"ह्रदयसंवाद-३०": "अपरिहार्य परस्परावलंबन !":
सध्या आत्मनिर्भरतेचे गोडवे गाणे आवश्यक आहे, ह्यात शंकाच नाही. मात्र अशा परिस्थितीतही आपण एका महत्वाच्या गोष्टीकडे कळत, नकळत विनाकारण दुर्लक्ष होतं, ते बरोबर नाही. आपण एकमेकांवर किती, किती अवलंबून असतो, हे आपल्या कधी लक्षातच येत नाही. आपण त्यापैकी किती तरी जणांना पाहिलेलेही नसते. कदाचित ती माणसे आपल्या जीवनात कधीही येत नाहीत आणि तरीही ती आपल्याला त्यांच्या परीने आपले जीवन सुकर, सुलभ होण्यासाठी मदत करत असतात, कष्ट घेत असतात.हा विचार आज मनात यायचं कारण म्हणजे, मुंबईत पडलेला धुवाँधार मुसळधार पाऊस. संपूर्ण रात्रभर पाऊस पडत असल्यामुळे, दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर माझ्या मनात आले की, आज दुध येणारच नाही. नेमका त्याच वेळेला आम्ही चांगला मोठा पाव आणला होता आणि तो टोस्टरवर भाजून, अमूल लोणी लावून छान पैकीन खायचा आमचा बेत होता. बहुधा, तो पाव फुकट जाणार असा विचार असतानाच, मी दार उघडले आणि बाहेरच्या पिशवीत बघतो, तर दुधाच्या पिशव्या टाकलेल्या होत्या.
मी थक्क झालो इतका पाऊस असूनही, नेहमी येणाऱ्या वेळेवरच दुधाचा रतीब टाकणारा माणूस आला होता. अर्थातच त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातून दुधाच्या गाड्या देखील आल्या होत्या. आपण घरामध्ये असतो, पण आधी आपल्याला दूध मिळण्यासाठी सुद्धा, त्या मागे किती हात असतात, हे लक्षात आले. म्हणूनच एकमेकांना मदत कशी, कोण अबोलपणे करत असतो, हा विचार मनात आला.
सध्या लाँकडाऊनमुळे घरातच मुक्काम करायला लागतोय आणि आमच्या सारख्या ज्येष्ठ नागरिकांना तर छोट्या पडद्याशिवाय दुसरी काही करमणूकही नाही. वाचनालयेही बंद आहेत आणि काही चालू असली, तरी सध्याच्या कसोटीच्या काळात आम्हाला बाहेर जाणं कठीण आहे. त्यामुळे वाचायचा जो काही छंद आहे, त्याच्यावर मर्यादा आलेल्या आहेत.
अशा वेळेला, आपल्याला चांगल्या वाटणार्या निवडक मालिकांबरोबर, टाईमपास म्हणून, आवडत नसलेल्या लांबण लावणार्या मालिकाही, बघत वेळ काढावा लागतो. अंतर्मुख होता होता, मला जाणवले की, आपल्या समोर करमणुकीचे हे ताट येते, ह्याला कारण ही कलाकार मंडळी आणि पडद्यामागचे अनेक अनभिज्ञ सहाय्यक. मालिकेचा संसार साजरा व्हावा म्हणून आपले घरदार सोडून, दूर एकत्र येऊन, धोका पत्करून करमणुकीचे जे काही त्यांचे योगदान असते, ते ही सर्व माणसे देत असतात. त्यांचेही किती आभार मानावे, तेवढे थोडेच आहेत. कारण कोरोना सारख्या संकटामुळे, असे चित्रिकरणासाठी अनेकांनी एकत्र येणे हे किती धोक्याचे आहे. अशा वेळी, एखादा नामवंत कलाकार, कोरोनामुळे निधन पावला की, चटका तर बसतोच, त्याचबरोबर ध्यानात येते की, ही मंडळी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्यासाठी खरोखर किती आणि काय काय करत असतात ते.
अशीच एकाहून एक नित्याची अनेक अद्रुश्य सहाय्याची, मदतीची उदाहरणे, आपण सजगतेने विचार केला की आपल्या ध्यानात येतील. मी म्हणून म्हणतो की, आपले जीवन सुकर, सुलभ होण्यासाठी अनेक अदृश्य, अज्ञात हात आणि व्यक्ती अहोरात्र झटत असतात. त्यांची आठवण आपण कायम ठेवली पाहिजे. आज हा ताजातवाना विचार मनामध्ये आला आणि तो मी या ह्रदयसंवादात मांडला, इतकेच.
तुम्हालाही असेच अनुभव येत असतील, यात शंकाच नाही. फक्त आपली त्या दृष्टीने बघण्याची तयारी असावी. पण आपण आपल्यातच मश्गुल असतो आणि त्यामुळे हे असे काही आपल्या सभोवती घडत असते, हे आपल्या लक्षातच येत नाही. म्हणून काळजी तर घ्या स्वतःची. पण ती घेताना, अनेकांच्या ह्या निरलस मदतीची मनात आठवण ठेवून त्या सर्वांना प्रणिपात करा.
धन्यवाद
सुधाकर नातू
ता.क.
माझा you tube channel:
moonsun grandson
ही लिंक save करा.......आणि पहा....
विविधांगी उपयुक्त विडीओज्....
https://www.youtube.com/user/SDNatu
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा