रविवार, १६ जून, २०१९

"अम्रुतमहोत्सवी मनोगत":


 "अम्रुतमहोत्सवी मनोगत":

माझ्या वाढदिवसाचे निमित्ताने मला शुभेच्छा देणार्या तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. असाच क्रुपालोभ असू द्यावा.

आज माझ्या वयाची चक्क अम्रुतमहोत्सवी ७५ वर्षे पूर्ण होऊन मी ७६ व्या वर्षांत मी पदार्पण करत आहे. फादर्स डेचेही निमित्त साधून माझ्या मुलीच्या घरी आमरस पुरीच्या सुग्रास भोजनाने हा अम्रुतमहोत्सवी वाढदिवस आनंदाने साजरा झाला.

विश्वास बसत नाही इतक्या गतीने ही सारी वर्षे गेली असे मला वाटत आहे. आपण एवढी मजल गाठू शकू, अशी मला कधी खात्री वाटली नव्हती किंवा मी तसा कुठल्याही प्रकारचा खास प्रयत्न केला नव्हता. यामागे नियतीचा कोणता तरी हेतू असावा.

जन्मानंतर जीवनामध्ये आमूलाग्र वळण देणारी एकमेव घटना जर कुठली असेल, तर ती म्हणजे विवाह. जोडीदाराच्या संगतीने तुमच्या तना-मनात एक क्रांतीकारी घुसळण सातत्याने होत राहते. मला वाटते की, कोणाही माणसाला जगण्याची प्रेरणा या जोडीच्या गोडी मधूनच मिळत जशी असावी, तद्वतच त्याच्या शारीरिक, मानसिक व भावनिक भवतालावर योग्यायोग्य परिणाम होत असावा.

म्हणूनच, एखाद्या चित्रपटात शोभेल, अशा चित्तथरारक रितीने माझ्या जीवनात आलेल्या माझ्या पत्नीचे ह्या दीर्घ वाटचालीत निश्चितच महत्वाचे योगदान आहे, असे मला वाटते. यास्तव तिचे खूप खूप आभार.

मात्र ह्या क्षणी, राहून राहून मनाला वाटते, जर आपण इतकी वर्षे जगणार आहोत, हे जर आधीच माहीत असते, तर आपल्याला आयुष्य, ह्याहूनही अधिक शहाणपणाने व समंजस सजगतेने जगता आले असते.

असो, Better late than never!

आता,चवीने जगत येणारा प्रत्येक दिवस 'माझा' बनवत जीवनानुभवाचे सार असेच भरभरून वाटत रहायचे, नाही कां?

आपला,
सुधाकर नातू
१६-६-२०१९

ता.क. विवाहीत व्यक्ती, अविवाहीतांपेक्षा अधिक काळ जगतात, हे सर्वश्रुत आहे. त्या पार्श्वभूमीवर, संसारातील जोडीदार एकमेकांच्या जीवनरेखेच्या कालमर्यादेवर किती, कसा व कां परिणाम करू शकतात ह्यावर सखोल वैज्ञानिक संशोधन होणे गरजेचे आहे, हे मला आजच्या निमित्ताने सुचवावेसे वाटते.

--------------------------





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा