सोमवार, २० जुलै, २०२०

"आनंदाने जगा':

'आनंदाने जगा':

आनंदाने जीवन जगणं ही एक कला आहे. सुख व दुःख हे व्यक्तीसापेक्ष किंवा एखाद्या गोष्टीकडे बघण्याच्या दृष्टिकोनावर ठरते. नित्य काहीच नसते, सुख व दुःख आलटून-पालटून क्रमाने येतच असते. एक ध्यानात घ्या, की आनंद तुम्हाला अनेक विविध गोष्टीतून वेचता येत असतो. वाचन, चिंतन, कलाविष्कार किंवा व्यक्तीच्या कर्तृत्वाच्या संघर्षातून, उत्कर्षाच्या कहाणीतून, प्रवासातल्या अनुभूतीतून व निसर्गाच्या गूढरम्यतेमधून, अनेक गोष्टी तुम्हाला आनंदाचा अनुभव देऊ शकतात. पण आनंद कोठून कसा मिळवायचा, हे ज्याच्या त्याच्या उपजत वृत्तीतूनच ठरते.

आपण म्हणूनच आपले आनंदक्षण निवडायचे वेचायचे आणि अनुभवायचे. अशा आनंददायी अनुभवातूनच आपले जीवन अर्थपूर्ण व समृद्ध होत असते. फुले वेचीत जावे तसे हे आनंदक्षण रोज आस्वादत जायचे आणि दररोज सकाळी कालचे तीन-चार आनंदानुभव रोजनिशीमध्ये नियमाने लिहायची सवय लावून घ्या. बघा काय सकारात्मक बदल तुमच्या जीवनांत होतो ते! शेवटी, एक मंत्र सर्वात महत्वाचा, आपल्याकडे काय नाही, ह्याची खंत करण्यापेक्षा, आपल्याकडे काय आहे, ह्याचा शोध घ्या. ही गोष्ट आजपासूनच, ह्या क्षणापासून सुरुवात करा आणि आनंदाने जगायला शिका.

'चांगुलपणाची साखळी':
अचानक आपण कधी मधी, अडचणीत सापडतो. प्रवासात तर अशी वेळ खूप वेळा येते किंवा दररोजच्या जीवनसंघर्षाच्या रहाट गाडग्यात, आपला मार्ग सुलभ व्हावा म्हणून कुणीतरी न मागता व काहीही परतफेडीची अपेक्षा न ठेवता मदत करून जाते व आपली अडचण संकट व दररोजचा आटापिटा कमी होतो किंवा त्याने दिलेल्या संधीमुळे आपला फायदा होतो प्रगती होते यालाच चांगुलपणा म्हणतात.

कधीतरी याच विषयावरचा एक लेख वाचला होता, चांगुलपणाची एक अनोळखी साखळी असते, हे मांडणारा! मग मनात विचार आला की, असे चांगुलपणाचे अवतार प्रत्येकाच्या जीवनात कधी ना कधी येतच असावेत.

मला आठवले, माझ्या बालपणी सायन ते दादरला शाळेत जाताना मला अधून मधून, आमच्या परिसरातील एक डॉक्टर न चुकता त्यांच्या हिल्मन गाडीतून सोडत असत. त्यांचा मुलगाही त्याच शाळेत माझ्याच बरोबर होता, हे जरी खरे असले, तरी मला ती एक प्रकारे चांगुलपणाने केलेली मदतच होती. पुढे शिक्षण घेताना असे चांगुलपणाचे अनेक प्रकार आढळले. शाळेतही माझे इंग्रजी चांगले व्हावे, म्हणून वडिलांचाच एक स्नेही शिक्षक मला कोणतीही फी न घेता शिकवत असत.

नंतर कॉलेजमध्येही गणितामध्ये किचकट अशी गणिते सोडवायला कॉलेजमधल्या प्राध्यापकांनी आपण होऊन मदत केली. इंजिनिअरिंगला, मशीन ड्राँईंग सारखा मला किचकट वाटणारा विषय, ज्यात मी एकदा नापास झालो होतो, अशा वेळेला माझ्या वडीलांच्या एका मित्राने, मला न चुकता तो विषय चांगल्या प्रकारे समजावला आणि मी पास झालो.

फार कशाला दररोज न बोलता न चुकता सकाळी वेळेवर चहा, नंतर नाश्ता ठराविक वेळी भोजन, घरातली टापटीप आणि एकंदरच मुलांचे संगोपन ह्या सगळ्या संसारांच्या जबाबदार्यांत, माझ्या सौभाग्यवतीचा जो काही सिंहाचा वाटा कायमच लाभला आहे, तो देखील चांगुलपणाच्या साखळीतला एक दुवा नव्हे कां?

तसेच नोकरीमध्ये माझ्यातले गुण हेरून मला लेखनाची चांगली संधी मिळावी, म्हणून आमच्या क्षेत्रातल्या असोसिएशनच्या मासिकामध्ये संपादकीय सल्लागार म्हणून, आमच्या कंपनीतर्फे माझ्याच एका वरिष्ठाने शिफारस केली, हासुद्धा, एक चांगुलपणाचा प्रकार. तसंच मला चांगल्या व्यवस्थापकीय पदव्युत्तर पार्ट टाईम मास्टर्स कोर्समध्ये माझी निवड झाली, तेव्हा कंपनीतील दुसऱ्या एका वरिष्ठाने कंपनीतर्फे मला प्रायोजित केले. तेही चांगुलपणाचेच लक्षण नव्हे कां?

माझ्या पहिल्या वहील्या अन् एकमेव पुस्तकाला-"प्रगतीची क्षितीजे", महाराष्ट्र शासनाचा शैक्षणिक विभागातील सर्वोत्तम पुस्तकाचा पुरस्कार मिळाला. हयामागे एका प्रकाशक पत्रकाराने दिलेले प्रोत्साहन व मार्गदर्शन कारणीभूत होते. त्यांचा हा चांगुलपणा मी कसा व कां म्हणून विसरेन?

थोडक्यात जीवनामध्ये कोणी ना कोणीतरी अचानक भेटते आणि आपल्याला मदत करून जाते. माझी व्यवस्थापकीय प्रशिक्षण देण्याची कला, अशाच एका दुसऱ्या संस्थेतील वरिष्ठाने, स्वत:हून जाणून घेतली आणि त्याने मला अनेक ठिकाणी प्रशिक्षणाचे कार्यक्रम दिले. खरं तर त्याची माझी ओळखही नव्हती, पण मी ज्योतिष बघायचो आणि अशाच एका गृहस्थाने ज्याची पत्रिका मी बघितली होती व सल्ला दिला होता, त्याच गृहस्थाचा हा वरिष्ठ मित्र होता आणि तेवढ्या दुव्यावर मला फार मोठ्या संधी, प्रशिक्षण देण्यासाठी लाभल्या. माझ्या सर्वांगिण जडणघडणीत, ह्या अवचित मला लाभलेल्या चांगुलपणाच्या साखळीमुळेच मी आयुष्यात चांगली प्रगती करू शकलो, मानसन्मान मिळवू शकलो.
चांगुलपणाची ही साखळी, आपणही दुसर्यांना तशीच मदत करून कायम अभेद्य व वाढती ठेवली पाहिजे.
चांगुलपणाच्या अशा साखळीमुळेच मला आठवला:
"समाजकारणाचा मतितार्थ":
समाजकारण हया शब्दांतच तयाचा मतित़ार्थ वा प्रयोजन दडलेले आहे. समाजासाठी, समाजोप़योगी कृत्य, निरपेक्ष बुद्धिने करत रहाणे. सामाजिक, शैक्षणिक,आरोग्य, वैचारिक अशा अनेक क्षेत्रांत अनेक व्यक्ति निरलस प्रवृत्तीने काम करत असतात.

माझ्या परिचयांतील एक मुलबाळ नसलेले ग्रहस्थ, पत्नीचे निधन झाल्यानंतर गेली ३०/३५ वर्षें अनाथ बालसंगोपनासारखे काम, तन मन धन अर्पण करून आवडीने पुढे नेत आहेत. आज त्यांनी पेरलेले हे रोपटे वटवृक्षाइतके मोठे झाले आहे. अशी माणसे आज काल दुर्मिळ होत चालली आहेत.

ही सर्वस्व ओतून समाजोप़योगी कामे करणारी माणसे वेगल़्याच मातीची बनलेली असतात. आपण आपल्या जीवनांत काही तरी अर्थपूर्ण आणि इतरांना ऊपयुक्त काम केले पाहिजे, अशी आस त्यांच्या मनात निर्माण होत असावी. पुढे ही माणसे त्यातून काय आपल्याला मनापासून आवडेल, तसेच जमेल, तशा निवडीनूसार ही माणसे दुसर्यांच्या गरजा, व्यथा आपल्याच मानून मनापासून काम करत असतात. अशा देवमाणसांना माझे शतश: प्रणाम!

शेवटी जाता जाता मनात विचार येतो, की असे त्यागमयी कार्य करणारी देवमाणसे ज़र आजच्या मतलबी राजकारणात येणे,ही काळाची नितांत गरज आहे1

शेवटी सांगावेसे वाटते ते,
"समाधानाचे रहस्य":
जीवनशैली, माणसापाशी असलेल्या ऐहिक साधन संपत्तीच्या मोजमापावरून, कधीही ठरवली जाऊ नये; तर ती त्याच्या विचार, वर्तुणुकीवरुन, सभोवतालच्या जगाकडे बघण्याच्या, त्याच्या द्रुष्टिकोनांतून आजमावली जाणेच इष्ट आहे.

जीवनामध्ये तीच माणसे खरीखुरी सुखी व समाधानी, ज्यांना आपल्याला आवडणार्या गोष्टी, निर्धोकपणे सातत्याने करावयाची संधी मिळते. त्यांत कलावंत व खेळाडू ह्यांचा अग्रक्रम असतो.

धन्यवाद
सुधाकर नातू
ता.क.
माझ्या ब्लॉगवर 250 हून अधिक असेच वाचनीय व वैविध्यपूर्ण लेख वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगची लिंक आहे:

http://moonsungrandson.blogspot.com

ह्या शिवाय.......
विचारमंथन, रंगभूमी, साहित्य, मालिका व चित्रपट तसेच ज्योतिष अशा विविधरंगी विषयांवरचे विडीओज् पहाण्यासाठी........

माझ्या You tube वरील...
moonsun grandson चँनेल:
ही लिंक उघडा.......शेअरही करा......

https://www.youtube.com/user/SDNatu

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा