"ह्रदयसंवाद-२३":
"सर्जनशीलतेचा असाही रसास्वाद-१":
# "अनिश्चिततेचे खेळ":
खळाळणार्या अथांग समुद्रात, दोन लाकडाचे ओंडके, केव्हा कधी कां एकत्र येतात, ह्याला मुळी उत्तरच नसते.....
पाहता पाहता लाटांच्या फटकार्यात ते एकमेकांपासून पुन्हा कधीही जवळ न येण्यासाठी विलग केव्हा होतात तेही न कळणारे अनिश्चित असेच....
माणसांचेही अगदी तसेच असते. जीवनात कोण केव्हा किती काळ एकत्र येतील ह्याचा थांग कुणालाही नसतो....सारे मुळी अनिश्चिततेचेच खेळ असतात...
सहाजिकच आहे...
अखेर माणसाचा जन्म होतो तोदेखील दोन जिवांच्या मिलनांतून, अतर्क्य अशा अनिश्चिततेचे पोटीच....
जीवनातील समस्याही त्याला अपवाद नाहीत. त्या देखील उदभवतात अशाच अवचित अनिश्चित वेळी.
अनिश्चितता हीच तर म्हणून माणसाच्या जीवनाची सत्यता आहे आणि वास्तवता आहे.
कोणाचीही तिच्यापासून सुटका नाही....
# "जीवन'दायी पर्जन्य":
इतके दिवस ज्याने अचानक दडी, ज्याची वाट पाहून थकलो, तोच आज अचानक आकाशातून पावसाच्या धारा, अविरत पडू लागल्या आणि आतापर्यंतच्या कडकडीत उन्हाळ्याच्या तापाने, तना मनाची होणारी काहीली, अवचित थांबून, अवघ्या आसमंताला गारे गार करून गेली. अन् लहानपणीचा संस्कृत भाषेतील सुभाषित स्फुरले:
'आकाशात पतितम् तोयम्
यथा गच्छती सागरम्,
सर्व देवम् नमस्कारम् केशवम् प्रतिगच्छती.'
खरंच, निर्गुण, निराकार अपरंपार अनंतातून, आज चमत्कार घडावा, तसे नवजीवनाचे स्त्रोत अवखळपणे धरित्रीला साद घालत, जीवाच्या आकांताने कोसळले. समस्त जीवमात्राची तहान भागविण्यासाठी, जमिनीत नवचैतन्याचे लक्ष लक्ष अंकूर फुलविणाणरे, नावाप्रमाणेच, 'जीवन'दायी असे पर्जन्याचे थेंबच थेंब, अवघ्या मनामनांना प्रफुल्लीत करीत, प्रसन्न झाले.
ह्या निसर्गचक्राच्या अदभूत् चमत्काराला, त्या संस्कृत सुभाषितांतील, दयासागर केशवाला, आपण सारे नतमस्तक होऊन, साष्ठांग प्रणाम करूं या आणि प्रार्थना असूं द्यावी की, ही अशीच क्रुपाद्रुष्टि ह्या चराचरावर निरंतर असूं द्यावी!"
# "सर्जनशीलतेचा असाही रसास्वाद":
काही दिवसांपूर्वी मुखपृष्ठ कसे आकार घेते, ते अतिशय सुलभतेने व ओघवत्या भाषेत, प्रत्यक्ष पुस्तकांची उदाहरणं देणारे अतिशय व प्रत्ययकारी, तसेच मनोरंजकही लेख वाचले होते.
वाटून गेले, हाती घेतलेले कोणतेही पुस्तक आपण वाचतो. पण मुखपृष्ठाकडे आपण जितके लक्ष द्यायला हवे, तेवढे ते देतोच असे नाही. दुसरे असे की मुखपृष्ठ चित्रकार त्याची कलाकृती सादर करण्यापूर्वी किती मेहनत घेतो आणि त्याच्या कल्पनाशक्तीच्या जोरावर पुस्तकातला आशय हुबेहूब चित्र रुपात प्रकट करण्याचा आटापिटा कसा करतो हेही समजता आले.
व्यवस्थापन शास्त्रातील IPO, अर्थात् Input Process Output ही संकल्पनाच जणु लेखकाने मुखपृष्ठ निर्मितीमागे कशी असते ते सहजतेने मांडले आहे. कोणतीही नवनिर्मिती कशी होते, त्यासाठी किती किती कष्ट उपसावे लागतात, किती व कसकसा विचार करावा लागतो ह्याचा अंतर्बाह्य शोध घेण्याची चालना मला ह्या अप्रतिम लेखामुळे मिळाली.
जाणवले की, सर्जनशीलता ही काय चीज आहे! कोणतीही नवनिर्मिती तत्संबंधी स्फूर्ती आल्याशिवाय होऊच शकत नाही. ही स्फूर्तीच सर्जकाला अंतर्बाह्य ढवळून काढते, त्याला दिशा दाखवत inputs चा सर्वंकष ढांढोळा घ्यायला लावते. त्यापुढची process ही पायरी हा अत्यंत मूलभूत गाभा असते. ती अचूक तर output अर्थात नवनिर्माण उत्तम होण्याची शक्यता अधिक.
सजीव निर्मिती ही निसर्गामध्ये नवनिर्माणाची परमोच्च कलाकृती! ती होत असताना कळा वेदना होतच असतात किंबहुना म्हणूनच बाळ जेव्हा जन्माला येते, त्या प्रक्रियेला बाळ-अंत-पण अर्थात बाळंतपण असे म्हणत असावेत. वेदनेतून पुनर्निर्मिती होण्याची संभाव्यता अधिक असते. स्फूर्ती अथवा 'क्रिएटिव्ह अँबिलिटी' हीदेखील म्हणूनच एक प्रकारची अंतर्गत वेदनाच होय. ही वेदना मात्र सर्जकाला परमानंद देणारी असते, कारण त्यातूनच जगाला नवीन काहीतरी मिळत असतं!
ह्या लेखामुळे मला असे काही लिहिण्याची बुद्धी झाली, यातच सर्व काही आले अन् लेखाची श्रेष्ठता अधोरेखित झाली. लेखकाचे म्हणूनच अभिनंदन, तसेच अशा प्रकारचा मूलभूत संकल्पना विषद करून टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या लेखमाला देणार्या संपादकांचेसुद्धा कौतूक.
असे लेख जर चवीने जरूर वाचले तर मला खात्री आहे की तुम्हालाही माझ्यासारखं काहीतरी वाटायला लागेल.
अखेर,
"जुने ते सोने हेच खरे!":
हल्ली पाश्चात्त्यांच्या प्रभावाखाली येऊन आपण किती बदलत चाललो आहोत. विशेषतः स्त्रिया आपले सौंदर्य राखण्यासाठी काय काय एकेक प्रसाधने वापरतात आणि ती काही नैसर्गिक घटकांची नसतात. त्यांच्यात केमिकल्स इतर काही अनिष्ट घटकही असू शकतात.
त्याचे उलट पूर्वी किती छान होतं, पूर्वी सकाळी उठल्यावर राखुंडीने दात घासायचे, अंघोळ करताना, साबणाऐवजी रिठ्ये वापरली जायची आणि कधीमधी दुध आणि हळद मिसळून त्याने अंगभर मर्दन करून कांती सतेज ठेवली जायची. त्या काळी डेंटिस्ट जवळ जवळ आजच्यासारखे कामच नसायचे. अगदी म्हातारपणी फार तर कवळी बसवायची वेळ यायची. पाश्चात्यांच्या अंधानुकरणाने आणि प्रसाधन क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या मार्केटिंग गिमिकमुळे, आपण अक्षरशः आपल्याच नैसर्गिक अशा सौंदर्याचे काही बरे वाईट तर करत नाही ना, हा विचार करण्याची वेळ आली आहे.
आता करोनासारख्या जीवघेण्या संकटामुळे आपले डोळे उघडले आहेत. आपली नमस्कार करणं, ही स्वागताची पद्धत, हस्तांदोलनापेक्षा कितीतरी आवश्यक व आरोग्यदायी आहे, हे आता समजले हे बरेच झाले! शक्यतो नैसर्गिकरित्या आचरणाची जीवनशैलीने, चांगले आरोग्य सांभाळावे, असे मला वाटतं.
पुन्हा आपण आपल्याला काय योग्य काय अयोग्य याचा विचार करायची वेळ आलेली आहे.
कारण....
जुने ते सोने हेच खरे!
धन्यवाद
सुधाकर नातू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा