"प्रतिमेतील प्रतिष्ठा !? :
आता उशीरा कां होईना, मला सुचलेलं शहाणपण मी सध्या, "सेलिब्रिटींना मिळणारे अवास्तव स्थान" ह्या चर्चे संदर्भात, ह्या छोटेखानी लेखात मांडले आहे. माझ्या सध्याच्या वयाला शोभेसे पोक्त विचार त्यांत आहेत....
तो लेख आपण जरूर वाचा....तुम्हालाही विचार करायला लावेल, व्यक्त व्हायला उद्युक्त करेल....
मला नेहमी एका गोष्टीचे आश्चर्य वाटते की, माणसाचे मन विशेषत: समाजमन सभोवतालच्या परिस्थितीनुसार कसे बदलत जाते. आपण कोणत्या गोष्टीकडे कशा दृष्टीने बघतो, त्याप्रमाणे आपल्या मनामध्ये प्रतिमा बनत जातात आणि त्या प्रतिमांची जी काही एकमेकांबरोबर तुलना करतो, त्यातून काही विशिष्ट प्रतिमा कां कुणास ठाऊक महत्वाच्या बनतात. अत्यंत प्रतिष्ठित बनतात.
इथे मला प्रतिमेतील प्राप्त प्रतिष्ठेबद्दल काही विचार व्यक्त करायचे आहेत. सध्याचा काळ हा किती विचित्र आहे, याचे आपण अनुभव घेत आहोत. आता जो खूप श्रीमंत आणि जो आपल्या श्रीमंतीचा,मग ती कोणत्याही मार्गाने मिळवलेली असो, तिचा तो बडेजाव मारतो प्रदर्शन करतो. त्याची प्रतिमा ही मोठी प्रतिष्ठेची बनते. तसेच कलाकार चित्रपट असो किंवा कलाकारांना सेलिब्रिटी, महान मानण्याचा सध्या काळ आहे. त्यामध्ये कर्तृत्व निश्चितच महत्त्वाचे आहे, चांगले आहे यात वाद नाही, परंतु शेवटी ते लेखकाने दिले आहे जे निर्मिलेले आहे, ते केवळ आपल्यासमोर त्यांच्या अंगभूत गुणांनुसार मांडतात आणि आपला काही काळ आनंदात समाधानात जावा, या दृष्टीने त्यांचे योगदान असते. ते त्यांच्या परीने खरोखर महत्त्वाचे आहे आणि योग्यच आहे. परंतु ह्या गोष्टीला आणि कलाकारांना समाजाने विशेषतः तरुणवर्गाने किती महत्त्व द्यावे याला काही मर्यादा उरलेली नाही. हे दुर्दैवच नव्हे कां?
कोणताही सुपरस्टार किंवा अगदी साध्या मालिकेतला कलाकार जरी सार्वजनिक ठिकाणी आला तर त्याच्या भोवती किती वेड्यासारखी गर्दी जमते ते आपण पाहतो. खरोखर हे आश्चर्य वाटते की, आपण कर्तृत्व ह्या संकल्पनेचा एकाप्रकारे विपर्यास तर करत नाही ना? असे कितीतरी श्रेष्ठ, अनुकरणीय, कर्तबगार शास्त्रज्ञ समाजसेवक शिक्षक किंवा लेखक विचारवंत आपल्यामध्ये असतात, परंतु त्यांची आपण किती ओळख ठेवतो, दखल घेतो? त्यांना आपण किती महत्त्व देतो? असे उद्योजक असू शकतात की, जे अनेक हजारोंचे पोशिंदे असतात. अशा कितीतरी समाजघटकांना आपण त्यांना जी प्रतिष्ठा आवश्यक आहे ती देतो कां, याचा गांभीर्याने विचार करायची वेळ आली आहे, नाही कां?....
स्वातंत्र्यापूर्वी, त्याग कष्ट प्रामाणिकपण यांना खरोखर महत्त्व होते आणि अशा राजकीय आणि सामाजिक परिस्थितीत, तशा नेतृत्वाला फार मोठी प्रतिष्ठा व किंमत होती. परंतु सध्याचा काळ हा बाजारू प्रतिमांचा पोरखेळ झाला आहे, असे मला तरी वाटते. कदाचित म्हणूनच एकंदर आपला नैतिक अधःपात होत चालला असावा. वेळ अशी आली आहे की, प्रतिमेतील प्रतिष्ठांचा योग्य तो अभ्यास करून, त्यांची योग्य ती तुलना करून त्याप्रमाणे श्रेष्ठ-कनिष्ठ यांची उतरंड योग्य तऱ्हेने समाजमनामध्ये मांडण्याघी गरज आहे.
No doubt, every competant person must get the due respect he or she deserves but it should not be too much over the board. कुणाला संयुक्तिक कारण नसताना, उगाच इतके डोक्यावर घेऊ नका, की ते त्यांच्या डोक्यात जाऊन, ते उततील माततील वा माजतील.
सारांश, प्रत्येकाला त्याच्या प्रतिमेचा आणि प्रतिष्ठेचा वाटा मिळायला हवा, हे खरोखर सत्य आहे. परंतु कुणा एका विशिष्ट समुहाला कारण नसताना, खरोखर आपण किती महत्व द्यायचे, याचे खरोखर आत्मचिंतन करणे गरजेचे आहे नाही कां? प्रतिमांतील प्रतिष्ठांचे सध्याचे अवमूल्यन थांबवणे आवश्यक नाही, कां?
सुधाकर नातू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा