"फुलांचे झाले अश्रू!":
मराठी माणसाचे नाटकाचे वेड सर्वश्रुत आहे. सर्वसाधारणपणे वर्तमानपत्रातील जाहिरात बघून व तेथे आलेले परीक्षण बघून रसिक नाटकाला जाण्याचे ठरवत असतात. सहाजिकच नवीन येणाऱ्या नाटकाचे परीक्षण पहिल्या काही प्रयोगांच्या आसपासच येणे आवश्यक ठरावे. कारण त्यामुळे त्या नाटकाविषयी रसिकाला योग्य ती माहिती होते आणि त्याची जशी आवड असेल त्याप्रमाणे, तो त्या नाटकाला जायचे की नाही, हे ठरवू शकतो.
ह्या पार्श्वभूमीवर बहुतांशी वर्तमानपत्रे नवीन नाटकाचे परिक्षण सत्वर देतात असे अनुभवास येते आणि ते योग्यही आहे. परंतु एका लोकप्रिय दैनिकात कधी कधी नाटकाचे बरेच प्रयोग होऊन गेल्यानंतर देखील, कधीही त्या नाटकाचे परीक्षण, एक जुने जाणते नाट्यपरीक्षक टीकाकार नाट्य परिक्षण लिहीत असतात, हे माझ्या द्रुष्टिस आले आहे. अर्थात कोणी परीक्षण कधी लिहावे व ते कधी प्रसिद्ध करावे हे स्वातंत्र्य, अर्थातच त्या त्या वर्तमानपत्राला आणि त्या त्या नाट्य परीक्षकाला आहे, यात वादच नाही. परंतु केवळ तो जनमान्य जुना नाट्य परीक्षक आहे म्हणून ते, इतक्या उशिरा छापावे कां, हा निर्णय त्या त्या वर्तमानपत्राने घ्यायचा असतो.
प्रा. वसंत कानेटकर लिखित "अश्रूंची झाली फुले" या नाटकाचे काही मर्यादित प्रयोग होणार होते. त्याप्रमाणे अर्ध्याहून अधिक प्रयोग होऊन गेल्यानंतर, जेव्हा ह्या नाटकाचे, त्याच मान्यवर नाट्यपरिक्षकाचे सविस्तर परीक्षण त्याच दैनिकात आले. त्यामुळे हे सारे विचार माझ्या मनात आले. इतक्या विलंबाने परीक्षण लिहिण्याचे प्रयोजन काय हा प्रश्न निर्माण झाला. अशा परिक्षणाचा फायदा कोणाला कसा होणार, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मुद्दा केवळ हाच की शक्यतो कुठल्याही नाटकाचे परिक्षण वेळेवर येणे, संबंधित सर्वांना अपेक्षित असते आणि तसे ते यावे हा.
आता या परिक्षणाबद्दल जर बोलायचं झालं तर ते ह्या नाट्यप्रयोगाची भलामण करणारेच दिसते. अर्थात तो त्या नाट्य परीक्षकाच्या स्वतंत्र अविष्कार करण्याच्या हक्काचा मुद्दा आहे. मला या नाटकाच्या बद्दल वेगळंच काही मांडायचं आहे. मी देखील हे नाटक रंगभूमीवर आले तेव्हा आवर्जून रवींद्र नाट्य मंदिर मधील प्रयोगाचे तिकीट काढले होते. दुर्दैवाने तो प्रयोग काही अपरिहार्य कारणामुळे रद्द झाला होता. म्हणून पुन्हा मुद्दामून आगाऊ तिकीट काढून मी हा नाट्यप्रयोग दुसऱ्या नाट्यगृहात बघितला.
परंतु तेव्हा त्याचा माझ्यावर विशेष प्रभाव पडला नाही कारण मी पूर्वीचे नाटक बघितले होते, त्यातून हा प्रयोग अगदीच मिळमिळीत वाटला. सध्या अतिशय लोकप्रिय असलेला सुबोध भावे याच्यासाठी लोक हा प्रयोग बघायला आवर्जून जात आहेत हे खरेच. परंतु डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांच्या लाल्या पुढे, सुबोधचा लाल्या पुष्कळसा नेभळट आणि अविश्वसनीय वाटतो. जी बेदरकारी आणि तडफ डॉक्टरांची दाखवली होती, त्या पुढे सुबोधचा हा लाल्या अगदीच बाल्या भासतो. तीच गोष्ट विद्यानंद झालेल्या पणशीकरांच्या विद्यानंद पुढे, शैलेश दातार ह्यांचा विद्यानंद हा आपल्या भूमिकेला तितकासा योग्य न्याय देत नाही असे वाटते. सतत बदलत जाणारे नेपथ्य आणि ज्या मुद्द्यावर विद्यानंदांना श्यामच्या कृत्यामुळे तुरुंगात जायला लागते आणि त्यांचा जणू अंतर्बाह्य कायापालट होतो व प्रामाणिकपणाचे गोडवे गाणारा हा सज्जन नायक, दर्जन खलनायक बनून जातो, ते तितकेसे पटत नाही. कारण ज्या घटनेमुळे हे होते, ती अधिक विस्तृतपणे दाखवली गेलेली नाही.
शामच्या व्यक्तिरेखेचा ह्या नाट्यातील सहभाग दुर्दैवाने नीटसा ठळकपणे प्रेक्षकांसमोर न आणल्याने हे नाटक शेवटी कंटाळा येईल इतके रेंगाळत गेल्यासारखे भासते. सहाजिकच विद्यानंद लाल्याच्या भेटीचा क्लायमॅक्स आवश्यक ती उंची गाठू शकत नाही. केवळ सुबोध भावेंची मराठीतला सुपरस्टार ही प्रतिमाच उरलेले प्रयोग (कसेबसे?) पुढे नेऊ शकेल इतकेच.
सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणतेही नाटक हे त्या त्या काळाचा आरसा असते. अगदी मोजकीच नाटके कालातीत आणि केव्हाही पटू शकणारी असतात. "अश्रूंची झाली फुले" हे नाटक
तीन चार दशकांपूर्वी जेव्हा आले, तेव्हाची जीवनशैली, नीतिमूल्ये आणि एकंदर सामाजिक भावनिक कौटुंबिक माहोल हा पूर्णतया वेगळा होता आणि एकंदर सामाजिक भावनिक कौटुंबिक माहोल हा पूर्णतया वेगळा होता.
परंतु सध्याचा माहोल हा पूर्णतया कलियुगाला साजेसा असा, भ्रष्टाचाराने बरबटलेला आणि वैश्विक मूल्ये तितकीशी न मानणारा पूर्णतया आत्मकेंद्री असा झालेला असल्यामुळे, हे नाटक मूलत: आज सध्याच्या कालप्रवाहात बरोबर बसत नाही. त्यामुळेही कदाचित या सर्व मंडळींनी मेहनत घेऊन देखील प्रयोग आपल्या मनावर तितकेसा परिणाम करत नाही. जितके या नाटकाला पूवी डोक्यावर घेतले गेले, तितके आत्ता घेतले जाईल या भावनेने रंगभूमीवर आणलेले हे नाटक त्यामानाने अपयशी ठरले आहे असे माझे मत आहे. अर्थात या मताशी सहमत व्हावे किंवा नाही हा ज्याचा त्याचा मुद्दा आहे मी मला जसे पटले सुचले तसे लिहिले.
सुधाकर नातू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा