: 'नियतीचा संकेत-६' :
"जन्मपत्रिकेची चिकीत्सक मीमांसा":
जीवनामध्ये विविध प्रकारच्या उदाहरणांवरून जन्मपत्रिकांच्या अभ्यासाची दिशा ठरवत येथे चिकित्सक मीमांसा करण्याचा प्रयत्न केला आहे. अचानक म्रुत्युचा घाला पडून कुणी अल्पायुषी होतो, तर कुणाला त्याच्या कुवतीपेक्षा अधिक उत्तम जोडीदार मिळतो, तर कुणा अभाग्यांच्या नशिबी विवाह न जुळण्याचे दुर्दैव येते, तर कुणाचा घटस्फोट होतो तर आणखी कुणी अपत्यहीन असतो, तर कुणाच्या नशिबी असाध्य रोगामुळे हाल हाल होऊन म्रुत्यु येतो....इ.इ. फलिते कां मिळतात, तो चिकित्सक आढावा जन्मपत्रिकेच्या माझ्या अभ्यासावरून ह्या लेखात मी मांडला आहे.
१ 'अचानक अल्पाययुष्यात म्रुत्यु':
ही पत्रिका एका कर्तबगार देखण्या तरुणांची आहे. संगीतामध्ये उत्तम कामगिरी असून त्याच्या एकंदर व्यवसायिक यशामध्येही तो पुढे असायचा. अशा या तरुणाचा प्रेम विवाह होऊन पुढे त्याचा अचानक अल्पायुषी असताना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू ओढवला. हे असं का व्हावं, असा प्रश्न कुणालाही पडावा अशीच त्याची पत्रिका आहे:
लग्न-मीन, चंद्र-वृषभेचा, केतू-मिथुनेचा
गुरू, हर्शल-कर्केचे, रवि व बुध-स्वगृही उच्चीचा कन्येत, तर शनी, शुक्र व नेपच्यून-तूळा राशीत
मंगळ, राहू-धनुमध्ये.
एकंदर पत्रिका पाहिली तर खरोखरी एक उत्तम पत्रिका दिसते. लग्नेश गुरु, पंचमात उच्चीचा त्यामुळे कलेमध्ये शिक्षणामध्ये चांगले यश. बुध स्वगृही उच्चीचा सप्तमात, प्रेम विवाह तर चंद्र उच्चीचा वृषभेमध्ये पराक्रमात, म्हणूनच अंगीकृत कार्यात अतिशय कर्तबगार तर अष्टमात उच्चीचा शनि स्वगृहीचा शुक्र अशी ही खरोखर चांगली पत्रिका आहे. त्यामुळे आपल्याला प्रश्न पडतो हा तरूण असा अल्पवयात कां मरण पावला?
याबाबत माझी मीमांसा अशी आहे:
लग्नेश गुरू वर शनीची दहावी दृष्टी आणि मंगळ दशमात असून लग्नेशाच्या षडाष्टकात व पराक्रम स्थानात असलेल्या चंद्राच्याही षडाष्टकात मंगळ. तो, राहू व शनी दोघेही भाग्यस्थानाच्या पापकर्तरी योगात. शनीशिवाय अष्टमात नेपच्यून, आणि मंगळ व राहू केतू हे दशम व चतुर्थात ह्या कारणामुळे या व्यक्तीला अल्प जीवन लाभले असावे.
जीवनाची व आरोग्याची एकंदर नियमांनुसार आपल्याला लग्नेश आणि अष्टमेश आणि षष्ठ स्थानावरून करता येऊ शकते. इथे अष्टमात अष्टमेशाबरोबर शनी, नेपच्यून आणि लग्नेश बिघडलेला या जोडीला षष्ठेश रवी देखील, राहु मंगळ केतूच्या केंद्रयोगात आणि शनीला बारावा या मुळे या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू आला असावा.
"तिशीतच अचानक म्रुत्यु":
जन्मपत्रिका":
लग्न-कन्या-हर्शल, चंद्र-धनु मूळ नक्षत्र,
मंगळ व राहू-मकर, बुध गुरु शुक्र-मेष,
शनी-व्रुषभ, केतू-कर्क.
ह्या उदाहरणात कन्या लग्न असून लग्नेश बुध अष्टमात शत्रू क्षेत्री आहे आणि त्याच्यावर पंचमातील उच्चीच्या मंगळाची दृष्टी असून राहूही पंचमात आहे. भाग्यातील शनिला लग्नेश बुध हा बारावा आहे, षष्ठेश शनीची षष्ठस्थानावर द्रुष्टी आहे.
तर हा कर्तबगार तरुण केवळ तिशीतच अचानक हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू पावला. येथे देखील लग्न अष्ठम षष्ठ स्थाने यांचा प्रामुख्याने विचार केला आणि अष्टमेशाबरोबर राहू, त्यामुळे एकंदर जीवन अल्पायुषी ठरले. हर्शलही लग्नात अष्ठमाच्या षडाष्टकात आहे.
२ "उत्तम, उजवा जोडीदार":
या तरुणाला त्याच्या एकंदर शैक्षणिक व व्यावसायिक कुवतीपेक्षा, अतिशय उच्च दर्जाची पत्नी लाभली, हे उदाहरण घेऊ.
येथे कन्या लग्न असून तेथे हर्षल, वृश्चिक-राहू मंगळ व गुरू-मीन, रवी बुध केतू-वृषभ, मिथुनेतील शनी आणि चंद्र दशमात, तर लाभात शुक्र अशी ही पत्रिका आहे.
ह्या पत्रिकेत सप्तमावर शनीची दृष्टी व तेथेच मंगळ आहे. परंतु गुरु स्वगृही मीनेचा ही एक अतिशय उत्तम अशी बाब या पत्रिकेत दिसते. त्यामुळे ह्या व्यक्तीला चांगली पत्नी उच्चशिक्षित व मानाच्या पदावर चांगल्या आर्थिक आमदनी असणारी अशी मिळाली. पत्रिका अधिक अभ्यासता लक्षात येतं की भाग्यामध्ये लग्नेश बुध आहे आणि भाग्येश लाभात आहे. त्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये भाग्यवर्धक आणि लाभदायी फळे मिळाली. गुरु रवि लाभयोग आणि गुरु शुक्र त्रिकोण योग हादेखील सुयोग ठरला. बुध शुक्र आणि चंद्र एकमेकांच्या घरात अशी ही पत्रिका असल्यामुळे या तरुणाला त्याच्यापेक्षा चांगली सुशिक्षित आणि आर्थिक बाजू बळकट असणारी पत्नी मिळाली.
३ "दिशाहीन ब्रम्हचर्य":
ह्या पन्नाशीच्या अविवाहित माणसाची
"जन्मपत्रिका":
लग्न-व्रुश्चिक,चंद्र-कन्या, रवी-मिथून
मंगळ-कन्या बुध-कर्क, गुरु-व्रुषभ
शुक्र-कर्क शनी-कुंभ, राहू-व्रुषभ
केतू-व्रुश्चिक
हा लहानपणी हुशार असून बारावीपर्यंत शिकल्यानंतर वाईट संगतीमुळे किंवा फार लाडावून ठेवल्यामुळे तो पुढे फुकट गेला. सिगरेट, दारू जुगार आणि बाहेरख्यालीपणा अशा अनेक व्यसनांमध्ये मग्न होऊन सबंध आयुष्याची त्याने नासाडी करून घेतली. आज ५४ व्या वर्षी देखील तो ब्रह्मचारी असून, पुढे काय करायचे हे ठाऊक नसलेला, अशारीतीने आयुष्य पूर्ण वाया घालवणारा हा माणूस आहे.
लग्न व सप्तमात राहू-केतू ही सर्वसाधारणपणे अनिश्चित अस्थिर अशी मानसिक स्थिती दर्शवते.
पंचमेश गुरु शत्रूक्षेत्री, इथे राहू बरोबर म्हणून बौद्धिक प्रगती खुंटली. शनी राहू केतू केंद्रयोगात,
सप्तमेश शुक्र व लग्नेश मंगळ शत्रुक्षेत्री बुधाच्या राशीत व शनीच्या षडाष्टकात. दशमेश रवि अष्टमात मंगळाच्या केंद्रात व केतुच्या षडाष्टकात. अशा विविध कुयोगांमुळे ना विवाह ना व्यावहारिक आर्थिक स्थैर्य. दिशा नसलेले भरकटत जाणारे जीवन ह्याच्या पदरी आले आहे.
लग्न, पंचम सप्तम व दशम स्थाने आपल्याला अशा बाबतीत अभ्यासावी लागतात.
४ "केविलवाणे अपंगत्व व अंत":
आता आपण दोन उदाहरणे अशी पाहणार आहोत ज्यामध्ये या व्यक्तींना आयुष्याची अखेर अत्यंत खडतर परावलंबी अपंगत्वामध्ये घालवावी लागून त्यातच त्यांचा अंत झाला.
पहिले उदाहरण:
"जन्मपत्रिका":
लग्न-कुंभ, चंद्र-मिथून, मंगळ-कुंभ, शनी-मेष, राहू-कन्या, केतू-मीन,
रवी,बुध गुरु व हर्षल-व्रुषभ
या ग्रहस्थाची तब्येत उत्तम असून आपल्या प्रकृतीच्या अनाठायी अभिमानामुळे औषधे न घेता ब्लड प्रेशर आदि व्याधी त्याने अंगावरच काढल्या. त्याची परिणती, एकदा हा गृहस्थ एकटाच असताना काही काम करता करता, खाली आपटला आणि बेशुद्ध झाला. त्याच अवस्थेत खूप तास गेल्यानंतर त्याला मदत मिळाली. परंतु त्यामध्ये त्याला अर्धांग झाल्याचे लक्षात आले. अनेक ऑपरेशन्स होऊन शेवटी व्हीलचेअरवर आयुष्याची आठ वर्षे त्याला अत्यंत खडतर व परावलंबी अवस्थेत काढावी लागली व शेवटी अंत झाला.
त्याच्या पत्रिकेत, मंगळ लग्नात शत्रुक्षेत्री शनीच्या कुंभेत व अष्टमातील राहूशी षडाष्टकात व रोगस्थानाशीही षडाष्टकात. तर शनी अष्टमस्थानाच्या व तेथील राहूच्या षडाष्टकात शत्रुक्षेत्री.
शनी ज्या स्थानापासून आठवा असतो त्या स्थानाविषयी अतिशय क्लेशकारक फळे देतो. येथे तर शनी अष्टम म्हणजे मृत्यू स्थानाच्या षडाष्टकात असल्यामुळे ह्या व्यक्तीला असा कष्टदायक अंत होणारे आयुष्य लाभले.
"दुसरे उदाहरण":
"जन्मपत्रिका":
लग्न-कर्क, चंद्र-मीन,
रवी व मंगळ व बुध-मिथूनेत
गुरु व शुक्र-व्रषभ, शनी-कन्या राहू-मकर
तर केतू-कर्क
या माणसाला निवृत्तीपूर्वी तीन-चार वर्षे असताना अचानक असाध्य असा रोग झाला, ज्यामध्ये तो पूर्ण विकलांग झाला. अशा परावलंबी अवस्थेत दोन-तीन वर्षे कशीबशी काढल्यानंतर शेवटी त्याला मृत्यू आला.
या उदाहरणात देखील शनि आठव्या मृत्यू स्थानाच्या षडाष्टकात असून तो तृतीय स्थानात आहे व मंगळाशी केंद्रयोगात आहे. राहू-केतू देखील सप्तम व लग्न अशा स्थानात असल्यामुळे मानसिक अस्थिरता व तत्संबंधी अनारोग्य लाभले. चंद्र भाग्यात असला तरी तो शनीच्या दृष्टीत व मंगळाशी त्याचा केंद्रयोग होतो. त्याशिवाय कुंभ ही अष्टम स्थान असणारी रास लग्नाला-कर्क राशीला मृत्यू षडाष्टकात आहे. अष्टम स्थानाचा मालक त्या स्थानाशी षडाष्टकात आहे. अशा विचित्र कुयोगांमुळे या माणसाच्या नशिबी असा अंत आला.
लग्न, अष्टम ह्या स्थानांप्रमाणेच शनि मंगळ राहू केतू ह्या पापग्रहांचा अभ्यास अशा प्रकारे क्लेशदायक म्रुत्युसाठी करावा लागतो असे म्हणता येईल.
जीवनातील विविध प्रकारचे अनुभव प्रत्येकाला नशिबामुळे कसे व का येतात त्यांचा अभ्यास पत्रिकेतील ग्रहयोगांवरून करण्याची ही दिशा आहे. त्याच प्रकारे अशी अजून काही उदाहरणे पुढील लेखात देखील घेतली जातील.
जन्मपत्रिकेचा चिकित्सक अभ्यास करण्याची त्यासाठी आवश्यकता असते.
धन्यवाद
सुधाकर नातू
ता.क.
"शोधा म्हणजे सापडेल, विचार करा, सुचेल":
जगप्रसिध्द मँनेजमेंट गुरुंच्या अनुभवी मार्गदर्शनाचे सार मांडणारे अभ्यासपूर्ण लेख असणारे 'Management Musings' व सोप्या भाषेत घरच्या घरी ज्योतिष शिकण्यासाठी 'नियतीचा संकेत' हे दोन खास डिजिटल अंक मी माझ्या ७६ व्या वाढदिवशी १६जून रोजी प्रकाशित केले आहेत.
ते ज्या इच्छूक वाचकांना हवे असतील त्यांना विनामूल्य पाठवले जातील. 9820632655 ह्या नं. वर आपले नांव, गांव देऊन, होकार whatsapp ने कळवावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा