सोमवार, १२ ऑगस्ट, २०१९

"राहू व केतूच्या राश्यंतराचे परिणाम":


 "राहू व केतूच्या राश्यंतराचे परिणाम":

गेल्या काही दिवसापासून अनेक चित्रविचित्र घटना घडून गेल्या आहेत. मोजक्याच चांगल्या, परंतु अनेक विचार करायला लावणार्‍या, धक्कादायक व क्लेशकारक दुर्घटना, विशेषतः सध्याचे महापुराचे संकट आ वासून उद्भवले आणि त्याला धैर्याने तोंड देणे चालू आहे. त्यापूर्वीही दुर्दैवाने अनेक ठिकाणी संरक्षक भिंती पडणे, धरण फुटणे, आगी लागणे आणि इमारती, पूल कोसळणे, तसेच चित्र विचित्र अपघात होऊन अनेक जण म्रुत्युमुखी गेले आहेत.

भीषण महापूरासारखी भयानक खरोखर कसोटी पाहणारी अशी ही वेळ आहे. त्यादृष्टीने आम्ही ज्योतिषी म्हणून राहू-केतू ह्यांचे राश्यंतर २३ मार्च २०१९ रोजी झाले व त्याचे अनिष्ट परिणाम ह्यांचा विचार करत आहोत. धनु राशीत शनि आणि केतू एकत्र येणे हासुद्धा अनेक वर्षांनी घडणारा कुयोग असल्यामुळे, हे तीन पापग्रहांच्या ग्रहस्थितीमुळे
अशा तऱ्हेचे दुष्परिणाम घडून आले कां, हा एक विचार करण्याजोगा प्रश्न आहे. त्यादृष्टीने प्रत्येक चंद्रराशीवरील बर्या वाईट परिणामांची दखल घेणारा हा खास लेख आहे.

"राहू व केतूच्या राश्यंतराचे परिणाम":

यंदा २३ मार्च २०१९ रोजी राहू-केतू चे राश्यंतर झाले आहे. राहू कर्केतून वक्री मिथुन राशीत आणि केतू मकरेतून धनु राशीत, जिथे शनी आहे, तिथे प्रवेश केला आहे. ही राहू केतूची स्थिती २२ सप्टेंबर २०२० पर्यंत राहणार आहे. ह्या कालखंडातमध्ये राहू केतूच्या राश्यंतराचा एकंदर काय परिणाम होईल यावर ज्योतिषींनी प्रकाश टाकणे गरजेचे आहे.

ह्या खास लेखात आम्ही तसा राशीनिहाय प्रयत्न केलेला आहे. अभ्यासूंनी त्यावर अधिक सखोल विचार करून आपले मत बनवावे. सर्वसाधारण वाचकांनी ह्या निरीक्षणांकडे, एक दिशादर्शक अशा दृष्टीने बघून आपले प्रयत्न आणि अपेक्षा ह्यांची समन्वयता साधावी.

हे राश्यंतर, कोणाला चांगलं, कोणत्या राशीला वाईट आणि कोणत्या विशिष्ट अशा विषयांवर वाईट, ह्याचा आपल्याला अभ्यास केला पाहिजे आणि तो असा करायला लागेल की जणू काही चंद्र कुंडली धरून त्या राशीच्या कोणत्या स्थानी हे ग्रह होते आणि आता कोणत्या स्थानी ते येणार आहेत याचा अभ्यास केला पाहिजे. अशा विचारधारेवर प्रत्येक राशीचा अभ्यास केला तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे निष्कर्ष काढता येतील:

१.मेष: मेष राशीच्या पराक्रमात आता राहू येणार आहे. त्यामुळे उत्साह वाढता राहील आणि इतके दिवस करावयाची महत्वाची कामे पूर्ण होऊ शकतील. आपल्या जबाबदाऱ्या हिंमतीने पार पाडाल मात्र केतू भाग्यस्थानात असल्यामुळे एकंदर अधिक अपेक्षा आपल्या भाग्योदयाच्या करू नका. जी काही फळे मिळतील नोकरी-व्यवसायात, त्यात समाधान माना. आतापर्यंत चौथा राहू असल्यामुळे मानसिक असमाधान होते, ते मात्र आता नियंत्रणात राहील, भावंडांकडून मात्र थोडाफार त्रास होऊ शकतो किंवा त्यांच्याबरोबर मतभेद होऊ शकतात. इतरांच्या तुलनेत, मेष राशीला हा कालखंड अधिक चांगला जाऊ शकेल.

२. व्रुषभ: वृषभ राशीला आता काय होणार तर, त्यांच्या धनस्थानात आणि अष्टम स्थानात राहु आणि केतु येणार. धनस्थानात म्हणजे आर्थिक चणचण भासू शकेल खर्च जास्त होतील. हेच कुटुंबाचे स्थान आहे म्हणजे कौटुंबिक कलह वा काहीतरी नव्या जबाबदाऱ्या वाढू शकतील. केतू अष्टम स्थानी म्हणजे त्यामुळे विविध प्रकारचे काही त्रास वा मोठे अचानक नुकसान अशा तऱ्हेचे अनुभव येतील.

३.मिथून: मिथुन राशीचा जर विचार केला, चंद्राबरोबर म्हणजे तुमच्या डोक्यावर राहू आणि सप्तम स्थानात म्हणजे जोडीदार भागीदारीच्या स्थानात केतू त्यामुळे महत्वाचे विचार करताना संभ्रम निर्माण होऊ शकतील. चुकीचे निर्णय परस्परसंबंधात काहीना काहीतरी वितुष्ट अशा तऱ्हेचे फळे मिळू शकतात. तुमच्या वागण्याच्या पद्धतीला सुधारावे लागेल. तसेच एजोडीदाराशी मतभेद टाळावे लागतील. व्यवसाय नोकरी स्थानापासून राहू चौथा असल्यामुळे तेथूनही तुम्हाला जास्त अपेक्षा करता येणार नाहीत आणि जैसे थे परिस्थिती राहील. थोडक्यात मिथुन राशीला हे संक्रमण तेवढे फलदायी नाही.

४.कर्क: कर्क राशीच्या व्ययांत राहु तर शत्रुक्षेत्री केतू, शनीबरोबर अशी स्थिती या कालखंडात राहणार आहे. विवाह जुळणी संबंधी काही अडचणी अथवा चौकशी अधिक करावी नाहीतर फसगतीची शक्यता अशा तऱ्हेचे योग आहेत. तसेच जुनी येणी परत मिळणे कठीण होऊ शकते. आरोग्यासंबंधीची काळजी वेळीच घ्यावी. पोटाचे विकार अथवा डोकेदुखी संबंधी काही समस्यांचे निरसन करणे गरजेचे ठरेल. भावडांबरोबरचे संबंध बिघडू शकतात आणि प्रवासामध्ये किरकोळ अपघात अडचणी हे ग्रहयोग सुचवतात. थोडक्यात तारेवरची कसरत करण्याचा काळ आहे.

५.सिंह: सिंह राशीला राहू लाभात येत असल्यामुळे शुभ फले देऊ शकतो. मात्र त्याच वेळेस केतु पंचम स्थानात असल्यामुळे काही निर्णय चंचलतेमुळे चुकू शकतात. त्यामुळे नोकरी व्यवसायात नुकसान होऊ शकते याचे भान ठेवायला हवे. केतू पंचमात असल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात चलबिचल अथवा अपेक्षित यश विद्यार्थ्यांना न मिळणे आणि संतती विषयक काही समस्या वडीलधाऱ्यांना येऊ शकतात. एकंदर हा काळ संमिश्र आहे असेच म्हणावे लागेल.

६.कन्या: कन्या राशीला दशमात राहू आणि चतुर्थात चंद्र केतू यामुळे हा काळ कसोटीचा जाऊ शकतो. माता-पित्यांना काळजी घ्यावी लागेल- त्यांच्याकाही अनारोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. कुटुंबात महत्त्वाच्या प्रश्नावर मतभेद होऊ शकतात. नोकरी-व्यवसायात ताणतणाव वाढेल आणि जबाबदाऱ्या योग्य वेळेला न पूर्ण झाल्यामुळे वरिष्ठांची बोलणी खावी लागतील. धंद्यात आर्थिक नुकसानीचा फटका बसू शकतो. इतरांच्या तुलनेत तुम्ही जास्त अपेक्षा ठेवू नका आणि प्रयत्न मात्र वाढवा असेच या कालखंडाचे सांगणे आहे.

७.तुळा: तुला राशीच्या बाबतीत केतू पराक्रमात तर राहू भाग्यस्थानात अशी स्थिती आहे. त्यामुळे संमिश्र फळे मिळतील. भाग्यस्थानातील राहुमुळे तुमच्यापुढे आलेल्या संधी, काही अडचणी आल्यामुळे त्यांचा फायदा होणार नाही. प्रवासात वाद विवाद किंवा इतर काही अडचणी विलंब ह्यांची शक्यता आहे. त्याचप्रमाणे भावंडांच्या आरोग्य विषयी काही चिंता निर्माण होऊ शकतात. एकंदर हा काळ प्रतिकूल आहे त्यामुळे सावधानता बाळगणे आवश्यक आहे.

८.व्रुश्चिक: वृश्चिक राशीचा विचार करता या राशीला राहू आठवा आणि केतू शनी बरोबर दुसरा असल्यामुळे सर्व राशींमध्ये जास्त कसोटीचा काळ जाऊ शकतो. अचानक आर्थिक नुकसान, प्रतिष्ठेला बाधा येईल अशा घटना घडू शकतील. कौटुंबिक जीवनामध्ये अडी अडचणींचा हा काळ असू शकतो. पंचमाच्या चतुर्थात राहू असल्यामुळे निर्णयशक्ती योग्य तऱ्हेने काम करेल असं नाही. त्याचप्रमाणे संतती विषयक काही समस्या निर्माण होऊ शकतात. अतिशय काळजीपूर्वक निर्णय घेऊन संयमाने या कालखंडात आपल्याला येणाऱ्या परिस्थितीशी धैर्याने मुकाबला करावयाचा आहे.

९. धनु: धनु राशींत चंद्राबरोबर केतू शनी असल्यामुळे मानसिक चांचल्य वाढण्याची या कालखंडात शक्यता जास्त आहे. त्याचप्रमाणे जोडीदाराच्या स्थानात राहु असल्यामुळे मतभेद अथवा सांसारिक जीवनात जबाबदाऱ्या वाढल्यामुळे होणारे एकंदर ताणतणाव अशा तऱ्हेचा अनुभव या कालखंडात येईल. चतुर्थ स्थान त्याच्या केंद्रात राहू असल्यामुळे मातुल घराण्यातील वडीलधार्‍या मंडळींची काळजी, त्याच प्रमाणे स्थावरासंबंधी योग्य निर्णय न होणे, मानसिक चिंता अशी फळे मिळू शकतात.

१०.मकर: मकर राशीच्या व्ययांत केतू शनी आणि षष्ठ अर्थात शत्रू स्थानात राहू असा संमिश्र कालखंड आहे. षष्ठातील राहू उत्साह वाढवू शकतो तसेच समोर येणाऱ्या कठीण प्रसंगांना विरोधाला समर्थपणे तोंड देण्याची क्षमता निर्माण करू शकतो. मात्र व्ययातील शनी केतू तुमच्या उत्सवावर पाणी टाकू शकतात. त्याचप्रमाणे बंधू-भगिनींशी मतभेद किंवा इतर अनुचित अनुभव येऊ शकतात. प्रवासातही विलंब आणि अडचणींना तोंड द्यावे लागेल.

११. कुंभ: कुंभ राशीला राशीस्वामी शनी केतू बरोबर लाभस्थानी आणि पंचमात राहु अशी संमिश्र स्थिती आहे. एकीकडे नोकरी-व्यवसायात चांगले लाभ आणि संधी तर दुसरीकडे आपल्या निर्णयामधील चांचल्य असा विरोधाभास अनुभवाला येईल. तसेच संततीविषयक काही महत्त्वाचे निर्णय घेताना काळजी घ्यावी लागेल. कारण त्यांत चूक होण्याची शक्यता अधिक आहे. धनस्थानाच्या चतुर्थात राहू असल्यामुळे आर्थिक बाजू सांभाळून मगच पुढे जावे लागेल, कौटुंबिक वादविवाद टाळावे लागतील. एकंदर कुछ खट्टा कुछ मीठा असा ह्या राशीला अनुभव यावा.

१२.मीन: मीन राशीच्या दोन केंद्र स्थानात राहू-केतू अशी योजना या कालखंडात येत असल्यामुळे एकीकडे मानसिक विचीत्र अवस्था व स्थावरासंबधी कटकट, तर दुसरीकडे नोकरी-व्यवसाय त्याचबरोबर माता पिता अशा प्रकारच्या गोष्टींवर राहू, केतू बरोबर असलेला शनी ह्यांचा अनिष्ट प्रभाव पडणार आहे. सहाजिकच ह्या सार्या गोष्टींच्या संबंधी तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीशी तोंड द्यावे लागणार आहे. प्रसंगी नुकसानही संभवते. मानसिक असमाधान वाढवणाऱ्या घटना घडू शकतात. संयम ठेवा.

ह्याप्रमाणे आम्ही राहू-केतू यांच्या राश्यंतराची फळे मांडायचा प्रयत्न केला आहे. तो करताना हे पाप ग्रह, कोणत्या राशीला कोणत्या प्रकारची फळे देणाऱ्या स्थानात त्यांचा प्रभाव आहे, ह्याचा प्रामुख्याने विचार केला आहे. ज्योतिषाकडे अभ्यासपूर्ण दृष्टीने बघण्याचा हा एक प्रयत्न आहे. आम्ही मांडलेली निरीक्षणे ही ज्याची त्याने तपासून घ्यावी आणि एकंदर आपल्या अपेक्षा आणि प्रयत्न यांच्यात समतोल साधून समाधान मिळवायचा प्रयत्न करावा.

सुधाकर नातू.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा