शनिवार, १ जून, २०१९

"सर्जनशीलतेचा असाही रसास्वाद":


 "सर्जनशीलतेचा असाही रसास्वाद":

आजच्या-२ जून'१९, महाराष्ट्र टाईम्समध्ये
श्री. चंद्रमोहन कुलकर्णी यांनी मुखपृष्ठ कसे आकार घेते, ते अतिशय सुलभतेने व ओघवत्या भाषेत, दोन प्रत्यक्ष पुस्तकांची उदाहरणं समोर घेऊन मांडली आहेत. हा लेख जसा अतिशय प्रत्ययकारी वाटला, तसाच मनोरंजकही.

वाटून गेले, हाती घेतलेले कोणतेही पुस्तक आपण वाचतो. पण मुखपृष्ठाकडे आपण जितके लक्ष द्यायला हवे, तेवढे ते देतोच असे नाही. दुसरे असे की मुखपृष्ठ चित्रकार त्याची कलाकृती सादर करण्यापूर्वी किती मेहनत घेतो आणि त्याच्या कल्पनाशक्तीच्या जोरावर पुस्तकातला आशय हुबेहूब चित्र रुपात प्रकट करण्याचा आटापिटा कसा करतो हेही समजता आले.

व्यवस्थापन शास्त्रातील IPO, अर्थात् Input Process Output ही संकल्पनाच जणु लेखकाने मुखपृष्ठ निर्मितीमागे कशी असते ते सहजतेने मांडले आहे. कोणतीही नवनिर्मिती कशी होते, त्यासाठी किती किती कष्ट उपसावे लागतात, किती व कसकसा विचार करावा लागतो ह्याचा अंतर्बाह्य शोध घेण्याची चालना मला ह्या अप्रतिम लेखामुळे मिळाली.

जाणवले की, सर्जनशीलता ही काय चीज आहे! कोणतीही नवनिर्मिती तत्संबंधी स्फूर्ती आल्याशिवाय होऊच शकत नाही. ही स्फूर्तीच सर्जकाला अंतर्बाह्य ढवळून काढते, त्याला दिशा दाखवत inputs चा सर्वंकष ढांढोळा घ्यायला लावते. त्यापुढची process ही पायरी हा अत्यंत मूलभूत गाभा असते. ती अचूक तर output अर्थात नवनिर्माण उत्तम होण्याची शक्यता अधिक.

सजीव निर्मिती ही निसर्गामध्ये नवनिर्माणाची परमोच्च कलाकृती! ती होत असताना कळा वेदना होतच असतात किंबहुना म्हणूनच बाळ जेव्हा जन्माला येते, त्या प्रक्रियेला बाळ-अंत-पण अर्थात बाळंतपण असे म्हणत असावेत. वेदनेतून पुनर्निर्मिती होण्याची संभाव्यता अधिक असते. कृती अथवा 'क्रिएटिव्ह अँबिलिटी' हीदेखील म्हणूनच एक प्रकारची अंतर्गत वेदनाच होय. ही वेदना मात्र सर्जकाला परमानंद देणारी असते, कारण त्यातूनच जगाला नवीन काहीतरी मिळत असतं!

ह्या लेखामुळे मला असे काही लिहिण्याची बुद्धी झाली, यातच सर्व काही आले अन् लेखाची श्रेष्ठता अधोरेखित झाली. लेखकाचे म्हणूनच अभिनंदन, तसेच अशा प्रकारचा मूलभूत संकल्पना विषद करून टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या लेखमाला सुरु करण्यासाठी म.टा.चे देखील कौतूक. आपण हा लेख जरूर वाचा मला खात्री आहे की तुम्हालाही माझ्यासारखं काहीतरी वाटायला लागेल.

सुधाकर नातू,

"ताजा कलम":
"स्टार प्रवाह" वरील "साथ देशी, तू मला" या मालिकेतील नायक समीर, नेहमी आपल्या मनांतील खळबळ आणि तळमळ काचेच्या बाऊलमधल्या चंद्रमोहन ह्या गोडगुलाबी माशापाशी व्यक्त करत असतो, हे दृश्य मला प्रत्ययकारीपणे आठवले. कारण योगायोग पहा: समीर झालेलाही अभिनेता कुलकर्णी आणि येथील लेखकाचे नावही चंद्रमोहन कुलकर्णीच!
हा दुग्धशर्करा योग म्हणायला नको कां?
---------------------------
"पुसता येत नाही, तो भूतकाळ,
लिहिता येतो, तो वर्तमानकाळ
आणि
कल्पिता येतो तो भविष्यकाळ!"
----------------------------

जो होता है,
वो आखिर भले के लिए ही होता है.
कौन कितने पानीमे और किसमे कितना दम है, यह समझता है.
----------------------------

कुटूंबातील लहान मुलांवर आपण नितांत माया, जिव्हाळा लावण्यांत आणि त्यांचे मनसोक्त कोड-कौतुक करण्यात आनंद मानतो.

त्याचप्रमाणे, समुहातील लहानांतील लहान घटकाला नीट समजून उमजून घेऊन योग्य दखल घेत, समुहाने संभाळून घ्यायला हवे.
----------------------- -------------- --- ----- 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा