काढली जात आहेत, ही खरोखर प्रेरणादायी घडामोड आहे...
आता अंकाचा रसास्वाद देत आहे:
प्रथम लेखक/लेखिकेचे नांव,
नंतर त्यांच्या लेखाचा परामर्ष:
१.
शिल्पा चिटणीस जोशी
नुकताच मेनका जानेवारी'२० चा अंक वाचला व त्यामध्ये 'जागर' सदरामध्ये "मुलगी होऊ द्या हो" हा तुमचा, सद्यस्थितीतील वास्तवतेत, स्त्रीच्या एकंदर अगतिक अपरिहार्यतेचे विदारक चित्र उभे करणारा लेख खरोखर थरकाप करणारा तर आहेच, परंतु तो समयोचित देखील आहे.
आज इतकी प्रगती होऊन, स्त्री पुरुषांच्या बरोबरीने सर्वच क्षेत्रात आपले कर्तृत्व दाखवत असतानाही, जर समाजामध्ये "वंशाचा दिवा म्हणजे मुलगाच" ही खूणगाठ बांधणारी संस्कृती जर तशीच द्रुढ असेल, तर ते आपले भवितव्य अंधकारमय करणारे ठरू शकेल, असे मनावर मनापासून बिंबविणारा हा एक आलेख आहे. ह्यामधील अभागी स्रीयांची विविध उदाहरणे वाचताना खरोखर डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही आणि आज अजूनही अशा तर्हेची दुःखे, मुक्या मनाने सहन करणाऱ्या स्त्रिया समाजात आहेत, हे समजून हृदय विदीर्ण झाल्याशिवाय रहात नाही.
शतका दीड शतकापूर्वी ज्या ज्या द्रष्ट्या,
समाजसेवकांनी विशिष्ट ध्येयाने, विरोध पत्करून प्रसंगी अवहेलना सहन करत, स्त्रीला उंबरठ्याबाहेर आणून शिक्षणाचा आणि इतर प्रगतीचा मार्ग दाखवला, त्या बिचार्या थोर मंडळींना "हेची फळ काय मम तपाला" असे स्वर्गात वाटल्याशिवाय राहणार नाही, अशी भयानक स्थिती आज आहे, हेच हा वेधक लेख आवर्जून सांगतो.
एका नितांत अत्यावश्यक अशा विषयाला वाचा फोडणारा लेख लिहिल्याबद्दल आपले अभिनंदन.
--------------------------
२.
प्रा. प्रवीण दवणे
सादर वंदन
नुकताच मेनका जानेवारी'२० चा अंक वाचला आणि त्यात 'शब्द जिवलग' ह्या सदरात "मंत्रमुग्ध करणारे कुलगुरू राम शेवाळकर" आणि तुमचे ऋणानुबंध कसकसे वेगवेगळ्या प्रसंगातून बहरत गेले, त्याचे तुमच्या नेहमीच्या रसाळ भाषेत आणि ओघवत्या शैलीतले वर्णन निश्चितच वाचनीय आहे.
एक यशस्वी गीतकार आणि संवादक म्हणून आपले कर्तृत्व खरोखर प्रेरणादायी आहे, यात शंकाच नाही आणि त्याबद्दल तुमचे कौतुक व अभिनंदन. मात्र ह्या लेखात केवळ आत्मप्रौढीचा भास वाटणारे, तुमच्याच कर्तृत्वाचे वेगवेगळे प्रसंग आवर्जून मांडलेले दिसतात, त्या तुलनेत लेख-नायकाचे म्हणजे अर्थातच राम शेवाळकर यांचे असामान्य शब्द प्रभुत्व आणि अमोघ वाक् चातुर्य सोदाहरण दाखविणारे व्यक्तिचित्र खरे म्हणजे अपेक्षित होते. परंतु इथे केवळ त्यांची सह्रदय गुणग्राहकता आणि वैदर्भीय आदरातिथ्यच फक्त प्रकर्षाने तुम्ही मांडलेले दिसते.
सहाजिकच "गाण्या मागच्या गोष्टी" ह्या आपल्या आधीच्या सदरात, जे विषयानुरुप विविधांगी अनुभव दर्शन घडले, तसे इथे अजून तितकेसे परिणामकारक वाटत नाही हे नमूद करतो.
ह्यावरील त्यांचा प्रतिसाद:
"नमस्कार! लेख वाचून आवर्जून इ पत्र लिहिलेत; आनंद झाला; पुढील लेखात मी निश्चितच काळजी घेईन! कृपया असेच स्पष्ट सांगत चला!
प्रवीण दवणे "
--------------------------
३.
संतोष गोगले,
इथे आपला "जिज्ञासा शमवणारी जिज्ञासा" हा जणु नावावरूनच कुतुहूल व जिज्ञासा वाढवणारा लेख वाचला.
पुण्यासारख्या ठिकाणी आम्ही खूप वेळा जात येत असतो, परंतु तिथे कोथरूडला अशी ही वेगळ्या पद्धतीने विद्यादान करणारी संस्था आहे हे आम्हाला तुमच्या लेखामुळे कळले. बदलत्या स्पर्धेच्या जीवनात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नाही, तर माणूस म्हणून सर्वांकष असा बदल विद्यार्थ्यांमध्ये झाला पाहिजे, स्वतःच्या पायावर वेळ आली तर ते उभे राहू शकली पाहिजेत, अशा तर्हेची अभिनव शिक्षणपद्धती साकारणाऱ्या, या संस्थेचे व ती ओळख करून देणार्या तुमचे कौतुक करावे, तितके थोडेच! म्हणून अभिनंदन व शुभेच्छा.
–--------------------
४.
वसुंधरा पर्वते
इथे आरोग्यदायी जपानी खाद्यसंस्कृतीचा तुम्ही सोदाहरण विस्तृत परिचय करून दिला आहे.
मला खरोखर गंमत व कौतुक वाटते की, मूलभूत पदार्थ, तसेच कदाचित खाद्यपदार्थ बनविण्याची साधनेही, सगळ्यांसाठी सारखीच असतात, परंतु त्यातून, वेगवेगळ्या प्रदेशातील भिन्न आवडी निवडी असणारी माणसे, आपल्या पद्धतीनुसार त्यांना कसे कसे विशिष्ट प्रमाणात, एकत्र आणून चविष्ट असे अन्नपदार्थ करतात ह्याचे! "पसंद अपनी अपनी खयाल खयाल अपने" असंच म्हणायचं! स्वादिष्ट आणि रुचकर अशा या लेखाबद्दल आपले अभिनंदन व शुभेच्छा.
-------------------------
५.
श्रीनिवास शारंगपाणी
तुमची "माग" ही उत्कंठापूर्ण अशी कथा वाचली. इशिता सारखी तरुण मुलगी आपल्या जन्मदात्या वडिलांचा शोध मोठ्या जिद्दीने कशी घेते ते चित्तथरारक पद्धतीने उभी केलेली कहाणी आहे. सगळ्यात न विसरण्याजोगी गोष्ट म्हणजे तिचा केलेला धक्कादायक शेवट! अगदी कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त परिणाम करणारी, ही कथा खरोखर कौतुकास्पद आहे, म्हणून तुमचे अभिनंदन व शुभेच्छा.
----------------------
६.
पल्लवी मुजुमदार
"तेजोमय" सदरामधील, मुलाखतीमधून ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी विदुषी डॉक्टर रोहिणी गवाणकर यांचं जीवनचरित्र मनावर प्रेरणादायी ठसा उमटून गेले. ध्येयवादी देशसेवा, साहित्यसेवा, विद्यादान करणार्या आणि अंगभूत गुणांवर पीएचडी पर्यंतची मजल गाठणार्या ह्या विदुषीचे योगदान फार मोठे आहे, ही जाणीव झाली.
अशा तर्हेची स्वयंभू, self motivated माणसं समाजात असतात, म्हणूनच जग कितीही अडचणी आल्या, तरी पुढे जात असते, आपापला नवा मार्ग शोधू शकत असते, असेच म्हणावे लागेल. या समयोचित लेखाबद्दल अभिनंदन व शुभेच्छा.
-----------------------
७.
कल्पिता राजोपाध्ये
पट खटल्याचा या सदरामध्ये "सायको किलर अविनाश" या वाट चुकलेल्या आणि दिशा भरकटलेल्या अशा अभागी तरुणाची चित्तथरारक कथा खरोखर डोळ्यात अंजन घालणारी आहे. परिस्थिती माणसाला कशी बदलू शकते आणि एक हुशार कर्तबगार असे जीवनाची त्यामुळे
गुन्हेगारी मार्गाला लागून कशी भयानक धूळधाण होऊ शकते, ते वाचताना खरोखर काळजाचा ठोकाच थांबतो.
--------------------------
सुधाकर नातू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा