मंगळवार, २८ जुलै, २०२०

"आजोबांचा बटवा-७": "आगे बढो वसंतरावजी":


 "आजोबांचा बटवा-७":
"आगे बढो वसंतरावजी":

प्रा. वसंतराव कानेटकर यांच्या नाटकांची पंचविशी. १ मे १९७९ चा तो दिवस, प्रख्यात नाटककार वसंतराव कानेटकरांच्या पंचविसाव्या नाटकाचा, शंभरावा प्रयोग: 'चंद्रलेखा' प्रकाशित 'गोष्ट जन्मांतरीची' चा.

हा असा अद्भुत सोहळा साजरा करायचे, हे नशिबी यायला आपणही तसेच अद्भुत असावे लागते. मराठी रंगभूमीच्या इतिहासात मध्यरात्रीच्या नाट्यप्रयोगांची पहाट सुरू करणारी शनिवारवाड्याचे दरवाजे त्याच्या 'स्वामी' साठी उघडणारी, एकाच दिवसात एकाच नाटकाचे चार प्रयोग करून धमाल उडवणारी आणि हे पुरे नाही, म्हणून की काय, पाण्यावर नाट्यप्रयोग करण्याचा सन्मान मिळवणार्या 'चंद्रलेखा' या अद्भुत नाट्यसंस्थेच्या भाळी हा हृदयंगम अनुभव साजरा करणे होते.

तुडुंब भरलेल्या रविंद्र नाट्यमंदिरात आपल्या आपल्या चाहत्यांना धन्यवादाचे चार शब्द सांगताना म्हणूनच प्रा. वसंतराव कानेटकर यांना गहिवरून आले. "ऐतिहासिक, सामाजिक पौराणिक नाटकांचे विषय हाताळल्यानंतर, मराठी प्रेक्षकांना अद्भुतरम्य नाटकांची चुणूक दाखवावी या इराद्याने 'गोष्ट जन्मांतरीची' हे नाटक आपण लिहिले; इतिहासाची पुनरावृत्ती होत असते, माणूस हा नियतीच्या हातचे बाहुले न बनता, नियतीचा नियंता होऊ शकतो, ते त्याच्या विचारशक्तीच्या जोरावर. हे सांगायला जेव्हा नाटक लिहायला त्यांनी घेतले तेव्हा साऱ्यांनीच त्यांना वेड्यात काढले होते, हा प्रयोग फसणार असेच अवतीभोवतीचे म्हणत होते. परंतु तरीही ते खोटे ठरवून आज हा सुदिन उगवला यातच आपल्याला सारे काही पावले. ही अशीच रंगभूमीची सेवा करायला आपल्याला मिळावी, हीच रंग देवते पुढे प्रार्थना आहे!" अशा शब्दात त्यांनी प्रेक्षकांचे आभार मानले.

प्रख्यात अभिनेत्री शशिकलाबाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या हृदयंगम सोहळ्यात, नाटकाशी संबंधित अशा सर्वांना चंदेरी, रूपेरी अश्वप्रतिमा देण्यात आल्या. "गोष्ट जन्मांतरीची" नाटकाचा प्रयोगही नेहमीप्रमाणे देखणा झाला आणि ह्या संस्मरणीय प्रसंगाला उपस्थित रहायला मिळाले, म्हणून साऱ्यांनाच मनातून धन्य धन्य वाटत असले पाहिजे. अर्थात माझ्या ही पदरी हे नशीब यायला, मला आठवड्यापूर्वी नाशिकला जावे लागले होते. तसा मी जवळ जवळ वीस बावीस वर्षांनी नाशिकला जात होतो. तेव्हाचे नाशिक आणि आताचे नाशिक यात विशेष फरक पडला आहे. 'गर्जा जयजयकार क्रांतीचा' सारख्या स्फुरण चढवणाऱ्या कविता करणार्या कुसुमाग्रजांचे नाशिक, ह्यात आता नाटककार कानेटकरांचे नाशिक, अशी महत्वपूर्ण भर पडली आहे.

सकाळी साडेनऊ वाजता वसंतरावांच्या "शिवाई" बंगल्यावर मी पोहोचलो. वसंतराव मला लगेच माडीवर लेखनकक्षात घेऊन गेले. तिथे येऊन पांढर्या स्वच्छ चादर अंथरलेल्या गादीवर तसाच गुबगुबीत तक्क्या ठेवून समोरच्या सागवानी लाकडाच्या सुरेख डेस्कवर, हा तपस्वी सदाबहार, हसतमुख माणूस, जेव्हा आपली लेखणी हातात घेतो, तेव्हाच मोत्यासारख्या मौल्यवान आणि सुवर्णासारख्या कांतिमान शब्दांची विचारधारा जणू मोरासारखी तिथे थुई थुई नाचत कशी असेल, हे मला आमच्या त्या दोन तासांच्या गप्पात दिसून आले.

एका प्रख्यात कवीच्या पोटी जन्मलेल्या आणि शिक्षणाचे नेहमीचे गड सरासर पार करत गेलेल्या, ह्या वसंताला कॉलेजमध्ये, केवळ चोविसाव्या वर्षी प्राध्यापकी मिळणे, हेच मुळी एक आनंदाचे लेणे वाटत होते. किर्लोस्करसारख्या दर्जेदार मासिकात पहिली कथा वयाच्या अठराव्या वर्षी येऊनही 'घर' 'पंख' 'पोरका' यासारख्या कादंबऱ्या लिहूनही जी तार म्हणावी, ती मुळी गवसतच नव्हती. वर्षे भुरु भुरु पंखांनी उडून जात होती. पस्तिशीने गाठले कधी हे कळलेही नव्हते. अशा क्षणी, अशीच एक कादंबरी लिहायला बसलेल्या, वसंतला काहीतरी वेगळेच वाटायला लागले, संवाद लेखणीतून झरझरा उतरून लागले अन् कादंबरी लिहायला घेतल्याचे नाटक 'वेड्याचे घर उन्हात बांधून' दिल्यासारखे झाले. नस सापडली होती, तार जुळली होती. कानेटकरांमधल्या साहित्यिकाला योग्य तो मार्ग सापडला होता. कथावस्तू संवादातून फुलवत नेता नेता, करमणुकीच्या आडून प्रेक्षकांच्या अंतर्मनाला कुठेतरी साद घालणाऱ्या नाटकांची जणु गुहाच कानेटकरांचे समोर दत्त म्हणून उभी राहिली.

प्रसंग १९५७/५८ चा, म्हणजे नाट्यसृष्टीला वखत आणीबाणीचा होता. रांगणेकरांची 'कलानिकेतन' बाबुराव गोखले यांची 'श्री स्टार्स' आणि पेंढारकरांची 'ललितकलादर्श' वगळता, तर बाकी सारे सामसूमच होते. अशा वेळेला नाटकाची नाट टाकाला लागणे, म्हणजे खरोखर वेड्यांचा बाजार होता. पण प्रत्येकाच्या नशिबी कुणी ना कुणी सहाय्यकर्ता, केव्हा ना केव्हा अनाहूतपणे अचानक धावून येतो. वसंतरावांना तो कुसुमाग्रजांच्या रुपाने मिळाला. त्यांना नाटक इतके आवडले की ते लगेच त्यांनी पुण्याला नेऊन प्राध्यापक भालबा केळकर यांना दाखवले. 'पूना ड्रँमँटिक असोसिएशनने', ते राज्य नाट्यस्पर्धेत सादर करून पहिले बक्षीस मिळवले. त्यातूनच डॉ. श्रीराम लागूंसारखा खंदा नटसम्राट रंगभूमीला मिळाला. त्या पुढचा इतिहास तसा ताजाच आहे...........
--------------------------
"गोष्ट जन्मांतरीची" हे कानेटकरांचे २५ वे नाटक. या नाटकानेही शंभरी ओलांडली. याच वर्षात
"कोपता वास्तू देवता" या निमित्ताने कानेटकरांचे चिरंजीव प्रियदर्शनही नाट्यलेखनाच्या प्रांतात आले, हा एक योगायोग. प्रा. वसंतराव कानेटकर यांच्या या नाट्यनिर्मितीच्या प्रवासाबाबत त्यांच्याशी केलेले हे माझे हितगुज, 'साप्ताहिक मनोहर' २७ मे ते दोन जून १९७९ ह्या अंकामध्ये जसे प्रसिद्ध झाले, तसे इथे दिले आहे....
---------------------------
धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क.
असे खुसखुशीत नवनवीन लेख आणि तसेच १५० हून अधिक वैविध्यपूर्ण लेख वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगची लिंक आहे:

http://moonsungrandson.blogspot.com

संग्रही जरूर ठेवून शेअरही करा.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा