सोमवार, २४ जून, २०१९

"आजचा जमानिमा":


"अम्रुतमहोत्सवी शुभाशिर्वाद":
नुकतीच मी वयाची ७५ वर्षे पूर्ण केली. तेव्हा मला माझ्या भगिनीकडून आलेला हा शुभाशिर्वाद:

"जन्म दिनाचे गाणे सुदिनं सुदिनं जन्मदिन मं तव भव तुमंगलम जन्मदिनं चिरंजीवकुरुजिन जिव शरद : शतू शतम् पु०यवर्धन्म सुदिनं सुदिनं जन्मदिनं विजयी भव सर्वत्र सर्वदा जगती भव तुत वसुयश गान म सुदिन सुदिन जन्मदिन.
------------------------------

# "आजचा जमानिमा":

रोज आपण आपल्या वैयक्तिक क्षमतेमध्ये काहीना काही तरी, भर घातली पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण सभोवतालचे अवलोकन केले पाहिजे.

तसे झाले तर आपल्याला काही ना काही नवीन असे शिकायला मिळते, त्यालाच म्हणायचे आजचा जमानिमा!

१. वेळेची मर्यादा पाळून वक्तशीरपणा अंगिकारणे, हा एक खरोखर उत्तम गुण आहे. त्याचे अनेक फायदे आहेत.

आपण आपली प्रतिमा सुधारू शकतो हा एक फायदा, वेळेची बचत करू शकतो हा दुसरा फायदा आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपण त्याद्वारे दुसऱ्याच्या वेळेचीही कदर करतो हे दाखवून देऊ शकतो. सहाजिकच, आपली प्रतिमा अधिकच वृद्धिंगत होऊ शकते.

म्हणून वेळेचे महत्त्व जाणा व दिलेली वेळ पाळा.

२. येणारा प्रत्येक दिवस हा नवीन दिवस आहे. त्यासाठी रोज नवीन काहीतरी चांगले करायला सुरुवात करा आणि नव्याने रोज जगतो आहोत अशा तर्‍हेचा अनुभव सातत्याने घेत रहा.
--------------------------
# "निवडक भावगीतं!":

भावगीतं म्हणजे शब्द सूर लय आणि ताल ह्यांच्या संगमाद्वारे मनातले भाव टिपणारं आल्हाददायक प्रसन्न संगीत.

अशीच ही निवडक भावगीतं!:

1. नको देवराया अंत आता पाहू,
2. सखी मंद झाल्या तारका,
3. तू, सप्तसूर माझे
4. त्या तिथे पलीकडे,
5. या भवनातील गीत पुराणे,
6. चाफा बोलेना,
8. माझे माहेर पंढरी
9. दत्त दिगंबर दैवत माझे,
10. तुझ्या गळा, माझ्या गळा
11. चांदण्या रात्रीतले ते स्वप्न,
12. ऋणानुबंधाच्या
13. आज कुणी तरी यावे
14. माझा होशील का,
15. ने मजसी ने
---------------------------
# "डोळे चिंब करणारी "साथसंगत"!:

"पोपटी चौकट" "देवचाफा"सारखे एकसे बढकर एक अनेक कथासंग्रह, "चक्र" "माता द्रौपदी" प्रमाणे महाभारतावर चाकोरीबाहेरचे भाष्य करणारी निवडक नाटकं आणि "आवडलेली माणसं" सारखे व्यक्तीचित्रणात्मक ललित लेखन करणार्या, ज्येष्ठ व श्रेष्ठ प्रतिभावंत साहित्यिक विद्याधर पुंडलिक, ह्यांच्याबरोबरच्या सदतीस वर्षांच्या सहजीवनाची "साथसंगत" त्याच चपखल शिर्षकाच्या पुस्तकांतून त्यांच्या सहधर्मचारिणीने-रागिणी पुंडलिक ह्यांनी उलगडली आहे.

असे पुस्तक हाती येणे, हा वाचकाला एका वेगळ्याच अद्भुत दुनियेत घेऊन जाणारा, अनुभव कसा असू शकतो, त्याची प्रचिती मला आली. दोघांच्या सहजीवनाच्या वाटचालीचा सुरूवातीपासून अखेरपर्यंत माग़ोवा घेत असताना, एखादी साहित्यकृती तिच्या बीजापासून पहाता पहाता अनपेक्षितपणे कसा आकार घेते, ते लेखिकेने अनेक उदाहरणे देत, सहजसुंदर भाषाशैलीद्वारे वाचकाशी ह्रदयसंवाद करावा अशा रितीने मांडले आहे. लेखक व माणूस म्हणून आपला जोडीदार अंतर्बाह्य कसा होता त्याची हुबेहूब प्रतिमा इथे लेखिकेने उभी केली आहे.

शेवटी शेवटी, अकाली मरण पावलेल्या आपल्या अत्यंत लाडक्या पुत्राच्या शोकाने हा बुद्धिमान सह्रदयी माणूस, कसा कोलमडून पडत गेला आणि त्या दु:खांतून बाहेर न येता त्याची अखेर कशी झाली, हे वाचताना तर कुणीही पाषाणह्रदयी माणसालाही पाझर फुटेल.

A Must Read Book.
----------------------------
# "जीवन'दायी पर्जन्य":

इतके दिवस ज्याने अचानक दडी, ज्याची वाट पाहून थकलो, तोच आज अचानक आकाशातून पावसाच्या धारा, अविरत पडू लागल्या आणि आतापर्यंतच्या कडकडीत उन्हाळ्याच्या तापाने, तना मनाची होणारी काहीली, अवचित थांबून, अवघ्या आसमंताला गारे गार करून गेली. अन् लहानपणीचा संस्कृत भाषेतील सुभाषित स्फुरले:

'आकाशात पतितम् तोयम्
यथा गच्छती सागरम्,
सर्व देवम् नमस्कारम् केशवम् प्रतिगच्छती.'

खरंच, निर्गुण, निराकार अपरंपार अनंतातून, आज चमत्कार घडावा, तसे नवजीवनाचे स्त्रोत अवखळपणे धरित्रीला साद घालत, जीवाच्या आकांताने कोसळले. समस्त जीवमात्राची तहान भागविण्यासाठी, जमिनीत नवचैतन्याचे लक्ष लक्ष अंकूर फुलविणाणरे, नावाप्रमाणेच, 'जीवन'दायी असे पर्जन्याचे थेंबच थेंब, अवघ्या मनामनांना प्रफुल्लीत करीत, प्रसन्न झाले.

ह्या निसर्गचक्राच्या अदभूत् चमत्काराला, त्या संस्कृत सुभाषितांतील, दयासागर केशवाला, आपण सारे नतमस्तक होऊन, साष्ठांग प्रणाम करूं या आणि प्रार्थना असूं द्यावी की, ही अशीच क्रुपाद्रुष्टि ह्या चराचरावर निरंतर असूं द्यावी!"
---------------------------
# "विचारशलाका":

"रंगीत पार्श्वभूमीवर, स्लाईडसारखे संदेश बनवणे,
हा बुद्धिला चालना, कल्पकतेला प्रेरणा आणि शब्दसामर्थ्याची परिक्षा घेणारा
छंद!"

"दररोज अर्थवाही, दिशादर्शक आणि विचारप्रेरक असे, मोजक्या शब्दातील निवडक एक वा दोन संदेशच "फेबु" वर मांडावेत."

"धावपळीच्या स्पर्धेच्या आजच्या माहोलांत, जिथे माणसामाणसांतला संवाद हरवत चालला आहे,
तिथे स्वत:च स्वत:शी कोण काय बोलणार?"

"जे 'सोशल मिडीया' वर दिवसेंदिवस
गैरहजर राहू शकतात, ते
आजच्या युगाचे जणु "मर्यादा पुरुषोत्तम"!
---------------------------
# "कुठे होतो, कुठे आलो!":

आमच्या तरुणपणी, काँलेजेस् बरोबर २० जूनला म्हणजे २० जूनलाच दरवर्षी सुरू होत असत आणि गुणांची अशी मुक्त खैरात होत नसे. कुणालाच शालान्त परिक्षेत १०० टक्के गुण मिळत नसत.

आता तर २० जूनला अजून काँलेजसाठी प्रवेश अर्जांची प्रक्रिया-तीही पहिल्याच दिवशी, सर्व्हर डाऊन होत, सुरू आहे.
कालाय तस्मैन् नम:,
दुसरे काय?

"ह्यावर एक प्रतिसाद":

😀👍🏽 अगदी खरे आहे. गेल्या अनेक दशकांत सुमार कर्तृत्वाच्या, निकृष्ट कुवतीच्या भ्रष्टाचारी राज्यकर्त्यांनी देशाची सर्वागीण दुर्दशा केली. आर्थिक, सामरिक, सांस्कृतिक, शैक्षणिक सर्व सर्व क्षेत्रांत आपली पिछेहाट झाली. कर्तुत्ववान व बुद्धिमान अशा सामान्य माणसांच्या बळावर देश तगून राहीला. कशीबशी वाटचाल करत राहीला. खरेतर आज आपण सर्व प्रगत देशांना, चीनला मागे टाकायला पाहीजे होते. एकेकाळी जगात नावाजलेले आपले मुंबई विद्यापीठ आज प्रसिद्ध झालेल्या जागतिक क्रमवारीत कुठेही नाही. ही परिस्थिती बदलायला भगिरथ प्रयत्न करावे लागतील.
खरंच आपण *कुठे होतो, कुठे आलो!
---------------------------
सुधाकर नातू
२४/६/'१९








बुधवार, १९ जून, २०१९

"अनुभव सागर":


 "अनुभव सागर":

विविध प्रकारच्या वाचनातून जाणवलेल्या अनुभवांचे मनांतील रागरंग अगदी वेगळे व संस्मरणीय असतात. अनेक प्रकारच्या पदार्थांची चव जशी विविध रुचीची असते, तसेच हे अनुभव देखील आगळेवेगळे असतात.

अशा दखल घेण्याजोग्या, मनाला भिडलेल्या अनुभवांची ही नोंद करावीशी वाटली आणि लिहावीशी वाटली, ती कल्पना म्हणजे हा "अनुभव सागर":

१. मुली दत्तक म्हणून प्राधान्याने स्वीकारल्या जाणे!

२. अनुभव सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन कॉलेजमध्ये बसविण्यात याव्यात असा आग्रह स्त्रीमुक्तीचे पुढचे पाऊल!

३. काही दशकानंतर शाळेतील एका वर्गातील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन केलेले स्नेहसंमेलन त्या उभरत्या वयातील अविस्मरणीय आठवणी व काळाच्या ओघात प्रत्येक घातले विलक्षण बदल.

४. पहिले प्रेम जसे अद्भुत, तसाच पहिला पगार व त्याचा केलेला विनियोग ज्याच्या त्याच्या साठी न विसरता येण्याजोगा. कुणाची तरी कृतज्ञता आणि आपल्या कर्तृत्वाची ती पहिली पायरी!

५. संत रामदासांनी ज्या ठिकाणी बसून दासबोधासारखा मार्गदर्शक ग्रंथ लिहिला त्या महाडजवळील सह्याद्रीच्या कुशीतल्या शिवथर घळीतील वास्तव्यातील प्रत्यक्ष रोमांचक अनुभव!

६. "ज्या दिवशी बार्टर पद्धत जावून
कागदी चलन अस्तित्वांत आले,
तोच दिवस बहुधा कलियुगाचा प्रारंभ."

७. "आनंद घ्यायला,
वा द्यायला
पैशाची श्रीमंती नाही,
तर मनाची श्रीमंती हवी,
काय उत्तम अन् काय अयोग्य,
त्यासाठी हवी, सद्सद्विवेक बुद्धी!"

८. "पुराणातील वांगी पुराणातच ठेवणं उत्तम.
त्यांचा व्रुथा अभिमान बाळगल्याने आपला "आज" काय मोठे दिवे लावणार आहे?
----------------------------
"सांजपर्व":

माणसाच्या जीवनातील सर्वच अवस्था, ह्या त्या त्या वेळच्या परिस्थितीचे व मनोभूमिकेचे प्रतिबिंब असते.

त्यातील सांजपर्व, हे खरं म्हणजे दुर्लक्षितच रहाते. पण जर माणूस मनस्वी अन् तपस्वी असेल तर व्रुद्धत्वही हवेहवेसे वाटू शकते, कारण तेव्हां
आत्मसंवेदनांच्या सह्रदय अश्रुंनी चिंब होऊन जाते.
----------------------------
आणि जाता, जाता....
Whatsapp वर....
वाचायला मिळालेला....
हा ह्रद्य संदेश........
तुमचाही अनुभव सागर...
सम्रुद्ध करून जाईल......

"ओंजळीतली फुले":

'बोलताना जरा सांभाळून....
शब्दाला तलवारीपेक्षा 
अधिक धार असते
फरक इतकाच की,
तलवारीने मान तर
शब्दांनी मन कापलं जातं. 

जरी तलवारीच्या जखमेतून रक्त
आणि शब्दांच्या जखमेतून अश्रू
येत असले तरी,
दोघांपासून होणारी वेदना
मात्र सारखी असते..

शब्दच माणसाला जोडतात
आणि शब्दच माणसाला तोडतात....
हे शब्दच आहेत..
"जे कधी रामायण,
तर कधी महाभारत रचतात..

तपासून घ्या शब्दांना, 
उच्चाराआधी,
कारण....
खोडरबर कुठलाच 
जिभेवर चालत नाही!....'
सुधाकर नातू
१९/६/'१८

रविवार, १६ जून, २०१९

"अम्रुतमहोत्सवी मनोगत":


 "अम्रुतमहोत्सवी मनोगत":

माझ्या वाढदिवसाचे निमित्ताने मला शुभेच्छा देणार्या तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. असाच क्रुपालोभ असू द्यावा.

आज माझ्या वयाची चक्क अम्रुतमहोत्सवी ७५ वर्षे पूर्ण होऊन मी ७६ व्या वर्षांत मी पदार्पण करत आहे. फादर्स डेचेही निमित्त साधून माझ्या मुलीच्या घरी आमरस पुरीच्या सुग्रास भोजनाने हा अम्रुतमहोत्सवी वाढदिवस आनंदाने साजरा झाला.

विश्वास बसत नाही इतक्या गतीने ही सारी वर्षे गेली असे मला वाटत आहे. आपण एवढी मजल गाठू शकू, अशी मला कधी खात्री वाटली नव्हती किंवा मी तसा कुठल्याही प्रकारचा खास प्रयत्न केला नव्हता. यामागे नियतीचा कोणता तरी हेतू असावा.

जन्मानंतर जीवनामध्ये आमूलाग्र वळण देणारी एकमेव घटना जर कुठली असेल, तर ती म्हणजे विवाह. जोडीदाराच्या संगतीने तुमच्या तना-मनात एक क्रांतीकारी घुसळण सातत्याने होत राहते. मला वाटते की, कोणाही माणसाला जगण्याची प्रेरणा या जोडीच्या गोडी मधूनच मिळत जशी असावी, तद्वतच त्याच्या शारीरिक, मानसिक व भावनिक भवतालावर योग्यायोग्य परिणाम होत असावा.

म्हणूनच, एखाद्या चित्रपटात शोभेल, अशा चित्तथरारक रितीने माझ्या जीवनात आलेल्या माझ्या पत्नीचे ह्या दीर्घ वाटचालीत निश्चितच महत्वाचे योगदान आहे, असे मला वाटते. यास्तव तिचे खूप खूप आभार.

मात्र ह्या क्षणी, राहून राहून मनाला वाटते, जर आपण इतकी वर्षे जगणार आहोत, हे जर आधीच माहीत असते, तर आपल्याला आयुष्य, ह्याहूनही अधिक शहाणपणाने व समंजस सजगतेने जगता आले असते.

असो, Better late than never!

आता,चवीने जगत येणारा प्रत्येक दिवस 'माझा' बनवत जीवनानुभवाचे सार असेच भरभरून वाटत रहायचे, नाही कां?

आपला,
सुधाकर नातू
१६-६-२०१९

ता.क. विवाहीत व्यक्ती, अविवाहीतांपेक्षा अधिक काळ जगतात, हे सर्वश्रुत आहे. त्या पार्श्वभूमीवर, संसारातील जोडीदार एकमेकांच्या जीवनरेखेच्या कालमर्यादेवर किती, कसा व कां परिणाम करू शकतात ह्यावर सखोल वैज्ञानिक संशोधन होणे गरजेचे आहे, हे मला आजच्या निमित्ताने सुचवावेसे वाटते.

--------------------------





शनिवार, १५ जून, २०१९

"एक रोमांचक सिलसिला":


"एक रोमांचक सिलसिला":

" माझी कथा" ही जणू लक्ष वेधून घेणार्या मुखपृष्ठाप्रमाणे भासणारी एक सुवर्ण संधी, कुणालाही व्यक्त होण्यासाठी 'फेबु'वर उपलब्ध आहे. तिचा मी गेले कित्येक दिवस दररोज न चुकता लाभ घेतो आहे.

जे जे पहातो, वाचतो वा अनुभवतो, त्याचा सर्वकालिक सर्वमान्य अर्थ-Concepts, लावण्याचा प्रयत्न करणारी शब्दचित्रे अथवा कधी कधी गतकाळातील स्मरणक्षणांची दर्शनचित्रे असे माझ्या कथेचे रूप राहिले आहे.

तेव्हापासून दररोज किती वाचक अथवा प्रेक्षक माझी कथा पाहतात किंवा वाचतात हे आजमावण्याचा छंदही एक कुतूहल म्हणून मला लागला आहे.

मला लक्षात आले की, दर्शन चित्रे अधिक बघितली जातात, त्या मानाने शब्दचित्रे वाचणारे कमी. त्यामागील कारण, "काही वाचण्यापेक्षा, बघणे हे कदाचित कमी श्रमाचे कार्य" हे तर नव्हे?

दर्शन चित्रांबद्दल बोलायचे तर ती वेगवेगळ्या ठिकाणची आणि वेळेची अन् अनोख्या मूडमधील लक्षणीय रंगरूपातील, भावचित्रे पुनश्च येथे मांडणे, हा एक असीम आनंददायी अनुभव मला वाटत आला आहे. कारण त्यावेळचे आपले रंगरूप भावपटल किती आगळे वेगळे होते, हे जसे कळते, तसेच बदलत्या काळामध्ये माणूस कसा आमुलाग्र बदलून जातो तेही उमजते. खरोखर काळ तुम्हाला असा कसकसा अन् किती किती बदलून टाकतो हे एक गूढच आहे. त्या तुलनेत शब्दचित्रे मात्र वर्तमान काळातील मनातील स्पंदनांचे सर्जनशील प्रकटीकरण असते.

सहाजिकच, इथे दर्शनचित्र रूपाने भूतकाळ जागवला जातो, तर शब्दचित्रांच्या माध्यमातून वर्तमानाचा भविष्याची दिशा आणि वेध दाखविण्याचा, प्रयत्न माझ्याकडून होऊन जातो. हा सिलसिला खरोखर रोमांचक असाच आहे, आणि तो होता होईल तो चालूच राहणार आहे.

आशा आहे की, असेच वाढत्या संख्येने दर्शक अन् वाचक मला प्राप्त होत रहातील!

तेव्हां जरूर पहा वा वाचा, 'फेबु'वरील:
"माझी कथा" अर्थात्
"एक रोमांचक सिलसिला"!
-------------------------

"मनोगते":

# स्वप्नं प्रत्यक्षात यायला, केवळ संधी मिळणे पुरेसे नसते, त्यासाठी अजोड गुणवत्ता, अथक परिश्रम आणि दांडगा अनुभव असायला लागतो!

# "ज्या दिवशी बार्टर पद्धत जावून
कागदी चलन अस्तित्वांत आले,
तोच दिवस बहुधा कलियुगाचा प्रारंभ."

## आपले "Out of Box" संदेश असे हवेत,
की ज्यामुळे वाचकांच्या विचारविश्वाला चालना व स्वनिर्मितीची प्रेरणा मिळू शकेल.

## कोणी सर्वगुणसंपन्न नसतो.
डोक्यावर घेतलेल्याचेही
दोष जाणवण्याची वेळ, त्याच्या गुणांच्या योगदानाची चिकित्सा होते, तेव्हां येते.

## राजकीय विषयावर पोस्टींग करणे, विचारपूर्वक हवे. बदलत्या परिस्थितीचा अचूक वेध घेणारे असावे,
न पेक्षा, ते टाळावे.

## "गतीमान शासन"?:
महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या गाजराची
अखंड वाजणारी पुंगी, बहुधा आता वाजणार!
--------------------------

"रंगांची दुनिया-तीन यक्षप्रश्न":

››› एखादी मालिका, एकदाची कधी बंद होते असा प्रश्न असंख्य प्रेक्षकांच्या कपाळावर आठ्या न आणता, अरेच्या ती कां बरे बंद झाली असेही त्यांना वाटायला न लावता आपला अवतार संपवू शकते, त्याचे 'सख्या रे' मालिका, उत्तम व दुर्मिळ उदाहरण ठरावे!
››› मराठी नाटकं, एखाद दुसरा अपवाद वगळता कधीही वेळेवर सुरू होत नाहीत. त्यामुळे अनाठायी किती तरी समुह-वेळाचा अपव्यय होतो. प्रेक्षकांच्या सहनशक्तीची परिक्षा अशी बिनदिक्कतपणे पहाणे सर्वथैव गैर नव्हे कां?
››› पुण्यामधील नाट्यप्रयोगांच्या दुपारी १२-३०, रात्री ९-३० ह्या वेळा अत्यंत गैरसोयीच्या आहेत. मुंबई प्रमाणेच सकाळी १०-३०, दुपारी ४ व रात्री८वाजता नाट्यप्रयोग पुण्यासही होणे गरजेचेआहे…….

सुधाकर नातू
१६/६/'१९                                                               

"कापा कामी!":


 कापा कामि":

या शीर्षकावरून चक्रावून जाऊ नका हे शीर्षक म्हणजे काय पाहिले व त्यामधून मला काय मिळाले, याचा तो शॉर्टफॉर्म आहे.

आपण नेहमी काही ना काही तरी पहात असतो' म्हणजे नाटक, चित्रपट वा मालिका. ते पाहताना आपल्याला काहीतरी नवीन असे अनुभवायला मिळत असते, अंतर्मुख होऊन विचार करायला लावत असते. ह्या सदरामध्ये मी जे काही असे कधी पाहतो, त्याच्यातले कधी केव्हा चांगले घेण्याजोगे तसेच इतरांना देण्याजोगे असं काही उमजलं तर ते तुमच्याबरोबर शेअर करायचा विचार आहे.

ह्या संदर्भात विचारमग्न असताना, "अनन्या" हे 'सुयोग" चे नाटक पाहिल्याचे स्मरले. आज ह्याच नाटकाचा विक्रमी २५० वा प्रयोग मुंबईत होत आहे, त्यानिमित्ताने पुनश्च हा रसास्वाद!:

"अनन्यसाधारण "अनन्या!":

क्लोरोफाँर्म" हे जर झोपी गेलेल्याला खडबडून जागे करणारे पुस्तक असेल, तर "महास्वप्न" पुस्तक त्याला आत्मप्रेरणेची संजिवनी देवून स्वयंविकासाच्या "एक्सप्रेस वे" वर घोडदौड करायला लावणारे संप्रेरक असेल.......

स्वयंप्रेरणा! असामान्य इच्छाशक्तीचे जे अदभूत् दर्शन "अनन्या" रंगभूमीवर उभे करते, हा एक खरोखरच चित्तथरारक अनुभव आहे..........

एका पाठोपाठ ही अशी विस्मयकारी पुस्तके आणि नाटक मला अवचितपणे मला अनुभवायला मिळावा, हा एक "सोने पे सुहागा" योगायोगच नव्हे कां?.........

दुर्दैवाने अपघात होऊन दोन्ही हात गमावणार्या अनन्या ह्या जिद्दी तरुणीची ही मेलोड्रँमँटिक कहाणी आहे. नायिकेची झट मंगनी, झटपट अपघात आणि पटकन ब्रेक अप्, खटाखट स्वयंपूर्ण होत सीए , चटाचट प्रेमाचा ट्रँगल आणि obvious असा गोड शेवट असे ह्या नाटकाचे स्वरुप आहे.

खरे म्हणजे सारा फिल्मी मामलाच आहे. पण येथे, जगावेगळे आहे ते, दोन्ही हात गमावलेल्या, नायिकेच्या भूमिकेत रूजूता बागवेने कमालीची मेहनत घेऊन स्वयंप्रेरणेच्या जोरावर अत्यंत बिकट अवस्थेवर मात कशी करता येते, ते द्रुष्ट लागावी असे सादर केले आहे, ते. खरोखरच तिचे हात गमावले आहेत असेच वाटते आणि हे बेमालूमपणे कसे काय जमले, हा प्रश्न रसिकांच्या मनात शेवटपर्यंत अनुत्तरित रहातो. हेच ह्ना नाटकाचे यश आहे.

प्रेक्षक हे तसे रन आँफ द मिल नाटक बघावयाला येतात, ते बहुदा रूजूताच्या असामान्य जीवंत सादरीकरणामुळे. नाटकाचे नेपथ्य, प्रकाशयोजनाही ह्या ह्रदयस्पर्शी नाट्याला अनुरुप होते.

अचानक आगांतूकासारखे येऊन अनन्यावर एकतर्फी प्रेम करणार्या तरूणाची भूमिका करणार्या अभिनेत्याची बुलेट ट्रेनस्पीडची संवादफेक खटकते. तो काय बोलतो ते स्पष्टपणे मुळीच कळत नाही. शिवाय त्याच्या एंट्री नंतर, सारा खेळ एका गंभीर नाटकाला विनोदी टच देण्यासाठी, पूर्णपणे अस्थानी व ओढून ताणून जमवलेला वाटतो. त्यामध्ये थोडेतरी गांभीर्य व संयमाचे भान ठेवणे गरजेचे आहे.

मात्र संकटांना न घाबरता ताकदीने तोंड कसे द्यावयाचे, हे चटका लावत पेश करणारे हे नाटक, तरुण पिढीसाठी प्रेरणादायी व दिशादर्शक असल्याने निश्चितच अनन्य आहे.

बिकट प्रसंग नेहमीच येत असतात सारे जीवन काही सुरळीत नसते अनिश्चितता हेच तर जीवनाचे वैशिष्ट्य आहे तेव्हा कुठले संकट आपल्या समोर उभे टाकेल याचा नेम नसतो अशा वेळेला खचून न जाता आपल्या अंगभूत शक्ती स्थळांचा जास्तीत जास्त उपयोग करून त्या संकटांचा मुकाबला करत राहणे हाच खरा जीवनाचा मतितार्थ आहे हे या नाटकामुळे मला समजून गेले.

अशीच विविथस्पर्शी लेखांची "अनन्यसाधारण महास्वप्न" पहाण्यासाठी...
माझ्या ब्लॉगची लिंक उघडा........

http//moonsungrandson.blogspot.com

सुधाकर नातू

शुक्रवार, ७ जून, २०१९

" मनोगते व स्वगते!":


 "मनोगते":

## ज्या "चष्म्यां"तून आपण पहातो,
तसे जग आपल्याला दिसते.
पण खरोखर "ते" तसे असतेच असे नाही!

## प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. जे जे निवडतो, त्यातून इतरांना कुठलाही त्रास न होता,
आनंद व समाधान मिळाले, तर सारे भरून पावले.

## "काल"चा दिवस, "आज"च्यापेक्षा बरा होता, अशी वेळ "उद्या" ये😢ऊ नये!

## गौरवशाली इतिहासाचे नगारे पिटताना,
तसा पराक्रम व कर्तृत्व वर्तमानात आणण्यासाठी सर्वंकष योगदान देताना दिसले,
तरच त्याला काही अर्थ.

## लाँ आँफ डिमीनिशिंग रिटर्नस्":
एखादी गोष्ट जरी खूप आवडली तरी,
तिच्या जास्त वापरामुळे,
ती हळूहळू नकोशी होते.

## "समाधानाची सप्तपदी":
१. डोके वापरा
२. दृष्टी बदला.
३. जीभेला आवरा
४. हाताने नेहमी देत रहा.
५. ह्रदयापासून प्रेम करा.
६. मन काबूत ठेवा.
७. पायाने चालत रहा.

## आपले "Out of Box" संदेश असे हवेत,
की ज्यामुळे वाचकांच्या विचारविश्वाला चालना व स्वनिर्मितीची प्रेरणा मिळू शकेल.

## कोणी सर्वगुणसंपन्न नसतो.
डोक्यावर घेतलेल्याचेही
दोष जाणवण्याची वेळ, त्याच्या गुणांच्या योगदानाची चिकित्सा होते, तेव्हां येते.

## राजकीय विषयावर पोस्टींग करणे, विचारपूर्वक हवे. बदलत्या परिस्थितीचा अचूक वेध घेणारे असावे,
न पेक्षा, ते टाळावे.

## "गतीमान शासन"?:
महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या गाजराची
अखंड वाजणारी पुंगी, बहुधा आता वाजणार!

## एक कोडे की व्यथा?:
"फेबु"वर स्नेहवर्तुळांत चार आकडी स्नेही जमा असले, तरीसुद्धा त्यातील हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच सक्रीय असतात.
----------------------------------------------
आता, 
"स्वगते"!:

"पैलतीरावर.....१":

वृद्धापकाळ हा खूपच अनिश्चिततेचा, कठीण आणि कसोटीचा असू शकतो. फारच थोड्यांना निरामय आरोग्य आणि आर्थिक स्वास्थ्य मिळू शकते.

संभाव्य अशा कितीतरी विचित्र आणि त्रासदायक अवस्था, अनेक अभाग्यांच्या वाट्याला येऊ शकतात. निसर्गचक्र म्हणा अथवा ज्याचे त्याचे प्रारब्ध, प्रत्येकाला काही ना काही तरी वेगळ्या भावनिक स्थितीला तोंड द्यावे लागते. त्या वाचून त्यांच्या जीवनातील संध्याकाळ संपत नाही.

असून नसल्यासारखे आणि नसून असल्यासारखे अशा अनुभवातून जाण्याची शक्यता खूप असते. जे जे सुख समाधान भोगले ते आठवून काहीच उपयोग नसतो. स्मरणरंजन हे कधी कधी वेदनादायी होऊ शकते.

अशा समयी "ठेविले अनंते, तैसेची रहावे" हेच शहाणपणाचे!
-----------------------------------------
"पैलतीरावर......२:

व्रध्दापकाळात बहुधा कुटुंबामध्ये आपल्याला कोणी विचारत नाही. आपले काही महत्त्व उरत नाही. आपल्याला कितीही योग्य व आरोग्य काही वाटत असले, तरीही ते कोणीही मनावर घेत नाही आणि आपण ते बोलून काही उपयोग नसतो. एखाद्या अडगळी सारखे आपल्यावर वेळ येऊ शकते.

पुष्कळदा अनेक असाध्य रोग आपला पिच्छा पुरवत शकतात आणि त्यातून जर तुम्ही तुमचे स्वतःचे स्वतः न करता येऊ शकणाऱे अपंगत्वाचे धनी झाला असलात, तर तुमचे हाल खरोखर परमेश्वरच जाणू शकतो. खरोखर ही अशी वेळ कोणावरही येऊ नये. पण बऱ्याच जणांवर येते हेही सत्य आहे.

कदाचित आपण जेव्हा ज्या गोष्टी करायला हव्या होत्या, ज्या गोष्टींना महत्त्व द्यायला हवे होते, ज्या तऱ्हेने आपण इतरांशी वागायला हवे होते, तसे आपण वागलेले नसतो. त्यामुळे आपल्यावर बऱ्याच वेळेला ही अशी वेळ येऊ शकते. थोडक्यात आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो.

आपलं वय उलटल्यानंतर, जे काही बरं वाईट होतं रोग किंवा इतर काही मानसिक शारीरिक भावनिक आर्थिक समस्या निर्माण होतात, त्याच्यामागे आपलीच कुठली ना कुठली तरी करणी वा निर्णय कारणीभूत असतात. पण हे सगळे जाणवायला आयुष्याची संध्याकाळ पुष्कळ जणांचे बाबतीत येते.

माणूस जन्माला येतो तो कशाकरता? त्याचे प्रयोजन काय आणि ते प्रयोजन कोणी ठरवतो कां आणि कधी? त्याप्रमाणे तो वागतो कां? कदाचित जन्म हा एक अपघात आहे आणि मृत्यू हा त्याचा शेवट आहे हेच सत्य! कदाचित प्रत्येक जण आपले काही विहित कार्य प्रारब्धात लिहिलेले असते ते पूर्ण होईपर्यंत या लोकात असतो आपले अवतार कार्य संपले की तो या सृष्टीचा त्याग करून, पुन्हा इथे कधीही न येण्यासाठी, माहीत नसलेल्या माहोलांत अंतर्धान पावतो.
--------------------------------------------
नाण्याच्या ह्या नकारात्मक दोन बाजू झाल्या. आता ही अनुकरणीय अशी सकारात्मक बाजूही पहा:

' "आजचा दिवस माझा!":

निवृत्तीनंतर दररोज शक्यतो ठराविक वेळेनंतर मी हाती घेतलेल्या कामात बदल करतो. त्यामुळे एकाच दिवसात अनेक कामांना हात घातला जातो व त्यात विविधता येते. सहाजिकच माझा वेळ कसा जातो ते कळतही नाही. उलट मला वेळ अपुरा पडतो असेच वाटते.

दररोज काही ना काही मनाला अंतर्मुख करणारे वा आनंद देणारे वाचन करण्याची वा कार्यक्रम पहाण्याची माझी धडपड असते.

अधून मधून ज्योतिषाचा छंद जोपासणे ही उपलब्ध वेळेला दिलेली खमंग फोडणी असते. पंधरवड्यात एखादे नाटक वा चित्रपट पाहिल्याशिवाय मला व पत्नीला रहावत नाही. महिन्यातून एकदा हाँटेलिंग केले की सार्थक होऊन जाते.

शिवाय ज्या दिवशी निदान एखादे तरी मनपसंत लेखन केले जातेच जाते व ते सोशल मीडीयावर प्रकाशित केले की तो दिवस माझा असतो. जसा हा आजचा!

जे जे करू शकतो वा जे जे करून मला आनंद वा समाधान मिळते, ते ते मला शक्यतो करायला मिळते. म्हणून "माझे म्हणू शकेन" असेच दिवस मला अधिक मिळत रहावेत, अशीच माझी प्रार्थना असते.

शेवटी सुख शांती वा समाधान पैशात नसते, तर व्रुत्तीत आणि द्रुष्टीत असते, हेच खरे!'
------------------------

सुधाकर नातू
८/६/'१९

" कावा कामि!":


 "कावा कामि!":

ह्या शीर्षकावरून चक्रावून जाऊ नका. हे शीर्षक म्हणजे, मी काय वाचले त्यातून मला काय मिळाले ह्याचा तो शॉर्टफॉर्म आहे.

आपण नेहमी काही ना काहीतरी वाचत असतो, वाचताना आपल्याला काहीतरी नवीन असे अनुभवायला मिळत असते. ह्या सदरामध्ये मी जेवढे काही वाचतो, त्याच्यातले कधीतरी, केव्हातरी, चांगले घेण्याजोगे, तसेच इतरांना देण्याजोगे असं काही उमजलं, तर ते तुमच्याबरोबर शेअर करायचा विचार आहे.

काही दिवसापूर्वी एका दैनिकात मी लॉटरी संबंधित एक लेख वाचला होता. तो या सदराला सुरुवात करताना आठवला. त्यामध्ये एक अगदी आगळा वेगळा, चक्रावून टाकणारा द्रुष्टिकोन मांडण्यात आला होता. तो म्हणजे:

"गर्भधारणेत जशी अनिश्चितता असते, तशीच ती लॉटरीच्या मूलतत्त्वामागे सापडते!."

लाँटरीसंबंधी सखोल विचार केल्यानंतरच हा अचूक मर्माचा वेध घालणारा असल्याचे पटले. ह्या विचारामुळे खरोखर ज्ञानात जशी भर पडली, त्याचप्रमाणे चिकित्सक दृष्टिकोन स्वीकारून एखाद्या गोष्टीच्या मुळापर्यंत जाणे कसे आवश्यक आहे, ते समजले.

वाटून गेले की, लॉटरी, रमी, तीन पत्ती व मटका इ.इ. असे अनेक जुगारासदृश्य खेळ, हे खरोखर अनिश्चिततेतील निश्चितीतता किती अस्थिर, चंचल आहे, तेच मांडतात. त्यामागे माणसाच्या मनातील अधिकाधिक मिळवण्याच्या प्रवृत्तीचे मूळ आहे. त्यातून कमीत कमी श्रमात जास्तीत जास्त मोल अपेक्षिण्याची प्रवृत्ती दिसून येते.

जाता जाता एक गोष्ट मला वैयक्तिक स्वरूपात सांगावीशी वाटते ती म्हणजे, मी कधीही लॉटरीचं तिकीट विकत घेतलं नाही: घेईन असेही वाटत नाही. त्यामागे माझी एक विचार करण्याची दृष्टी आहे. ती सगळ्यांना पटेलच असे नाही. कारण माझ्या लक्षात आले, एक रुपयाचे तिकिट जेव्हा आपण घेतो आणि भरघोस असे बक्षीस मिळते, तेव्हा इतर अनेक जणांचे दुस्वास तर घेत असतोच पण त्यांचे नुकसानही करत असतो.

त्याशिवाय, इनपुट आउटपुट या बरोबरीच्या तत्त्वानुसार जर आपण काही श्रम केलेले नाहीत, तर त्याचा असा अवास्तव मोबदला मिळवणे अयोग्य नव्हे कां? ही माझी एक प्रकारे तात्विक वृत्ती लाँटरीचे तिकीट न घेण्याच्या मागे आहे.

त्याचे मला दुःख तर नाहीच नाही, उलट मनापासून समाधान आजपर्यंत मिळत आले आहे. अनेक ताणतणावापासून सहाजिकच माझी सुटका झाली आहे. आपल्याला बक्षिस मिळेल की नाही, अशा दोलायमान अवस्थेत राहण्याची वेळ माझ्यावर कधीही आली नाही.

साध्या लॉटरीच्या विषयामधून श्रमाचे महत्व आणि श्रमा इतकाच मोबदला या नैसर्गिक मूळ तत्त्वाचा गाभा समजून गेला हे ह्या वाचनाचे सार!

सूक्ष्म निरीक्षण, माहितीची समतोल चिकीत्सा
ह्या जोडीला कल्पनाशक्तीमुळे, "शाश्वत वास्तववादी विचारसूत्रे"
(Concepts) निर्माण होतात, ती अशी!
--------------------------

"पुस्तके, ही एक अडगळच?!":

नुकताच मी ललित मासिकामध्ये एक लेख वाचला. तो लेख प्रकाशकांना पुस्तके विकण्याच्या वेळी ग्राहक मिळत नाहीत, अशा तऱ्हेची तक्रार मांडणारा लेख होता. प्रकाशन अतिशय झोकात होते. सवलतीही दिल्या जातात. पण एवढे करून बहुतेक पुस्तकांची पहिली आवृत्तीही विकण्यासाठी, नाकी नऊ येऊन खूप वेळ जातो, ही खंत त्या लेखात मांडली होती.

मला अंतर्मुख करून गेले ते शब्द असे होते की, "माणसं महिन्यातून एकदा दोनदा हॉटेलिंग करायला जातात, तिथे पाचशे-हजार रुपये खर्च करायला त्यांना काही वाटत नाही. किंवा सिनेमा नाटकं बघायला जातात, तेव्हाही असेच पैसे खर्च होतात. अथवा मॉलमध्ये गेलं, तर तिथे देखील अशाच प्रकारचा खर्च केला जातो. मात्र पुस्तक विकत घ्यायची वेळ जेव्हा येते, तेव्हा हात कां आखडले जातात?"

आपण मारे म्हणतो कीं "वाचाल तर वाचाल! पण ते केवळ बोलण्यापुरते, प्रत्यक्ष वास्तव वेगळे व चिंताजनक आहे. त्यातून आता बरंच काही डिजिटल झाल्यामुळे, वाचायला कोणाला वेळ नाही, बघायला मात्र वेळ आहे.

माझा एक भाचा मला म्हणाला की, ब्लॉगवर तू लिहून काही उपयोग नाही, लिखित शब्द वाचण्यापेक्षा व्हिडिओ बनव आणि व्हिडिओ मधून प्रत्यक्ष बघणं आणि ऐकणे यातून तुला अधिक प्रतिसाद मिळू शकेल. अनुभव आला की हे तंतोतंत खरंच आहे.

माझा ब्लॉग सुरू करून जरी दोन वर्ष झाली असली तरीही मला जो प्रतिसाद त्यासाठी मिळाला आहे, त्याच्या कितीतरी पट प्रतिसाद, सुमारे सहा सात महिन्यापूर्वी मी माझा युट्युब वरचा चॅनेल सुरू केल्यापासून मिळाला आहे. केवळ एवढ्या अल्प कालावधीत मी वार्षिक राशि भविष्य आणि इतर विचार मांडणारे जवळजवळ पंचवीस व्हिडिओ त्यावर प्रकाशित केले. सांगायला आनंद होतो की, त्याने नुकताच ७३००० चा व्यूहरशिपचा आंकडा पार केला! त्यामानाने माझ्या ब्लॉगवर मी विविधरंगी दोनशेच्यावर लेख लिहूनही तोच आंकडा ३०००० जेम तेम होत आहे.

ह्यावरूनच या समस्येचे मूळ कळावे. खरं म्हणजे असं कां व्हावं? कदाचित पुस्तक वाचून झाल्यावर त्याचा पुन्हा उपयोग तसा काही नसतो. त्यामुळे त्याच्यासाठी पैसे कां वाया घालवा, असा विचार त्यामागे असावा. शिवाय अल्प दरात हवे ते वाचायला, वाचनालयही सोयीची आहेतच.

परंतु जेव्हा आपण हॉटेलिंग चित्रपट नाटक बघतो तेव्हादेखील वन टाइम युज अशाच तर्हेचे पदार्थ अथवा सेवा असते. तेव्हा आपल्याला असे नाही वाटत नाही की, माझे पैसे वाया गेले. त्या पैशात मला पुन्हा काहीच मिळणार नाहीये. पण पुस्तकांच्या बाबतीत मात्र आपण कां वेगळा विचार करतो, हे खरोखर एक कोडेच आहे. खरं म्हणजे, पुस्तक पुन्हा तुम्हाला कधी आठवण झाली तर, ती काढून वाचू शकता, त्यातील विचार किंवा दिशा तुम्हाला मार्गदर्शक ठरू शकते. पण लक्षात कोण घेतो? वाचन हे खरोखर आता इतके काही महत्त्वाचे राहिलेले नाही, हे दुर्दैव आहे.

ह्या विषयावर माझ्या पत्नीशी मी चर्चा करत असताना, तिने मला एक नवीनच काही सांगितले. ती म्हणाली "पुस्तक विकत घेऊन, ती वाचल्यावर ठेवायला जागा कोणाकडे असते?" हा म्हणजे खरोखर मास्टरस्ट्रोक होता आणि सगळ्या समस्येच्या मुळाशी जाणार होता. म्हणजे दुर्दैव असे की पुस्तके वाचायची दूरच, ती विकत घ्यायचीही म्हणून दूरच. पुस्तके म्हणजे शेवटी अडगळच असं कां म्हणायचं? बदलत्या काळातील भीषण वास्तव हे असे आहे!

जरा गांभीर्याने जरूर विचार करा.

----------------------------

सुधाकर नातू

शनिवार, १ जून, २०१९

"सर्जनशीलतेचा असाही रसास्वाद":


 "सर्जनशीलतेचा असाही रसास्वाद":

आजच्या-२ जून'१९, महाराष्ट्र टाईम्समध्ये
श्री. चंद्रमोहन कुलकर्णी यांनी मुखपृष्ठ कसे आकार घेते, ते अतिशय सुलभतेने व ओघवत्या भाषेत, दोन प्रत्यक्ष पुस्तकांची उदाहरणं समोर घेऊन मांडली आहेत. हा लेख जसा अतिशय प्रत्ययकारी वाटला, तसाच मनोरंजकही.

वाटून गेले, हाती घेतलेले कोणतेही पुस्तक आपण वाचतो. पण मुखपृष्ठाकडे आपण जितके लक्ष द्यायला हवे, तेवढे ते देतोच असे नाही. दुसरे असे की मुखपृष्ठ चित्रकार त्याची कलाकृती सादर करण्यापूर्वी किती मेहनत घेतो आणि त्याच्या कल्पनाशक्तीच्या जोरावर पुस्तकातला आशय हुबेहूब चित्र रुपात प्रकट करण्याचा आटापिटा कसा करतो हेही समजता आले.

व्यवस्थापन शास्त्रातील IPO, अर्थात् Input Process Output ही संकल्पनाच जणु लेखकाने मुखपृष्ठ निर्मितीमागे कशी असते ते सहजतेने मांडले आहे. कोणतीही नवनिर्मिती कशी होते, त्यासाठी किती किती कष्ट उपसावे लागतात, किती व कसकसा विचार करावा लागतो ह्याचा अंतर्बाह्य शोध घेण्याची चालना मला ह्या अप्रतिम लेखामुळे मिळाली.

जाणवले की, सर्जनशीलता ही काय चीज आहे! कोणतीही नवनिर्मिती तत्संबंधी स्फूर्ती आल्याशिवाय होऊच शकत नाही. ही स्फूर्तीच सर्जकाला अंतर्बाह्य ढवळून काढते, त्याला दिशा दाखवत inputs चा सर्वंकष ढांढोळा घ्यायला लावते. त्यापुढची process ही पायरी हा अत्यंत मूलभूत गाभा असते. ती अचूक तर output अर्थात नवनिर्माण उत्तम होण्याची शक्यता अधिक.

सजीव निर्मिती ही निसर्गामध्ये नवनिर्माणाची परमोच्च कलाकृती! ती होत असताना कळा वेदना होतच असतात किंबहुना म्हणूनच बाळ जेव्हा जन्माला येते, त्या प्रक्रियेला बाळ-अंत-पण अर्थात बाळंतपण असे म्हणत असावेत. वेदनेतून पुनर्निर्मिती होण्याची संभाव्यता अधिक असते. कृती अथवा 'क्रिएटिव्ह अँबिलिटी' हीदेखील म्हणूनच एक प्रकारची अंतर्गत वेदनाच होय. ही वेदना मात्र सर्जकाला परमानंद देणारी असते, कारण त्यातूनच जगाला नवीन काहीतरी मिळत असतं!

ह्या लेखामुळे मला असे काही लिहिण्याची बुद्धी झाली, यातच सर्व काही आले अन् लेखाची श्रेष्ठता अधोरेखित झाली. लेखकाचे म्हणूनच अभिनंदन, तसेच अशा प्रकारचा मूलभूत संकल्पना विषद करून टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या लेखमाला सुरु करण्यासाठी म.टा.चे देखील कौतूक. आपण हा लेख जरूर वाचा मला खात्री आहे की तुम्हालाही माझ्यासारखं काहीतरी वाटायला लागेल.

सुधाकर नातू,

"ताजा कलम":
"स्टार प्रवाह" वरील "साथ देशी, तू मला" या मालिकेतील नायक समीर, नेहमी आपल्या मनांतील खळबळ आणि तळमळ काचेच्या बाऊलमधल्या चंद्रमोहन ह्या गोडगुलाबी माशापाशी व्यक्त करत असतो, हे दृश्य मला प्रत्ययकारीपणे आठवले. कारण योगायोग पहा: समीर झालेलाही अभिनेता कुलकर्णी आणि येथील लेखकाचे नावही चंद्रमोहन कुलकर्णीच!
हा दुग्धशर्करा योग म्हणायला नको कां?
---------------------------
"पुसता येत नाही, तो भूतकाळ,
लिहिता येतो, तो वर्तमानकाळ
आणि
कल्पिता येतो तो भविष्यकाळ!"
----------------------------

जो होता है,
वो आखिर भले के लिए ही होता है.
कौन कितने पानीमे और किसमे कितना दम है, यह समझता है.
----------------------------

कुटूंबातील लहान मुलांवर आपण नितांत माया, जिव्हाळा लावण्यांत आणि त्यांचे मनसोक्त कोड-कौतुक करण्यात आनंद मानतो.

त्याचप्रमाणे, समुहातील लहानांतील लहान घटकाला नीट समजून उमजून घेऊन योग्य दखल घेत, समुहाने संभाळून घ्यायला हवे.
----------------------- -------------- --- -----