"आजोबांचा बटवा-८":
"हे प्रणयगंध किती अनंत-२":
विश्वाच्या संक्रमणातून मानव उत्पन्न झाल्यानंतर, शरीराबरोबर त्याला देण्यात आलेले तरल मन हा त्या विश्वंभराच्या सामर्थ्याचा परमोच्च बिंदू होय. स्त्री-पुरुषांच्या मनाच्या अनंत संवेदनांपासून चित्रविचित्र प्रणयगंध फुलत राहिले. संस्कृतीच्या विकासातून निर्माण झालेल्या विवाह रूढीने या प्रणयगंधांना जखडून ठेवण्याचा प्रयत्न अपुरा ठरला, इतके हे पाश अतिविशाल आणि गूढ रम्य आहेत. त्यांना स्थळ-काळ, वय, जात-पात नातीगोती कशाकशाचे म्हणून बंधन मान्य नाही.
दोन व्यक्ती एकमेकांना कां आणि कधी आवडाव्यात कराव्यात, हा एक अनाकलनीय प्रश्न आहे.
मनाच्या गाभार्यात त्यामुळे अनेक कल्लोळ जन्मतात. जितक्या व्यक्ती, तितक्या मनोहारी त्यांच्या अभिव्यक्ती. दोन व्यक्ती एकमेकांना कां कधी आवडाव्यात याला उत्तर नाही. कुणाला एखादीचे हास्य मोहित करते, तर कुणाचे बालिश डोळे, एखादीचा ठाव घेतात, कुणाचा भोळाभाबडा स्वभाव एखादीला आवडतो, तर एखादीच्या अनुकंप अवस्थेतून सहानुभूती मधून प्रणय भावना फुलत जाते. किती किती म्हणून हे प्रणयगंध आठवायचे !
"स्मृतिची ती उलगडता पाने":
तीन-चार दशकांपूर्वी काही नियतकालिकातील माझे प्रकाशित साहित्य चाळत असताना, अचानक ह्या माझ्या तीन रचना मला गवसल्या.
प्रणयभावनेच्या शोभादर्शकासारख्या बदलत्या रंगसंगतीचे हे तीन चित्तथरारक काव्यमय आविष्कार:
त्या इथे देत आहे....
"सीमोल्लंघन"!:
हे प्रणयगंध किती अनंत.....
अनंगरंगी हे अनंगरंग....
विविधरंगी ते भावतरंग....
शब्दांचे ते झेल.....
नजरेचे हे खेळ.....
भावनांचे ते वेल.....
वासनांचे हे मेळ......
आज मर्यादांचे सीमोल्लंघन.....
करिती सर्वस्वाचे समर्पण.....
दोन जीवांचे मीलन ज्वलंत.....
हे प्रणयगंध किती अनंत.....
###################
"कां?... कां?...कां?...."
भोग, भोगून भागतो कां?
योग, जुळवून जुळतो कां?
राग, रागवून रहातो कां?
प्रीत, रीत जाणते कां?
गीत, गाऊन संपते कां?
वाट, पाहून दमतो कां?
याद, विसरून चालते कां?
वाद, वदवून विझतो कां?
गंध, घेऊन उडतो कां?
नाद, निंदून सुटतो कां?
पाप, पचवून पचते कां?
चाल, चालून चुकते कां?
काळ, कळवून येतो कां?
###################
"शोध":
उधळूनी अनंगाचे अनंत रंग....
घेऊनी सहवासाचे विविध सुगंध....
शोधिता परी मिळेना.....
प्रीतीची सरी जुळेना....
असे कां, ती भावनांची असोशी....
कां, ती मुळी वासनांची कासाविशी.....
काहीच, मुळी कळेना.....
तार,कशी ही जुळेना....
अन्
येशी अवचि जीवनी.....
तिला नकोशी, मला हवीहवीशी....
खूपता मज, आसवे तव लोचनी....
सुयश तव, सुहास्य मम आननी..
अन्
गवसे, सहजी अर्थ..
एकमेका देई दर्द....
प्रीतिचा हाचि रे गर्भ.....
आपुलकीचे सारे मर्म......
सुधाकर नातू....
###################
ता.क.
असेच मननीय लेख आणि तसेच ३५० हून अधिक वैविध्यपूर्ण लेख वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगची लिंक आहे:
http://moonsungrandson.blogspot.com
संग्रही जरूर ठेवून शेअरही करा.....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा