"ह्रदयसंवाद-३१": "शुभस्य शीघ्रम् क्षणाक्षणांतच रंग भरा !"
आपल्याला चांगलं जमणारं आणि आवडणारं, असं काही करायला मिळणं, याच्यासाठी कदाचित भाग्य लागत असावं. कारण तशी संधी मिळणारे, ती न मिळणाऱ्यांपेक्षा, कां, कुणास ठाऊक, आपल्याला नेहमीच कमी असलेले आढळून येतात.
तुमच्या अंगात काही कला असते, तुमची बुद्धिमत्ता तल्लख असते, कुठली ना कुठली तरी आवड वा छंद, अशा कितीतरी गोष्टी तुमच्याजवळ असतात. पण प्रत्यक्ष जीवनात मात्र खडतर असं, जे कदाचित भलतच, तुम्हाला जे जमत नाही किंवा जे आवडत नाही, तेच कधीकधी पुष्कळदा करायची तुमच्यावर वेळ येते. नीट विचार केलात, तर अशी अनेक उदाहरणं तुम्हाला तुमच्या अवतीभवती आढळतील. त्यातीलच काही वानगीदाखल प्रथम सांगतो:
# ह्या माणसाची बुद्धिमत्ता खरोखर दृष्ट
लागण्याजोगी. हा खरं म्हणजे एखादा मोठा शास्त्रज्ञ किंवा चांगला इंजिनियर झाला असता. पण प्रत्यक्ष जीवनात मात्र त्याच्यावर खर्डेघाशी करायची वेळ आली.
# दुसरं एक उदाहरण, बघितलं तर याच्या आवाजात उमाळा, ह्रदयांत जिव्हाळा आणि एकंदरच संगीताची तालासुरांची उत्तम जाण असलेला हा माणूस. खरं म्हणजे तो एक चांगला गायक संगीतकार होऊ शकला असता. पण याच्यावर वेळ कुठली आली, तर एखाद्या कारखान्यात निळा बाँयलर सूट घालून कामगार म्हणून जगायची !
# शालेय जीवनापासून या माणसाला खेळांची खूप आवड. त्यातल्या त्यात क्रिकेट हा त्याचा जीव की प्राण. सलामीचा फलंदाज म्हणून उत्कृष्ट अशी त्यांची कामगिरी असे. कॉलेजला कसं बस जायला मिळाल्यावर आपल्याला पुढे येता येईल असे वाटत असतानाच अचानक काही कौटुंबिक अशा घटनांमुळे शिक्षण सोडून, त्याला कुठेतरी पेढीवर नोकरी करायची वेळ आली आणि नंतर कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये तो इतका व्यग्र झाला की खेळ आणि क्रिकेट त्याला पारखे झाले. एका उत्तम सलामीच्या फलंदाजाला आपण मुकलो, असे वाटण्याइतपत गुणवत्ता त्याच्याजवळ होती.
# हा माणूस बालपणापासून बोलण्यात चिंमखडा आणि वाद-विवाद वक्तृत्व स्पर्धा यामध्ये कायम शाळेमध्ये बाजी मारणारा, तो विचार व्यवस्थित करून तर्कशुद्ध योग्य त्याच भाषेत कुठलिही बाजू मांडण्याचे, त्याचे कौशल्य वादातीत होते. त्यामुळे सगळ्यांना वाटायचे की तो उद्या चांगला वकील होणार. पण कसचे काय? अभ्यासांत त्या मानाने नेहमी मागे पडणारा, उगाचच उनाडक्या करणारा हा माणूस मॅट्रिकची परीक्षा काही पार करू शकला नाही. अनेक वेळा त्याचे प्रयत्न फोल ठरले. अखेर कुठल्यातरी दुकानांमध्ये पुड्या बांधत आयुष्य काढायची याच्यावर वेळ आली. कुठली आवड, कुठले कौशल्य आणि कुठले ते त्याचं वकील होणं !
ही केवळ आठवली म्हणून काही प्रातिनिधिक उदाहरणं. आपल्याला जे जमत नाही, आवडत नाही, तेच पुष्कळांच्या आयुष्यात करायची वेळ आलेली आपण बघतो. हे असं कां व्हावं? काही मोजक्याच जणांना आपल्या अंगचे गुण दाखवून, पुढे यायची संधी व काम मिळावे? असे प्रश्न त्यामुळे आपल्या मनात नेहमीच पिंगा घालत असतात. हे कुठल्या जन्मीचे भोग वा प्रारब्ध?
पण हे सारं मला सुचलं कधी? तर
लाँकडाऊनच्या काळात, कां? तर आत्ताच या
सहा महिन्यात मला लेखन, बोलणं, विचार निर्माण करणं, आवडतं याचा शोध लागला आणि त्याप्रमाणे मला करावसं वाटलं. मी मुक्तपणे ते करत गेलो व करतही राहणार आहे. ब्लॉगवर लेख, moonson grandson ह्या माझ्याyou tube चँनेलवर विडीओज्, whatsapp वर ध्वनीफिती असे माझे नवनव्या कल्पना व विचार ह्याचे रतीब मी घालत आहे. भरघोस प्रतिसाद मिळत असल्याने मला प्रोत्साहन आपोआपच मिळत आहे.
पण ही अशी मला भावणारी, बर्यापैकी जमणारी कामे करायची वेळ, मला माझ्या आयुष्याच्या संध्याकाळी मिळाली, हेही विसरता येणार नाही. आपल्याला आवडतं, आनंद देतं, असं काहीतरी आत्ता कां होईना, मला करायला मिळतंय हेही नसे थोडके. सहाजिकच ज्यांना तसं काही कधीच मिळत नाही, त्यांची मला आज आठवण झाली. त्याचेच फलित म्हणजे हा ह्रदयसंवाद.
आज नामवंत झालेल्या आणि आपापल्या क्षेत्रात खरोखर दिग्गजासारखी कामगिरी करणाऱ्या, मंडळींचा तुम्ही जर विचार केलात, तर तुम्हाला लक्षात येईल की, त्यांना ही स्वतःतील गुणवत्तेची खुबी आणि आपल्याला काय आवडतं काय जमतं याचा शोध लागला असावा असतो. त्यानंतर ते संधी शोधतात, संधी मिळाल्यावर त्यांचा पाठपुरावा करत अहर्निश कष्ट घेत, आपली योग्यताही ते सिद्ध करतात. त्यामध्ये अर्थातच त्यांचा सगळ्या बाजूने फायदा होतो, आवड जपली जाते, व्यवसाय मिळतो प्रसिद्धी आणि अर्थातच उत्तम अर्थार्जनही त्यांचे होते. अशाच आजच्या पुष्कळशा सेलिब्रिटीज निर्माण झालेल्या तुम्हाला दिसतील.
# सेलिब्रिटींचा विषय काढता काढता, अचानक मला आठवलं, आमच्याच ओळखीच्या एका गृहिणीचं उदाहरण. या बाई लहानपणापासून आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडत, संसाराला लागल्या आणि मुलं मोठी झाल्यावर पन्नाशी आली अन त्यांना आपल्या लहानपणची चित्रकलेची आवड आठवली. तिचा त्यांनी इतका प्रचंड पाठपुरावा नंतर केला की, त्यांची चित्रं आणि त्यांची प्रदर्शनं, जागोजागी भरली जाऊ लागली. आज त्यांना फुरसत नाही आणि त्यांच्या प्रदर्शनांमधून, त्यांना नाव तर मिळाले, परंतु आवडीचं असं काहीतरी उशिरा कां होईना, आपण करू शकतो, याचं अंतरी समाधान व आनंद प्राप्त झाला.
# याच विचारांच्या ओघात, मला आमच्या ऑफिसमधल्या दोन मित्रांची गोष्ट आठवली. चांगली नोकरी करून नंतर निवृत्तीनंतर, एकाने जपानची ओरिगामी कला आत्मसात केली आणि त्यातच त्याचे मन रमले. त्या कलेचे प्रयोग करायला लागला आणि त्यातच आपला आनंद मिळवायला लागला. दुसरा नोकरी संपल्यावर पूर्वीची त्याची आवडीची अशी गोष्ट म्हणजे जादूचे प्रयोग करणे. त्यामध्ये त्यांने लक्ष घातले आणि जागोजागी तो जादूचे प्रयोग करायला लागला. थोडक्यात आपल्याला जे आवडतं, तेच करायचं असेल त्यासाठी अमूकच वेळ लागते असं नाही. तुम्ही विचार करून शोध केव्हाही घेऊन त्यात पारंगत होऊ शकता, एवढेच म्हणायचे. अर्थातच तशी तुमची इच्छा व प्रेरणाही हवी.
अजूनही एक गोष्ट ध्यानात आली, ह्या नाण्याची दुसरी बाजू. ती अशी असू शकते की, खूप थोडे जण आपल्याला काय आवडतं, काय जमतं याचा अंतर्मुख होऊन, कधी स्वतःशी संवाद साधत, प्रयत्नपूर्वक शोध कधी घेत असतील. जे असा शोध घेतात आणि त्याच्या पाठीमागे लागून काहीही करून पाठपुरावा करतात, त्यांना आज ना उद्या अशा संधी मिळणार, यात शंका असू नये.
याकरता सांगतो, वेळ गेलेली नाही. वेळ कधीही अशी फुकट जात नसते. आजच, नव्हे आत्तापासूनच शोध घ्या, तुम्हाला काय आवडतं, काय चांगलं जमतं त्याचा. त्यासाठी काय करायला लागेल, कसं ते जमून येईल, याचाही मागोवा घ्या. असं केलं तर तुमचं तुम्हाला स्वतःचं आत्मसमाधान आणि आत्मानंद मिळणं दूर नाही.
म्हणून,
"शुभस्य शीघ्रम् क्षणाक्षणांतच रंग भरा !"
सुधाकर नातू
ता.क.
असेच एकसे बढकर एक वाचनीय २०० हून अधिक खुसखुशीत व वैविध्यपूर्ण लेख वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगची लिंक सेव्ह करा......
http://moonsungrandson.blogspot.com
आणि
माझा you tube channel:
moonsun grandson
ही लिंक save करा.......आणि पहा....
विविधांगी उपयुक्त विडीओज्....
https://www.youtube.com/user/SDNatu