"ह्रदयसंवाद":
समाज माध्यमांचा उपयोग मी नेहमीच माझ्या लेखन हौसेसाठी आणि ज्योतिषासंबंधीच्या माझ्या ज्ञानाचा इतरांना लाभ व्हावा, म्हणून करत असतो. त्यादृष्टीने ब्लॉगवरील लेख आणि युट्युब वरील माझा moonsun grandson चॅनेलवर उपयुक्त व्हिडिओंंसाठी उपयोग केला जातो. त्यामुळे नवनवीन कल्पना प्रत्यक्षात आणता येतात. अशा कल्पनांचा मी नेहमीच शोध घेत असतो.
संपूर्ण वार्षिक राशिभविष्यावरील विडीओज् त्यापूर्वी अनुकूल गुणांवर आधारित साप्ताहिक भविष्य ह्यांना उत्तम प्रोत्साहन आपणाकडून मला मिळत गेले. धन्यवाद व आभार. मी आता, एका नव्या उपक्रमाचा प्रारंभ करण्याचे मी ठरवत आहे. त्याचे शीर्षकही अनुरूप सुचले आहे
"हृदयसंवाद".
नेहमी आपण काही ना काही वाचत असतो. नाटक व मालिका वा चित्रपट पहात असतो. अशा तर्हेने आपली बौद्धिक व वैचारिक भूक भागवण्याचा प्रयत्न करत असतो. कधी कधी आपल्या मनातली स्पंदने व प्रतिक्रिया एखाद्या भावणाऱ्या कलाकृती साठी निर्माण होत असतात. तो रसास्वाद त्याच्या निर्मात्याला लेखकाला वा कलाकाराला पत्ररूपाने साधारण दर रविवारी, मी पत्ररुपाने पाठविण्याची ही संकल्पना म्हणजे "हृदयसंवाद"! आपल्या सक्रीय सहभागाची मला अपेक्षा आहे.
शुभारंभ, मी झी प्रस्तुत "उत्सव नात्यांचा" दिवाळी अंक'१९ मधील डॉ. जगन्नाथ दीक्षित ह्यांच्या मनमोकळ्या मुलाखतीवरील माझ्या प्रतिसादाच्या रुपाने करत आहे.....
त्यासाठी माझ्या ब्लॉगची
ही लिंक उघडा...शेअरही करा...
http//moonsungrandson.blogspot.com
धन्यवाद.
१. "मधुमेहावर बोलू काही":
डॉ. जगन्नाथ दीक्षितसाहेब,
सादर वंदन,
माझ्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने, दिवाळी अंक ही एक पर्वणी असते. पूर्वीच्या दिवाळी अंकांची सर आता उरली नसली तरी, काही निवडक अंक खरोखर संग्राह्य आणि वाचनीय असतात ही एक समाधानाची गोष्ट आहे. त्यातील त्यातील झी समुहाचा 'उत्सव नात्यांचा' दिवाळी अंक'१९, खरोखर अत्यंत माहितीपूर्ण, सर्वांगसुंदर आणि संग्रह्य असाच आहे.
हा उत्सव नात्यांचा दिवाळी अंक माझ्या वाचनात नुकताच आला. त्यामधील तुमचे मुलाखतीतून व्यक्त झालेले विचार व अनुभवधन खरोखर वास्तवाची जाणीव करून देणारे आणि मनाला अंतर्मुख करणारे आहे.
आरोग्यसेवेचा जो बाजार सध्या झाला आहे, त्याचे संपूर्ण विदारक चित्र आपल्याला दररोज समोर दिसते आहे. अशावेळी सर्वसामान्य माणसांची परवड होत आहे. भूतकाळाचा विचार केला तर, तेव्हाचे आरोग्य सल्लागार अर्थात् डॉक्टर हे खरोखर जिव्हाळ्याने आपल्या समोर येणाऱ्या व्याधीग्रस्त माणसांवर उपचार करत असत. पैसा हे प्राधान्य तेव्हा सुदैवाने नव्हते. कदाचित त्यांच्या अशा आपुलकीच्या वागण्यामुळे अर्ध्या अधिक व्याधी बऱ्या होत असाव्यात.
ह्या उलट आत्ताचे चित्र पहा: समोरचा व्याधीग्रस्त, हा केवळ एक पैसे मिळवून देणारा जणू बकरा आहे, अशाच तऱ्हेने आजचे बहुतांश डॉक्टर्स पहातात, वागतात. खरोखर ही गोष्ट लाजीरवाणी आहे. सध्याच्या बहुचर्चित डायबेटिस अर्थात मधुमेहावरील दिल्या जाणार्या सल्ला व उपचारांचा विचार केला तर, मला वाटतं ही स्पेशालिस्ट डॉक्टर मंडळी दरवेळेला, खरोखर काय करतात, हा प्रश्न उभा रहातो. रक्त तपासणी करायला सांगून जे काही निदान आकड्यांमध्ये आले असेल ते पाहून औषध उपचारांमध्ये थोडे पुढे मागे फक्त बदल ते करतात व काही दिवसांनी वा १/२ महिन्याने पुन्हा यायला सांगतात.
दिलेल्या औषधोपचारांमुळे मधुमेह ज्या मर्यादेत राहायला हवा तसे तपासणीचे निकाल येतीलच याची कधीही खात्री दिली जात नाही, हे कितपत योग्य आहे? सारा प्रकार राम भरोसे! दर वेळेला डॉ. त्यांची घसघशीत फी मात्र ठणकावून घेत असतो. दहा-पंधरा मिनिटाच्या तपासणीत ( ? ) ही केवळ तपासणी नसते तर केवळ जे "निकालपत्र" आलेले असते त्याचे निरीक्षण असते. आहे त्या गोळ्या चालू ठेवा, वा काही बदल सुचवला, पुढची तारीख दिली की, पुढचा मधुमेही!
डॉक्टरांकडे येणारा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हजचा कळप, सुध्दा कळत नाही, खरोखर काय करतो! जेव्हा जेव्हा आम्ही डॉक्टरांकडे जातो त्या त्या प्रत्येक वेळेला दहा-पंधरा वेगळ्याच मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हचा कळप आलेला दिसतो. याचा अर्थच असा की, आलेल्या व्याधिग्रस्तांवर विविध औषधांचे प्रयोग केवळ केले जातात. अशा तर्हेचा व्यवहार किती डॉ. करतात हा वादाचा मुद्दा असू शकेल. परंतु सचोटीने मनापासून मधुमेहापासून योग्य त्या मर्यादेत आणण्याची खात्री कोणीही डॉ. देत नाही, हे काही मनाला पटत नाही. सामान्यांना काही कळत नाही. "मुकी बिचारी हाका कशीही" असा सारा माहोल आपण सहन करत आहोत.
जेव्हा आपण एखादे बिघडलेले यंत्र वा उपकरण मेकँनिकला दुरुस्तीला देतो, तेव्हा ते पूर्ववत चालू लागले आहे, ह्याची खात्री झाल्यावरच त्याची फी आपण देतो. पण हा नियम डॉ. समोर जिथे बोलायची सोय नाही, तिथे प्रत्यक्षात कशी कोण आणू शकणार? डॉ. सांगतील तेव्हा तशा तपासण्या बिचार्या मधुमेहींनी करावयाच्या, निमूटपणे पुन्हापुन्हा त्यांच्याकडे जायचे, सांगतील ते ऐकायचे व फी देत रहायचे हा रिवाज आहे. हे बदलता येणार नाही कां, ह्याचा गांभीर्याने विचार करायला हवा.
अशा पार्श्वभूमीवर मधुमेह नियंत्रणासाठी, तुमचे दररोज फक्त दोन वेळा भोजन घेणे हा प्रयोग आहे. तो कदाचित सोपा नसेलही, परंतु खर्चिक नाही, हे मान्यच करायला हवे. अर्थात ते किती जणांना प्रत्यक्षात नेहमी आणता येतील ही शंकाच आहे. अधिक सोपे, सर्वांना शक्य होऊ शकेल असा मार्ग शोधला गेला जावा, ही प्रामाणिक इच्छा आहे.
माझे विचार मी विस्ताराने मांडले आहेत. कदाचित चुकीचेही असू शकतील, परंतु गेल्या काही वर्षापासून माझ्या पत्नीला व नंतर मला मधुमेह झाल्यापासून मला जे अनुभव आले त्याचे निरीक्षण शब्दात मांडण्याची संधी, अंकातील तुमच्या मुलाखतीमुळे मिळाली. याबद्दल मी तुमचे आभार मानतो. क्रुपया राग मानू नका.
धन्यवाद
सुधाकर नातू माहिम मुंबई १६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा