"ह्रदयसंवाद-३":
"Achievement Motivation":
"असाही रियाज":
जे गायक-वादक असतात किंवा जे तसे होऊ पाहतात, त्यांच्या बाबतीत असे सांगितले जाते की, ते दररोज पहाटे वा सकाळी उठल्यावर चांगला दोन-तीन तास रियाज अर्थात सराव करत असतात. कदाचित हे असे माझ्या बाबतीत वेगळ्या प्रकारे होत असावे. मला सकाळी नेहमी नवीन काही ना काहीतरी सुचत असते आणि ते जर तेव्हाच नोंदले गेले नाही तर, पुढे विसरूनही जाते, म्हणूनच आज कल्पना सुचली की, आपणही तसा हा जे स्फूरतं ते शब्दात लिहिण्याचा रियाज करावा.
इथे smart phone च्या आधुनिक तंत्रज्ञानाची मला गंमत वाटते. ती अशी की, त्याच्या सहाय्याने मी देखील एक प्रकारे मला जे वाटतं ते बोलून रियाज वा सराव करत आहे आणि ते इथे आपोआप लिहिण्याच्या स्वरूपात नोंदवले जात आहे! हा एक वेगळाच आनंद मला हे सारे करत असताना आता मिळत आहे ही झाली पार्श्वभूमी.
"काळ, काम, वेग!":
पण आज काय सुचलं ते असं, काळ हा पुढे जातच असतो आपण काय केलं तरी काही केलं नाही तरी काळ हा पुढे जातच असतो. जर आपण काहीच न करता काळ गेला, तर आपल्याला पश्चाताप होतो. मग अशा वेळेला वाटतं, आपण काहीतरी उपयुक्त योगदान देणारं, असं काम करायला हवं होतं. तशी ठरवलेली कामं पुष्कळ असतात, पण कां कुणास ठाऊक, त्यांना हातच घातला जात नाही. ही मनाची एक प्रकारे कुठली ना कुठली तरी विचित्र अवस्था असते, ज्याला इंग्रजीमध्ये प्रोक्रास्तीनेशन असं काहीतरी म्हटलं जातं. करायचं असूनही ठरवूनही, आपण काहीच करत नाही, अशी ती मनाची कसनुशी अवस्था असते आणि मला वाटतं ती सर्वांच्याच आयुष्यात नेहमीच अधून मधून अनुभवाला येत असते.
त्यावर मात कशी केली जाऊ शकते, हा एक मोठा प्रश्न आहे. जर तुम्हाला उपजत अंतःप्रेरणेमुळे काही काम करायची सवय असेल, ज्याला आपण अचीवमेंट मोटीव्हेशन असे म्हणतो, ते जर तुम्हाला साध्य झाले, तर तुम्ही अशी प्रोक्रास्तीनेशनची अवस्था टाळू शकता.
"अचीवमेंट मोटिवेशन":
आता अचीवमेंट मोटिवेशन म्हणजे काय?
एखादे (आपल्याला आवडणारे?) काम पूर्ण करण्याचा जो आनंद असतो, तो मिळवण्याची प्रेरणा म्हणजे अचिव्हमेंट मोटिवेशन असं मला वाटतं. माझी पुष्कळशी जी काही कामे झाली आहेत अथवा काही भरीव असं मी कधीही केलेलं असेल, तर त्यामागे हे अदृश्य अशी शक्ती असणारं अचीवमेंट मोटिवेशन असावं, असं मला वाटतं.
"शून्यातून विश्व उभे!":
"स्मार्ट फोन ते ब्लॉग ते विडीओ चँनेल!":
मला नेहमी काही ना काही योगदान देणारं, आपण करत राहावं असं वाटत असतं. त्यादृष्टीने मी जेव्हा निवांत असतो, तेव्हा मी आता काय वेगळं करू शकतो ह्याचा विचार करतो. यासंबंधी माझा अनुभव सांगतो. तीन वर्षापूर्वी माझ्या मुलाने मला अगदी आग्रह करून स्मार्टफोन बक्षिस म्हणून दिला. खरं म्हणजे मी तो वापरण्या विरुद्ध होतो मला तो वापरताच येणार नाही असे वाटत होते.
परंतु झाले उलटेच! फोन हातात आल्यावर मलाच वाटायला लागले, बघुयात खरं! हे काय नुसते
फोन करणे किंवा एसेमेस करणे एवढाच त्याचा उपयोग नाही, तर त्याहूनही खूप काही करता येऊ शकते, असा मलाच बघता बघता शोध लागला.
पहाता पहाता मी व्यक्त होण्यासाठी, प्रथम सोशल मीडियावर माझे विचार इंग्रजीतून व्यक्त करू लागलो. मग कुतूहल व आव्हान असे समजून मराठीतून लिहायला शिकलो. त्याची पुढची पायरी म्हणजे लेख लिहून नंतर मी चक्क माझा ब्लॉग काढला. लिंक:
http//moonsungrandson.blogspot.com
काही दिवसांनी त्यात समाधान न मानता, माझा "सुधा" दिवाळी अंक काढला. काही दिवसांनी, ते पुरे नाही म्हणून, आता वेगळं काय करायचं या विचारात असताना, युट्युब वर माझा moonsun grandson व्हिडिओ चॅनेल काढला......
आणि आता ह्या दोन्ही योगदानांचा प्रसार अधिकाधिक सर्वदूर करण्याचा अविरत उद्योग करण्याची मी धडपड करतो आहे. शून्यातून विश्व कसे उभे राहू शकते, तर हे असे!
"Out of box thinking"
ही जी काही माझी वाटचाल झाली ती केवळ आणि केवळ माझ्या अंतःप्रेरणेने मध्ये असलेल्या एका विशिष्ट विचारांमुळे: आपण काही ना काही तरी प्रॉडक्टिव केले पाहिजे हा तो विचार. मनाला जेव्हा असमाधान वाटते, तेव्हा तळमळीने काही अगदी out of box करावे असे मला आपोआप वाटत रहाते. कदाचित अचीवमेंट मोटिवेशन म्हणजे असेच काहीतरी असावे.
अर्थात ही कदाचित एखाद्याच्या अंतःप्रेरणा अथवा मूलभूत अशा प्रत्येकाच्या स्वभावाचा नैसर्गिक भाग असू शकते. परंतु आपणही प्रयत्न करून बघू शकता. आपण आहे त्या परिस्थितीत अस्वस्थ आहोत आणि ते कां आहोत ह्याचा शोध घ्या. आपल्याला काय आवडतं, काय करता येतं, याचा विचार करून त्यापासून मिळणारे समाधान व आनंद मिळवण्याची अशी ईर्ष्या तुम्ही मनात निर्माण करायचा प्रयत्न करा. अशामुळे, तुम्हाला हे अचीवमेंट मोटिवेशनसारखे आनंददायी प्रगतीकडे, पूर्णत्वाच्या शोधाकडे नेणारे, प्रभावी साधन गवसूं शकेल.
करा तर प्रयत्न माझ्यासारखा....
सुधाकर नातू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा