"एक रोमांचक सिलसिला":
" माझी कथा" ही जणू लक्ष वेधून घेणार्या मुखपृष्ठाप्रमाणे भासणारी एक सुवर्ण संधी, कुणालाही व्यक्त होण्यासाठी 'फेबु'वर उपलब्ध आहे. तिचा मी गेले कित्येक दिवस दररोज न चुकता लाभ घेतो आहे.
जे जे पहातो, वाचतो वा अनुभवतो, त्याचा सर्वकालिक सर्वमान्य अर्थ-Concepts, लावण्याचा प्रयत्न करणारी शब्दचित्रे अथवा कधी कधी गतकाळातील स्मरणक्षणांची दर्शनचित्रे असे माझ्या कथेचे रूप राहिले आहे.
तेव्हापासून दररोज किती वाचक अथवा प्रेक्षक माझी कथा पाहतात किंवा वाचतात हे आजमावण्याचा छंदही एक कुतूहल म्हणून मला लागला आहे.
मला लक्षात आले की, दर्शन चित्रे अधिक बघितली जातात, त्या मानाने शब्दचित्रे वाचणारे कमी. त्यामागील कारण, "काही वाचण्यापेक्षा, बघणे हे कदाचित कमी श्रमाचे कार्य" हे तर नव्हे?
दर्शन चित्रांबद्दल बोलायचे तर ती वेगवेगळ्या ठिकाणची आणि वेळेची अन् अनोख्या मूडमधील लक्षणीय रंगरूपातील, भावचित्रे पुनश्च येथे मांडणे, हा एक असीम आनंददायी अनुभव मला वाटत आला आहे. कारण त्यावेळचे आपले रंगरूप भावपटल किती आगळे वेगळे होते, हे जसे कळते, तसेच बदलत्या काळामध्ये माणूस कसा आमुलाग्र बदलून जातो तेही उमजते. खरोखर काळ तुम्हाला असा कसकसा अन् किती किती बदलून टाकतो हे एक गूढच आहे. त्या तुलनेत शब्दचित्रे मात्र वर्तमान काळातील मनातील स्पंदनांचे सर्जनशील प्रकटीकरण असते.
सहाजिकच, इथे दर्शनचित्र रूपाने भूतकाळ जागवला जातो, तर शब्दचित्रांच्या माध्यमातून वर्तमानाचा भविष्याची दिशा आणि वेध दाखविण्याचा, प्रयत्न माझ्याकडून होऊन जातो. हा सिलसिला खरोखर रोमांचक असाच आहे, आणि तो होता होईल तो चालूच राहणार आहे.
आशा आहे की, असेच वाढत्या संख्येने दर्शक अन् वाचक मला प्राप्त होत रहातील!
तेव्हां जरूर पहा वा वाचा, 'फेबु'वरील:
"माझी कथा" अर्थात्
"एक रोमांचक सिलसिला"!
-------------------------
"मनोगते":
# स्वप्नं प्रत्यक्षात यायला, केवळ संधी मिळणे पुरेसे नसते, त्यासाठी अजोड गुणवत्ता, अथक परिश्रम आणि दांडगा अनुभव असायला लागतो!
# "ज्या दिवशी बार्टर पद्धत जावून
कागदी चलन अस्तित्वांत आले,
तोच दिवस बहुधा कलियुगाचा प्रारंभ."
## आपले "Out of Box" संदेश असे हवेत,
की ज्यामुळे वाचकांच्या विचारविश्वाला चालना व स्वनिर्मितीची प्रेरणा मिळू शकेल.
## कोणी सर्वगुणसंपन्न नसतो.
डोक्यावर घेतलेल्याचेही
दोष जाणवण्याची वेळ, त्याच्या गुणांच्या योगदानाची चिकित्सा होते, तेव्हां येते.
## राजकीय विषयावर पोस्टींग करणे, विचारपूर्वक हवे. बदलत्या परिस्थितीचा अचूक वेध घेणारे असावे,
न पेक्षा, ते टाळावे.
## "गतीमान शासन"?:
महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या गाजराची
अखंड वाजणारी पुंगी, बहुधा आता वाजणार!
--------------------------
"रंगांची दुनिया-तीन यक्षप्रश्न":
››› एखादी मालिका, एकदाची कधी बंद होते असा प्रश्न असंख्य प्रेक्षकांच्या कपाळावर आठ्या न आणता, अरेच्या ती कां बरे बंद झाली असेही त्यांना वाटायला न लावता आपला अवतार संपवू शकते, त्याचे 'सख्या रे' मालिका, उत्तम व दुर्मिळ उदाहरण ठरावे!
››› मराठी नाटकं, एखाद दुसरा अपवाद वगळता कधीही वेळेवर सुरू होत नाहीत. त्यामुळे अनाठायी किती तरी समुह-वेळाचा अपव्यय होतो. प्रेक्षकांच्या सहनशक्तीची परिक्षा अशी बिनदिक्कतपणे पहाणे सर्वथैव गैर नव्हे कां?
››› पुण्यामधील नाट्यप्रयोगांच्या दुपारी १२-३०, रात्री ९-३० ह्या वेळा अत्यंत गैरसोयीच्या आहेत. मुंबई प्रमाणेच सकाळी १०-३०, दुपारी ४ व रात्री८वाजता नाट्यप्रयोग पुण्यासही होणे गरजेचेआहे…….
सुधाकर नातू
१६/६/'१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा