"कालाय तस्मै नमः २!":
खुप वर्षांपूर्वी, "नाट्यदर्पण" तर्फे श्री सुधीर दामले हे "कल्पना एक आविष्कार अनेक" अशी संकल्पना, एकांकिका स्पर्धांसाठी राबवत असतं. फुलाची जी अवस्था कळी पासून होते, तसाच हा प्रकार. ह्या एकांकिका स्पर्धांमधून अनेक नवोदितांना प्रोत्साहन मिळून, त्यामुळेच अनेक दिग्गज कलाकार पुढे आले.आज ही अशी आठवण व्हायला, खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. माझे वडील एका समस्यापूर्ती या अभिनव काव्यस्पर्धेमध्ये भाग घ्यायचे. मला वाटतं 'संजय' नावाचं गावकरी ग्रुप तर्फे प्रसिद्ध केलं जाणार एक मासिक होतं. त्यामध्ये कवितांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि नवोदित कवी पुढे आणले जावेत, यासाठी एखादी छोटीशी समस्या अर्थात एका ओळीची कल्पना दिली जात असे आणि त्यावरून वाचकांमधील कवींनी आपल्या कविता पाठवायच्या, असा तो स्पर्धेचा प्रकार होता. त्यामधून ज्या निवडक कविता चांगल्या वाटायच्या, त्या अंकामध्ये प्रसिद्ध व्हायच्या आणि कवींना अंक विनामूल्य भेट म्हणून दिला जायचा. तर सर्वोत्तम अशा तीन कवितांना मला वाटतं, एक रुपयापासून पाच रुपये असे बक्षीस व अंक घरपोच भेट म्हणून पाठवला जायचा.
त्या स्पर्धेमध्ये माझे वडील-बापू नेहमी न चुकता भाग घ्यायचे. बऱ्याच वेळेला त्यांच्या कविता प्रसिद्ध व्हायच्या, अंक यायचा तर कधी कधी चांगली उत्तम कविता म्हणून प्रसिद्ध होऊन बक्षिसाची रक्कमही मनीऑर्डरने अंकासोबत यायची. त्या वेळेला आमच्या घरामध्ये अक्षरशः आनंदोत्सव व्हायचा. छोट्या-छोट्या अशा गोष्टींमधून आनंद उपभोगायची त्यावेळच्या माणसांची प्रवृत्ती होती. याच स्पर्धेमुळे त्यामध्ये भाग घेणाऱ्या एका बडोद्याच्या कवीची देखील माझ्या वडिलांची पत्रमैत्री झाली आणि ती उत्तरोत्तर चांगली वाढतही गेली. माझी आठवण जर बरोबर असेल तर, ते गृहस्थ एकदा आमच्या घरीदेखील मुंबईस येऊन गेल्याचे आठवते. त्या दोघांमधील शुद्ध मैत्री खरोखर "समान शीलेषु व्यसनेषु सख्यम !" या म्हणीला अगदी ओतप्रोत सिद्ध करणारी, अशी होती. खरंच ते दिवसच वेगळे होते.
नवीन नवीन अशा गोष्टीत भाग घेऊन त्यामधून काही ना काहीतरी आनंद मिळवायची, जी काही व्रुत्ती होती ती खरंच आगळीवेगळीच. आज सारी सुखं सभोवताली असताना, माणूस आनंदी आहे कां? हा एक मोठा प्रश्न आहे आणि त्याला कारण म्हणजे वाढती उपभोगवृत्ती आणि थोडक्यात समाधान न मानणे, तसेच आहे ती परिस्थिती स्वीकारून पुढे जाणे ही मनोवृत्ती आता या मार्केटींग युगात नष्ट झाली आहे. शिवाय मैत्रीच म्हणाल तर, शक्यतोवर व्यावहारिक दृष्टीने "मला काय त्यातून फायदा?" या प्रश्नाच्या उत्तरानंतरच मैत्री किंवा तो जनसंपर्क वाढविला जातो आणि तोही तेवढ्यापुरताच असतो असतो. दृढ शुद्ध व निरपेक्ष मैत्री ही आता दुर्मिळ होत चालली आहे. आपल्या हाती म्हणायचं एवढंच की,
"कालाय तस्मै नमः"! दुसरं काय?
धन्यवाद
सुधाकर नातू
ता.क.
हे असेच अंतर्मुख करणारे.......
लेख वाचण्यासाठी....
ही लिंक संग्रही ठेवा.....शेअरही करा........
https://moonsungrandson.blogspot.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा