शुक्रवार, १० डिसेंबर, २०२१

"टेलिरंजन ? नव्हे, हे तर चिंताजनक नैतिक अध:पतन !":


 "टेलिरंजन ? नव्हे, हे तर चिंताजनक नैतिक अध:पतन !": 

टीव्हीवरील बहुतेक मालिका प्रथम खूप उत्सुकता वाढवणाऱ्या असतात परंतु त्यांचा कथेचा जीव इवलासा असल्यामुळे त्यानंतर मालिका वाढवण्यासाठी काहीही, कसंही दाखवलं जातं. प्रेक्षक जणु मूर्ख आहेत त्यांना डोकं नाही अशा पद्धतीने मालिका कसेही, काहीही दाखवत पुढे नेली जाते. मी अशावेळेपासून ती भरकटत जाणारी मालिका पहाणे सोडून देतो.

"येऊ कशी मी नांदायला !": नकोच येऊस!:

नव्याने आलेली काही अंशी उत्सुकता निर्माण करणारी अशी ही मालिका, मात्र हा एक हास्यास्पद पोरकटपणा आहे, हे लौकरच जेव्हा मालविका लिव्ह ईन सहचराला अक्षरश:कुत्र्यासारखे साखळीला बांधून फिरवते तेव्हाच लक्षात येते. 

ह्या मालिकेमध्ये परिस्थितीने गरीब असलेली लठ्ठ मुलगी-स्वीटू देखण्या श्रीमंत तरुणा-ओमबरोबर बिनदिक्कत प्रेमाचे चाळे करते आणि हे सगळं तिच्या आईला काही केल्या लक्षातही येत नाही. 

न पटणार्या ह्या जोडीच्या आंधळ्या प्रेमात दोघांचे भेटणे प्रेमाचे चाळे चालूच असलेले दाखवतात. घरातल्या आई वडिलांना किंमत न देणारी आणि ज्याच्याबरोबर लिव इन रिलेशनशिप मध्ये आहे अशा नवऱ्याला कुत्र्यासारखे वागवणारी, नोकराला केव्हाही थोबाडीत देणारी अशी मालविका म्हणजे न पटण्याजोगी व्यक्तिरेखा आहे. तिला कसे शोधून काढता येत नाही की, तिचा भाऊ ओम, स्वीटूबरोबर काय काय उद्योग स्वीटूबरोबर करतोय ते. त्याचप्रमाणे त्यांची जर एवढी गडगंज श्रीमंती आहे तर त्यांचा खरोखर काय उद्योग असतो, हे कळायलाही मार्ग नाही. अशा या कंटाळवाण्या मालिकेने छोट्या पडद्यावर यापुढे नांदूच नये. स्वीटूचे ओमशी लग्न न होता, त्यांच्या उद्योगातील नोकराशी होते, त्यानंतर मी ती मालिका पहाणे

सोडून दिले.

"रंग माझा वेगळा-काळा, काळा !":

ह्या मालिकेमध्ये तर सौंदर्या ही सासू असलेली खलनायिका काळ्या रंगाची पराकोटीची नफरत करते. त्यामुळे काळ्या रंगाच्या सुनेच्या-दीपाच्या मागे ती अक्षरशः हात धुऊन मागे लागते आणि तिचे हाल-हाल होईल इतका त्रास देते. दीपाची सावत्र बहीण श्वेताचा दीपाच्या नवऱ्यावर-डॉ कार्तिकवर डोळा असल्यामुळे, त्यांच्या घरात प्रवेश मिळावा ह्या हेतूने, बिनदिक्कत त्याच्या धाकट्या भावाशी विवाह काय करते. नंतर गर्भवती राहिलेल्या दीपाच्या बाबतीत ती तर नको ते भयानक कृत्य करते. 

तिच्या मध्ये आणि तिचा नवरा कार्तिक यांच्यात दुरावा व्हावा म्हणून कार्तिकला मूलबाळ होणारच नाही अशा तऱ्हेचा खोटा रिपोर्ट तयार करण्यामागे तिचा हात असावा हे काय म्हणायचे? पुढे तर दीपा घर सोडून गेल्यावर मालिका कशीही भरकटत जाते. भरीला भर म्हणून मध्येच एंट्री घेतलेल्या डॉ कार्तिकच्या डॉक्टर मैत्रिणीचे खलनायकी उद्योग वेगळेच. थोडक्यात ह्या मालिकेचा रंगच मुळी काळाकुट्ट. काय साधतं हे असले नकारात्मक चित्रण दाखवून? त्यानंतर मी ही मालिका पहाणेच

सोडून दिले.

"स्वाभिमान?: हा तर गुंडाचा आखाडा !":

"स्वाभिमान" मालिकेमध्ये तर अक्षरशः सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या आहेत शैक्षणिक संस्थेमध्ये नाही केला पल्लवीला वर्गातील टारगट मुले त्रास देतात आणि वर्गातच जवळजवळ रात्रभर कोंडून ठेवतात तेवढे पुरे झाले नाही म्हणून की काय त्या मुलांना नंतर काहीच शिक्षा होत नाही तीच मुले काही दिवसानंतर तर याच्या पुढची मजल घाटात स्टोअर रूम मधून काहीतरी पल्लवीला आणायला लावून तिथे अशी व्यवस्था करतात की तिचा पाय लागल्यावर मोठा स्फोट होईल, शॉर्टसर्किटमुळे आग लागेल. तरीही त्या मुलांना त्या भीषण क्रुत्याबद्दल ना पुढे काही जाब विचारला गेला, ना या प्रकरणाचा शोध घेतला गेला. दुसरे असे की आदिती मॅडम आणि त्यांचा मुलगा शांतनु यांच्यामध्ये जे हाडवैर आहे ते तर खरोखर अनाकलनीयच. मुलाची इतकी दुश्मनी आईबद्दल दाखवून काय साध्य होते?

त्यापेक्षाही कमाल म्हणजे पल्लवीचे वडील आदिती मॅडमच्या वरील प्राणघातक हल्ल्याला जबाबदार असल्याचे कळूनही, या मॅडम खटला मागे घेतात आणि त्यांना सोडून देतात. म्हणजे इथे गुन्हे एकामागोमाग घडतात, मात्र त्या आरोपींना शिक्षा होत नाही. शैक्षणिक संस्था आहे की गुंडांचा बाजार असं देखील वाटतं ! इतके पुरे नाही, म्हणून पल्लवीचा मेव्हणा तिच्यावर अतीप्रसंग काय करतो! ह्या तर्‍हेची घ्रुणास्पद गुन्हेगारी क्रुत्ये दाखवून, स्वाभिमान नावाखाली दाखवून काय साधलं जातं ते त्यांचं त्यांनाच ठाऊक. ओढून ताणून चंद्रबळ आणत ही मालिका अशीच भरकटत चालली आहे.

आपली भूषणावह परंपरा आपले नीतिमूल्ये आणि एकंदर आपली संस्कृती आपली कुटुंब व्यवस्था याकडे पूर्ण दुर्लक्ष करून मराठी मालिका जे जे काही दाखवत आहेत ते तिटकारा उत्पन्न करणारे आणि निश्चितच अयोग्य असे आहे. गुन्हेगारी स्वरूपाचे अनेक प्रसंग नकारात्मक अशा तर्‍हेची कृत्ये करायची आवड असलेली पात्रे यांचा सुळसुळाट, हेवे दावे, कटकारस्थाने या सगळ्यांमधून टीआरपी मिळवायचा अट्टाहास हे निश्चितच निंदनीय आहे. आपल्या लेखकांना झाले काय आहे?

यापेक्षा आपले जे चांगले साहित्य आहे त्यामधील चांगल्या कथा निवडून किंवा कादंबऱ्यांमधून उत्तम उत्तम असे नाट्यमय मालिका तयार करता येतील याकडे कोणाचेच लक्ष नाही. करमणूकीच्या बुरख्याखाली हा सारा समाजाला रसातळाला नेणारा उद्योग ताबडतोब थांबला पाहिजे, असेच कुणाही समंजस माणसाला वाटेल. त्या करताच ह्या सगळ्या करमणुकीच्या एकंदर प्रयोगांवर सेंन्सारशिप येणे आवश्यक नव्हे कां?

अखेरीस....

ह्या विचार मंथनाला "प्रेक्षकांनी रिमोट वापरावा", असे साळसूद उत्तर नको, उलट प्रेक्षकांना रिमोटला उलट हातच लावायची वेळ येणार नाही, अशा उत्तमोत्तम मालिका बनवल्या जाव्यात.

त्याकरिता.....

"मालिकांचे 'महाभारत':

भरकटत, 'पाणी' टाकून लांबलचक मालिकांना नांवे ठेऊन अक्षरशः उबग आला. ह्या द्रुक् शाव्य माध्यमाचा अधिक चांगला उपयोग व्हायला हवा. म्हणून हे मनोगत:

१ जुन्या चावून चोथा झालेल्या आणि कथानकात काहीही नाविन्य न उरलेल्या मालिका पुढे दाखविल्या जाऊ नयेत.

२ ह्या पुढे तरी शक्यतोवर टी-20 सामन्यांप्रमाणे मर्यादित भागांच्या आणि निश्चित कथानकाचा शेवट असलेल्या मालिकाच दाखविल्या जाव्यात.

३ त्या अनुषंगाने कुठल्याही मालिकेत प्रचलित कायद्यांच्या विपरीत असे काहीही दाखवले जाणार नाही ना, असे यापुढे तरी त्यांच्यावर सेन्सॉर नियंत्रण ठेवले जावे.

४ ज्याप्रमाणे महाभारत मालिकेमध्ये प्रत्येक भागाच्या शेवटी त्या त्या भागातील कलाकारांचा सहभाग असे, त्यांच्या नावाची श्रेयनामावली दाखवली जायची, तीच पद्धत यापुढे मालिकांमध्ये सुरू केली जावी.

याशिवाय

काय?....काय?... काय?...

जे तुम्हाला वाटते ते प्रतिसादात जरूर लिहा.

धन्यवाद

सुधाकर नातू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा