शनिवार, ११ जानेवारी, २०२०

"शारदोत्सव": "क्षणा क्षणांतच रंग भरा"....


"शारदोत्सव !":
"क्षणा क्षणांतच रंग भरा...."

"पाय सलामत तो.....":
काल वाचनालयातून परत येताना, अचानक डावा पाय मुरगळला, डावा पाय टाकता येईना जमिनीवर. पाऊल टाकले रे टाकले की, तो भार सहन होत नव्हता, चालताना अक्षरशः असह्य कळा येऊ लागल्या. कसाबसा घरी आलो.

त्यानंतर घरात चालायचा प्रयत्न केला, तेव्हाही तीच गत! काय करावे सुचेना. हे असं ध्यानी मनी नसताना कसं, काय झालं? कळेना. कदाचित त्या वाचनालयाकडे जाणारा तो रस्ता, फेवर ब्लॉकचा असल्यामुळे वर खाली अशा उंच सखल पद्धतीची जमीन असल्यामुळे, डाव्या तळपायाची ही ( आग जणु मस्तकांत ) त्रासदायक स्थिती झाली असावी. वाचनालयापासून घरापर्यंत हे अंतर तसे फार नव्हते. परंतु तेही मला फार मोठी दूरची मजल असल्यासारखे वाटले.

घरी आल्यानंतर, उपाय म्हणून प्रथम गार पाण्याने पाय भरपूर धुतले, पण काही उपाय नाही. त्यानंतर काही वेळाने गरम पाण्याच्या बादलीत डावा पाय टाकून बराच वेळ बसलो, तरीही तीच स्थिती. कसनुसं व्हायला लागले. अखेर रात्री झोपताना डाव्या पायाला "मूव" मलम लावून चांगले माँलीश केले आणि देवाची प्रार्थना केली की, 'बाबा रे माझी या पीडेतून सुटका कर'.

हे सगळे होत असताना त्या काळात जाणवले की आपले सारे शरीर सहज सरळ सुलभ असते, तेव्हा खरोखर किती आपल्याला सुख आणि समाधान मिळत असते. परंतु जर कधी अशी बिघाडी झाली, तर आपले सारे जीवनच आणि मानसिक स्वास्थ पार बिघडून जाते. त्या काही तासात मला वाटले की, आता आपल्याला कधी चालता येणं कठीण आहे, घरातच पडून राहावे लागणार, प्रवास तर फार फार दूरची गोष्ट झाली. एक्स-रे प्लास्टर किंवा कदाचित काहीतरी ऑपरेशन आणि त्यानंतरचे परत फिजिओथेरपी वगैरे वगैरे हेही करायला लागणार की काय, अशी भीती निर्माण झाली. अशावेळेला वाटून गेले ते असे:

"When v hv, v don't value what v hv;
but when v lose it,
v feel the pinch of not having,
what v had earlier."

अखेर छान झोपेनंतर सकाळी नवलची वर्तले, प्रथम मुद्दाम डावा पायच जमिनीवर टाकला अन् कळले "All is Well"!

ह्या पार्श्वभूमीवर, मला नुकताच वाचलेल्या महाराष्ट्र टाइम्स मधील श्री. दीपक करंजीकर ह्यांच्या एका सुंदर विचारप्रवर्तक "जीवन आणि जगणे" ह्या विषयावरील लेखाची आठवण झाली. खरोखर एखाद्या तत्त्वज्ञ माणसासारखे, येथे त्यांनी या अविभाज्य दोन महत्त्वाच्या गोष्टींवर सोप्या भाषेत, कुणालाही समजण्यासारखे भाष्य केले आहे. अर्थ सोपा आहे:

"जीवन म्हणजे असणं-म्हणजे केवळ अस्तित्व, तर जगणे म्हणजे त्या असण्याला अर्थ आणणे, त्यात नवा अर्थ भरणे होय."

किती छान व्याख्या त्यांनी ह्या दोन वरवर एकच भासणार्या गोष्टींची केली आहे: मरण येत नाही, म्हणून केवळ असणं, म्हणजे जीवन. बरीचशी मंडळी जीवन आणि जगणं यांच्या काठावर आयुष्य काढत असतात.

"उघडा, दार मनाचे":
अचानक एक मन अंतर्मुख करणारे असे भावगीत ऐकले. त्याचे शब्द असे होते:

"उघडा दार मनाचे उघडा दार मनाचे,
करा काम पुण्याचे, करा काम पुण्याचे!"

जीवन कसे जगावे हे समजण्यासाठी, खरोखर विचार करायला लावणारे असेच हे बोल आहेत. मनाच दार उघडून आपण आपल्याच मनाशी संवाद साधला पाहिजे, तसे करताना आपण काय केले आणि ते कसे होते, चांगले की वाईट, हितकारक कि अहितकारक, असे तपासणे गरजेचे आहे, असेच हे बोल सांगतात.

शेवटी पुण्य पुण्य म्हणजे काय? तर केवळ देवाची आराधना किंवा देवळात जाणे नव्हे, तर दुसऱ्याला आनंद देईल, इतरांचेही भले साधेल असे काही ना काही करणे, म्हणजे पुण्य होय. तर पाप म्हणजे फक्त स्वार्थ साधणे. तर इतरांचे वाईट होईल, मत्सराने दुसऱ्यांचा दुःस्वास करणे आणि त्यांचे अहित कसे होईल याचा विचार करून कृती करणे म्हणजे पाप होय.

आज हे पुण्याचे भावगीत ऐकले, नंतर मला अचूकपणे समजला जीवन अन् जगणे ह्यातला खराखुरा फरक. जीवनातील जगणे अर्थपूर्ण करण्यासाठी आपण प्रथम मनाचे दार उघडले पाहिजे हे उमजले.

तसे कराल, तर जगण्यातला 'किती जगलात ह्यापेक्षा कसे जगलात' ते महत्त्वाचे, हा मतितार्थ कळून जाईल. मग दररोजची सकाळ आपल्याला नवा उत्साह, नवी ऊर्जा घेऊन येत राहील आणि दिवस कसे सरतील ते कळणारच नाही. "प्रौढत्वी निज शैशवास जपणे हा बाणा कवीचा असे", हे जे म्हंटलं जातं, तेच जगणे, नव्हे कां!

केवळ वय झालं म्हणून, शरीर थकलंही असेल, परंतु जर मन मात्र, तसंच ताजं तवानं असेल- बालपणीसारखं, तर तुमच्या जगण्याला, तुमच्या जीवनाला अर्थ येऊ शकतो, त्यात तुम्ही अर्थ भरू शकता, आपल्या मर्जीने आणि आपल्या वेळेनुसार, आपल्याला भावेल असे जगता येईल.

ह्या संदर्भात टीव्हीवर एक बातमी बघितली होती, ती आठवली. यामध्ये ७३ वर्षाची युरोपियन स्त्री उत्साहाने रोज वीस किलोमीटर चालत वा धावत युरोप पासून अगदी थेट भारतापर्यंत पोहोचण्यासाठी, दरकूच दर मजल करतानाची द्रुष्ये त्यात दाखवली होती. स्वतःचे सामान एका छानशा बनवलेल्या हातगाडी सारख्या वाहनात घालून ती स्री, ते वाहन स्वतः धावत रोज नेत असणारे ते दृश्य होते. अक्षरशः अचंबा करावे असेच ते दृश्य आणि ती बातमी होती. म्हणजे इतके वय होऊनही, ती स्त्री उत्साहाने नवनव्या उमेदीने कशी आपल्या जीवनात अर्थ भरत आहे ते उमजले.

सारांश, ज्याने त्याने हाच विचार करायचा आहे की, आपण कुठे आहोत, केवळ "असण्या"त मशगुल रहाण्याचे जीवन स्वीकारतोय की, खरोखर त्यात आपल्याला हवा तसा आवडणारा अर्थ भरून अधिकाधिक समाधान मिळवणार आहोत! ह्या लेखाने असा वेगळा विचार करायला लावला आणि तो मी तुमच्या पर्यंत पोहोचला बघा घेता आला तर....

हा तुम्हाला नवी द्रुष्टी देईल, अशी आशा आहे.

जाता जाता सांगतो.....

"क्षणा क्षणांतच रंग भरा....
हितकर, रुचकर करण्याचा चंग धरा....
रुसण्या, रडण्याचा छंद ,व्यर्थ ना करा....
जीवन जगण्याचा हाच, अर्थ खरा!....
क्षणा क्षणांतच रंग भरा"....

धन्यवाद.
सुधाकर नातू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा