👍"नियतीचा संकेत-१":👍🎂
गेल्या चार दशकांच्या माझ्या ज्योतिष अभ्यासामुळे आणि अनेक पत्रिकांच्या निरीक्षणामुळे काही गोष्टी ध्यानात आल्या. त्यापैकी एक दोन इथे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे.
माणसाच्या जीवनाची एकंदर वाटचाल असते, ती नेहमी सुलभ असतेच असं नाही. कुणाची खडकाळ खेड्यातल्या रस्त्यासारखी, तर कुणाचे जंगलातल्या आडवाटेची, याउलट काही नशिबवान मंडळींची 'एक्सप्रेस हायवे'वरून अथवा चांगल्या डांबरी रस्त्यावरून सुलभपणे जाणारी. शेवटी प्रत्येकाचे जीवन वेगळे, जीवनशैली वेगळी आणि आपण ज्याला नशीब म्हणतो ते नशीब वेगळे.
👍एक-दोन पत्रिका अशा माझ्या नजरेत आल्या की, त्यांचे सर्वसाधारण आयुष्य इतरांच्या तुलनेने सरळ, सुलभ, त्यांना मनाजोगत्या घडणाऱ्या अशा घटनांमधून, आनंदी समाधानी आणि यशस्वी होत गेलं. त्या दोन पत्रिकांमध्ये मला जे साम्य आढळलं ते इथे मांडतो.
👍एका पत्रिकेत कन्या लग्न, कन्या राशीत उच्चीचा बुध, व्ययात स्वगृही रवि आणि लाभात कर्केचा चंद्र, अष्टमात मेषेचा गुरू अशी एक पत्रिका. तर दुसऱ्या पत्रिकेत लग्नी शनी, सप्तमात स्वगृही गुरु, व्ययात चंद्र, बुध केतु शुक्र आणि लाभात चंद्राच्या अन्योन्य योगात रवी. दोघांच्याही आयुष्याची जीवनरेखा सरळ, आनंदी, समाधानी अशीच होत गेली. नेहमी दान त्यांच्या मनाप्रमाणे पडत गेलं आणि त्यांना कुटुंबामध्ये नेहमीच मानसन्मान मिळत गेला.
पहिल्या पत्रिकेत लग्नी उच्चीचा बुध स्वगृही, लाभात कर्केचा चंद्र आणि व्ययातील सिंहेच्या रवीचा अष्टमातील गुरु बरोबर नवपंचम योग हे पहिल्या पत्रिकेचे वैशिष्ट्य. तर दुसऱ्या पत्रिकेमध्ये रवि चंद्र अन्योन्य योग होत असल्यामुळे जणू काही ते स्वगृही असल्यासारखे. सप्तमातील गुरुचा लाभातील रवी बरोबर पहिल्या पत्रिकेप्रमाणे शुभ त्रिकोणयोग किंवा नवपंचम योग. अशी या दोन पत्रिकांमधील अनेक साम्यस्थळे आढळली. तसेच त्यांच्या जीवनाची एकंदर नौका देखील वादळात न सापडता, आनंददायी सुखाची अशी होत गेली. याचा अर्थ लाभस्थान आणि लग्नस्थान यांना जर चांगला योग घडवून आणणारे ग्रह असले आणि रवी गुरु नवपंचम योग असला तर पुष्कळदा आपल्या आयुष्यात जे घडायला हवं तसंच घडत जाऊ शकतं. असं हे माझं निरीक्षण.
👍"दुसरे उदाहरण":
आता ह्या ज्या तीन पत्रिका आहेत, त्यामध्ये मी संतती सुख आणि पत्रिकेतील मंगळाची स्थिती या दृष्टीने निरीक्षण केले आहे.
दशमात मंगळ तसा शुभफलदायी. धडाडीचे आत्मविश्वास असणारे, व्यावहारिक जीवनात यशस्वी असं जीवन प्रदान करणारा शक्तिमान मंगळ दशमात असतो. मात्र या तीन पत्रिकांमध्ये
दशमातला मंगळ हा संततीस्थानाला षडाष्टकात असल्यामुळे संतती बाबतीत, या तीनही पत्रिका त्रासदायक अशी फळे देत गेल्या.
पहिल्या पत्रिकेमध्ये हा गृहस्थ व्यावहारिक जीवनात यशस्वी, अत्युच्चपदी गेला खरा, परंतु त्याच्या मुलांच्या विवाहाबद्दल काही ना काही कायम समस्या होत राहिल्या. तो निवृत्त होईपर्यंत देखील त्याच्या मुलांच्या संसाराचा मार्ग सापडला नाही. दुसऱ्या पत्रिकेतही जवळजवळ तसंच. हुशार ग्रहस्थ, कंपनीत चांगल्या पदावर होऊन निवृत्त झाला. मात्र त्याच्या बाबतीत देखील संततीचा घटस्फोट, फसवणूक अशा तर्हेचे फळ प्राप्त झाले. तर तिसऱ्या पत्रिकेमध्ये संततीबाबत आरोग्यविषयक समस्या गंभीर अशा होत्या.
👍हे निरीक्षण आहे, दशमस्थानच्या मंगळाचा प्रभाव असं मला या तीनही पत्रिकांवरून वाटलं, हे माझे अनुभवाचे बोल आहेत. पत्रिकेमधील इतर ग्रहयोगांचाही विचार करायला हवा हे ही मान्य आहे, मात्र कॉमन फॅक्टर म्हणून दशम मंगळाचा विचार केल्यामुळे, मी हे निरीक्षण मांडले. चूकभूल द्यावी घ्यावी. शेवटी "पसंद अपनी अपनी, खयाल अपना अपने" या न्यायाने माझे हे अनुभवाचे बोल इथे तुमच्याशी शेअर केले.
धन्यवाद
सुधाकर नातू