बुधवार, २९ डिसेंबर, २०२१

"एक छोटीसी बात":

"एक छोटीसी बात !":

छोट्या पडद्यावर सहसा जाहिरातींशिवाय कोणताही कार्यक्रम आपल्याला पहायला मिळत नाही. मग तो मालिका, कथाबाह्य कार्यक्रम असो, नाटक, चित्रपट असो वा बातम्या जाहिरातींच्या महापूरात बुडवून टाकणारा असतो ! परंतु, त्या रात्री नवलच घडले. सहज चॅनेल सर्फिंग करताना, "लीडर्स" या शीर्षकाच्या कार्यक्रमाने लक्ष वेधून घेतले आणि पहाता पहाता अर्धा तास कसा निघून गेला, ते अक्षरशः कळलेही नाही. श्री निलेश खरे व अमोल पालेकर ह्यांच्या, त्या उद्बोधक मुक्तसंवादात कोणत्याही जाहिरातींचा अडथळा नव्हता.....

मोजक्या शब्दात श्री निलेश खरे यांनी टोकदार प्रश्न व गोटीबंद मुद्दे मांडले आणि त्याला अनुषंगून, तर्कशास्त्राला पटेल, अत्यंत स्पष्टपणे, संयत बुद्धीने मोजक्या, अचूक शब्दात प्रत्येक विषयाचा योग्य तो मागोवा, अमोलजींनी घेतल्याचे जाणवले. कोणत्याही माणसाची विचारधारा व द्रुष्टिकोन, हा तो सभोवताली काय घडतंय, त्याकडे डोळस बुद्धीने पाहणारा आणि कुठल्याही विषयाचा सखोल अभ्यास करणारा ह्यावर अवलंबून असतो. असे बोलणे जसे मनाला पटते, तसाच ते आनंददायी व अनुकरणीय भासते. ती कला अमोल पालेकरांनी निसर्गत: आत्मसात केली आहे, याचा प्रत्यय सातत्याने येत होता.

या मुक्त संवादातून यशस्वी चित्रकार, अभिनेता दिग्दर्शक आणि निर्माता अशा विविध रंगी आणि विविधरंगी प्रतिमांमधून अमोल पालेकर हा एक श्रेष्ठ,
आदरणीय व अत्यंत बुद्धिमान मनस्वी कलावंत आहे असेही जाणवून गेले.

# 'लीडर' अमोलजींचे निवडक बोल:

# "लहानपणापासून मला चित्रकलेची आवड एसएससी नंतर चित्रकला मला पुढे शिकायची होती आणि त्यासाठी माझ्या आई-वडिलांचा प्रथम विरोध होता कारण चित्रकलेतून मी उपजीविका करू शकणार नाही याची जाणीव मला त्यांनी करून दिली पण मी माझ्या विचाराशी ठाम होतो हे बघून त्यांनी मला पूर्णपणे स्वातंत्र्य दिले. मला त्यांच्या या संस्कारांचा खरोखर खूप उपयोग झाला. आपण जो निर्णय घ्यायचा, त्याचे परिणाम आपण स्वीकारले पाहिजेत हे माझ्या मनात त्यांनी रुजवले. त्यांच्या या दृष्टिकोनाचे मला आभार मानायला हवेत आणि कौतुक वाटते."

# " सत्तेच्या वा प्रभावी वर्तुळात मला यश मिळाले नाही आणि त्यापासून मी वंचित राहिलो असे म्हणणे चूक आहे. कारण जर एखाद्या गोष्टीची मला अपेक्षाच नसेल, तर ती नाही मिळाली तर मी वंचित कसा असू शकतो? मला कुठल्याही राजकीय वर्तुळात सामील व्हायचे नव्हते, मी अलिप्त होतो. माझी तेथून कोणतीही अपेक्षा नव्हती. म्हणूनच मी डाव्या पासून उजव्या विचारसरणीच्या पर्यंत सर्वांच्या बाबतीत मला जर काही पटले नाही, तर मी माझा विचार स्षष्टपणे मांडत आलो आहे."

# "नाट्यक्षेत्रात मी अपघातानेच आलो. सत्यदेव दुबे यांच्या छबिलदास मधील नाट्य वर्तुळात मी टाईमपास म्हणून जात असे. तेव्हा त्यांच्या नजरेला मी आल्यावर, त्यांनी मला नाटकात काम करशील कां, असे विचारले मी अचंबित झालो. त्यावर त्यांनी जे सांगितले ते महत्त्वाचे: 'तू काही मोठा कलावंत आहेस किंवा होशील असे मला वाटले म्हणून मी तुला निवडले नाही, तर तू टाईम, वेळ फुकट घालवतोयस, येथे थोडा वेळ सत्कारणी लागेल, म्हणून तुला निवडले आहे. असा मी नाट्यक्षेत्रात शिरलो."

# "भूमिका" चित्रपटामध्ये मला केशव दळवी हीच भूमिका करावयाची होती आणि तसे मी निर्माते श्याम बेनेगलना सांगितले. खरं म्हणजे "छोटीसी बात" "रजनीगंधा" आणि "चित्तचोर" ह्या माझ्या तीन चित्रपटांच्या यशस्वी रौप्यमहोत्सवांमुळे, मी लोकप्रिय नायक म्हणून यशस्वी झालो होतो. अशावेळी मी केशव दळवी सारखी या चित्रपटातली खलनायकी भूमिका स्वीकारणे तसे धोक्याचे आणि निर्माते श्याम बेनेगलनादेखील मीच त्या भूमिकेला योग्य आहे असे वाटणे, हा सुयोग जुळून आल्यामुळे, माझ्या करियर मधली ही भूमिका मला मिळाली व ती म्हणजे मैलाचा एक दगड आहे असे मला वाटते"

# " चित्रपटाने वा नाटकाने मार्केटमध्ये किती गल्ला जमवला यावरून त्यांचे मोजमाप करणे गुणवत्तेच्या दृष्टीने चूक आहे असे मला वाटते. "थोडासा रुमानी हो जाए" हा अगदी आगळा-वेगळा असा चित्रपट आणि त्यामधील नाना पाटेकर यांची त्याच्या अँग्री यंग मॅन या भूमिकेला विरुद्ध अशी रोमँटिक भूमिका हा जो योग जुळून आला. त्या चित्रपटाने मला स्वतःला जे जे आत्मसमाधान मिळाले, त्याची तुलना चित्रपटाने मिळवलेल्या माफक गल्ल्याशी करता येणार नाही."
.......
............
त्या छोटेखानी कार्यक्रमांतून मी माझ्या मनमंजुषेत वेचलेले अमोलजींचे हे निवडक बोल, हा 'सुखी माणसाचा सदरा' (हे त्यांचेच शब्द) बाळगणारा एक बुद्धिमंत, जातीवंत कलावंत समाजभान असलेली व्यक्ती आहे, हेही जाणवेल. अशी आपल्या पाठीच्या ताठ कण्यावर, विचारधारेच्या मजबूत पायावर ठाम उभी असलेली मंडळी आता दुर्मिळ होत चालली आहेत, हे आपणा सर्वांचे दुर्दैव !

केवळ अर्ध्या तासात चित्रकला, चित्रपट, नाट्यसृष्टी आणि एकंदरच सध्याच्या संक्रमणशील, अस्वस्थ करणार्या माहोलासंबंधी, जो विस्तृत पट ह्या विचारगर्भ कार्यक्रमात मांडला गेला, तो नि:संशय आनंददायी व दुर्मिळ अनुभव होता. त्याबद्दल श्री निलेश खरे आणि अमोल पालेकर ह्यांचे अभिनंदन व धन्यवाद.

ही 'छोटीसी बात', 'चित्त' चोरुन गेली, मनाला 'रजनीगंधा'त भिजवून गेली.

सुधाकर नातू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा