शुक्रवार, ७ जून, २०१९

" कावा कामि!":


 "कावा कामि!":

ह्या शीर्षकावरून चक्रावून जाऊ नका. हे शीर्षक म्हणजे, मी काय वाचले त्यातून मला काय मिळाले ह्याचा तो शॉर्टफॉर्म आहे.

आपण नेहमी काही ना काहीतरी वाचत असतो, वाचताना आपल्याला काहीतरी नवीन असे अनुभवायला मिळत असते. ह्या सदरामध्ये मी जेवढे काही वाचतो, त्याच्यातले कधीतरी, केव्हातरी, चांगले घेण्याजोगे, तसेच इतरांना देण्याजोगे असं काही उमजलं, तर ते तुमच्याबरोबर शेअर करायचा विचार आहे.

काही दिवसापूर्वी एका दैनिकात मी लॉटरी संबंधित एक लेख वाचला होता. तो या सदराला सुरुवात करताना आठवला. त्यामध्ये एक अगदी आगळा वेगळा, चक्रावून टाकणारा द्रुष्टिकोन मांडण्यात आला होता. तो म्हणजे:

"गर्भधारणेत जशी अनिश्चितता असते, तशीच ती लॉटरीच्या मूलतत्त्वामागे सापडते!."

लाँटरीसंबंधी सखोल विचार केल्यानंतरच हा अचूक मर्माचा वेध घालणारा असल्याचे पटले. ह्या विचारामुळे खरोखर ज्ञानात जशी भर पडली, त्याचप्रमाणे चिकित्सक दृष्टिकोन स्वीकारून एखाद्या गोष्टीच्या मुळापर्यंत जाणे कसे आवश्यक आहे, ते समजले.

वाटून गेले की, लॉटरी, रमी, तीन पत्ती व मटका इ.इ. असे अनेक जुगारासदृश्य खेळ, हे खरोखर अनिश्चिततेतील निश्चितीतता किती अस्थिर, चंचल आहे, तेच मांडतात. त्यामागे माणसाच्या मनातील अधिकाधिक मिळवण्याच्या प्रवृत्तीचे मूळ आहे. त्यातून कमीत कमी श्रमात जास्तीत जास्त मोल अपेक्षिण्याची प्रवृत्ती दिसून येते.

जाता जाता एक गोष्ट मला वैयक्तिक स्वरूपात सांगावीशी वाटते ती म्हणजे, मी कधीही लॉटरीचं तिकीट विकत घेतलं नाही: घेईन असेही वाटत नाही. त्यामागे माझी एक विचार करण्याची दृष्टी आहे. ती सगळ्यांना पटेलच असे नाही. कारण माझ्या लक्षात आले, एक रुपयाचे तिकिट जेव्हा आपण घेतो आणि भरघोस असे बक्षीस मिळते, तेव्हा इतर अनेक जणांचे दुस्वास तर घेत असतोच पण त्यांचे नुकसानही करत असतो.

त्याशिवाय, इनपुट आउटपुट या बरोबरीच्या तत्त्वानुसार जर आपण काही श्रम केलेले नाहीत, तर त्याचा असा अवास्तव मोबदला मिळवणे अयोग्य नव्हे कां? ही माझी एक प्रकारे तात्विक वृत्ती लाँटरीचे तिकीट न घेण्याच्या मागे आहे.

त्याचे मला दुःख तर नाहीच नाही, उलट मनापासून समाधान आजपर्यंत मिळत आले आहे. अनेक ताणतणावापासून सहाजिकच माझी सुटका झाली आहे. आपल्याला बक्षिस मिळेल की नाही, अशा दोलायमान अवस्थेत राहण्याची वेळ माझ्यावर कधीही आली नाही.

साध्या लॉटरीच्या विषयामधून श्रमाचे महत्व आणि श्रमा इतकाच मोबदला या नैसर्गिक मूळ तत्त्वाचा गाभा समजून गेला हे ह्या वाचनाचे सार!

सूक्ष्म निरीक्षण, माहितीची समतोल चिकीत्सा
ह्या जोडीला कल्पनाशक्तीमुळे, "शाश्वत वास्तववादी विचारसूत्रे"
(Concepts) निर्माण होतात, ती अशी!
--------------------------

"पुस्तके, ही एक अडगळच?!":

नुकताच मी ललित मासिकामध्ये एक लेख वाचला. तो लेख प्रकाशकांना पुस्तके विकण्याच्या वेळी ग्राहक मिळत नाहीत, अशा तऱ्हेची तक्रार मांडणारा लेख होता. प्रकाशन अतिशय झोकात होते. सवलतीही दिल्या जातात. पण एवढे करून बहुतेक पुस्तकांची पहिली आवृत्तीही विकण्यासाठी, नाकी नऊ येऊन खूप वेळ जातो, ही खंत त्या लेखात मांडली होती.

मला अंतर्मुख करून गेले ते शब्द असे होते की, "माणसं महिन्यातून एकदा दोनदा हॉटेलिंग करायला जातात, तिथे पाचशे-हजार रुपये खर्च करायला त्यांना काही वाटत नाही. किंवा सिनेमा नाटकं बघायला जातात, तेव्हाही असेच पैसे खर्च होतात. अथवा मॉलमध्ये गेलं, तर तिथे देखील अशाच प्रकारचा खर्च केला जातो. मात्र पुस्तक विकत घ्यायची वेळ जेव्हा येते, तेव्हा हात कां आखडले जातात?"

आपण मारे म्हणतो कीं "वाचाल तर वाचाल! पण ते केवळ बोलण्यापुरते, प्रत्यक्ष वास्तव वेगळे व चिंताजनक आहे. त्यातून आता बरंच काही डिजिटल झाल्यामुळे, वाचायला कोणाला वेळ नाही, बघायला मात्र वेळ आहे.

माझा एक भाचा मला म्हणाला की, ब्लॉगवर तू लिहून काही उपयोग नाही, लिखित शब्द वाचण्यापेक्षा व्हिडिओ बनव आणि व्हिडिओ मधून प्रत्यक्ष बघणं आणि ऐकणे यातून तुला अधिक प्रतिसाद मिळू शकेल. अनुभव आला की हे तंतोतंत खरंच आहे.

माझा ब्लॉग सुरू करून जरी दोन वर्ष झाली असली तरीही मला जो प्रतिसाद त्यासाठी मिळाला आहे, त्याच्या कितीतरी पट प्रतिसाद, सुमारे सहा सात महिन्यापूर्वी मी माझा युट्युब वरचा चॅनेल सुरू केल्यापासून मिळाला आहे. केवळ एवढ्या अल्प कालावधीत मी वार्षिक राशि भविष्य आणि इतर विचार मांडणारे जवळजवळ पंचवीस व्हिडिओ त्यावर प्रकाशित केले. सांगायला आनंद होतो की, त्याने नुकताच ७३००० चा व्यूहरशिपचा आंकडा पार केला! त्यामानाने माझ्या ब्लॉगवर मी विविधरंगी दोनशेच्यावर लेख लिहूनही तोच आंकडा ३०००० जेम तेम होत आहे.

ह्यावरूनच या समस्येचे मूळ कळावे. खरं म्हणजे असं कां व्हावं? कदाचित पुस्तक वाचून झाल्यावर त्याचा पुन्हा उपयोग तसा काही नसतो. त्यामुळे त्याच्यासाठी पैसे कां वाया घालवा, असा विचार त्यामागे असावा. शिवाय अल्प दरात हवे ते वाचायला, वाचनालयही सोयीची आहेतच.

परंतु जेव्हा आपण हॉटेलिंग चित्रपट नाटक बघतो तेव्हादेखील वन टाइम युज अशाच तर्हेचे पदार्थ अथवा सेवा असते. तेव्हा आपल्याला असे नाही वाटत नाही की, माझे पैसे वाया गेले. त्या पैशात मला पुन्हा काहीच मिळणार नाहीये. पण पुस्तकांच्या बाबतीत मात्र आपण कां वेगळा विचार करतो, हे खरोखर एक कोडेच आहे. खरं म्हणजे, पुस्तक पुन्हा तुम्हाला कधी आठवण झाली तर, ती काढून वाचू शकता, त्यातील विचार किंवा दिशा तुम्हाला मार्गदर्शक ठरू शकते. पण लक्षात कोण घेतो? वाचन हे खरोखर आता इतके काही महत्त्वाचे राहिलेले नाही, हे दुर्दैव आहे.

ह्या विषयावर माझ्या पत्नीशी मी चर्चा करत असताना, तिने मला एक नवीनच काही सांगितले. ती म्हणाली "पुस्तक विकत घेऊन, ती वाचल्यावर ठेवायला जागा कोणाकडे असते?" हा म्हणजे खरोखर मास्टरस्ट्रोक होता आणि सगळ्या समस्येच्या मुळाशी जाणार होता. म्हणजे दुर्दैव असे की पुस्तके वाचायची दूरच, ती विकत घ्यायचीही म्हणून दूरच. पुस्तके म्हणजे शेवटी अडगळच असं कां म्हणायचं? बदलत्या काळातील भीषण वास्तव हे असे आहे!

जरा गांभीर्याने जरूर विचार करा.

----------------------------

सुधाकर नातू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा