"मनोगते":
## ज्या "चष्म्यां"तून आपण पहातो,
तसे जग आपल्याला दिसते.
पण खरोखर "ते" तसे असतेच असे नाही!
## प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. जे जे निवडतो, त्यातून इतरांना कुठलाही त्रास न होता,
आनंद व समाधान मिळाले, तर सारे भरून पावले.
## "काल"चा दिवस, "आज"च्यापेक्षा बरा होता, अशी वेळ "उद्या" ये😢ऊ नये!
## गौरवशाली इतिहासाचे नगारे पिटताना,
तसा पराक्रम व कर्तृत्व वर्तमानात आणण्यासाठी सर्वंकष योगदान देताना दिसले,
तरच त्याला काही अर्थ.
## लाँ आँफ डिमीनिशिंग रिटर्नस्":
एखादी गोष्ट जरी खूप आवडली तरी,
तिच्या जास्त वापरामुळे,
ती हळूहळू नकोशी होते.
## "समाधानाची सप्तपदी":
१. डोके वापरा
२. दृष्टी बदला.
३. जीभेला आवरा
४. हाताने नेहमी देत रहा.
५. ह्रदयापासून प्रेम करा.
६. मन काबूत ठेवा.
७. पायाने चालत रहा.
## आपले "Out of Box" संदेश असे हवेत,
की ज्यामुळे वाचकांच्या विचारविश्वाला चालना व स्वनिर्मितीची प्रेरणा मिळू शकेल.
## कोणी सर्वगुणसंपन्न नसतो.
डोक्यावर घेतलेल्याचेही
दोष जाणवण्याची वेळ, त्याच्या गुणांच्या योगदानाची चिकित्सा होते, तेव्हां येते.
## राजकीय विषयावर पोस्टींग करणे, विचारपूर्वक हवे. बदलत्या परिस्थितीचा अचूक वेध घेणारे असावे,
न पेक्षा, ते टाळावे.
## "गतीमान शासन"?:
महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या गाजराची
अखंड वाजणारी पुंगी, बहुधा आता वाजणार!
## एक कोडे की व्यथा?:
"फेबु"वर स्नेहवर्तुळांत चार आकडी स्नेही जमा असले, तरीसुद्धा त्यातील हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच सक्रीय असतात.
----------------------------------------------
आता,
"स्वगते"!:
"पैलतीरावर.....१":
वृद्धापकाळ हा खूपच अनिश्चिततेचा, कठीण आणि कसोटीचा असू शकतो. फारच थोड्यांना निरामय आरोग्य आणि आर्थिक स्वास्थ्य मिळू शकते.
संभाव्य अशा कितीतरी विचित्र आणि त्रासदायक अवस्था, अनेक अभाग्यांच्या वाट्याला येऊ शकतात. निसर्गचक्र म्हणा अथवा ज्याचे त्याचे प्रारब्ध, प्रत्येकाला काही ना काही तरी वेगळ्या भावनिक स्थितीला तोंड द्यावे लागते. त्या वाचून त्यांच्या जीवनातील संध्याकाळ संपत नाही.
असून नसल्यासारखे आणि नसून असल्यासारखे अशा अनुभवातून जाण्याची शक्यता खूप असते. जे जे सुख समाधान भोगले ते आठवून काहीच उपयोग नसतो. स्मरणरंजन हे कधी कधी वेदनादायी होऊ शकते.
अशा समयी "ठेविले अनंते, तैसेची रहावे" हेच शहाणपणाचे!
-----------------------------------------
"पैलतीरावर......२:
व्रध्दापकाळात बहुधा कुटुंबामध्ये आपल्याला कोणी विचारत नाही. आपले काही महत्त्व उरत नाही. आपल्याला कितीही योग्य व आरोग्य काही वाटत असले, तरीही ते कोणीही मनावर घेत नाही आणि आपण ते बोलून काही उपयोग नसतो. एखाद्या अडगळी सारखे आपल्यावर वेळ येऊ शकते.
पुष्कळदा अनेक असाध्य रोग आपला पिच्छा पुरवत शकतात आणि त्यातून जर तुम्ही तुमचे स्वतःचे स्वतः न करता येऊ शकणाऱे अपंगत्वाचे धनी झाला असलात, तर तुमचे हाल खरोखर परमेश्वरच जाणू शकतो. खरोखर ही अशी वेळ कोणावरही येऊ नये. पण बऱ्याच जणांवर येते हेही सत्य आहे.
कदाचित आपण जेव्हा ज्या गोष्टी करायला हव्या होत्या, ज्या गोष्टींना महत्त्व द्यायला हवे होते, ज्या तऱ्हेने आपण इतरांशी वागायला हवे होते, तसे आपण वागलेले नसतो. त्यामुळे आपल्यावर बऱ्याच वेळेला ही अशी वेळ येऊ शकते. थोडक्यात आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो.
आपलं वय उलटल्यानंतर, जे काही बरं वाईट होतं रोग किंवा इतर काही मानसिक शारीरिक भावनिक आर्थिक समस्या निर्माण होतात, त्याच्यामागे आपलीच कुठली ना कुठली तरी करणी वा निर्णय कारणीभूत असतात. पण हे सगळे जाणवायला आयुष्याची संध्याकाळ पुष्कळ जणांचे बाबतीत येते.
माणूस जन्माला येतो तो कशाकरता? त्याचे प्रयोजन काय आणि ते प्रयोजन कोणी ठरवतो कां आणि कधी? त्याप्रमाणे तो वागतो कां? कदाचित जन्म हा एक अपघात आहे आणि मृत्यू हा त्याचा शेवट आहे हेच सत्य! कदाचित प्रत्येक जण आपले काही विहित कार्य प्रारब्धात लिहिलेले असते ते पूर्ण होईपर्यंत या लोकात असतो आपले अवतार कार्य संपले की तो या सृष्टीचा त्याग करून, पुन्हा इथे कधीही न येण्यासाठी, माहीत नसलेल्या माहोलांत अंतर्धान पावतो.
--------------------------------------------
नाण्याच्या ह्या नकारात्मक दोन बाजू झाल्या. आता ही अनुकरणीय अशी सकारात्मक बाजूही पहा:
' "आजचा दिवस माझा!":
निवृत्तीनंतर दररोज शक्यतो ठराविक वेळेनंतर मी हाती घेतलेल्या कामात बदल करतो. त्यामुळे एकाच दिवसात अनेक कामांना हात घातला जातो व त्यात विविधता येते. सहाजिकच माझा वेळ कसा जातो ते कळतही नाही. उलट मला वेळ अपुरा पडतो असेच वाटते.
दररोज काही ना काही मनाला अंतर्मुख करणारे वा आनंद देणारे वाचन करण्याची वा कार्यक्रम पहाण्याची माझी धडपड असते.
अधून मधून ज्योतिषाचा छंद जोपासणे ही उपलब्ध वेळेला दिलेली खमंग फोडणी असते. पंधरवड्यात एखादे नाटक वा चित्रपट पाहिल्याशिवाय मला व पत्नीला रहावत नाही. महिन्यातून एकदा हाँटेलिंग केले की सार्थक होऊन जाते.
शिवाय ज्या दिवशी निदान एखादे तरी मनपसंत लेखन केले जातेच जाते व ते सोशल मीडीयावर प्रकाशित केले की तो दिवस माझा असतो. जसा हा आजचा!
जे जे करू शकतो वा जे जे करून मला आनंद वा समाधान मिळते, ते ते मला शक्यतो करायला मिळते. म्हणून "माझे म्हणू शकेन" असेच दिवस मला अधिक मिळत रहावेत, अशीच माझी प्रार्थना असते.
शेवटी सुख शांती वा समाधान पैशात नसते, तर व्रुत्तीत आणि द्रुष्टीत असते, हेच खरे!'
------------------------
सुधाकर नातू
८/६/'१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा