"नव्या दिशा, नवे मार्ग अन् ताजेतवाने विचार-१":
चालण्यासारखा दुसरा कुठला, चांगला व्यायाम नाही, दुसरी कुठली चांगली तपस्या नाही. कारण आपण चालताना, क्षणाक्षणाला सभोवतालचे वातावरण जसे बदलत असते, तसतसे आपल्या मनांतले विचारही बदलत असतात. अशावेळी आपण एकटेच असलो तर सोन्याहून पिवळे, कारण त्यावेळी आपणच आपले असतो, आपण एकाग्रतेने पुढचा मार्ग शोधत चालत जात असतो. स्वत:शी स्वत: संवाद साधण्यासाठी ही व हीच वेळ योग्य असते.
पाण्यामध्ये तुरटी फिरवल्यावर, वरती पाणी स्वच्छ पारदर्शक निर्मळ जसे राहते अन् गाळसाळ जसा तळाला जातो, तसं चालताना आपलं मन पूर्ण मोकळं होतं, प्रसन्न होत असतं. काल काय केलं, काय झालं वा काय निर्णय घेतले, काय निर्णय घेतले नाहीत, काय निर्णय घ्यायला नको होते असे आणि आपली पुढची वाटचाल कशी असावी अशा अनेक प्रश्नांचे मोहोळ पिंगा घालतात व त्यांची उत्तरे पाहता पाहता सुटतही जातात, जावू शकतात....
अशावेळी आपणच आपले आपल्याच आरशात चित्र पहात असतो, बाहेरच्या जगातील स्पर्धात्मक जीवनाचा संग्राम तर आपल्याला सामना करायला बोलवत तर असतोच, पण त्या मोजक्या क्षणी आपण त्या सार्यापासून दूर होत, स्वतंत्र विचार करू शकतो. अशाच वेळी आपल्याला "नव्या दिशा नवे मार्ग किंवा ताजेतवाने विचार", कल्पना सुचत जातात किंवा जाऊ शकतात.....
कुठे फिरता हे महत्वाचे नसते. सध्याच्या कसोटीच्या काळात तर, घरातल्या घरात जरी फिरलात, तरी चालू शकते. चालण्यासाठी सूर्योदयानंतरची वेळ तर सर्वोत्तमच. दिवस कसा गेला हे पाठीमागे असतं आणि आता दिवस कसा घालवायचा ते आपल्या समोर असतं. त्यामुळे नेहमी असे चालत रहा, फिरत रहा, नवनवे मार्ग नव्या संधी शोधत राहा आणि आपल्या जीवनात सुखदुःखाचे क्षण असेच टिपत रहा.....
जसा माझा, आजच्या सकाळी चालताना सुचत व रुचत गेलेला हा ह्रदयसंवाद!
सुधाकर नातू
ता.क.
माझा you tube channel:
moonsun grandson
ही लिंक save करा.......आणि पहा....
विविधांगी उपयुक्त विडीओज्....
https://www.youtube.com/user/SDNatu
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा