बुधवार, १३ जुलै, २०२२

☺️ "अंधारातून प्रकाशाकडे !":👌💐

 ☺️ "अंधारातून प्रकाशाकडे !":👌💐

सकाळी चहा पिण्याच्या वेळेला काही ना काही हाताशी येईल ते वाचण्याचा माझा प्रभात आहे. आज अचानक दिवाळी अंक दोन वर्षांपूर्वीचा कोरोना काळातला ऋतुरंग हा दिवाळी अंक वाचायला मिळाला. "संघर्ष" या संकल्पनेवर आधारित असा हा वाचनीय अंक खूप खूप काही सांगून व देऊन जातो.

जीवनामध्ये संघर्षाचे महत्व आणि संघर्षातूनच माणसाच्या योग्यतेची परीक्षा होऊन तो तावून सुलाखून स्वतःचे असे अस्तित्व कसे निर्माण करतो, त्याच्या विविध स्तरांवरील आणि विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या या कहाण्या मुळातच वाचण्याजोग्या आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी अनेक संघर्षाची वळणे येत असतात आणि जो तो आपापल्या परीने त्यांना तोंड देऊन स्वतःला सिद्ध करायचा प्रयत्न करत असतो, हा आपला अनुभव आहे.

पण मला जे इथे सांगायचे आहे ते अजून वेगळे आहे. ते काय आहे, ते विशद करण्यासाठी एक कथा त्यामधील संघर्षाची वाचली. तिची पार्श्वभूमी देणं आवश्यक आहे. ज्याचे व्यक्तिमत्व रूढ अर्थाने चित्रपटात नायक होण्यास लायक नाही, अशा एका जातिवंत नैसर्गिक अभिनय क्षमतेने ठासून भरलेल्या एका प्रसिद्ध कलाकाराची आणि त्याच्या संघर्षाची ती कहाणी खरोखर रोमहर्षक आहे. त्यामध्ये मांडलेला मुद्दा असा होता की, तो जेव्हा येथे मुंबईत आला, त्यावेळेला ज्या तऱ्हेने चित्रपटसृष्टीने नवे वळण घेऊन केवळ करमणूक, धंदा एवढ्या पुरतेच मर्यादित न राहता कला आणि आगळावेगळे विचार, प्रवृत्ती दर्शविणार्या चित्रपटांची निर्मिती होऊ लागली होती. प्रेक्षकही अधिक चोखंदळ होत अशा समांतर आगळ्यावेगळ्या चित्रपटांना दाद देऊ लागला होता. 

अशा वेळेला त्याच्या अभिनय क्षमतेला लायक असे वातावरण आपोआपच हळूहळू निर्माण होत होते. मुद्दा असा की, चित्रपटसृष्टीने जर असे वळण घेतले नसते, तर त्याच्यातील अभिनय क्षमतेला न्याय मिळाला नसता आणि तो केवळ फुटकळ भूमिका करणारा एखादा कलाकार एवढाच राहिला असता. पण काळ आणि तुमच्यातील क्षमता यांचा जर अचूक मेळ जुळून आला, तर तुम्ही खूप काही करू शकता, यश मिळवू शकता, हा तो मुद्दा मला मांडायचा आहे. खरंच हे सत्य आहे कालातीत सत्य आहे !

हे मूलभूत तत्व अथवा शाश्वत सत्य आपल्याला काळाच्या उदरात डोकावल्यावर पडताळून पाहता येते. ज्या तऱ्हेच वातावरण त्या तऱ्हेचे लेखक निर्माण झालेले आपण पाहतो. मग ते नवकथाकार असो अथवा खेळकर अशा विनोदाला वाहिलेले लाडके व्यक्तिमत्व असो. जे साहित्य क्षेत्राबाबत किंवा कलाक्षेत्राबाबत तेही इतर सर्वच क्षेत्राबाबत, सत्य असलेले आपल्याला आढळून येईल. काळ जसा, तशी तुमच्यातील गुणवत्ता जर असेल तर तुम्हाला यश मिळू शकते, हा एक विचार करण्याजोगा मुद्दा आहे. 

काही वेळा काळाच्या पुढची माणसे जन्माला येतात आणि त्यामुळे त्यांचे असामान्य कर्तृत्व हे ते गेल्यानंतर प्रत्ययास येते. याचेही कारण हे तत्व असावे. विचार करा आणि पडताळून पहा आपापल्या विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या अनुभवांवरून त्या त्या काळाच्या इतिहासावरून.

धन्यवाद

सुधाकर नातू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा