"मुंबईचे षड्दर्शन !":
"मुंबईचे षड्दर्शन" ही म.टा. मधील लेखमाला, मी नियमितपणे वाचतो. खास तज्ञांनी लिहीलेल्या प्रत्येक लेखामध्ये, मुंबई, तिच्या नजिकच्या इतिहासावर प्रकाश टाकत, इथे घडून गेलेल्या महत्त्वपूर्ण घटनांवर मांडलेली माहिती उत्कंठा पूर्ण आणि उपयुक्त अशीच असते.
काय,काय घडून गेले आणि त्याचे काय परिणाम झाले व पुढे काय होतील अशा पद्धतीचे निरीक्षणही या अभ्यासपूर्ण लेखांमध्ये असते. त्यामुळे लेखकांचे अभिनंदन आणि ही अभिनव संकल्पना वाचकांच्या हितासाठी राबविल्याबद्दल म.टा.चे कौतुक व शुभेच्छा.
म.टा. २३ डिसेंबरच्या अंकामध्ये विचक्षण आणि साक्षेपी अशी कीर्ती असणाऱ्या, संपादक तत्वाचे अनेक पैलू अंगी असणाऱ्या, 'श्रीपु' अर्थात श्री. पु. भागवतांचे 'सत्यकथा' मासिक व मौज प्रकाशनाच्या रुपाने मराठीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांचे योगदान आहे. 'सत्यकथा' मासिकाच्या संपादनाची मुहूर्तमेढ करून 'श्रीपुं'नी साहित्य विश्वात जे पाऊल टाकले, ते खरोखर वामनावताराप्रमाणे मराठी साहित्यविश्वाला व्यापून गेले. 'सत्यकथे'ने, पुढे नामांकित झालेले अनेकानेक दिग्गज लेखक घडवले ही एक त्या विश्वातील अभिमानास्पद व आनंददायी गोष्ट आहे. तिचा लेखाजोखा साक्षेपी व्रुत्तीने सादर करणारा हा लेख, प्रत्येक मराठी प्रेमीने वाचावा असाच आहे.
त्या लेखातील वेचक व वेधक गोषवारा असा आहे:
"संपादन एक दृष्टी असते, कथा कवितेतील नव्या प्रतिभावंतांच्या प्रयोगशील निर्मितीला आग्रहाने स्थान देणारी आणि त्याचा पुरस्कार करणारी समीक्षाही प्रकाशित करणे, हे संपादकाचे आद्य कर्तव्य असते. मराठी साहित्यवर निरतिशय प्रेम करणारे, लेखकांच्या जडण-घडणीत स्वतःला झोकून देणारे, नवसाहित्य घडवून आणणारे आणि साहित्यिक बांधिलकीचे व्रत घेऊन जाणारे असे संपादक म्हणजे 'श्रीपु' होय.
संपादक हा लेखक घडवतो हे मान्य न करता, प्रतिभावान लेखकच संपादकाला नकळत घडवत असतो, असे म्हणणारा विचक्षण व साक्षेपी संपादक म्हणजेच श्री पु भागवत !"
सारांश,
ही 'मुंबईचे षड्दर्शन' लेखमाला म्हणजे जणू काही, मुंबईकरांसाठी उघडलेला तिसरा डोळाच म्हणावा लागेल.
धन्यवाद
सुधाकर नातू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा