गुरुवार, २९ ऑगस्ट, २०१९

"अशी ही, फजीती व बेफिकीरीची कहाणी!":


 "अशी ही, फजीती व बेफिकीरीची कहाणी!":

पुष्कळ वेळा आपण महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो बेफिकीरीने वागतो आणि आपली फजिती होते, नाहक मनस्ताप होतो. अशाच माझ्या अनुभवांच्या काही गोष्टी मी इथे सांगणार आहे.

"फजिती नव्हे दारुण निराशा":

एकदा आम्ही दोघं, एका गाजत असलेला चित्रपट बघायला जाणार होतो. तिकीट आधीच काढलं होतं आणि माझी अशी कल्पना होती ही तिकीटं त्या दिवशी, दुपारी तीन वाजल्याच्या खेळाची आहेत. म्हणून आम्ही त्याप्रमाणे दुपारी अडीच पावणेतीनला घरातून निघून थिएटरवर गेलो.

तिथे मोठ्या दिमाखात द्वाररक्षकाला तिकीट दाखवून आता उत्सुकतेने चित्रपट बघायला मिळणार अशा आशेवर आम्ही दोघं होतो. तिकीटं पाहिल्यावर त्यावेळेला त्याने आमच्याकडे चमत्कारिक रितीने पहात म्हंटले "अहो साहेब तिकिटं नीट पाहिली नाहीत वाटते? ही बाराच्या खेळाची आहेत, तो आत्ताच संपला!" चांगला चित्रपट पाहायला आलेल्या आमचे चेहरे पहाण्यासारखे झाले.

म्हणजे झालं होतं असं की तिकीटे काढली तेव्हा ती हाती आल्यावर, त्यावर तो खेळ किती वाजताचा आहे ते बघित़़लं नाही. ना ज्या वेळेस सिनेमाला घरून जायचं तेव्हाही तिकिटावरची वेळ मी माझ्या बेफिकीरीने पाहिली नव्हती. त्यापायी अशी ही फजिती व दारूण निराशा झाली!

"फजिती नव्हे, नुकसान!":

त्याचं असं झालं, आम्ही गावी गेलो होतो. गावाहून परत आल्यावर माझी एक पूर्ण झालेली, फिक्स डिपॉझिट रसीट घेऊन आम्ही बँकेत गेलो. ती गुंतवणूक कुठल्या प्रकारची आहे ते बघितलंच नव्हतं. त्याची पूर्णतेची तारिख उलटून गेली होती. त्यामुळे तिथे गेल्यावर मी विचार न करता कर्मचाऱ्याला सांगितलं " ती तशीच पुढे गुंतवा". त्या कर्मचाऱ्याने तिचे त्यानुसार नुतनीकरण केले व रसीट आम्हाला दिली.

नीट पाहिली,तेव्हा कळलं की ही रसीट 80C अन्वये टँक्स सेव्हिंगची म्हणजे पाच वर्ष मुदतीची होती. खरं म्हणजे आम्हाला दोन वर्ष इतक्याच मुदतीची नवीन रसीद हवी होती. हे पाहिल्यावर मी पुन्हा बँकेत गेलो आणि सांगितलं की ही रिसीट रिडीम करा. तर मला तो कर्मचारी म्हणाला "माफ करा, आता तसं करता येणार नाही, कारण ती रसीट टॅक्स सेव्हिंग असल्यामुळे पाच वर्षांनीच आता रिडीम करता येईल!" कारण नसताना ह्या माझ्या हलगर्जीपणामुळे पाच वर्षे वाट पहायला लागून आमचे तसे नुकसान होणार होते.
रसीट बँकेत घेऊन जाताना जर नीट बघितलं असतं तर....!

आर्थिक व्यवहारात नेहमी, आपल्याला खूपच काळजी घ्यावी लागते. काटेकोरपणे प्रत्येक गोष्ट नीट तपासून घेऊन मग कृती करावी लागते. हा धडा मी ह्या प्रसंगातून शिकलो.

"फजिती नव्हे बेफिकिरी-२":

हा अनुभव म्हणजे, नुसतीच फजितीच नाही तर मूर्खपणाचा कळस पण आहे, हलगर्जीपणाची कमाल! त्याचं असं झालं असाच फिक्स डिपॉझिट रसीट ह्यावर्षी १८ ऑगस्ट'१९ ला संपत आहे असे समजून बँकेत गेलो. ती तर तारीख उलटून गेली होती. नेहमीप्रमाणे पुन्हा गुंतवायला सांगितली, दोन वर्षांसाठी. आता हे २०१९ साल म्हणजे २०२१साल पर्यंत ती पूर्ण होईल, असं समजून मी रसीट दिली होती. क्लार्कने पण बहुदा ती न बघता जवळ ठेवली, कारण दुर्दैवाने त्यादिवशी बँकेची कॉम्प्युटर सिस्टीम बंद होती व मला एक चिठ्ठी लिहून दिली की तुम्ही पुन्हा उद्या नूतनीकरण झालेली रसीट घ्यायला या.

खरं म्हणजे विविध बँकांचे सामीलीकरण झाल्यामुळे आमचा जो अकाउंट घराजवळ होता तो या नव्या ब्रँचमध्ये जागी गेला होता. नेहमी लांबवर तिथे जायचं हा एक मोठा द्राविडी प्राणायाम होता. कॉम्प्युटर सिस्टिम चालू नसण्यामुळे म्हटलं तर माझी भेट फुकट गेली होती.

काही दिवस असेच गेले. मग केव्हा तरी मला आठवण झाली-पाच-सहा दिवसांनी की, आपल्याला ही नवीन FD रसीट आणायची आहे. म्हणून बँकेत गेलो तर तिथे भली मोठी लाईन होती. आमचं नेमका, FD चे काम करणारा कर्मचारी आला नव्हता! मी वैतागून गेलो. पुढे वरिष्ठांना जाऊन सांगितल " तुमचं हे काय सेवा देणं? आमच्या सारख्या ज्येष्ठ नागरिकांचे हाल तुम्हाला पाहवत नाही कां? किती वेळा आम्हाला यायला लावणार? काही करून मला माझी नवीन FD रसीट द्या" माझ्या खंबीर बोलण्यामुळे, त्या ऑफिसरने एका शिपायाला सांगितलं- त्या क्लार्कच्या ड्रॉवरमधून यांना रसीट शोधून दे. मग तो शोधत बसला. शेवटी एकदाची ती नवीन (?) मिळाली आणि मला गंगेत घोडं आल्यासारखं झालं!

मी घरी आलो. घरी आल्यावर बघितलं तर रसीट पूर्णतेची तारीख होती १८ ऑगस्ट'२०! मला वाटलं असं कसं झालं, ती '२१ असायला पाहिजे होती. जरा निरखून पाहिलं, तर सुरुवातीची गुतवणुकीची तारीख बघितली तेव्हा लक्षात आलं ती १८ ऑगस्ट'१८ होती. म्हणजे मी दिलेली रसीटच मला जशीच्या तशी परत मिळाली होती!

सारांश मला मुळी नुतनीकरण करण्याची आत्ता गरजच नव्हती कारण ती आत्ता २०१९ मध्ये पूर्ण होतच नव्हती. अशा तर्हेने दोन नाहक खेपा व मनस्ताप मी माझ्या बेफिकीरीने ओढवून घेतला होता.

जागते रहो, बेफिकीरी मत करो, हे म्हणतात ते खोटे नाही.

सुधाकर नातू
२९/८/२०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा