☺️ "सारे प्रवासी, एका घडीचे !": 😊
👍"जीवनाचे गुढ ना कुणा समजले !":😢दररोज अनेक घटना घडत जातात आणि पुष्कळदा आपण त्या घटनांचे वा प्रसंगांचे अपरोक्ष वा परोक्ष साक्षी असतो. त्याच त्याच प्रकारच्या घटना जर एखादेवेळी एकामागोमाग घडत गेल्या तर त्यांना योगायोग असे म्हणावे लागते. जीवनामध्ये योगायोगांची कमाल आपल्याला अधून मधून प्रत्ययास येत असते. माझेही असेच नुकतेच झाले. कसे ते ह्या मुक्तसंवादात मी सांगत आहे....
दररोज चहा प्यायच्या वेळेला मी काही ना काही वाचत असतो. "पद्मगंधा" दिवाळी अंक'२१ हा वाचायला घेतला आणि त्यामध्ये जी ए कुलकर्णी ह्यांच्या मौलिक साहित्य सेवेसंबंधी अत्यंत अभ्यासपूर्ण असा लेख वाचायचा योग आला. तोही आत्मचरित्र ह्या विषयावर "जी एं"चे चपखल विचार मांडणारा होता.
मला देखील सर्वात अधिक कशाची आवड असेल वाचना बाबतीत, तर ती म्हणजे आत्मचरित्रांची. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते, तिचे जीवन हे एक गुढ नाट्यमय कादंबरी असते आणि प्रत्येक व्यक्तीला वेगळा असा भवताल आणि त्याच्या आयुष्यात येणारी माणसेही अगदी वेगळीच असतात. त्यामुळे मोठी माणसे वा सेलिब्रिटी असो वा सर्वसामान्य माणसे, प्रत्येकाचे आयुष्य ही एक रोमांचक कहाणी असते.
आत्मचरित्रामुळे वेगवेगळ्या व्यक्तींचे जीवन कसे वेगळे असते त्याचा प्रत्यय दुसरा एक हृदयस्पर्शी लेख त्याच अंकात वाचताना आला. स्वतः संपादक अरुण जाखडे यांनी त्यांच्या दोन मित्रांसंबंधित आदरांजली वाहिलेली ती हृदयस्पर्शी शब्दपुष्पे होती. त्यांचे ते दोन्ही मित्र कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत मृत्युमुखी पार पडले, ही ती कहाणी मनाला चटका लावणारी होती आणि त्या दोन्ही माणसांचे जीवन आणि त्यांचा जाखडे यांच्याशी आलेला भावबंध हा खरोखर अंतर्मुख करणारा होता.
प्रत्येकाचे जीवन कसे आगळे वेगळे असते, म्रुत्यु देखील कसा विचित्र असतो, त्याचाच हा योगायोगाने प्रत्यय होता. यापुढची योगायोगाची बाब म्हणजे, मला त्याक्षणी आठवले, ते काही दिवसांपूर्वी "मणीपुष्पक" हा आरोग्य आणि ज्योतिष यांना वाहिलेला वाचनीय दिवाळी अंक काढणारे रमाकांत बर्डे यांचे झालेले अकाली निधन. मी स्वतः "मणिपुष्पक" मध्ये गेले काही वर्षे त्यांच्या आग्रहामुळे ग्रहबदलानुसार अनुकूल गुणांवर आधारित "संपूर्ण वार्षिक राशी भविष्य" लिहीत आलो आहे. त्या संपादकांचा असा अचानक मृत्यू हा मला भयानक धक्का होता.
कदाचित कुयोग म्हणा किंवा काही जर माझ्या माहितीत तथ्य असेल, कारण अशा बातम्या सहसा खोट्या नसतात. तर "पद्मगंधा"चे संपादक अरुण जाखडे यांचेही निधन झाले आहे आणि तेही आता आपल्यात नाहीत. त्यामुळे हे दोन दिवाळी अंक कदाचित यापुढे निघणारही नाहीत, याची रुखरुख मनाला तर लागलीच. परंतु आत्मचरित्र, माणसांची विविधांगी जीवने या विषयाच्या घटना कशा एका मागोमाग समोर घडत गेल्या, याचे मला कमालीचे आश्चर्य वाटले. ते शब्दात व्यक्त करणे कठीण आहे इतका मी दिग्मुढ होऊन गेलो.
पण योगा योगांची ही मालिका इथेच थांबली नाही. सकाळी "वाफारे" घेताना, मी सर्वसाधारणपणे काही गीते ऐकतो अथवा माझ्या ध्वनीफिती अथवा माझ्या "मूनसन ग्रँडसन" या युट्युब चॅनेल वरील माझा व्हिडिओ ऐकत राहतो. योगायोगाने आज माझ्याकडून व्हिडिओ जो लावला गेला, तो "जीवन मृत्यूचे गुढ" व्यक्त करणारा आणि मानवी जीवनाच्या रहस्याचा मागोवा घेणारा व्हिडिओ होता.
त्या व्हिडिओची लिंक मी पुढे देतच आहे पण योगायोग असा की हे झाल्यानंतर हा लेख लिहिण्यासाठी मी जेव्हा बसलो, तेव्हा बाजूला जुना वर्तमानपत्राचा एक कागद नजरेत आला आणि योगायोगांची मालिका विचित्रपणे पूर्ण झाली. जवळच्याच केमिस्टकडून मागवलेल्या आमच्या औषधांना गुंडाळणारा ते वर्तमानपत्राचे एक पान होते. ते जेव्हा मी चाळले, तेव्हा माझ्या नजरेस "जीएं'चे साहित्य जगभरात पोहोचणे आवश्यक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांचे मत" असे शीर्षक असलेला वृत्तांत नजरेसमोर अचानक आला.
"मानवी दुःखाचे मूळ जीए कुलकर्णी नियतीमध्ये शोधतात मराठी कथाविश्वाला अनोखी अशी देणगी या श्रेष्ठ कथाकाराने दिली आहे आणि त्यांच्या साहित्याचा अनुवाद करून त्यांचे लेखनाचे श्रेष्ठत्व जगापुढे सांगितले पाहिजे." असेही मत श्री भारत सासणे यांनी सांगितले होते. तो प्रसंग होता जी ए कुटुंबीय, महाराष्ट्र साहित्य परिषद व अक्षरधारा बुक गॅलरी यांच्या वतीने आयोजित जीए कुलकर्णी जन्मशताब्दी सोहळ्याचे उद्घाटन, श्री भारत सासण्यांच्या हस्ते होण्याचे आणि त्यासंबंधीचा हा वृत्तांत मला वाचायला मिळणे ! या लेखाची सुरुवात जीएंच्या साहित्यकार्य कर्तृत्वासंबंधी विशेषतः समीक्षा आत्मचरित्र विषयीचे विचार यावर व्हावी हा एक विलक्षण योगायोग नव्हे हवे कां?
पण योगायोगांच्या या विचित्र मालिकेचा क्लायमॅक्स हा की, ते औषधे गुंडाळणारे वर्तमानपत्राचे पान ज्या केमिस्टच्या दुकानातून आले होते, आमच्या परिसरातील तो लोकप्रिय केमिस्ट गेल्या वर्षी कोरोना साथीतच दुर्दैवाने अकाली निधन पावला होता 😢 पद्मगंधा मधील आदरांजली देखील ज्यांना वाहिली गेली ते दोघे देखील असेच कोरोनाच्या लाटेत मृत्युमुखी पावले होते 😢😢
इतके सारे चित्रविचित्र नमनाला सांगितल्यानंतर मी जीवनाचे गुढ उलगडणार्या माझ्या व्हिडिओची- "सारे प्रवासी एका घडीचे !" लिंक पुढे देत आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अंतर्मुख होऊन जीवनाविषयी अधिक गांभीर्याने आपण विचार कराल अशी मला खात्री आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा