गुरुवार, २९ ऑगस्ट, २०१९

"अशी ही, फजीती व बेफिकीरीची कहाणी!":


 "अशी ही, फजीती व बेफिकीरीची कहाणी!":

पुष्कळ वेळा आपण महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो बेफिकीरीने वागतो आणि आपली फजिती होते, नाहक मनस्ताप होतो. अशाच माझ्या अनुभवांच्या काही गोष्टी मी इथे सांगणार आहे.

"फजिती नव्हे दारुण निराशा":

एकदा आम्ही दोघं, एका गाजत असलेला चित्रपट बघायला जाणार होतो. तिकीट आधीच काढलं होतं आणि माझी अशी कल्पना होती ही तिकीटं त्या दिवशी, दुपारी तीन वाजल्याच्या खेळाची आहेत. म्हणून आम्ही त्याप्रमाणे दुपारी अडीच पावणेतीनला घरातून निघून थिएटरवर गेलो.

तिथे मोठ्या दिमाखात द्वाररक्षकाला तिकीट दाखवून आता उत्सुकतेने चित्रपट बघायला मिळणार अशा आशेवर आम्ही दोघं होतो. तिकीटं पाहिल्यावर त्यावेळेला त्याने आमच्याकडे चमत्कारिक रितीने पहात म्हंटले "अहो साहेब तिकिटं नीट पाहिली नाहीत वाटते? ही बाराच्या खेळाची आहेत, तो आत्ताच संपला!" चांगला चित्रपट पाहायला आलेल्या आमचे चेहरे पहाण्यासारखे झाले.

म्हणजे झालं होतं असं की तिकीटे काढली तेव्हा ती हाती आल्यावर, त्यावर तो खेळ किती वाजताचा आहे ते बघित़़लं नाही. ना ज्या वेळेस सिनेमाला घरून जायचं तेव्हाही तिकिटावरची वेळ मी माझ्या बेफिकीरीने पाहिली नव्हती. त्यापायी अशी ही फजिती व दारूण निराशा झाली!

"फजिती नव्हे, नुकसान!":

त्याचं असं झालं, आम्ही गावी गेलो होतो. गावाहून परत आल्यावर माझी एक पूर्ण झालेली, फिक्स डिपॉझिट रसीट घेऊन आम्ही बँकेत गेलो. ती गुंतवणूक कुठल्या प्रकारची आहे ते बघितलंच नव्हतं. त्याची पूर्णतेची तारिख उलटून गेली होती. त्यामुळे तिथे गेल्यावर मी विचार न करता कर्मचाऱ्याला सांगितलं " ती तशीच पुढे गुंतवा". त्या कर्मचाऱ्याने तिचे त्यानुसार नुतनीकरण केले व रसीट आम्हाला दिली.

नीट पाहिली,तेव्हा कळलं की ही रसीट 80C अन्वये टँक्स सेव्हिंगची म्हणजे पाच वर्ष मुदतीची होती. खरं म्हणजे आम्हाला दोन वर्ष इतक्याच मुदतीची नवीन रसीद हवी होती. हे पाहिल्यावर मी पुन्हा बँकेत गेलो आणि सांगितलं की ही रिसीट रिडीम करा. तर मला तो कर्मचारी म्हणाला "माफ करा, आता तसं करता येणार नाही, कारण ती रसीट टॅक्स सेव्हिंग असल्यामुळे पाच वर्षांनीच आता रिडीम करता येईल!" कारण नसताना ह्या माझ्या हलगर्जीपणामुळे पाच वर्षे वाट पहायला लागून आमचे तसे नुकसान होणार होते.
रसीट बँकेत घेऊन जाताना जर नीट बघितलं असतं तर....!

आर्थिक व्यवहारात नेहमी, आपल्याला खूपच काळजी घ्यावी लागते. काटेकोरपणे प्रत्येक गोष्ट नीट तपासून घेऊन मग कृती करावी लागते. हा धडा मी ह्या प्रसंगातून शिकलो.

"फजिती नव्हे बेफिकिरी-२":

हा अनुभव म्हणजे, नुसतीच फजितीच नाही तर मूर्खपणाचा कळस पण आहे, हलगर्जीपणाची कमाल! त्याचं असं झालं असाच फिक्स डिपॉझिट रसीट ह्यावर्षी १८ ऑगस्ट'१९ ला संपत आहे असे समजून बँकेत गेलो. ती तर तारीख उलटून गेली होती. नेहमीप्रमाणे पुन्हा गुंतवायला सांगितली, दोन वर्षांसाठी. आता हे २०१९ साल म्हणजे २०२१साल पर्यंत ती पूर्ण होईल, असं समजून मी रसीट दिली होती. क्लार्कने पण बहुदा ती न बघता जवळ ठेवली, कारण दुर्दैवाने त्यादिवशी बँकेची कॉम्प्युटर सिस्टीम बंद होती व मला एक चिठ्ठी लिहून दिली की तुम्ही पुन्हा उद्या नूतनीकरण झालेली रसीट घ्यायला या.

खरं म्हणजे विविध बँकांचे सामीलीकरण झाल्यामुळे आमचा जो अकाउंट घराजवळ होता तो या नव्या ब्रँचमध्ये जागी गेला होता. नेहमी लांबवर तिथे जायचं हा एक मोठा द्राविडी प्राणायाम होता. कॉम्प्युटर सिस्टिम चालू नसण्यामुळे म्हटलं तर माझी भेट फुकट गेली होती.

काही दिवस असेच गेले. मग केव्हा तरी मला आठवण झाली-पाच-सहा दिवसांनी की, आपल्याला ही नवीन FD रसीट आणायची आहे. म्हणून बँकेत गेलो तर तिथे भली मोठी लाईन होती. आमचं नेमका, FD चे काम करणारा कर्मचारी आला नव्हता! मी वैतागून गेलो. पुढे वरिष्ठांना जाऊन सांगितल " तुमचं हे काय सेवा देणं? आमच्या सारख्या ज्येष्ठ नागरिकांचे हाल तुम्हाला पाहवत नाही कां? किती वेळा आम्हाला यायला लावणार? काही करून मला माझी नवीन FD रसीट द्या" माझ्या खंबीर बोलण्यामुळे, त्या ऑफिसरने एका शिपायाला सांगितलं- त्या क्लार्कच्या ड्रॉवरमधून यांना रसीट शोधून दे. मग तो शोधत बसला. शेवटी एकदाची ती नवीन (?) मिळाली आणि मला गंगेत घोडं आल्यासारखं झालं!

मी घरी आलो. घरी आल्यावर बघितलं तर रसीट पूर्णतेची तारीख होती १८ ऑगस्ट'२०! मला वाटलं असं कसं झालं, ती '२१ असायला पाहिजे होती. जरा निरखून पाहिलं, तर सुरुवातीची गुतवणुकीची तारीख बघितली तेव्हा लक्षात आलं ती १८ ऑगस्ट'१८ होती. म्हणजे मी दिलेली रसीटच मला जशीच्या तशी परत मिळाली होती!

सारांश मला मुळी नुतनीकरण करण्याची आत्ता गरजच नव्हती कारण ती आत्ता २०१९ मध्ये पूर्ण होतच नव्हती. अशा तर्हेने दोन नाहक खेपा व मनस्ताप मी माझ्या बेफिकीरीने ओढवून घेतला होता.

जागते रहो, बेफिकीरी मत करो, हे म्हणतात ते खोटे नाही.

सुधाकर नातू
२९/८/२०१९

रविवार, १८ ऑगस्ट, २०१९

"स्वातंत्र्योत्तर प्रगतीचा लेखाजोखा"::


 "स्वातंत्र्योत्तर प्रगतीचा लेखाजोखा":

माझ्या एका मित्राचे विचार:
"नाण्याची एक बाजू":

"१५ आँगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारत राजकीय, आर्थिक आणि लष्करी सामर्थ्यासाठी वेगळ्या स्थानावर होता. पूर्वेकडील बहुतेक देश उदा. जपान, चीन, मलेशिया, सिंगापोर, कोरिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया, फिलीपिन्स इत्यादी एकतर त्यामानाने नगण्य होते किंवा महायुद्धात त्यांचे अतौनात नुकसान झाले होते.

भारताच्या पश्चिमेला प्रवासी भटक्या जमातींनी आखाती देश वसविला होता. उत्तरेकडील सोव्हिएत युनियनमध्येही इराण, इराक आणि सीरिया यांना युद्धामध्ये सामना करावा लागला. भारताचे एकमेव दुर्दैव म्हणजे फाळणी आणि परिणामी अनागोंदी. त्याखेरीज सर्व घटक भारताच्या बाजूने होते. मुंबई, कलकत्ता, मद्रास, नवी दिल्ली, उत्कृष्ट प्रशासकीय यंत्रणा, हेवा करणारे सैन्य, विस्तृत रेल्वे व रस्ते पायाभूत सुविधा, सिंचन मालमत्ता, वीज केंद्रे, रस्ते वाहतूक आणि सुशिक्षित उच्चवर्गाचे लोक यासारख्या जागतिक दर्जाची शहरे होती.

आम्ही या सर्व फायद्यांसह काय केले? आता आमच्या शेजार्‍यांनी केलेल्या आश्चर्यकारक प्रगतीकडे परत पाहताना आपण असे, कसे म्हणू शकतो की आपण यशस्वी झालो? आपल्या राष्ट्राचे भवितव्य बदलणे अजूनही शक्य आहे की आम्ही १३५ कोटी लोकसंख्येसह आपल्या सर्व दुर्बलतेसाठी ब्रिटिशांना जबाबदार धरण्याचा आमचा आवडता उद्योग चालू ठेवतो?"

माझी प्रतिक्रीया:
"नाण्याची दुसरी बाजू":

"स्वातंत्र्यानंतर भारताची प्रगती" ह्या विषयावरील, वरील सुसंगत प्रतिपादन फेसबुकवर वाचले. नाण्याची दुसरी बाजू इथे मांडण्याचा मी प्रयत्न करतो.

स्वातंत्र्य लढ्यात आधी सुधारणा की आधी स्वातंत्र्य, हा सुधारककार आगरकर व लोकमान्य टिळकांमधला वाद प्रसिद्ध आहे. दुर्दैवाने आधी सुसंस्कृत माणसं अन् समाज घडवू या आणि नंतर स्वातंत्र्य मिळवू या, असा आग्रह धरणार्या आगरकरांच्या अकाली निधनामुळे म्हणा वा अन्य कारणाने सुधारक पराजित झाले आणि स्वातंत्र्य योग्य तर्हेने स्विकारून ते राबविण्याची क्षमता असणारे नागरिक बनण्या आधी स्वातंत्र्य मिळाले.

यामुळे विहीत कर्तव्यांचे उत्तरदायित्व जबाबदारीने पाळणारे नागरिक नसणार्या आपल्या देशाचे "चालसे कल्चर"मध्ये रुपांतर कधी झाले ते कळलेच नाही. आपली प्रगती त्याच सुमारास स्वतंत्र झालेल्या देशांच्या तुलनेत मागे राहीली हयाचे हे एक महत्वाचे कारण असू शकते.

दुसरे कारण बहुभाषिक, बहुधर्मिय व प्रचंड वैविध्यपूर्ण लोकसंख्या असलेल्या आपली, लोकशाही प्रणाली आणि बहुतांश इतर देशांचा हुकूमशाही सद्रूष कारभार हे होय.

वरील संदेशामुळे, ह्या महत्वाच्या मुद्यावर विचार करायला प्रेरणा मिळाली आणि जे सुचले, ते मांडले.

"मित्राचा ह्याला प्रतिसाद":

"तुझे मत वाचुन बरे वाटले. मी बऱ्याचशा बाबतीत सहमत आहे. मुख्यत्वेकरून आगरकरांच्या मतप्रणालीशी. राष्ट्र चालवण्याची कुवत नसतांना स्वातंत्र्य मिळाले. त्यात लाखों लोकांचें फाळणीमुळे प्राण गेले व करोडो निर्वासित झाले. आपण इंग्रजांना दोष देऊन मोकळे झालो. आपले राज्यकर्ते हात झटकून मोकळे झाले. त्यांनी आपल्या जनतेला संरक्षण देण्याची क्षमता नसतांना आपल्या हट्टासाठी स्वराज्य घेतले व निष्पाप जीवांचा बळी दिला. स्वातंत्र्य मिळाल्यावर सुंदर देशाची दुर्दशा केली. आपल्या बाजूचे देश राखेतून वर आलें. आपण मात्र सगळी शहरं धारावी सारखी करतो आहोत. ३५ कोटीची लोकसंख्या १३५ कोटींवर आणली आहे. ह्याला फक्त लोकशाही राजवट जबाबदार आहे असे वाटत नाही. लोकशाहीचे बेबंदशाहीत केव्हाच रूपांतर झाले आहे."

सारांंश....
स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होण्याची वेळ जवळ आली असताना, आपण कुठे होतो, आता कुठे आलो तसेच त्यासाठी आपण काय बरोबर वा चूकीचे केले, खरोखर काय करणे गरजेचे होते आणि प्रगत आघाडीवर येण्यासाठी ह्यापुढे काय काय करायला हवे अन् काय टाळायला हवे ते सारे ऐरणीवर आणून चर्चा व्हायला हवी विचारांचा सांगोपांग उहापोह व्हायला हवा।
---------------------------------------

सुधाकर नातू


शनिवार, १७ ऑगस्ट, २०१९

"असेही, तसेही अन् काहीही हं! !":


# "काहीही हं"!:

"अग्गबाई सासूबाई" मालिकेने तर सुरूवातीपासूनच "काहीही हं, दाखवण्याचा जणु चंगच बांधला आहे. झट मंगनी पट ब्याह करून कुळकर्ण्यांची आगाऊ सून ग्रहप्रवेश करण्यापासून "काहीही हं" प्रसंग दाखवण्याचा सिलसिला जो सुरू,
तो तसाच सुसाट चालूच आहे.......

उच्चभ्रू सोसायटींतील पाच सहा बायका नटून थटून, एकत्र माँलमध्ये शाँपिंगला न जाता, चक्क भाजी आणायला बाजारात काय जातात.....अन् तिथे शेफ अभिजीतच येऊन योगायोगाने चक्क एक भाजीविक्रेता काय बनतो....मेचक्या तिथेच, हे महिला मंडळ वाटेतल्या इतर कोणाकडे न जाता, भाजी खरेदीसाठी काय जाते....काहीही हं!

असावरी व शेफ अभिजीतनी "काही ही हं" करून एकत्र यावे म्हणून, घरातला सासरा गांवी, सून कंपनीच्या कामासाठी लोणावळ्याला आणि त्याच दिवशी मुसळधार पावसाचे थैमान अन् सोहमचे घरी न जाणे.... एकट्या असावरीला अशा वेळी ना शेजारी पाजारी, ना जवळचे नातेवाईक वा ना सोहमचे मित्र ह्यांची आठवण येतच नाही, मेचकी शेफसाहेबांचीच मदत घ्यावी लागणे, हे सारे "काहीही हं"!....

( लौकरच एक ओढून ताणून घोडनवरी बनणार्या?) असावरीला आपल्या मुलाचा ना मोबाईल नंबर ठाऊक ना त्याच्या आँफीसचे नांव पत्ता इ.इ. माहिती....मुलगा सोहम इतका बेपर्वा की मित्राकडे गेलोय हे सांगतही नाही....अन् ही जगावेगळी आई त्याला एखाद्या कुक्कूलं बाळ असल्याप्रमाणे काय संबोधते.... (सारे काही चिड आणणारे, बुद्धीला न पटणारे) "काहीही हं"!....

जी कहाणी अग्गबाई ची, तीच "तुझ्यात जीव रंगला" ची, तीच " जीव झाला वेडा पिसा" ची, तीच अनु सिद्धार्थच्या " मन बावरे" ची...आणि बहुधा सगळ्याच मालिकांची.....

कारण सगळ्यांनी मालिका पाहून, " काही ही हं" म्हणावं ही स्पर्धाच जणु ईडियट बाँक्सवर चालू होती, चालू आहे आणि चालूच रहाणार आहे!

हे म्हणजे अगदीच "काहीही हं!"

सुधाकर नातू

ता.क.
मागे एका मालिकेतील सून, ह्याही मालिकेत असल्याने तिची 'काहीही हं', ही सवय बहुधा carry forward करत आहे.

------------------ --------
"समीक्षेची समीक्षा":

# समीक्षा करताना समीक्षक ते काम केवळ आपलयापुरते करत नसतो,तर तो प्रेक्षंकंाचा दिशादशॅक असतो. सहाजिकच त्याला सर्वसाधारण प्रेक्षंकांची आवडनिवड माहित असणे गरजेचे असते. जो, ती नीट जाणून आपले परीक्षण लिहितो, त्याच्यावर सहसा टीका होत नाही.

समीक्षक जसा निर्मात्याचा भाट नसावा, तसाच तो प्रेक्षकांचा शत्रुही नसावा,तर हितचिंतक असावा. प्रेक्षकांची नस ज्यांना जाणता येत नाही, अशांनी परीक्षणे न लिहीणे चांगले!

'What 'classes' like, more often than not, masses reject And vice versa' appears unfortunately to be a reality.
-------------------------
# "सोशल मिडीया: आपले उत्तरदायित्व":

Whatsapp वर व्हिडिओ पाठवताना बहुतांश ते कोणत्या विषयावर आहेत हे दिले जात नाही. विषय जर दिला तो उघडायचा की नाही हे ठरवता येऊ शकते आणि वेळ व डेटा वाचतो. ई मेल पाठवताना सुद्धा जेव्हा आपण एखादे ईमेल पाठवतो तेव्हा त्याचा विषय विचारला जातो, आणि नंतर तो पाठवावा अशी अपेक्षा असते. अर्थात विषय घातला नाही, तरी तो जातो हे जरी खरे असले, तरी विषय टाका अशी विनंती तिथे केलेली असते हे ध्यानात ठेवायला हवे.

अशा वेळी "विषय सांगा, नंतर तो उघडायचा की नाही ते ठरवू" हा प्रतिसाद अत्यावश्यक असूनही, पाठवणार्याचा अवमान न होण्यासाठी तो पाठविला जात नाही. अशा वेळी न बघता, तो डिलीटही करता येतो. पण हे नेहमीचेच झाले तर आपल्याला त्रास होतो. सारांश, विषय दिल्याशिवाय कोणताही विडीओ पुढे पाठवला जाणारच नाही अशी व्यवस्था व्हायला हवी.

शिवाय असे की, कुणीही कधीही कुणालाही संदेश पाठवतच असतात. कधी कधी कुणी अनेक संदेश अक्षरश: फेकतच रहातो. इतरांच्या खाजगी भवतालामध्ये अशा तर्हेने ढवळाढवळ केली जाते. म्हणून दररोज किती संदेश 'पाडायचे व फेकायचे' तसेच ते कां व कुणाला ह्याचे तारतम्य बाळगणे शहाणपण होय. ज्या विषयांत रस नाही, गम्य नाही, असे संदेश येतच रहातात आणि हा ओघ थांबवायचा कसा हा प्रश्न निर्माण होतो. ह्यास्तव "सोमि" वर गैरहजेरीरुपी उपवास हे व्रत पाळणे फायद्याचे होईल.

ह्या पार्श्वभूमीवर ज्याने त्याने सोशल मिडीयावर आपआपली आचार संहिता ठरवायला हवी. ही जाणीव झाल्याने मी माझ्यापरते तसे करून, काही शिस्त व सुत्रबद्धता आणण्याचा संकल्प सोडत आहे. बघू या, किती कसे जमते. सध्या निदान जाणीव झाली, हे ही नसे थोडके!

तुमची ह्यावर काय प्रतिक्रिया आहे?

"सोशल मिडीया: माझी आचारसंहिता":

१ दररोज जास्तीतजास्त तीन संदेश-फेबु wapp
२ नीट तपासून अत्यावश्यक संदेशच पुढे पाठविणे.
३. ज्यांच्याकडून जेव्हां आपल्याला संदेश येतात, त्यांनाच अनाहूत संदेश पाठविणे.
४ विषयाविना असलेला विडीओ वा फोटो न पहाता डिलीट करणे.
५. ब्लॉग व चँनेल प्रमोशन आठवड्यातून फक्त एकदाच.
६. राजकीय विषयावर संदेश पाठविणे शक्यतो टाळणे.
७ लोकोपयोगी, विचार विकास प्रवर्तक असे स्वनिर्मित संदेशच शक्यतो पाठविणे.

सुधाकर नातू


शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०१९

"स्विकारा, नित्य बदल":


 "स्विकारा, नित्य बदल":

हवाहवासा वाटणारा गुलाबी हिवाळा, तो संपतो न संपतो तोच रखरखीत असा तापदायक उन्हाळा, असे हे ऋतुचक्र युगानुयुगं चालू आहे. म्हणजे बदल हाच निसर्गाचा नित्यनियम आहे. काही चांगलं, तर काही त्रासदायक, काही सुखदायक, तर काही दुःखदायक अशा तर्‍हेचे विविध अनुभव घेणं हेच तर जीवन असतं. म्हणूनच सुखदुःख ही आलटून-पालटून येत असतात. सगळ्यांचे सगळेच आयुष्य काही दुखी किंवा सुखी समाधानी नसते. प्रत्येकाच्या जीवनाची वाटचाल, ही त्याच्या त्याच्या नशिबाने म्हणा, प्रारब्धाने म्हणा ही अगदी आगळी वेगळी असते.

कुठे होतो आणि कुठे आलो, विचार करता करता पण त्यातून एक साधलं, ते म्हणजे आपल्या सभोवताली जे घडत असतं, ते आपल्याला अनुभवायला येत असतं. ते जसंच्या तसं स्वीकारणं आणि पुढे जाणं हाच खरा पुरुषार्थ आहे.

स्थितप्रज्ञ व्हा, हे जे भगवान श्रीकृष्णाने सांगून ठेवलयं, ते खरोखरच अनुकरणीय आहे. अशी द्रुष्टी येणं, असा स्वभाव बनणं, निश्चित कठीण आहे. पण ते तसं आपल्याला जमलं, तर आपले जीवन अधिक संतोषजनक होईल.
---------------------------
# "हवे, कर्तव्याचे उत्तरदायित्व":

"सद्दस्थिती चिंताजनक अशीच झाली आहे. एकीकडे नित्य वाढत्या अपेक्षा, दुसरीकडे संधींचा दुष्काळ आणि त्यांत भर म्हणून मतलबी स्वार्थी राजकारण, हेही पुरेसे नाही म्हणून की काय, अनियंत्रित नोकरशाही, ढासळती प्रशासकीय गुणवत्ता व कारभार अशा चक्रव्यूहात शास्वत, सर्वसमावेशक विकास पुरता अडकला आहे.

जो पर्यंत सर्वच क्षेत्रात, समस्त स्थरांवर विहीत कर्तव्ये आणि त्यासाठीचे प्रत्येकाचे उत्तरदायित्व समाधानकारकरित्या पूर्ण करण्याची ईर्षा निर्माण होत नाही, तोपर्यंत उत्तरोत्तर भवितव्य अंध:कारमय होत जाणार हे निश्चित.
----------------------------

"भ्रष्टाचाराचा भस्मासूर":

# लक्ष्मी चंचल असते,तिची देवाण घेवाण सतत चालू असते. लक्ष्मी चंचल असते व हे चक्र न थांबणारे असते. लक्ष्मी नेहमी स्वकष्टांतून, प्रामाणिक मार्गाने यावी. ग़ैर मार्गाने कष्टांशिवाय आलेली लक्ष्मी कधीही चांगली नाही; अशी लक्ष्मी सुख शांती देत नाही. हाच निसगॅ नियम आहे,जो जणु Newton चा पहिल्या नियमानुसार आहे. "करावे, तसे भरावे".

सध्याची अशांतता, ताणतणाव, हिंसा विध्वंसक वातावरण हा भ्रष्टाचाराने बरबटलेल्या मार्गांनी येत असलेल्या लक्ष्मीचा परिणाम आहे. कारण अशा व्यवहारांत एका बाजूला कर्तव्याचा विसर, फ़क्त हाव असते, तर दुसर्या बाजूला अगतिकता असते. कोण, कसा केव्हा थांबवणार, भ्रष्टाचाराचा हा विदारक भस्मासूर?
----------------------------
कां?: अमक्याचा खास अमूक दिवस?":
"एक मार्केटिंग फंडा"?

आज ह्याचा उद्या त्याचा, अमुकच एक, खास दिवस निवडण्याची संकल्पना कुणी शोधली व कां? वर्षातील तशा दिवसांची एकत्रितपणे माहिती कुठे मिळते?

अशा तर्हेचे प्रश्न मनात येणे सहाजिकच आहे. त्यामागचा शोध एका निकटवर्तीयाने घेतला आणि तो मला जसा समजला, तो असा आहे:

"मूलतः काही दिवस 'मदर्स डे' सारख्या विशिष्ट क्रुतज्ञता मनापासून व्यक्त करण्याच्या प्रेरणेमुळे नियुक्त केले गेले. परंतु अमुक अमक्याचा “दिवस” हे सर्व फॅड मुख्यतः "हॉलमार्क हॉलिडे" ह्यावरून सुरू झाले असावे.

हॉलमार्क ही एक ग्रीटिंग कार्ड कंपनी होती आणि बर्‍याच अमक्याचे “दिवस ” ह्यांचा शोध त्याद्वारे काटेकोरपणे लावला गेला. जेणेकरून नवीन ग्रीटिंग कार्ड आणि केक गिफ्टसारख्या नवीन व्यवसाय विक्रीचे उत्पन्नांत वाढ होणे शक्य झाले. अमुक जणांचे अमुकच खास दिवस ही संकल्पना मोठ्या प्रमाणावर विस्तारित होत गेली. अगदी काही दशकांपूर्वी जरी 'मदर्स डे' स्थापित झाला असला तरी ऐकला नव्हता. पण अशा खास दिवशी किती व्यवसाय होतो हे पहा!

आणि मग बर्याच संस्था किंवा कंपनीचे विशिष्ट विभाग इत्यादींनी स्वतःच्या विशिष्ट ओळखीसाठी अशा “दिवस” संकल्पनेची एक नियमितपणे प्रथाच सुरू केली. आणि आता .... जसे की ते म्हणतात की ह्या प्रकारे वर्षामध्ये जणु ३६५ पेक्षा अधिक विशिष्ट "दिवस" असावेत हे कदाचित वास्तव आहे!

ह्या "खास राखून ठेवलेल्या अमुकचा हा दिवस ह्या संकल्पनेमुळे उगाच भावविवश व्हायचे कारण नसावे. हे फँड सध्याच्या बाजाराभिमुख जीवनशैलीचा मार्केटिंग फंडा आहे, दुसरे तिसरे काहीही नाही.

सुधाकर नातू

सोमवार, १२ ऑगस्ट, २०१९

"राहू व केतूच्या राश्यंतराचे परिणाम":


 "राहू व केतूच्या राश्यंतराचे परिणाम":

गेल्या काही दिवसापासून अनेक चित्रविचित्र घटना घडून गेल्या आहेत. मोजक्याच चांगल्या, परंतु अनेक विचार करायला लावणार्‍या, धक्कादायक व क्लेशकारक दुर्घटना, विशेषतः सध्याचे महापुराचे संकट आ वासून उद्भवले आणि त्याला धैर्याने तोंड देणे चालू आहे. त्यापूर्वीही दुर्दैवाने अनेक ठिकाणी संरक्षक भिंती पडणे, धरण फुटणे, आगी लागणे आणि इमारती, पूल कोसळणे, तसेच चित्र विचित्र अपघात होऊन अनेक जण म्रुत्युमुखी गेले आहेत.

भीषण महापूरासारखी भयानक खरोखर कसोटी पाहणारी अशी ही वेळ आहे. त्यादृष्टीने आम्ही ज्योतिषी म्हणून राहू-केतू ह्यांचे राश्यंतर २३ मार्च २०१९ रोजी झाले व त्याचे अनिष्ट परिणाम ह्यांचा विचार करत आहोत. धनु राशीत शनि आणि केतू एकत्र येणे हासुद्धा अनेक वर्षांनी घडणारा कुयोग असल्यामुळे, हे तीन पापग्रहांच्या ग्रहस्थितीमुळे
अशा तऱ्हेचे दुष्परिणाम घडून आले कां, हा एक विचार करण्याजोगा प्रश्न आहे. त्यादृष्टीने प्रत्येक चंद्रराशीवरील बर्या वाईट परिणामांची दखल घेणारा हा खास लेख आहे.

"राहू व केतूच्या राश्यंतराचे परिणाम":

यंदा २३ मार्च २०१९ रोजी राहू-केतू चे राश्यंतर झाले आहे. राहू कर्केतून वक्री मिथुन राशीत आणि केतू मकरेतून धनु राशीत, जिथे शनी आहे, तिथे प्रवेश केला आहे. ही राहू केतूची स्थिती २२ सप्टेंबर २०२० पर्यंत राहणार आहे. ह्या कालखंडातमध्ये राहू केतूच्या राश्यंतराचा एकंदर काय परिणाम होईल यावर ज्योतिषींनी प्रकाश टाकणे गरजेचे आहे.

ह्या खास लेखात आम्ही तसा राशीनिहाय प्रयत्न केलेला आहे. अभ्यासूंनी त्यावर अधिक सखोल विचार करून आपले मत बनवावे. सर्वसाधारण वाचकांनी ह्या निरीक्षणांकडे, एक दिशादर्शक अशा दृष्टीने बघून आपले प्रयत्न आणि अपेक्षा ह्यांची समन्वयता साधावी.

हे राश्यंतर, कोणाला चांगलं, कोणत्या राशीला वाईट आणि कोणत्या विशिष्ट अशा विषयांवर वाईट, ह्याचा आपल्याला अभ्यास केला पाहिजे आणि तो असा करायला लागेल की जणू काही चंद्र कुंडली धरून त्या राशीच्या कोणत्या स्थानी हे ग्रह होते आणि आता कोणत्या स्थानी ते येणार आहेत याचा अभ्यास केला पाहिजे. अशा विचारधारेवर प्रत्येक राशीचा अभ्यास केला तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे निष्कर्ष काढता येतील:

१.मेष: मेष राशीच्या पराक्रमात आता राहू येणार आहे. त्यामुळे उत्साह वाढता राहील आणि इतके दिवस करावयाची महत्वाची कामे पूर्ण होऊ शकतील. आपल्या जबाबदाऱ्या हिंमतीने पार पाडाल मात्र केतू भाग्यस्थानात असल्यामुळे एकंदर अधिक अपेक्षा आपल्या भाग्योदयाच्या करू नका. जी काही फळे मिळतील नोकरी-व्यवसायात, त्यात समाधान माना. आतापर्यंत चौथा राहू असल्यामुळे मानसिक असमाधान होते, ते मात्र आता नियंत्रणात राहील, भावंडांकडून मात्र थोडाफार त्रास होऊ शकतो किंवा त्यांच्याबरोबर मतभेद होऊ शकतात. इतरांच्या तुलनेत, मेष राशीला हा कालखंड अधिक चांगला जाऊ शकेल.

२. व्रुषभ: वृषभ राशीला आता काय होणार तर, त्यांच्या धनस्थानात आणि अष्टम स्थानात राहु आणि केतु येणार. धनस्थानात म्हणजे आर्थिक चणचण भासू शकेल खर्च जास्त होतील. हेच कुटुंबाचे स्थान आहे म्हणजे कौटुंबिक कलह वा काहीतरी नव्या जबाबदाऱ्या वाढू शकतील. केतू अष्टम स्थानी म्हणजे त्यामुळे विविध प्रकारचे काही त्रास वा मोठे अचानक नुकसान अशा तऱ्हेचे अनुभव येतील.

३.मिथून: मिथुन राशीचा जर विचार केला, चंद्राबरोबर म्हणजे तुमच्या डोक्यावर राहू आणि सप्तम स्थानात म्हणजे जोडीदार भागीदारीच्या स्थानात केतू त्यामुळे महत्वाचे विचार करताना संभ्रम निर्माण होऊ शकतील. चुकीचे निर्णय परस्परसंबंधात काहीना काहीतरी वितुष्ट अशा तऱ्हेचे फळे मिळू शकतात. तुमच्या वागण्याच्या पद्धतीला सुधारावे लागेल. तसेच एजोडीदाराशी मतभेद टाळावे लागतील. व्यवसाय नोकरी स्थानापासून राहू चौथा असल्यामुळे तेथूनही तुम्हाला जास्त अपेक्षा करता येणार नाहीत आणि जैसे थे परिस्थिती राहील. थोडक्यात मिथुन राशीला हे संक्रमण तेवढे फलदायी नाही.

४.कर्क: कर्क राशीच्या व्ययांत राहु तर शत्रुक्षेत्री केतू, शनीबरोबर अशी स्थिती या कालखंडात राहणार आहे. विवाह जुळणी संबंधी काही अडचणी अथवा चौकशी अधिक करावी नाहीतर फसगतीची शक्यता अशा तऱ्हेचे योग आहेत. तसेच जुनी येणी परत मिळणे कठीण होऊ शकते. आरोग्यासंबंधीची काळजी वेळीच घ्यावी. पोटाचे विकार अथवा डोकेदुखी संबंधी काही समस्यांचे निरसन करणे गरजेचे ठरेल. भावडांबरोबरचे संबंध बिघडू शकतात आणि प्रवासामध्ये किरकोळ अपघात अडचणी हे ग्रहयोग सुचवतात. थोडक्यात तारेवरची कसरत करण्याचा काळ आहे.

५.सिंह: सिंह राशीला राहू लाभात येत असल्यामुळे शुभ फले देऊ शकतो. मात्र त्याच वेळेस केतु पंचम स्थानात असल्यामुळे काही निर्णय चंचलतेमुळे चुकू शकतात. त्यामुळे नोकरी व्यवसायात नुकसान होऊ शकते याचे भान ठेवायला हवे. केतू पंचमात असल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात चलबिचल अथवा अपेक्षित यश विद्यार्थ्यांना न मिळणे आणि संतती विषयक काही समस्या वडीलधाऱ्यांना येऊ शकतात. एकंदर हा काळ संमिश्र आहे असेच म्हणावे लागेल.

६.कन्या: कन्या राशीला दशमात राहू आणि चतुर्थात चंद्र केतू यामुळे हा काळ कसोटीचा जाऊ शकतो. माता-पित्यांना काळजी घ्यावी लागेल- त्यांच्याकाही अनारोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. कुटुंबात महत्त्वाच्या प्रश्नावर मतभेद होऊ शकतात. नोकरी-व्यवसायात ताणतणाव वाढेल आणि जबाबदाऱ्या योग्य वेळेला न पूर्ण झाल्यामुळे वरिष्ठांची बोलणी खावी लागतील. धंद्यात आर्थिक नुकसानीचा फटका बसू शकतो. इतरांच्या तुलनेत तुम्ही जास्त अपेक्षा ठेवू नका आणि प्रयत्न मात्र वाढवा असेच या कालखंडाचे सांगणे आहे.

७.तुळा: तुला राशीच्या बाबतीत केतू पराक्रमात तर राहू भाग्यस्थानात अशी स्थिती आहे. त्यामुळे संमिश्र फळे मिळतील. भाग्यस्थानातील राहुमुळे तुमच्यापुढे आलेल्या संधी, काही अडचणी आल्यामुळे त्यांचा फायदा होणार नाही. प्रवासात वाद विवाद किंवा इतर काही अडचणी विलंब ह्यांची शक्यता आहे. त्याचप्रमाणे भावंडांच्या आरोग्य विषयी काही चिंता निर्माण होऊ शकतात. एकंदर हा काळ प्रतिकूल आहे त्यामुळे सावधानता बाळगणे आवश्यक आहे.

८.व्रुश्चिक: वृश्चिक राशीचा विचार करता या राशीला राहू आठवा आणि केतू शनी बरोबर दुसरा असल्यामुळे सर्व राशींमध्ये जास्त कसोटीचा काळ जाऊ शकतो. अचानक आर्थिक नुकसान, प्रतिष्ठेला बाधा येईल अशा घटना घडू शकतील. कौटुंबिक जीवनामध्ये अडी अडचणींचा हा काळ असू शकतो. पंचमाच्या चतुर्थात राहू असल्यामुळे निर्णयशक्ती योग्य तऱ्हेने काम करेल असं नाही. त्याचप्रमाणे संतती विषयक काही समस्या निर्माण होऊ शकतात. अतिशय काळजीपूर्वक निर्णय घेऊन संयमाने या कालखंडात आपल्याला येणाऱ्या परिस्थितीशी धैर्याने मुकाबला करावयाचा आहे.

९. धनु: धनु राशींत चंद्राबरोबर केतू शनी असल्यामुळे मानसिक चांचल्य वाढण्याची या कालखंडात शक्यता जास्त आहे. त्याचप्रमाणे जोडीदाराच्या स्थानात राहु असल्यामुळे मतभेद अथवा सांसारिक जीवनात जबाबदाऱ्या वाढल्यामुळे होणारे एकंदर ताणतणाव अशा तऱ्हेचा अनुभव या कालखंडात येईल. चतुर्थ स्थान त्याच्या केंद्रात राहू असल्यामुळे मातुल घराण्यातील वडीलधार्‍या मंडळींची काळजी, त्याच प्रमाणे स्थावरासंबंधी योग्य निर्णय न होणे, मानसिक चिंता अशी फळे मिळू शकतात.

१०.मकर: मकर राशीच्या व्ययांत केतू शनी आणि षष्ठ अर्थात शत्रू स्थानात राहू असा संमिश्र कालखंड आहे. षष्ठातील राहू उत्साह वाढवू शकतो तसेच समोर येणाऱ्या कठीण प्रसंगांना विरोधाला समर्थपणे तोंड देण्याची क्षमता निर्माण करू शकतो. मात्र व्ययातील शनी केतू तुमच्या उत्सवावर पाणी टाकू शकतात. त्याचप्रमाणे बंधू-भगिनींशी मतभेद किंवा इतर अनुचित अनुभव येऊ शकतात. प्रवासातही विलंब आणि अडचणींना तोंड द्यावे लागेल.

११. कुंभ: कुंभ राशीला राशीस्वामी शनी केतू बरोबर लाभस्थानी आणि पंचमात राहु अशी संमिश्र स्थिती आहे. एकीकडे नोकरी-व्यवसायात चांगले लाभ आणि संधी तर दुसरीकडे आपल्या निर्णयामधील चांचल्य असा विरोधाभास अनुभवाला येईल. तसेच संततीविषयक काही महत्त्वाचे निर्णय घेताना काळजी घ्यावी लागेल. कारण त्यांत चूक होण्याची शक्यता अधिक आहे. धनस्थानाच्या चतुर्थात राहू असल्यामुळे आर्थिक बाजू सांभाळून मगच पुढे जावे लागेल, कौटुंबिक वादविवाद टाळावे लागतील. एकंदर कुछ खट्टा कुछ मीठा असा ह्या राशीला अनुभव यावा.

१२.मीन: मीन राशीच्या दोन केंद्र स्थानात राहू-केतू अशी योजना या कालखंडात येत असल्यामुळे एकीकडे मानसिक विचीत्र अवस्था व स्थावरासंबधी कटकट, तर दुसरीकडे नोकरी-व्यवसाय त्याचबरोबर माता पिता अशा प्रकारच्या गोष्टींवर राहू, केतू बरोबर असलेला शनी ह्यांचा अनिष्ट प्रभाव पडणार आहे. सहाजिकच ह्या सार्या गोष्टींच्या संबंधी तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीशी तोंड द्यावे लागणार आहे. प्रसंगी नुकसानही संभवते. मानसिक असमाधान वाढवणाऱ्या घटना घडू शकतात. संयम ठेवा.

ह्याप्रमाणे आम्ही राहू-केतू यांच्या राश्यंतराची फळे मांडायचा प्रयत्न केला आहे. तो करताना हे पाप ग्रह, कोणत्या राशीला कोणत्या प्रकारची फळे देणाऱ्या स्थानात त्यांचा प्रभाव आहे, ह्याचा प्रामुख्याने विचार केला आहे. ज्योतिषाकडे अभ्यासपूर्ण दृष्टीने बघण्याचा हा एक प्रयत्न आहे. आम्ही मांडलेली निरीक्षणे ही ज्याची त्याने तपासून घ्यावी आणि एकंदर आपल्या अपेक्षा आणि प्रयत्न यांच्यात समतोल साधून समाधान मिळवायचा प्रयत्न करावा.

सुधाकर नातू.


गुरुवार, ८ ऑगस्ट, २०१९

"सारा हा, ऊन-पावसाचा खेळ!":


"सारा हा, ऊन-पावसाचा खेळ!":

माझ्या मुलीने मला पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त कॅराव्हान ही इन्स्ट्रुमेंट भेट म्हणून दिली. तेव्हापासून आम्ही दररोज सकाळी अतिशय सुमधुर अशी भावगीते त्यावर ऐकत, चहा वगैरे पीत असतो. दिवसाची आमची सुरुवात ही माणिक वर्मा आणि अरुण दाते यांच्या सुरेल आवाजातील आल्हाददायक अशा गीतांनी होत असते. "शुक्र तारा मंद वारा" "सूर जुळले शब्दही जुळले" किंवा "घननीळा लडिवाळा" "क्षणभर उघड नयन देवा" "सावळ्या विठ्ठला" अशी एकापेक्षा एक अशी गाणी ऐकत, आमची सकाळ बहारीने जाते.

आज मी अशीच गीते ऐकताना, मला लक्षात आलं की कोणत्याही गायक गायिकेची काही गीते आपल्याला आवडतात, मनाला भावतात, तर काही आपल्याला बिलकुल आवडतच नाहीत! असं कां होतं ह्याचं उत्तर शोधताना, मला लक्षात आलं की, बहुतेक सगळ्याच बाबतीत हे असंच होत असतं. कुठलाही चित्रपट निर्माता हिरो-हिरॉईन घ्या. त्यांचे काही मोजके चित्रपट सुपरहिट होतात, तर बाकीचे फ्लॉप! खरं म्हणजे प्रत्येक वेळेला तीच मेहनत, तीच गुणवत्ता, तीच निष्ठा व परिश्रम सारं करून ती कलाकृती बनवली जात असते, परंतु सगळ्याच कलाकृती यशाचे दिवस बघतातच असं नाही. नाटकांचही तसंच.

खेळाडूंचे बाबतीतही वेगळं काही नाही. असाच एखादा ख्यातनाम खेळाडू शतका मागून शतकं मारतो खरा, परंतु तोच सिलसिला प्रत्येक सामन्यात त्याला करता येत नाही. बऱ्याच वेळेला तो फ्लाँप जातो, कधी कधी तर शून्यावरही आऊट होतो. काही मामुली रन्स काढतो. खेळाडूंचं जे, तेच राजकारण्यांचही. बघा, कुणी राजकारणी एखादा, काही वर्ष अक्षरश: डोक्यावर घेतला जातो, जिकडेतिकडे त्याचा उदोउदो होतो. परंतु बघता-बघता काळ बदलतो आणि डोक्यावर होता तो आता पायदळी तुडवला गेल्यासारखा, कुठेतरी अंधःकारमय दुनियेत फेकला जाऊन विसरलाही जातो.

घरी दारीही तोच अनुभव पहायला मिळतो. घरांमध्ये दोन तीन मुलं असली तर त्याच्यातला एखादा तरी फुकट जातो, बाकीचे थोडेफार यशस्वी होतात. म्हणजे उडदामाजी काळे-गोरे हा जो काही स्थायीभाव आहे, तो सातत्याने आपल्या नजरेस येतो.

हे असं का होतं हे मी जेव्हा शोधायला लागलो, तेव्हा माझ्या लक्षात आलंः अरे कदाचित हा निसर्गनियमच आहे. बघा सकाळची वेळ प्रसन्न आल्हाददायक असते, तर दुपार तापदायक, परत संध्याकाळी पुन्हा वेगळीच भावना आणि रात्र तर अगदी पूर्ण गहिरी, वेगळीच! म्हणजे एकाच दिवसात चार वेगवेगळे बरे-वाईट अनुभव आपल्याला सतत येत असतात. तेच ऋतूंचे बाबतीत सुध्दा! तीन-चार महिने पावसाळा सगळीकडे हिरवीगार रम्य सृष्टी नंतरचा हवाहवासा वाटणारा गुलाबी हिवाळा. तो संपतो न संपतो, तोच रखरखीत असा तापदायक उन्हाळा. असे हे ऋतुचक्र युगानुयुगे चालू आहे.

सारांश काय तर नित्य नवीन बदल हाच निसर्गाचा अलिखित नियम आहे. काही चांगलं, तर काही त्रासदायक, काही सुखदायक तर काही दुःखदायक; अशा तर्‍हेचे विविध अनुभव घेणं हेच तर जीवन असतं! म्हणूनच सुखदुःख ही आलटून-पालटून येत रहाणारच असतात. सुखान हुरळून जाऊ नये अन् दुःखाने त्रासून! सगळ्यांचे सगळेच आयुष्य काही दु:खी किंवा सुखी समाधानी नसते.

प्रत्येकाच्या जीवनाची वाटचाल ही त्याच्या त्याच्या नशिबाने म्हणा प्रारब्धाने म्हणा, ही अगदी आगळी वेगळी असते. पहा, गीते ऐकताना विचार करता करता, कुठे होतो आणि कुठे आलो! पण ह्या मंथनातून, एक चांगलं साधलं, उमजलं ते म्हणजे आपल्या सभोवताली जे घडत असतं जे आपल्याला अनुभवायला येत असतं, ते जसंच्या तसं स्वीकारणं आणि पुढे जाणं हाच खरा पुरुषार्थ आहे.

स्थितप्रज्ञ व्हा, हे जे भगवान श्रीकृष्णाने सांगून ठेवलयं, ते खरोखरच अनुकरणीय आहे. अशी द्रुष्टी येणं, असा स्वभाव बनणं निश्चित कठीण आहे. पण ते तसं आपल्याला जमलं तर आपले जीवन अधिक संतोषजनक होईल.

सुधाकर नातू
९/८/'१९

असेच अनेक विचारप्रवर्तक लेख वाचण्यासाठी
माझ्या ब्लॉगची लिंक उघडा, शेअर करा:

http//moonsungrandson.blogspot.com

शनिवार, ३ ऑगस्ट, २०१९

"फुलांचे झाले अश्रू":


 "फुलांचे झाले अश्रू!":

मराठी माणसाचे नाटकाचे वेड सर्वश्रुत आहे. सर्वसाधारणपणे वर्तमानपत्रातील जाहिरात बघून व तेथे आलेले परीक्षण बघून रसिक नाटकाला जाण्याचे ठरवत असतात. सहाजिकच नवीन येणाऱ्या नाटकाचे परीक्षण पहिल्या काही प्रयोगांच्या आसपासच येणे आवश्यक ठरावे. कारण त्यामुळे त्या नाटकाविषयी रसिकाला योग्य ती माहिती होते आणि त्याची जशी आवड असेल त्याप्रमाणे, तो त्या नाटकाला जायचे की नाही, हे ठरवू शकतो.

ह्या पार्श्वभूमीवर बहुतांशी वर्तमानपत्रे नवीन नाटकाचे परिक्षण सत्वर देतात असे अनुभवास येते आणि ते योग्यही आहे. परंतु एका लोकप्रिय दैनिकात कधी कधी नाटकाचे बरेच प्रयोग होऊन गेल्यानंतर देखील, कधीही त्या नाटकाचे परीक्षण, एक जुने जाणते नाट्यपरीक्षक टीकाकार नाट्य परिक्षण लिहीत असतात, हे माझ्या द्रुष्टिस आले आहे. अर्थात कोणी परीक्षण कधी लिहावे व ते कधी प्रसिद्ध करावे हे स्वातंत्र्य, अर्थातच त्या त्या वर्तमानपत्राला आणि त्या त्या नाट्य परीक्षकाला आहे, यात वादच नाही. परंतु केवळ तो जनमान्य जुना नाट्य परीक्षक आहे म्हणून ते, इतक्या उशिरा छापावे कां, हा निर्णय त्या त्या वर्तमानपत्राने घ्यायचा असतो.

प्रा. वसंत कानेटकर लिखित "अश्रूंची झाली फुले" या नाटकाचे काही मर्यादित प्रयोग होणार होते. त्याप्रमाणे अर्ध्याहून अधिक प्रयोग होऊन गेल्यानंतर, जेव्हा ह्या नाटकाचे, त्याच मान्यवर नाट्यपरिक्षकाचे सविस्तर परीक्षण त्याच दैनिकात आले. त्यामुळे हे सारे विचार माझ्या मनात आले. इतक्या विलंबाने परीक्षण लिहिण्याचे प्रयोजन काय हा प्रश्न निर्माण झाला. अशा परिक्षणाचा फायदा कोणाला कसा होणार, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मुद्दा केवळ हाच की शक्यतो कुठल्याही नाटकाचे परिक्षण वेळेवर येणे, संबंधित सर्वांना अपेक्षित असते आणि तसे ते यावे हा.

आता या परिक्षणाबद्दल जर बोलायचं झालं तर ते ह्या नाट्यप्रयोगाची भलामण करणारेच दिसते. अर्थात तो त्या नाट्य परीक्षकाच्या स्वतंत्र अविष्कार करण्याच्या हक्काचा मुद्दा आहे. मला या नाटकाच्या बद्दल वेगळंच काही मांडायचं आहे. मी देखील हे नाटक रंगभूमीवर आले तेव्हा आवर्जून रवींद्र नाट्य मंदिर मधील प्रयोगाचे तिकीट काढले होते. दुर्दैवाने तो प्रयोग काही अपरिहार्य कारणामुळे रद्द झाला होता. म्हणून पुन्हा मुद्दामून आगाऊ तिकीट काढून मी हा नाट्यप्रयोग दुसऱ्या नाट्यगृहात बघितला.

परंतु तेव्हा त्याचा माझ्यावर विशेष प्रभाव पडला नाही कारण मी पूर्वीचे नाटक बघितले होते, त्यातून हा प्रयोग अगदीच मिळमिळीत वाटला. सध्या अतिशय लोकप्रिय असलेला सुबोध भावे याच्यासाठी लोक हा प्रयोग बघायला आवर्जून जात आहेत हे खरेच. परंतु डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांच्या लाल्या पुढे, सुबोधचा लाल्या पुष्कळसा नेभळट आणि अविश्वसनीय वाटतो. जी बेदरकारी आणि तडफ डॉक्टरांची दाखवली होती, त्या पुढे सुबोधचा हा लाल्या अगदीच बाल्या भासतो. तीच गोष्ट विद्यानंद झालेल्या पणशीकरांच्या विद्यानंद पुढे, शैलेश दातार ह्यांचा विद्यानंद हा आपल्या भूमिकेला तितकासा योग्य न्याय देत नाही असे वाटते. सतत बदलत जाणारे नेपथ्य आणि ज्या मुद्द्यावर विद्यानंदांना श्यामच्या कृत्यामुळे तुरुंगात जायला लागते आणि त्यांचा जणू अंतर्बाह्य कायापालट होतो व प्रामाणिकपणाचे गोडवे गाणारा हा सज्जन नायक, दर्जन खलनायक बनून जातो, ते तितकेसे पटत नाही. कारण ज्या घटनेमुळे हे होते, ती अधिक विस्तृतपणे दाखवली गेलेली नाही.

शामच्या व्यक्तिरेखेचा ह्या नाट्यातील सहभाग दुर्दैवाने नीटसा ठळकपणे प्रेक्षकांसमोर न आणल्याने हे नाटक शेवटी कंटाळा येईल इतके रेंगाळत गेल्यासारखे भासते. सहाजिकच विद्यानंद लाल्याच्या भेटीचा क्लायमॅक्स आवश्यक ती उंची गाठू शकत नाही. केवळ सुबोध भावेंची मराठीतला सुपरस्टार ही प्रतिमाच उरलेले प्रयोग (कसेबसे?) पुढे नेऊ शकेल इतकेच.

सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणतेही नाटक हे त्या त्या काळाचा आरसा असते. अगदी मोजकीच नाटके कालातीत आणि केव्हाही पटू शकणारी असतात. "अश्रूंची झाली फुले" हे नाटक
तीन चार दशकांपूर्वी जेव्हा आले, तेव्हाची जीवनशैली, नीतिमूल्ये आणि एकंदर सामाजिक भावनिक कौटुंबिक माहोल हा पूर्णतया वेगळा होता आणि एकंदर सामाजिक भावनिक कौटुंबिक माहोल हा पूर्णतया वेगळा होता.

परंतु सध्याचा माहोल हा पूर्णतया कलियुगाला साजेसा असा, भ्रष्टाचाराने बरबटलेला आणि वैश्विक मूल्ये तितकीशी न मानणारा पूर्णतया आत्मकेंद्री असा झालेला असल्यामुळे, हे नाटक मूलत: आज सध्याच्या कालप्रवाहात बरोबर बसत नाही. त्यामुळेही कदाचित या सर्व मंडळींनी मेहनत घेऊन देखील प्रयोग आपल्या मनावर तितकेसा परिणाम करत नाही. जितके या नाटकाला पूवी डोक्यावर घेतले गेले, तितके आत्ता घेतले जाईल या भावनेने रंगभूमीवर आणलेले हे नाटक त्यामानाने अपयशी ठरले आहे असे माझे मत आहे. अर्थात या मताशी सहमत व्हावे किंवा नाही हा ज्याचा त्याचा मुद्दा आहे मी मला जसे पटले सुचले तसे लिहिले.

सुधाकर नातू