"द्रुष्टि बनवेल सृष्टी"!:
तुम्ही कोणत्याही गोष्टीकडे, कोणत्या नजरेने बघता, त्यावर तुमची एकंदर मनोभावना तुमच्या भवतालाची सृष्टी तयार होत असते. अशाच तर्हेचे एक अत्यंत उपयुक्त असा इंग्रजी वाक्य आहे:
"Beauty lies in the eyes of the beholder."!
मला आठवतं, आम्ही नोकरीत, जेव्हा विक्रीविभागांत प्रवेश केला, त्या वेळेला आम्हाला सर्वांना जे प्रशिक्षण दिलं, तेव्हा एक सुंदर इंग्रजी फिल्म दाखवली होती आणि तीच शीर्षक हेच होतं:
"Beauty lies in the eyes of the beholder."!
त्या लघुपटांत, एकच माणूस, पण त्याच्याकडे त्याच्या संपर्कात येणारे वेगवेगळे व्यावहारिक कौटुंबिक सामाजिक आणि इतर घटक त्याला कोणत्या नजरेने बघतात आणि त्याच्याबद्दल काय कल्पना करून घेतात, त्याचे एक शोभादर्शका सारखे विविध चांगल्या वाईट प्रतिमांचे खरोखर मनावर ठसेल असे चित्र होते.
विक्री विभागामध्ये अशा तर्हेचे प्रशिक्षण याकरता दिलं जातं की, तुम्ही तुमचा जो प्रॉडक्ट वा सेवा विकत असता त्याच्याकडे योग्य नजरेने तुमच्या भावी ग्राहकाने बघावं, यादृष्टीने तुम्हाला काय काय प्रयत्न केले पाहिजेत, ते समजावं व त्या प्रतिमांवर यशापयश अवलंबून असतं , हे मनावर ठसावं, ह्यासाठी.
याच संदर्भातली एक कुठलीतरी छोटीशी कथा ऐकल्याचे वाचल्याचे मला आठवते. छोटीशी गोष्ट आहे. एक मोठा व्यापारी होता, त्याचे विविध शहरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे व्यवहार चालायचे आणि तो गडगंज श्रीमंत होता. एका शहरांमध्ये त्याचे महत्त्वाचे असे गोडाऊन किंवा वखार होती. एका रात्री काय झाले की त्यातील बहुतेक सर्व धान्यारूपी माल चोरांनी पळवून नेला. त्याच्या आजूबाजूचे सगळे व्यथित झाले. खूप मोठं नुकसान झालं. आता आपल्या साहेबांचे काय होणार, किती धक्का बसणार त्यांना, असे विचार त्यांच्या मनात येऊ लागले.
परंतु तो माणूस ह्या संकटामुळे कुठल्याही प्रकारे विचलित झाला नाही. सहाजिकच सगळ्यांना आश्चर्य वाटले. तेव्हा त्यांनी त्यांना कारण विचारले एवढ्या मोठ्या तुमचं नुकसान झालं तरी तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही? तर तो म्हणाला "मी या गोष्टीकडे थोड्या वेगळ्या नजरेने बघितले, आज आपल्याकडे भरपूर संपत्ती आहे. त्यातील काही आपल्याकडून गेले आहे, जे गेले ते दुसर्यांची भूक भागवणारे धान्यच तर गेले आहे. बहुतांश ते चोर पकडले जातील, परंतु समजा ते पकडले गेले नाहीत, तरी मी असं समजतो की आपल्याकडून जणू हा दानधर्म झाला! त्यामुळे मला दुःख न होता हा एक प्रकारचा संतोष झाला"
हे ऐकून इतर जण सर्व आश्चर्यचकित झाले! अशा आगळ्यावेगळ्या नजरेने जेव्हा एखादा माणूस संकटाकडे बघतो, तेव्हा तो खरोखर वेगळ्याच प्रतीचा माणूस असतो. अर्थात अशातही वेगळ्या नजरेने एखाद्या प्रसंगाकडे गोष्टीकडे बघायला सगळ्यांनाच जमतेच असे नाही.
नुकताच एक अतिशय हृदयंगम, प्रेरणादायी असा कार्यक्रम एबीपी माझावर झाला. "माझा कट्टा" असा तो कार्यक्रम. त्या कार्यक्रमांमध्ये सुप्रसिद्ध अभिनेते श्री. शरद पोंक्षे यांनी जे काही सांगितले त्यांना झालेल्या कॅन्सर संबंधी, आणि त्याच्यावर त्यांनी कशी विलक्षण धैर्याने मात केली, हे ऐकून खरोखर कोणताही माणूस अचंबीत होईल.
त्यांचे म्हणणे होते की, कँन्सर हा शब्दच धडकी भरविणारा होता, त्यावर मात करण्यासाठी १२ केमोथेरपी घेणे हे मोठे महासंकट होते आणि अशा वेळेला तेही तसेच सर्वांसारखे दुःखी झाले होते.
सुदैवाने मात्र, ह्य बिकट प्रसंगी, त्यांना आठवण झाली ती त्यांनी वाचलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या "जन्मठेप" या पुस्तकाची आणि त्यात वाचलेल्या मजकुराची! विचार करता करता, त्यांना जाणवले की, या थोर माणसाने अंधारकोठडीत कोलू ओढत एकट्याने, थोडी थोडकी नव्हे तर चक्क अकरा वर्ष भयानक हाल-अपेष्टा सहन करत, कुठल्याही प्रकारे, मनाने विचलित न होता, खंबीर मनाने काढली. त्यातुलनेत आपल्याला हे सहा-आठ महिने फक्त ह्या नव्या पाहुण्याचे स्वागत करण्यासाठी काढायचे आहेत. त्या जाणीवेनंतर त्यांनी त्या बारा केमोथेरपी ज्या काही हालअपेष्टा होत्या, त्या खेळकथपणे सहन केल्या, सातत्याने सकारात्मक अशा वृत्तीचा पाठपुरावा करून ते ह्या जीवघेण्या प्रसंगातून बाहेर आले, ते मोकळेपणाने सांगितले. त्यांनी आपणा सर्वांसमोर खरोखर एक आदर्श घालून दिला आहे. ह्याकरताच शेवटी मुद्दा हा उरतो की, तुम्ही कोणत्या गोष्टीकडे कसे बघतात त्यावर तुमचे भवितव्य घडत जाते.
"स्रुष्टि बनवेल स्रुष्टी" हेच खरे नाही कां?
अगदी अशीच गोष्ट, तुम्हाला आश्चर्यवाटेल, मी आजपर्यंत जाहीरपणे जिची वाच्यता करायला टाळत होतो, परंतु माझ्या बाबतीतही घडलेली आहे. बरोबर, चार वर्षापूर्वी मलाही अशाच प्रसंगातून जावे लागले. डॉक्टरांकडे जायचे मी महिनोन्महिने टाळल्यामुळे, माझ्या आवाजावर वाईट परिणाम झाला होता. अखेर ENT specialist डॉक्टरांकडे मला जावेच लागले. माझ्या घशाची बायोप्सी झाल्यावर त्यांनी "तुम्हाला "कँन्सर झाला आहे", हे माझ्या पत्नी व मुलीसमोर मला सांगितले. ते ऐकून त्या दोघी बिचार्या खरोखर भयभीत होऊन गेल्या.
पण अगदी मी मनापासून सांगतो, मला काहीही त्या क्षणाला वाटले नाही! मी उलट विचार केला की, मला जर हार्ट अटॅक आला असता, तर मी आज आहे, तो उद्या ह्या जगात नसतो! आता मला उलट काही काळ का होईना जगायला मिळणार आहे, ह्या संकटावर काहीना काहीतरी उपाय आहे, आपल्याला काही लगेच मरण येत नाही. या कल्पनेमुळे मी अगदी शांत होतो.
त्यानंतर पुढचे तीन-चार महिने मी त्यावरचे उपाय: रेडिएशन वगैरे सहजतेने सहन केले आणि त्यातून बाहेर आल्यावर, आज मी हे जे काही लिहितोय, ते चक्क व्यवस्थित बोलून, म्हणजे "स्पीच टू टेक्स्ट" या ॲपचा उपयोग करून मी लिहीत आहे. माझी इतकी प्रगती माझी झाली की, माझ्या स्वरयंत्राला झालेल्या कॅन्सरमुळे मला जे मुळीच बोलताही येत नव्हते, ते आज या स्थितीला मी आलो आहे. एवढेच काय
"यु ट्युब" वरील माझ्या moonsun grandson चँनेलवर गेल्या वर्षभरात माझ्या आवाजातील चाळीस व्हिडीओंना, जवळ जवळ ९०,००० views मिळाले आहेत. मागे वळून ह्या क्षणी पहाताना मला वाटते की, मी ज्या जगावेगळ्या दृष्टीने त्या संकटाकडे पाहिले, केवळ त्यामुळेच मला हा मार्ग मिळाला.
थोडक्यात काय, तुम्ही कोणत्याही गोष्टी कडे बघण्याची दृष्टी कशी ठेवता, त्यावर पुढचे बरे-वाईट अवलंबून असते. म्हणूनच म्हणतो,
"दृष्टी बनवेल तुमची सृष्टी"!
हा मंत्र जपा, वेगळ्या नजरेने संकटांकडे बघायला शिका.
सुधाकर नातू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा