मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२०

"समाधानाची सप्तपदी":


"समाधानाची सप्तपदी":

ह्या अत्यंत उपयुक्त लेखाच्या प्रारंभीच हे सात मंत्र देताना मला विलक्षण आनंद होत आहे:
१. डोके वापरा
२. दृष्टी बदला.
३. जीभेला आवरा
४. हाताने नेहमी देत रहा.
५. ह्रदयापासून प्रेम करा.
६. मन काबूत ठेवा.
७. पायाने चालत रहा.

प्रास्ताविक:
दरवर्षी दसऱ्याचे दिवशी मला एक चांगली संधी मिळत असे. आमच्या कंपनीतील दसऱ्याचे कार्यक्रमाचे वेळी पूजा व आरती झाल्यावर, कर्मचाऱ्यांसमोर काही मौलिक विचार मांडण्याची मला संधी दिली जाई. त्या संधीचा मी नेहमीच उत्तम उपयोग करून घेत असे. पाहिलेले, अनुभवलेले, ऐकलेले आणि वाचलेले जे जे काही असे त्याचे चिंतन करून मी पंधरा वीस मिनिटांचे मार्गदर्शक व उद्बोधक विचार साऱ्या सहकाऱ्यांसमोर मांडत असे. त्यात रंजकता यावी म्हणून दोन-तीन छोट्या छोट्या गोष्टी देखील फिरत असे.

व्यक्तिमत्व विकास आणि आपले जीवन खाजगी व व्यवसायिक क्षेत्रात, अधिक समृद्ध कसे करावे, ह्याबद्दलचे विचार त्या साऱ्या खटाटोपात मी देत असे. माणसाजवळ असलेल्या व तिचा परिपूर्ण उपयोग करण्याची आवश्यकता असलेल्या, विचारशक्ती चिंतनशीलता या दोन मूलभूत शक्तींच्या जोरावर माझे दसऱ्याचे हे सीमोलंघन पुष्कळांना प्रेरणादायी ठरत असे. आपण जिथे काम करतो तेथे उपयुक्त असे काहीतरी वेगळे आपण करत आहोत याचा आनंद तर त्यामुळे मला होतच असे, परंतु त्याचबरोबर सभाधीटपणा, आपले विचार परिणामकारक रीतीने कसे सांगावे ह्याची कला आणि अर्थातच प्रसिद्धी व जनसंपर्क त्यामुळे मला मिळत असे.
नेहमी आनंदाने समाधानाने कसे जगावे ह्याची गुरुकिल्ली असणारी सात पावले अशाच एका कार्यक्रमाच्या ओघात मला गवसली आणि त्याला अनुरूप असे "समाधानाची सप्तपदी" असे आकर्षक नाव मी दिले. 

आज श्रीगणेशाच्या, विद्येच्या देवतेच्या उत्सवात म्हणूनच माझे हे दुसरे लेख पुष्प: ह्या समाधानाच्या सप्तपदीची संकल्पना पूर्णपणे वाचकांसमोर उभे रहावी, म्हणून हा लेख आहे.
मानवी जीवनात समाधान शांती सुख व आनंद यांची सर्वच जण अपेक्षा करतात परंतु मृगजळा सारख्या या गोष्टी दूर दूर पळून जात असतात माणूस जन्माला येतो वाढतो कुटुंब कबिला करतो आणि एक दिवस निजधामाला जातो या मानवी जीवनाचे रहस्य काय हे गुण उकळण्याचा अनेकांनी प्रयत्न केला परंतु या प्रश्नाचे शाश्वत असे उत्तर अजून तरी कुणालाही सापडले नाही आणि मलाही नाही कदाचित ते कधी सापडेल असे वाटतही नाही या मूलभूत प्रश्नांचा प्रश्नही आयुष्यभर कित्येक जणांना पडत नाही हीच तर दुर्दैवाची बाब आहे या पार्श्वभूमीवर मी सुख व समाधान शांतीसाठी वर मांडलेली सप्तपदी सुचवू इच्छितो. आता प्रत्येक मंत्राची ओळख करून घेऊ:

१ डोके वापरा:
माणसाच्या जीवनात समस्या नेहमीच येत राहणार, खडतर प्रसंगांना तोंड द्यावेच लागणार. अशावेळी माणसाने सारासार विचार करून आपल्यापरीने डोके वापरावे आणि आपला मार्ग आपणच शोधून काढावा.

एक गोष्ट सांगतो एक खेडेगाव होते तिथे तात्या एका घरी दररोज पाणी भरायचा. त्याकरता त्याला बिचार्‍याला एक-दीड मैलभर पाऊलवाटेने खांद्यावर दोन मडक्यांची कावड घेऊन पायपीट करावी लागे अशा आठ दहा खेपा मारल्या की मग त्याचे त्या घरातले पाणी भरण्याचे काम पुरे व्हायचे. असेच काही दिवस गेले. दोन मडक्यापैकी, एका मडक्याला भोक पडले. साहजिकच नेहमी फेर्‍या मारताना पाणी गळून जायचे. आता तात्याला यामुळे अधिक फेऱ्या माराव्या लागायच्या. तात्याला होणार्‍या त्रासाचे त्या फुटक्या मडक्याला खूप खूप वाईट वाटायचं. पण करते काय असेच काही महिने गेले. तात्याजवळ आपले दुःख व्यक्त करावे असे त्या फुटक्या मणक्याला नेहमीच वाटायचे. 

शेवटी एका दिवशी त्याला ते फुटके मडके तात्याला म्हणाले: "तात्या माझ्यामुळे तुला खूप त्रास होतो तुला अधिक पायपीट करावी लागते याचे मला वाईट वाटते". हे ऐकून तात्या हसला. तो असा हसत असलेला पाहून ते फुटके मडके आश्चर्यचकित झाले व ते म्हणाले "तात्या बाबा रे हसतोस का माझा त्रास सहन कां सहन करतोस?" त्यावर तात्या म्हणाला "अरे आपण पुन्हा त्या पुलावरून पाणी भरून परत येऊ तेव्हा तुझ्या पाऊल वाटेच्या दोन्ही बाजूला पहा म्हणजे मग मी तुला काय हसलो  ते कळेल"

खरोखरच नवलच घडले होते पुनश्च पाणी भरून येताना त्या मडक्याला काय दिसले? तर ज्या बाजूला पूर्ण भरलेले पाण्याचे मडके असे, त्या बाजूला उजाड माळरान होते, मात्र ज्या बाजूला ते फुटके मडके होते त्या बाजूला रंगीबेरंगी सुंदर फुलांची झाडे दिसत होती. तात्या म्हणाला "मला कळले होते तू फुटला आहेस, पण मी मालकाला ते सांगितले असते तर तो चिडला असता व तुला व मला त्याने दूर केले असते. अशावेळी मी डोके वापरले तुझ्या ज्या बाजूला कावडीत असावयाचास, त्या बाजूस विविध फुलझाडांच्या मी बिया फेकायचो. मला जरी थोड्या जास्त खेपा पाणी भरण्यासाठी माराव्या लागल्या तरी, त्याचमुळे पाणी मिळून त्या बियांच्या वेली झाल्या आणि त्या बहरल्या तुझ्यामुळेच ही फुले मालकाच्या दारी देवाला पूजेला वापरली जातात, घरातील बायकांना ती रोज आपल्या वेण्यात माळता येतात आणि उरलेली बाजारात विकून मालकाला पैसे मिळतात! तुझ्या फुटकेपणाचे आम्हाला सर्वांना हा असा फायदा झाला आहे" गोष्ट संपली.
आहे की नाही गंमत! डोके वापरल्याने अडचणीतून मार्ग तात्याला सापडला. तुम्हालाही म्हणूनच नेहमी डोके वापरून जीवनात समाधानाचे पहिले पाऊल टाकता येईल.

२ दृष्टी बदला:
आपण एका विशिष्ट नजरेने कोणत्याही गोष्टीकडे व्यक्तीकडे पाहतो, प्रसंगाकडे पाहतो, ती दृष्टी आपण बदलली पाहिजे, अगदी वेगळ्या नजरेने त्या गोष्टीकडे पाहायला शिकले पाहिजे. अर्धा ग्लास पाण्याने भरलेला कुणाला दिसतो तर तोच कुणाला अर्धा रिकामा आहे असे भासते. वरील गोष्टीतही तात्याने मडक्याच्या फुटकेपणाकडू वेगळ्याच दृष्टीने पाहिले आणि वाईटातून त्याला चांगलेच फळ मिळाले.

एक छोटीशी गोष्ट:
 दोन जुळे भाऊ असतात, दुर्दैवाने, त्यांचे वडील दारुडे जुगारी व नालायक असतात. ह्यापैकी एका भावाच्या डोळ्यांना, वडिलांचे वाईट गुण हेच अनुकरण करणारे वाटले आणि तो फुकट गेला, तर दुसऱ्या डोळ्याने त्यांच्या वाईट गुणांकडे वेगळ्या दृष्टीने पाहिले आणि आपण जीवनात काय टाळले पाहिजे ते त्याला उमजले आणि तो जीवनामध्ये यशस्वी झाला.

शिक्षक व तीन विद्यार्थ्यांच्या बाबतीतली एक गोष्ट:  पाण्यातील पाठमोऱ्या माणसाकडे पाहण्याची प्रत्येकाची दृष्टी वेगळी असते ते सांगणारी. एकाला वाटले तो जीव द्यायला उभा आहे, तर दुसर्याला वाटले तो पाणी भरतोय तर तिसर्याला वाटले तो ओंजळीत पाणी घेऊन उगवत्या सूर्याला अर्घ्य देतोय! म्हणूनच नेहमी कोणत्याही प्रसंगाकडे व्यक्तीकडे गोष्टीकडे वेगळ्या दृष्टीने पाहायला शिका. "The beauty lies in the eyes of the beholder" हे म्हटलय ते किती चपखल आहे! दुःखातून सुखाचा त्रासातून समाधानाचा तुम्हाला नवा मार्ग मिळेल तो अशा दृष्टी बदलातूनच! म्हणून समाधानाचे दुसरे पाऊल अर्थातच दृष्टी बदला हेच आहे.

३ जीभ आवरा:
 जीभेमुळे माणसाला चव कळते. मसालेदार चटकदार गोड खाण्याचे सौख्य हे जीभेच्या सामर्थ्यामुळे द्विगुणित होते. मात्र कोणत्याही गोष्टीचा अतिरेक योग्य नव्हे ह्या न्यायाने जीभ जर आपण आवरली नाही तर आपले आरोग्य धोक्यात येऊ शकते, मधुमेहासारखा रोग चिकटून आपल्याला ग्रासून टाकू शकतो किंवा लठ्ठपणा आणि त्यातून नवीन तब्येतीच्या कटकटी जीवनामध्ये त्यामुळे निर्माण होऊ शकतात.

त्याच्या दुसर्या दिशेने पहा: आपण जीभेने बोलतो देखील, म्हणून जीभ न आवरता नको तिथे, नको ते एखाद्याला जर आपण बोललो तर आपल्यातले परस्पर संबंध बिघडू शकतात. वाद-विवाद त्यातून भांडणे वितुष्ट निर्माण होते ते असे जीढ न आवरल्यामुळे! आपल्या सर्व दुःखांचे, असमाधानाचे मूळ वा कारण बऱ्याच वेळेला तेच असू शकते. म्हणून समाधानाच्या प्राप्तीसाठी तिसरे पाऊल:
"जीभ आवरा"!

४ हाताने नेहमी देत रहा:
आपले हात हे देण्यासाठी आहेत तसेच घेण्यासाठी आहेत, परंतु आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की आपण जास्त देण्याचा विचार करायला हवा, घेण्याचा करू नये. जगामधले सर्वात उत्तम असे देणे कुठले असेल तर बाळंतपणात आई मुलाला जन्म देते ते होय! माणसाला एकदाच मिळणारे माणूसपणाचे जीवन ह्या सर्वोत्तम देण्यातून निर्माण होते हे लक्षात ठेवा. निसर्गाकडे पहा: काय दिसते तेथे तुम्हाला? एक बी पेरले की, झाड उगवते त्याला अनेक फळे येतात त्या अनेक फळातील बियांपासून पुनश्च अनेक झाडे फळे निर्माण होतात. अशा तऱ्हेने देण्याचे, भरभरून देण्याचे कार्य निसर्ग विविध रुपात अव्याहत, सातत्याने करत असतो. सूर्य  लाखो वर्षे अव्याहतपणे विश्वाला प्रकाश देत असतो, अखंड अव्याहत शक्ती देतो. पावसाच्या रूपाने निसर्ग अविरत जीवन देत असतो. अशी कितीतरी उदाहरणे सभोवताली दिसतील.

आपल्याजवळ असलेला एखादा चांगला विचार दुसऱ्यांना द्या, अधिक असलेला पैसा गरजूंना देऊन मदत करा, जिथे जिथे मदतीची गरज आहे, तिथे ती देता येणे तुम्हाला शक्य असेल, तर कुठलाही विचार न करता देत रहा. देण्याने जो आनंद मिळतो तो घेण्यात नाही. समाधानाचे मूळ खरोखर ह्या अशा देण्यात आहे. आपल्या करणीमुळे इतरांच्या हास्य चेहऱ्यावर हास्य समाधान होत असेल तर त्याहून कोणते देणे मोठे असेल आणि कोणता आनंद कोणता मोठा असेल? मी हा लेख लिहून तुमच्या जीवनात समाधान मिळवण्याचा मंत्र देत आहे आणि त्याचा मला खूप आनंद वाटतोय.
ह्याकरता ध्यानात ठेवा समाधानाचे चौथे पाऊल:
हाताने नेहमी देत रहा!

५ ह्रदया पासून प्रेम करा
माणसाला ह्रदय दिल दिले आहे ते चांगल्या विचारांवर प्रेम कराण्यासाठी, चांगल्या माणसांवर प्रेम करावे ह्यासाठी. आपल्याला पाच ज्ञानेंद्रिये दिली आहेत, ती जगातील सुंदर गोष्टींवर प्रेम करण्यासाठी! माणसाच्या सर्व दुःखांचे मूळ हे द्वेषात आहे, क्रोधात आहे हेवेदावे करण्यात आहे, त्यांचा त्याग करा. माणसांवर माणसांसारखे प्रेम करा. सुख समाधानाचे मूळ प्रेमात आहे. जीवनात आपल्याला मनापासून काय आवडते, काय केल्यामुळे आपणास खरेखुरे समाधान लाभते, त्याचा शोध घ्या. कुणाला चांगले सुर, संगीत आवडते, कुणाला निसर्गाचे भरभरून जागोजागी लुटले जाणारे अलौकिक निसर्गसौंदर्य पाहण्यात समाधान वाटते, कुणाला चांगले विचार ऐकायला तर कुणाला चांगले पुस्तक वाचायला आवडते. सुखी-समाधानी माणूस तोच की, ज्याला आपल्याला मनापासून आवडणाऱ्या आणि ज्या गोष्टी आपण करू शकतो त्या करता येऊ शकणाऱ्या आणि त्यांच्यावर प्रेम करता येते तो. आवडणाऱ्या गोष्टींवर म्हणून हृदयापासून प्रेम करा हे समाधान देणारे पाचवे पाऊल आहे.

६ मन नेहमी ताळ्यावर ठेवा:
जीवनामध्ये प्रचंड गती आली आहे, जिथे तिथे स्पर्धा आहे, रांगा आहेत. लांब पल्ल्याच्या अडथळ्यांच्या शर्यतीत सारखे सध्या माणसाचे जीवन अनिश्चित झाले आहे. ट्रॅफिक जॅम, बसगाड्यांना प्रचंड गर्दी, जिथे तिथे अडचणीच अडचणी, त्यांत आर्थिक मंदीचा फटका व्हीआरएसच्या स्वरूपात अधून मधून बऱ्याच जणांना बसतो, तर तरुण सुशिक्षितांना नोकऱ्या नाहीत. जिकडेतिकडे प्रश्नच प्रश्न, कूट समस्याच समस्या! घरात वृद्धांना थारा नाही, जो तो आपल्या घाईत आहे, आपापले प्रश्न सोडवायला धडपडतोय. अशा या परिस्थितीत, तोच टिकणार आहे जो ह्या बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतो. पाण्यात पडलो आहोत मग पाणी ते कसेही कितीही असले तरी पोहणे भाग आहे. सहनशक्ती वाढवणे हे अत्यंत गरजेचे आहे. प्रतिकूल तेच घडणार. त्याही परिस्थितीत आपणाला मार्ग काढायचा आहे. आपण तो निश्चित काढणार आहोत याचे आत्मभान ठेवा. कितीही बिकट कठीण प्रसंगाला चक्रव्युहात अडकल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली तरी डगमगू नका, मन ताळ्यावर ठेवा. ज्याची मनशक्ती श्रेष्ठ, तोच आजच्या युगात टिकणार आहे. जीवनाला अर्थ देऊ शकणार आहे. ही खरोखर सारी तारेवरची कसरतच आहे. भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे, मन ताळ्यावर ठेवून स्थितप्रज्ञ राहणे अत्यावश्यक बनणार आहे.  म्हणून जीवनात शांती समाधान मिळविण्यासाठीचे 6 वे पाऊल आहे: मन नेहमी ताळ्यावर ठेवा. मनच तुमचे भविष्य घडवत असते. मनगटाच्या शक्तीपासून मशीनच्या शक्तीच्या जोरावर जग इथवर येऊन पोहोचले आणि आता आहे कसोटी मनाच्या शक्तीची, ह्याचे भान ठेवा.

 ७ पायाने नेहमी पुढे चालत राहा:
थांबला तो संपला ही म्हण कधी नव्हे ती, आजच्या युगात खरी ठरत आहे. मागे वळून बघायचे ते क्षणभरच, काय बरोबर केले वा काय चूक ह्याचा केवळ आढावा घेण्यासाठी. भूतकाळ बरा-वाईट कसाही असो, आज त्याचा उपयोग नाही, सतत पुढे पुढे जायला हवे. पायाने जमिनीवर राहून नेहमी उज्ज्वल भवितव्याकडे चालत राहा. नवा मार्ग नवीन दिशा शोधत रहा. जीभ आवरण्याचे जसे दोन फायदे, तसेच या पायाने चालत राहण्याच्या सातव्या पावला मध्ये आहेत: एक म्हणजे पायांना आणि आपल्या आरोग्याला फिरण्यासारखा उत्तम व्यायाम नाही. त्यामुळे तब्येत तंदुरुस्त राहण्यासाठी पायाने नेहमी चालत राहा, दुसरी बाजू म्हणजे नेहमी सकारात्मक उत्साहवर्धक विचार करून भूतकाळात न रमता, भविष्याकडे बघा. जीवनात शांती समाधान मिळवण्यासाठी चालत राहा, आपले कर्तव्य पूर्ण करायची पराकाष्टा करा.

अशा तऱ्हेने समाधान प्राप्ती साठीचे मंत्र व सप्तपदी सांगून झाले.आता फक्त स्वत:साठी दोन प्रश्न: एक नेहमी विचारला पाहिजे आणि दुसरा प्रश्न कधीही मनात आणायचा नाही असा! कायम प्रश्न विचारायचा तो असा: स्वतःला आता मी जे काय करतो आहे त्याचा इतरांना दुसऱ्या कोणाला त्रास तर होत नाही ना? आणि न विचारण्यासारखा प्रश्न म्हणजे  मी जे काय करतो त्यात मला काय मिळणार माझा फायदा काय हे विचारायचं नाही हा! गीतेमध्ये सांगितले आहे:
"कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन"
ते कायम ध्यानात असू द्या. आपले कर्तव्य सातत्याने करत राहा. शांती व समाधान तुमच्याकडे आपण होऊन येईल.
"शुभम् भवतु"!
सुधाकर नातू

ता.क.
माझा you tube channel:
moonsun grandson
ही लिंक save करा.......आणि पहा....
विविधांगी उपयुक्त विडीओज्....

https://www.youtube.com/user/SDNatu

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा