गुरुवार, ८ ऑगस्ट, २०१९

"सारा हा, ऊन-पावसाचा खेळ!":


"सारा हा, ऊन-पावसाचा खेळ!":

माझ्या मुलीने मला पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त कॅराव्हान ही इन्स्ट्रुमेंट भेट म्हणून दिली. तेव्हापासून आम्ही दररोज सकाळी अतिशय सुमधुर अशी भावगीते त्यावर ऐकत, चहा वगैरे पीत असतो. दिवसाची आमची सुरुवात ही माणिक वर्मा आणि अरुण दाते यांच्या सुरेल आवाजातील आल्हाददायक अशा गीतांनी होत असते. "शुक्र तारा मंद वारा" "सूर जुळले शब्दही जुळले" किंवा "घननीळा लडिवाळा" "क्षणभर उघड नयन देवा" "सावळ्या विठ्ठला" अशी एकापेक्षा एक अशी गाणी ऐकत, आमची सकाळ बहारीने जाते.

आज मी अशीच गीते ऐकताना, मला लक्षात आलं की कोणत्याही गायक गायिकेची काही गीते आपल्याला आवडतात, मनाला भावतात, तर काही आपल्याला बिलकुल आवडतच नाहीत! असं कां होतं ह्याचं उत्तर शोधताना, मला लक्षात आलं की, बहुतेक सगळ्याच बाबतीत हे असंच होत असतं. कुठलाही चित्रपट निर्माता हिरो-हिरॉईन घ्या. त्यांचे काही मोजके चित्रपट सुपरहिट होतात, तर बाकीचे फ्लॉप! खरं म्हणजे प्रत्येक वेळेला तीच मेहनत, तीच गुणवत्ता, तीच निष्ठा व परिश्रम सारं करून ती कलाकृती बनवली जात असते, परंतु सगळ्याच कलाकृती यशाचे दिवस बघतातच असं नाही. नाटकांचही तसंच.

खेळाडूंचे बाबतीतही वेगळं काही नाही. असाच एखादा ख्यातनाम खेळाडू शतका मागून शतकं मारतो खरा, परंतु तोच सिलसिला प्रत्येक सामन्यात त्याला करता येत नाही. बऱ्याच वेळेला तो फ्लाँप जातो, कधी कधी तर शून्यावरही आऊट होतो. काही मामुली रन्स काढतो. खेळाडूंचं जे, तेच राजकारण्यांचही. बघा, कुणी राजकारणी एखादा, काही वर्ष अक्षरश: डोक्यावर घेतला जातो, जिकडेतिकडे त्याचा उदोउदो होतो. परंतु बघता-बघता काळ बदलतो आणि डोक्यावर होता तो आता पायदळी तुडवला गेल्यासारखा, कुठेतरी अंधःकारमय दुनियेत फेकला जाऊन विसरलाही जातो.

घरी दारीही तोच अनुभव पहायला मिळतो. घरांमध्ये दोन तीन मुलं असली तर त्याच्यातला एखादा तरी फुकट जातो, बाकीचे थोडेफार यशस्वी होतात. म्हणजे उडदामाजी काळे-गोरे हा जो काही स्थायीभाव आहे, तो सातत्याने आपल्या नजरेस येतो.

हे असं का होतं हे मी जेव्हा शोधायला लागलो, तेव्हा माझ्या लक्षात आलंः अरे कदाचित हा निसर्गनियमच आहे. बघा सकाळची वेळ प्रसन्न आल्हाददायक असते, तर दुपार तापदायक, परत संध्याकाळी पुन्हा वेगळीच भावना आणि रात्र तर अगदी पूर्ण गहिरी, वेगळीच! म्हणजे एकाच दिवसात चार वेगवेगळे बरे-वाईट अनुभव आपल्याला सतत येत असतात. तेच ऋतूंचे बाबतीत सुध्दा! तीन-चार महिने पावसाळा सगळीकडे हिरवीगार रम्य सृष्टी नंतरचा हवाहवासा वाटणारा गुलाबी हिवाळा. तो संपतो न संपतो, तोच रखरखीत असा तापदायक उन्हाळा. असे हे ऋतुचक्र युगानुयुगे चालू आहे.

सारांश काय तर नित्य नवीन बदल हाच निसर्गाचा अलिखित नियम आहे. काही चांगलं, तर काही त्रासदायक, काही सुखदायक तर काही दुःखदायक; अशा तर्‍हेचे विविध अनुभव घेणं हेच तर जीवन असतं! म्हणूनच सुखदुःख ही आलटून-पालटून येत रहाणारच असतात. सुखान हुरळून जाऊ नये अन् दुःखाने त्रासून! सगळ्यांचे सगळेच आयुष्य काही दु:खी किंवा सुखी समाधानी नसते.

प्रत्येकाच्या जीवनाची वाटचाल ही त्याच्या त्याच्या नशिबाने म्हणा प्रारब्धाने म्हणा, ही अगदी आगळी वेगळी असते. पहा, गीते ऐकताना विचार करता करता, कुठे होतो आणि कुठे आलो! पण ह्या मंथनातून, एक चांगलं साधलं, उमजलं ते म्हणजे आपल्या सभोवताली जे घडत असतं जे आपल्याला अनुभवायला येत असतं, ते जसंच्या तसं स्वीकारणं आणि पुढे जाणं हाच खरा पुरुषार्थ आहे.

स्थितप्रज्ञ व्हा, हे जे भगवान श्रीकृष्णाने सांगून ठेवलयं, ते खरोखरच अनुकरणीय आहे. अशी द्रुष्टी येणं, असा स्वभाव बनणं निश्चित कठीण आहे. पण ते तसं आपल्याला जमलं तर आपले जीवन अधिक संतोषजनक होईल.

सुधाकर नातू
९/८/'१९

असेच अनेक विचारप्रवर्तक लेख वाचण्यासाठी
माझ्या ब्लॉगची लिंक उघडा, शेअर करा:

http//moonsungrandson.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा