शनिवार, ५ जून, २०२१

"हवी श्रीमंती जाणीवांची !";


"हवी श्रीमंती जाणीवांची !";

नुकतच "धूळपाटी" हे प्राध्यापिका, कवयित्री आणि लेखिका श्रीमती शांता शेळके यांचं पुस्तक वाचलं. रूढ अर्थाचे ते आत्मचरित्र नाही असे त्यांनी प्रस्तावनेतच सांगितले आहे. त्यातील बऱ्याचशा गोष्टी बालपणापासून त्यांच्या वैयक्तिक जीवनातील जडणघडणीच्या आणि एकंदर सामाजिक कौटुंबिक वातावरणाची शब्दचित्रे आहेत. मूलतः शब्द आणि शब्दांवरचं प्रेम या त्यांच्या मुलभूत आवडीमुळे लेखिका म्हणून त्यांची वाटचाल उलगडणार्या, साहित्यविषयक विचारमंथनाचा उहापोह त्यांनी ह्या पुस्तकात केलेला आहे. सहाजिकच एक हौशी लेखक म्हणून मला ते पुस्तक प्रत्ययकारी वाटले आणि त्यातील काही नोंदी तर मला जपून ठेवाव्यात अशाच वाटल्या. माझ्यासारख्या शब्दाचे शिल्पकार असलेल्या लेखकांना मार्गदर्शक आणि योग्य ती दिशा दाखवणारे असेच ते मूलभूत विचार आहेत. त्याची ही छोटीशी मी घेतलेली दखल:

"शब्दांचे शिल्पकार":
"लेखक जे लिहितो, ते चार लोकांसमोर आल्याखेरीज, त्यांनी ते पाहिल्या वाचल्या खेरीज त्याच्या निर्मितीच्या आनंदाला परिपूर्णता येत नाही. तो केवळ अहंकार नसतो, ती नुसती प्रसिद्धीची हावही नसते. ते त्याहून अधिक काहीतरी असते, असे मला वाटते. लेखन प्रसिद्ध झाल्यानंतर लिहिणाऱ्याला एक प्रकारचे आश्वासन मिळत असावे, एक सुरक्षिततेची भावना त्याच्या ठायी निर्माण होत असावी आणि मामुली लेखकाची गोष्ट सोडा, पण फार मोठ्या यशस्वी लेखकालादेखील या आश्वासनांची, या सुरक्षिततेच्या भावनेची, आतून निकडीची गरज भासत असावी."

"रेषेचे लाघव":
रेषेच्या सुरेल लडिवाळ वळणांना विविध असे आकार देत, चित्रकार आपल्या मनातील प्रतिमा कागदावर उमटवत, सर्जनशीलतेचा आविष्कार चित्रकलेतून निर्माण करत असतात. त्यांच्या रेषा वेगवेगळ्या भावना व्यक्त तर करतातच, कधी कधी उग्र, क्रूर पीडलेल्या दुःखाने पिळवटलेल्या असहाय्य आक्रंदन करणाऱ्या, तर कधी जाणीवेच्या पलीकडे नेऊन जाणार्‍या अशा असतात, तर कधी कधी आनंदाचा समाधानाच्या एका नव्या क्षितिजाकडे घेऊन जाणाऱ्याही त्या रेषा असतात. निसर्ग चित्रांतून तर हुबेहूब निसर्गाची पुनर्निर्मिती आपल्या रेषांच्या लाघवातून चित्रकार, रसिकांपर्यंत आणत असतो. खरोखर रेषांचे लाघव हे मनाला भिडणारे असे असते आणि म्हणूनच चित्रकला ही मूर्तीमंत अद्भुत अशी प्रतिभासंपन्न कला आहे यात वाद नाही."

"लेखकही एक चित्रकारच !"
ह्या पुस्तकाच्या वाचनांतून मला उत्साह तर वाटलाच, परंतु नव्याने साहित्य निर्मीतीकडे पहाण्याची प्रेरणा मिळाली. वाटून गेले, माणसाला वाणीसारखी अनमोल शक्ती मिळाल्यामुळे, या माध्यमातून त्याने शब्द आणि त्यांचे अर्थ निर्माण केले. शब्द निर्माण करताना त्यामागे मनातील स्पदनांची, विचारांची एकरुपतेची भावभावना जोडली. बहुदा साहित्य अशाच रितीने निर्माण होत असते. लेखक हा नेहमी विचार करत असतो, कल्पना करत असतो आणि त्या कल्पना, विचार शब्दांमधून व्यक्त करत असतो. अर्थातच चित्रकार जर रेषांची वळणे वळणे घेऊन, आपली कला समृद्ध अशा स्वरुपात सादर करतो, तर लेखकही नेहमी शब्दांशी खेळ करून शब्दांची जादू वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्यातून मांडत असतो.

चित्रकाराचे जसे साधन रेषा, तसंच लेखकासाठी साधन शब्द, शब्द आणि शब्दच. लेखक आणि चित्रकार दोघेही प्रतिभासंपन्न असेच कलाकार. लेखनाची ज्याला आवड लागली, तो नेहमीच एखादा गायक जसा आपल्या शिकलेल्या विविध अशा सूर, तालांचा सातत्याने रियाझ करतो, त्याच प्रमाणे लेखकही नेहमी नवनवीन अशा अनुभवांचे, व्यक्तींचे, प्रसंगांचे त्याचप्रमाणे विचारांचे व कल्पनाविलासांचे अनेक विविध रंग तुमच्यासमोर उधळत असतो. त्यामागे त्याची वाचनाची तपश्चर्या, जीवनाकडे बघण्याचा डोळसपणा, वेगवेगळे अनुभव घेण्याची निरीक्षणशक्ती अशा कितीतरी गोष्टी असतात. तेव्हाच तो लेखक आपल्याला समर्थपणे त्याला काय वाटते ते चपखलपणेव्यक्त करू शकतो.

"हवी श्रीमंती जाणीवांची!";
अंतर्मुख होऊन मी विचार करू लागलो की,
माणसांची श्रीमंती, पैसाअडका जमीनजुमला व इतर साधनं सम्रुद्धी ह्यावर सर्वसाधारणपणे मोजली जाते, समजली जाते. पण खरं म्हणजे तोच माणूस खरा श्रीमंत, ज्याच्या जाणिवांचा भवताल अतिविशाल असतो. अशा माणसाला जाणिवा अर्थात विविध प्रकारचे अनुभव, माहिती आणि ज्ञान अवगत असतात, तर असा जो माणूस बहुश्रुत, विचारी तोच खरा श्रीमंत, असं मानायला हवं, असं मला वाटतं.

कारण माणूस माणूस म्हणून इतर सजीवां पेक्षा वेगळेपण जर काही माणसात असेल, तर ते म्हणजे सभोवतालच्या एकंदर परिस्थितीचे आकलन जाणिवांचा रूपात होते, ते करून घेण्याची त्याची अमोघ शक्ती हेच. प्रत्येकाची ती कुवत वेगवेगळी असते. ती विविध प्रकारची माहिती घेऊन, वाचन करून, प्रवास करून, अनुभव घेऊन वाढत जात असते. मात्र तशी ती सातत्याने वाढायला हवी, ही ईर्षा इच्छा मात्र माणसाजवळ हवी.

सारांश मला तरी असं वाटतं की, कायम माणसाने नवनवीन शिकत जावे. माहिती गोळा करत राहावे, विविधांगी अनुभव, सुख भोगत वा दुःख पचवत जावं आणि आपल्या जाणिवांचे क्षेत्र अधिकाधिक विस्तीर्ण करत जावे हेच. नाही तरी कोणीतरी म्हटलंय की, ज्ञान हे महासागरासारखं आहे आणि आपल्याला जे काही माहिती असतं ते म्हणजे एक जलबिंदू पण नाही. म्हणून आता एकांतात घरात बसलेले असताना, आपण हेच केलं पाहिजे की, आपलं एकंदर ज्ञान, माहिती, वाचन वेगवेगळ्या प्रकारे वाढवून अंतर्मुख होत, स्वतः कडे व आपल्या भवतालाकडे, भावविश्वाकडे नव्याने बघत, आपली जाणीवांची अधिकाधिक श्रीमंत केली पाहिजे. "कोरोना" संकटकाळातील ही एक हवीहवीशी वाटणारी तपस्या आत्मसात करत जावे.

धन्यवाद
सुधाकर नातू.

ता.क.
हे आणि असेच.....
अनेक विचारप्रवर्तक, अर्थगर्भ लेख....
लेख वाचण्यासाठी......
माझ्या ब्लॉगची ही लिंक संग्रही ठेवा....

https://moonsungrandson.blogspot.com

लेख पसंतीस आले तर....
लिंक शेअरही करा.....

1 टिप्पणी: