शुक्रवार, ३१ जुलै, २०२०

"आजोबांचा बटवा-९": "हे प्रणयगंध किती अनंत-३":


 "आजोबांचा बटवा-९":
"हे प्रणयगंध किती अनंत-३":

"अधुरी ही प्रेमकहाणी":

मी आज ४८ वर्षांची आहे अन् तरीही लग्न केलेले नाही, आश्चर्य वाटावे अशीच ही गोष्ट आहे. मी वडिलांची एकुलती एक मुलगी अन पाठीमागे दोन भाऊ. मला चांगली नोकरी आणि रूपही चारचौघींसारखे. तरीही मी विवाह वेदीवर चढले नाही, त्याचे कारण फक्त मलाच माहित आहे.

लहानपणापासून ज्याच्याबरोबर वाढले तो चंदू माझ्या मनाचा सम्राट. मी खूप शिकले, पण तो मॅट्रिकच्या पुढे जाऊ शकला नाही. पण त्याचे कुरळे केस गोरा वर्ण, देखणे रुप आणि बेफिकीर वृत्ती यावर मी मोहित झाले. आमच्या घरी त्याच्याशी लग्न करायला परवानगी मिळणे शक्यच नव्हते. दुरूनच अबोल प्रेम आम्हा दोघात अंकुरत गेले मी नोकरीत खूप बढती मिळवत होते, तरी पण चंदूचे कुठेच काही खरे नव्हते. कुठलासा टर्नरचा कोर्स केला होता, त्यामुळे काही महिने त्याला तात्पुरती नोकरी मिळात असे, तर बाकी सर्व काळ बेकारी. सहाजिकच मोकळ्या वेळात लागणारी सारी वाईट व्यसने त्याला लागली.

पण अशी सारी विपरीत स्थिती असुनही, काही केल्या माझ्या मनातून अन् स्वप्नातून चंदू जात नव्हता. त्याच्याही मनातून मी काही हलत नव्हते. वडील भावा बरोबर एका खोलीच्या घरात तो राहतो. त्याची वहिनी काहीशी वेडसर आहे. त्यामुळे तो त्या घरात मला पत्नी म्हणून घेऊन जायला तयार नाही. कां? तर त्या सार्‍या वातावरणाचा मला त्रास होऊ नये म्हणून! इतकी त्याला माझ्या विषयी काळजी आहे. शिवाय बायको वेडसर असूनही तिच्यावर मनापासून प्रेम करणारा मोठा भाऊ असल्यामुळे त्याचा आदर्श चंदू पुढे आहे.

घरातून पळून जाऊन त्याच्याशी लग्न करायचीही माझी तयारी होती आणि त्याच्यापाशी चार जणांच्या कुत्सितत हल्ल्याला तोंड द्यायची धमक होती. एवढेच काय माझ्या पैशातून कर्ज काढून कुठेतरी ब्लॉक घेऊन संसार काढणे अशक्य नाही, हे ही मी त्याला पटवून देत आले आहे. पण अत्यंत मानी स्वभावाचा चंदू त्या गोष्टीला तयार नाही. तो म्हणतो 'नंदा, मी असा जरी सध्या असा फाटका असलो तरी, एक ना एक दिवस मी माझे विश्व उभे करीन. माझ्या धमक आहे, मी स्वतःच्या कष्टाने खूप पैसा मिळवेन यशस्वी होईन आणि तेव्हाच माझ्या नंदुराणीला स्वतंत्र घरात घेऊन जाईन, तरच खरा चंदू!'

त्याच्या अशा स्फूर्तीदायी वाक्यांवर मी विसंबून आहे, स्वप्ने बघत आहे, माझे सारे स्त्रीत्व जपले आहे ते त्याच करता, जेव्हा चंदूच्या घरात उंबरठा ओलांडून मी जाईन तेव्हा. पण तो क्षण मात्र मला वर्षानुवर्ष वाकुल्या दाखवतो आहे. बरोबरीच्या मुलींची लग्ने होऊन त्या स्वतः आता काही वर्षांनी सासुबाई होतील इतक्या अवस्थेत पोहोचल्या आहेत आणि मात्र मी? मी मात्र वाट नाही, गाडी चुकल्यासारखी एकाच ठिकाणी उभी आहे. साऱ्या कुटुंबियांच्या भावना दुखवत, समाजाच्या विचित्र नजरांना टोमण्यांना तोंड देत, शरीराच्या सुलभ, हळूवार भावना आपल्या मनातल्या मनात जाळीत, माझ्या चंदुकरीता, आमच्या अबोल प्रीतीकरिता....
आमचे जमले या जन्मी, तर ठिकच. नाही तर मी अनंतकाळपर्यंत, अगदी पुढच्या जन्मापर्यंत वाटच पाहत राहणार आहे.....

हा सारा तिचा अट्टाहास कां? कशाकरिता?
हा असा कसा मनस्वी अन् तपस्वी प्रणयगंध?

सुधाकर नातू

( ही कथा 'रोहिणी' मासिक जून १९८३ च्या अंकात प्रकाशित)

ता.क.
ता.क.
असेच चित्ताकर्षक साहित्य आणि तसेच १५० हून अधिक वैविध्यपूर्ण लेख वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगची लिंक आहे:

http://moonsungrandson.blogspot.com

संग्रही जरूर ठेवून शेअरही करा.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा