"साफसफाईतील, "खजिना"-भाग -१": !
आज कपाटातील खणाचीसाफसफाई करताना, बाईंडींग केलेल्या माझ्या संग्रहातील हा "खजिना" !:
हे बाड माझ्याकडे बरीच वर्षे पडून होते त्यामध्ये काही स्वनिर्मित साहित्याचे अवश्य लेख स्वरूपात अथवा वर्तमानपत्रातील पत्रव्यवहाराच्या स्वरूपात होते तर काही मला आलेल्या मान्यवरांच्या प्रतिसादा चा रूपात होते प्रथम माझ्या स्वनिर्मित साहित्यातील काही निवडक अंश येथे पेश करतो. दुसऱ्या भागात मान्यवरांचे प्रतिसाद देणार आहे.
"अणुकथा":
"मीठ"
नीट साऱ्या तपासण्या करून झाल्या,
मला मूल होऊ शकणार नाही हे निश्चित झाले. संसारात सारच उरले नाही.
चारचौघीत झिडकारलेली मी झाले.
"त्या" क्षणांची तर गोडीच नासून गेली.
एवढ्या गडगंज मालमत्तेला वारसा मिळावा,
दुडूदुडू पाउलांनी घर-अंगण फुलावे,
म्हणून...म्हणून.....
त्याने दुसरे लग्न करावे हा माझा हट्ट.
एक जगावेगळी मागणी !
त्याचा निक्षून नकार,
खूप अनामिक सुख संवेदना नकळत निर्माण झाल्या.
पण....पण....
तेव्हापासून एक माझा नवाच हट्ट !
त्यानही त्याची पूर्ण तपासणी करून घ्यावी हा.
त्याचे प्रथम दुर्लक्ष.
माझा आग्रह, त्याचा नकार, माझा अट्टाहास.
त्याचे चवताळणे आकांडतांडव करणे.
तेव्हापासून तर,
एक नवीनच शंका मन पोखरत्ये,
हा तरी पुरुष-पूर्ण पुरुष आहे कां, ही !
आणि...आणि....
आधीच बेचव असलेल्या,
नीरस संसारात,
मीठ की हो पडून गेले.
सुधाकर नातू
("रोहिणी अंक" ऑगस्ट १९८५)
--------------------------
"एकटेपणा":
एकटेपणाच्या आव्हानातील अस्तित्वाचे हे प्रश्न: 'बरं मग जगायचे कशासाठी? कोणासाठी?' असा विचार नेहमीच प्रत्येकाच्या मनात येतो. माणसाची भौतिक, वैचारिक, मानसिक व आध्यात्मिक प्रगती केवळ त्याच्या चिंतन क्षमतेमुळे होत राहिली आहे. या नव्या दिशेने चिंतनशक्तीचे प्रेरणादायी स्रोत निर्माण होत आहेत. इतिहासाचा दाखला देऊन असे म्हणता येईल की, सामाजिक सुधारणांची लाट गेल्या शतकात आली आणि इतकी वर्षे कोशात असलेली स्त्री उंबरठ्याबाहेर येऊन, आपले स्वत्व शोधू लागली.
मी कोण आहे, मला जगायचे आहे म्हणजे काय करायचे आहे, असे प्रश्न अनेकांना पडू लागावेत ही चिंतेची बाब बिलकूल नसून मानव जीवनाच्या उत्क्रांती प्रवासातील एक आनंददायी गरुड झेप आहे. याचा एक कटु अर्थ स्पष्ट आहे, असे प्रश्न पडण्याआधी मानवसमाज जे काही जीवन जगत होता, त्याला मर्यादा होत्या. इतर काही जणांच्या जीवनकक्षेच्या थोडेसे पुढे इतकीच जन्मणे जगणे-मरणे या साखळीची कक्षा होती.
एकत्र कुटुंब, विभक्त कुटुंब, स्वतंत्र व्यक्तिमत्व या प्रवासातील एका महत्त्वाच्या टप्प्यावर आता आपण येऊन ठेपलो आहोत. ज्ञानेंद्रिये व त्यावर नियंत्रण ठेवणारी विचारशक्ती यांच्या चिंतनाच्या माध्यमातून, विचार करून माणूस आपल्या अस्तित्वाचे खरेखुरे मर्म शोधून काढू शकणार आहे, ते आजच्या एकटेपणाच्या अस्वस्थतेच्या आव्हानामुळे, ज्ञानामुळे माणसाच्या बुद्धीचा प्रचंड आवाक्याचा दणका बसून या मूलभूत प्रश्नांची उत्तरे आणि जीवन जगण्याचा नवा मार्ग म्हणूनच मिळणार आहे.
सुधाकर नातू
माहीम, मुंबई १६
( "बहुतांची अंतरे" महाराष्ट्र टाईम्स, २१ नोव्हेंबर ९८)
-----------------------------
"कोठे चीन आणि कोठे आपण?":
चीनच्या प्रबळ वेगवान आर्थिक प्रगतीचे सार्थ विवेचन करणारे दोन लेख म. टा. मध्ये वाचले. त्यातील एका वाक्यातच फार मोठे सत्य लेखकाने सांगितले आहे:
"आपल्या देशाचे, देशाच्या नागरिकांचे भले व्हावे, अशी मनापासूनची कळकळ चीनच्या नेत्यांना होती व आहे हे चीनचे सद्भाग्य."
आपल्याकडे शतकापूर्वी स्वातंत्र्यलढ्याच्या काळात, अगदी अशीच स्थिती होती. देशहितासाठी सर्वस्वावर लाथ मारणारे अनेक लहान थोर पुढारी भारताला लाभले होते. म्हणूनच भारताला स्वातंत्र्याचा
मंगलकलश प्राप्त झाला. त्यानंतर मात्र गेल्या ५० वर्षांचा आपला इतिहास पाहता, जो तो नेता आणि सामान्य माणूसही आपले स्वतःचे भले कसे होईल, याचीच चिंता करून स्वार्थ साधण्याचा धडा गिरवत असल्याने, आपली सर्वच आघाड्यांवर पिछेहाट होत आहे.
लोकसंख्यावाढ, बेकारी, दारिद्रय रेषेखालील जनता, निवारा, पिण्याचे पाणी इत्यादी इत्यादी अनेक बाबतीत याच पन्नास वर्षात चीन आपल्या कितीतरी योजने पुढे गेला आहे. त्यामागे तेथील नेत्यांची दूरदृष्टी व देश हिताची आस कारणीभूत आहे. घोटाळ्यांच्या जंगलामागे घोटाळणार्या भारतवासीयांनासमोर मात्र भयानक अंधकार आहे.
सुधाकर नातू
माहीम, मुंबई.
( बहुतांची अंतरे महाराष्ट्र टाईम्स, १५/७/१९९७)
----------------------------
शेवटी,
माझी एक पूर्वप्रकाशित कविता:
"शोध":
उधळुनी अनंगाचे
अनंत रंग,
घेऊनी सहवासाचे
विविध सुगंध,
शोधिता परि
मिळेना,
प्रीतीची सरि
जुळेना.
असे कां ती
भावनांची असोशी?
कां ती मुळी
वासनांची कासाविशी?
काहीच कळेना
तार ही जुळेना.
अन्
येशी अवचित जीवनी
'तिला' नकोशी मला हवीशी,
खुपता मज,
आसवे तव लोचनी.
खुलता सुयश तवगे,
सुहास्य मम आननी !
अन्
गवसे सहजी अर्थ,
प्रीतीचा हाची गर्भ,
आपुलकीचे सारे मर्म,
एकमेकांचा खरा दर्द,
एकमेका देई दर्द !
सुधाकर नातू
('रोहिणी' मासिकातली कविता )
----------------------------
धन्यवाद
सुधाकर नातू
ता.क.
"व्यावहारिक जीवनोपयोगी विषय व ज्योतिषावरील अनेक विडीओजचा खजिना":
ही लिंक उघडा......
https://www.youtube.com/user/SDNatu.
विडीओज् आवडले........
ही लिंक शेअर करा.......
तर चँनेल subscribe सुध्दा करा......
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा