"हृदय संवाद-२":
"मागोवा, अनुभवांतून शिकलेल्या गोष्टींचा!"
आज सकाळी न्याहारी तयार होण्यास वेळ होता, म्हणून कपाटातील कुठलीशी माझी जुनी डायरी मी चाळत होतो. अचानक काही वर्षांपूर्वी नोंद केलेले, वरील शीर्षकाचे पान, माझ्या नजरेस पडले. ते आपोआपच वाचावेसे वाटले अन् पाहता पाहता वाचूनही झाले. नंतर वाटले, अरे हे सारे मुद्दे आजही तसेच ताजे आहेत आणि खरोखर अनुकरणीय आहेत.
मी ह्या वेळच्या ह्रदयसंवादात, ते इथे मांडू इच्छितो, म्हणजे माझे म्हणणे तुम्हाला पटेल:
१. कुणाच्याही पहिल्याच भेटीत एखाद्या व्यक्ती बद्दल, पूर्ण माहीती मिळाल्याशिवाय मत व्यक्त करणे अयोग्य ठरु शकते. त्यांमुळे शेवटी आपले परस्पर संबंध बिघडू शकतात. सहाजिकच तारतम्य हवे, आपल्या जीभेवर व मनावर संयम हवा.
मागे केव्हातरी माझ्याकडून अशी एक चूक घडली होती. माझ्या स्नेह्याच्या, परगावी असलेल्या मुलाच्या घरी आम्ही प्रथमच गेलो होतो. दार उघडल्यावर, प्रथमदर्शनी आमचे स्वागत एका प्रौढ वाटणाऱ्या स्त्रीने केले आणि तिच्या बाजूला एक तरुण उभा होता. लगेच मागचा पुढचा विचार न करता, मी सहज विचारले की, हा तुमचा मुलगा कां? खरं म्हणजे मला ही दोघं कोण आहेत, हे माहित नसताना, मी असे बोलणे योग्य नव्हते. कारण नंतर लक्षात आले की, ती दोघे पती-पत्नी होती! अर्थातच माझी खरोखर फजिती झाली, मला अपराध्यासारखे वाटायला लागले.
त्या दोघांच्या, विशेषतः त्या स्त्रीच्या मनातून मी पूर्ण उतरलो व सहाजिकच माझे माझ्या स्नेह्याबरोबरचे संबंध ह्यामुळे खराब झाले.
२. गरज असेल तेव्हाच मुद्देसूद बोलावे. कमी बोलणे वा न बोलणेच अखेर हिताचे असते. मुद्दे सोडुन अति बडबड केली, तर आपली प्रतिमा खराब होते. कोण हा उपटसुंभ बाष्कळ बडबड करतो आहे, असा इतरांना प्रश्न पडतो. शिवाय अंतिमतः आपल्या तब्येतीवर व आवाजावर हे अति बोलणे विपरीत परिणाम करू शकते.
३. आपले बोलणे, हे काय परिणाम घडवेल याचा पूर्ण विचार, आपण बोलण्यापूर्वीच करायला हवा. बोलण्यातून आपल्याला जे काम साध्य करायचे आहे ते महत्वाचे असते. बोलण्या मुळे त्या कामात काही अडथळा तर येत नाही ना, किंवा येऊ शकणार नाही ना, याचा अगोदर विचार करायला हवा. कितीही तर्कसंगत असले तरी, ती वेळ योग्य आहे कां हे ध्यानात घेऊन, त्याचा परिणाम काय होऊ शकतो, याचा विचार करायला हवा.
माझा एक अनुभव येथे सांगण्यासारखा आहे. घरात काहीतरी मंगल कार्य होते, म्हणून रंगकाम एका नामांकित कंपनीकडून करून घ्यायचे ठरवले होते. त्या कंपनीचा प्रतिनिधी घरी येऊन, मोजमाप वा इतर गोष्टी ठरवणार होता. मुळात तो खूप उशिरा आला आणि एकंदर त्याच्या हालचाली व वागणुकीवरून त्याला या विषयाची विशेष माहिती असलेली दिसली नाही. त्यामुळे मी मागचा पुढचा विचार न करता त्याला खूप नावे ठेवली. खरं म्हणजे मला संयम बाळगायला हवा होता. तो गेल्यानंतर, फार तर मी त्याच्या वरिष्ठ व्यक्तीजवळ माझे मत व्यक्त करू शकलो असतो. त्यामुळे तो जवळजवळ चिडून नाराज होऊन गेला आणि अर्थातच आमचे रंगकामाचे खूप खेळखंडोबे झाले.
थोडक्यात,
"डोक्यावर बर्फ व जीभेवर नेहमी साखर" हवी.
४. आपण सारासार विचार करून घेतलेल्या निर्णयाशी नेहमी ठाम राहावे. जरी विरोध झाला, तरी त्याला संयमाने खोडून टाकण्याचा प्रयत्न करावा. मात्र एखादा निर्णय घेतल्यावर, समजा त्याचे जर अपेक्षित परिणाम झाले नाहीत, तर कुठलीही कारणे न सांगता पालुपदे न लावता, आपली चूक झाली हे खुल्या दिलाने कबूल करावे. ते हिताचे व आवश्यक असते. आपल्याबद्दल आदर त्यामुळे वाटतो.
मात्र असे पुष्कळांना जमतेच असं नाही. आपल्याला असे आढळते की, जर कुणाचे निर्णय चुकले आणि काही वेगळाच परिणाम झाला, तर बरेचसे लोक वेगवेगळी कारणे देत आपली जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करतात. अर्थातच अशी माणसे मनातून तर उतरत जातातच, पण पुढे त्यांच्यावर कुणी भरंवसा ठेवत नाहीत.
सुधाकर नातू
२१/१२/'१९
Helpful guidance
उत्तर द्याहटवा