शनिवार, ७ ऑगस्ट, २०२१

"जादुचा कंदील !":

 "जादूचा कंदील !":

सिनेमा हा एक जादूचा कंदील आहे हे मला श्री. अवधूत परळकर यांचा "आठवणींचे असेच असते" या पुस्तकातील लेख वाचून समजले. जागतिक सिनेमाच्या अद्भुत दुनियेमधून आपल्याला मुक्त संचार करणारा, करवून आणणारा हा लेख खरोखर मनावर एक असीम ठसा उमटवून गेला.

सिनेमा कां बघावा, कसा बघावा त्यासाठी कोणती दृष्टी आवश्यक आहे, त्याचप्रमाणे लेखातील- लेखनातील शब्दांची भाषा आणि सिनेमातील चित्रांची भाषा, यातील फरक कोणता आणि तो कसा समजून घ्यायचा, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या लेखामधून मिळून गेली. त्यावरून लक्षात आले की, प्रत्येक माध्यमाची एक वेगळी भाषा, आगळी खुमारी असते, त्या त्या माध्यमाचा आस्वाद घेण्यासाठी विशिष्ट प्रकारची आवड असावी लागते, हे जसे उमजले आहे. त्याचप्रमाणे, प्रत्येक माध्यमाच्या शक्तीस्थळांचा योग्य तो प्रत्यय आल्याशिवाय, ते माध्यम आपल्यावर गारुड करत नाही हेही उमजले.

जाणिवा नेणीवांच्या महासागरामध्ये कसंही, कुठेही वहावत जाणार्या जीवनाचा एक वेगळा अर्थ, मर्म आपल्याला ह्या अशा विविध माध्यमांमधून समजता येऊ शकते, याचीही एक अनाहुत जाण ह्या लेखाच्या वाचनावरून मनःपटलावर उमटली. त्यासाठी रसिकता मात्र रोमरोमात हवी आणि ती जर असेल, तर जे जे चांगले आहे, ते ते तिथे तिथे जाऊन त्या त्या माध्यमातून रसिक मिळवू शकतो, नव्हे अट्टाहासाने तो मिळवतच असतो. जर अंगी रसिकता असेल, तर जीवन अधिकाधिक समृद्ध होत कसे जाते हेही पाहता पाहता मला वाटू लागले. नशिबाने कणभर का होईना अशा प्रकारची रसिकता आपल्यात जरूर आहे, ह्याची जाणीव हा संदेश लिहीत असताना आपोआपच माझ्यामनामध्ये जागी झाली.

"आठवणींचे असेच असते":
श्री अरुण शेवते संपादित आठवणींचे असेच असते हा ऋतुगंध दिवाळी अंकांतील विविध वर्षांत मध्ये प्रसिद्ध झालेल्या २५ च्या आसपास विविध क्षेत्रातील नामवंतांच्या लेखांतून प्रकट होणारा वैविध्यपूर्ण जीवनपटलांतील वेचक वेधक आणि मनोज्ञ आठवणींचा संच आहे.

सर्वश्री मृणाल गोरे, अरुण साधू, कुमार केतकर, निळूभाऊ फुले, रणजित देसाई, गिरीश कुबेर, गुलजार, डॉक्टर उदय निरगुडकर, शंकर वैद्य, नाना पाटेकर, अमृता शेरगील.. इत्यादी इत्यादी...आणि अर्थातच अवधूत परळकर अशांच्या आठवणींची जादुई मांदियाळी ह्या संग्राह्य पुस्तकात आहे.

"विश्वरुप दर्शन":

मृणाल गोरे आणि बंडू गोरे यांचे उणेपुरे १० वर्षाचे सहजीवन आणि त्यातील त्या दोघांचे देशसेवा आणि समाज सेवा यासाठी घेतलेले व्रत, ह्या पुस्तकात वर्णिलेले आहे. त्या वेळच्या अनेक गोष्टीपैकी एक कदाचित माहीत नसलेली गोष्ट म्हणजे, मृणालताईंनी एम. बी. बी. एस. ला प्रवेश घेऊन पहिल्या वर्षाची परीक्षा दिल्यानंतरच शिक्षण सोडून स्वतःला संपूर्ण समाजसेवेत झोकून दिले होते, ही. खरंच त्या वेळची तरुण पिढी, स्वातंत्र्य मिळविण्याच्या ईर्षेने आणि समाजाच्या हितासाठी आपण काहीतरी योगदान दिलेच पाहिजे, अशा मनोवृत्तीची होती, हे देखील त्या लेखातून उमजते.

शिरीष पै, अर्थात आचार्य अत्रे यांच्या कन्या, त्यांच्या जीवनपटाचा बालपणापासूनचा जो चित्रविचित्र घडामोडींचा आलेख आपल्यासमोर उभा राहतो, तो देखील असाच लक्षात ठेवण्याजोगा. त्याकाळचे जुने पुणे, तेथील वाडासंस्क्रुती त्याकाळचा संयुक्त महाराष्ट्राचा लढा आणि या साऱ्यांमधील आचार्य अत्रे यांच्यासारख्या पहाडाएवढे कर्तृत्व व भाषाप्रभूत्व असलेला, वक्ता दशसहस्त्रेषु आणि त्यांच्याच भाषेत दहा हजार वर्षात असे व्यक्तिमत्व एखादाच घडते, त्याचेही चित्र इथे हक्क करून जाते.

याउलट श्री यशवंतराव गडाख यांच्या लेखामधून
मेळघाट व गडचिरोलीमधील आदिवासी समाजाचे जे दर्शन घडते आणि आमटे कुटुंबीयांच्या असामान्य योगदानाचे जे काही वर्णन आहे ते निश्चितच प्रेरणा देणारे आहे. त्याचप्रमाणे आपल्या देशामध्ये अजूनही असा अशिक्षित, त्याचप्रमाणे अत्यंत मागासलेला, बाहेरच्या जगाची कुठलीही जाणीव नसलेला समाज येथे जंगलामध्ये राहून आपले जीवन व्यतीत करतो आहे, हे देखील समजून मनाला चटका बसतो.

कुमार केतकर ह्यांनी त्यांच्या रशियामधील प्रवासाचे जे वर्णन केले आहे, त्यामुळे तेथील एकंदर परिस्थिती ही "दाखवायचे दात वेगळे आणि खरे वेगळे" अशी किंवा "बडा घर पोकळ वासा" अशी होती हे प्रकर्षाने ध्यानात येते. कोणताही इझम् हा सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात सुखसमाधान आणतोच असं नाही हेच यावरून मनावर ठसते.

अमृता प्रीतम यांच्या कथेमधून ज्योतिष आणि पुढे काय होणार याची स्वप्नांतून माणसाला कशी पूर्वकल्पना येऊ शकते, त्याची अद्भुत व चित्तथरारक कहाणी आहे. तर डॉक्टर उदय निरगुडकर यांच्या प्रशिक्षणानिमित्त केलेल्या ब्राझीलवारी मधून, त्या दूरवरच्या देशातील खेडोपाडींचे नगर शहरांचे, तेथील समाज जीवन तसेच विविध व्यक्तिमत्वांचे आपल्याला आतून-बाहेरून दर्शन होते. अमृता शेरगील ह्यांच्यासारख्या फक्त २८ वर्षांचं आयुष्य लाभलेल्या जागतिक कीर्तीच्या चित्रकर्तीचे कलात्मक चित्राविष्कार आणि त्याचबरोबर त्यांच्या जीवनात येणाऱ्या अनेक माणसांबरोबर कस कसे अनोखे जगावेगळे भावबंध होते, तसेच आयुष्यातील नाट्यमय घडामोडी आणि उलथापालथीचे प्रसंग आपल्याला खरोखर चटका लावून जातात.

एवढे पुरे नाही म्हणून की काय, मुकेश माचकर ह्यांनी नेपोलियन गांधी अब्राहम लिंकन, विवेकानंद आदी अनेक महान व्यक्तींच्या आठवणींमधून, खूप मनोरंजक घटना वर्णिलेल्या आहेत. त्यामधून अनेकानेक मान्यवर व्यक्तीमात्रांच्या जीवनातील चटकदार भेळपुरी बरोबर, एक मसालेदार अशी चव आणणारे अनुभव त्या छोट्या व गंमतीशीर गोष्टींमधून येतात.

ही केवळ वानगीदाखल विविध अशा अनुभवांची जीव़ंत उदाहरणे. अशा जवळजवळ २५ व्यक्तींची व्यक्तीचित्रे किंवा जीवनपटांतील आठवणी या पुस्तकात शोभादर्शक यासारख्या वेगवेगळ्या अशा अनुभूतींची जाणीव करून देतात. उगाच मी म्हटले नाही की, जणू हे पुस्तक वाचन म्हणजे समाजजीवनाचा, मानवजीवनाचा विश्वरुप दर्शनाचा आराखडा आहे.

प्रत्येकाने वाचावेच असे हे पुस्तक आहे, कारण त्यामधून जणू प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाची कादंबरी आणि त्यामधून आगळ्यावेगळ्या अशा जीवन पटलांचा आस्वाद आपल्याला घेता येतो आणि जणु समस्त मानवी जीवनाचे विश्वरूप दर्शनच अगदी जवळून, त्या वाचनातून होते हे मला जरूर सांगावेसे वाटते.

धन्यवाद
सुधाकर नातू

ता.क"सुधा" डिजिटल दिवाळी अंक'२१:
प्रकाशित करण्याचे नेहमीप्रमाणे ठरविले आहे.....
खास आकर्षण......
'नियतीचा संकेत': अर्थात ग्रहबदलानुसार "अनुकूल गुणांवर आधारित संपूर्ण वार्षिक राशीभविष्य लिहून शुभारंभ केलाही आहे......
ह्या शिवाय........
ह्रदयसंवाद, आजोबांचा बटवा, टेलिरंजन....
"वाचा, फुला आणि फुलवा".......
अशी वैविध्यपूर्ण साहित्यिक मेजवानी......

आपली मागणी आजच 9820632655 ह्यावर whatsapp ने
किंवा sudhakarnatu@hotmail.com वर ईमेलने नोंदवा......
अपेक्षित प्रतिसाद मिळाल्यावर आँनलाईन मानधन मूल्य रु १००/-कसे पाठवावयाचे ते कळविण्यात येईल.....

धन्यवाद
सुधाकर नातू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा